अभिषेक तेली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे सर्वच क्षेत्रांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला होता आणि त्यांची आर्थिक बाजूही कोलमडून पडली होती. परंतु आता करोनाविषयक सगळे निर्बंध हटवल्यानंतर सर्वच क्षेत्रं ही पूर्वपदावर येत आहेत. नाटकाची तिसरी घंटा वाजून आणि मखमली पडदा उघडून नाटय़क्षेत्रसुद्धा हळूहळू सावरतंय व प्रेक्षकांची पावलं ही नाटय़गृहांकडे वळत आहेत. व्यावसायिक रंगभूमी नव्याने भरारी घेत असताना प्रायोगिक रंगभूमीची सध्या काय अवस्था आहे? विषयांची निवड कशा पद्धतीने केली जाते आहे आणि प्रामुख्याने नेमके कोणते विषय हाताळत समाजप्रबोधन करण्याचे काम सुरू आहे? याचसोबत तालमीच्या जागेचा प्रश्न, खर्चाचा मेळ कसा जमवला जातोय, प्रत्यक्ष प्रयोग करताना येणाऱ्या अडचणी आणि प्रेक्षकांचा प्रायोगिक नाटकांना मिळणारा प्रतिसाद, याबाबत तरुण रंगकर्मीसोबत संवाद साधून घेतलेला हा आढावा.

मुंबईत काही वर्षांपूर्वी ‘गंधर्व कलामंच’ या संस्थेची स्थापना निनाद कदम या तरुणाने आपल्या मित्रमंडळींसह केली होती. ही संस्था विविध विषयांवर नाटय़प्रयोगांचे सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करीत असते. पहिल्या टप्प्यातील टाळेबंदीनंतर नवीन नाटकाच्या तालमीला या संस्थेने सुरुवात केली होती, पण सतत बदलणाऱ्या नियमावलीचा फटका या संस्थेला बसला होता. एका नाटय़प्रयोगासाठी पन्नास टक्के प्रेक्षक क्षमतेनुसार तिकिटे छापण्यात आली होती. पण नाटक पाहण्यासाठी केवळ पन्नास जणांना नाटय़गृहात प्रवेश देण्यात येईल, या आठवडय़ाभरात बदललेल्या नियमामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करण्याची वेळ गंधर्व कलामंचवर आली होती. काही प्रेक्षकांचे पैसे परत करण्यात आले, तर घरच्या मंडळींना व काही प्रेक्षकांना एका छोटय़ा सभागृहात नाटक दाखविण्यात आले. यानंतर करोनाविषयक सर्वच निर्बंध शिथिल झाल्यानंतर व्यावसायिक व प्रायोगिक रंगकर्मी नवीन विषयांसह कामाला लागले. ‘मोठय़ा संस्था आणि निर्माते आधीच भारंभार डिपॉझिट भरून महत्त्वाच्या वेळेचे व दिवसाचे नाटय़गृहातील स्लॉट्स आरक्षित करत असल्यामुळे आम्हा प्रायोगिक नाटकवाल्यांना अपेक्षित दिवसाचे स्लॉट्स मिळत नाहीत. टाळेबंदीमध्ये घरबसल्या ऑनलाइन गोष्टी बघण्याची प्रेक्षकांना सवय झाल्यामुळे पूर्वीसारखा प्रतिसाद सध्यातरी मिळत नाही आहे. प्रेक्षकांना नाटय़गृहांकडे वळविण्यासाठी वर्तमानपत्रातून जाहिरात आणि इतर प्रमोशन फंडे यांचा आधार घ्यावा लागतो आहे. नूतनीकरण झाल्यामुळे आणि टाळेबंदीमुळे झालेला तोटा भरून काढण्यासाठी मुंबईत अनेक हॉल्सनी आपले भाडे वाढविले आहे. यामुळे आम्ही एका शाळेत तालीम करत आहोत, तर कधी कोणाच्या घरी अथवा कॉलेजमध्ये संहितेचे वाचन करतो’, असे निनाद कदम सांगतो. प्रायोगिक रंगभूमीवरचा एकेक प्रयोग करणं हा खर्चाचा डोंगर तोलून धरण्यासारखे आहे.

टेम्पोचे भाडे, प्रकाशयोजना, इतर तंत्रज्ञान वापरण्यासाठी व्यावसायिक प्रमाणेच प्रायोगिकवाल्यांना पैसे आकारले जातात, इथे कोणतीही सवलत मिळत नाही. नाटकात संस्थेतील सदस्यच काम करत असल्यामुळे ते मानधन घेत नाहीत, फक्त बाहेरून जे तंत्रज्ञ येतात त्यांना मानधन दिले जाते. अशाप्रकारे खर्चाचे मेळ ही संस्था जमविते. तरीही नाटकाच्या प्रेमाखातर तरुणाई प्रायोगिक रंगभूमी जागवताना दिसते. सध्या अरुणा ढेरे यांच्या कवितांवर आधारित ‘अनय’ या दोन अंकी मराठी नाटकाची निर्मिती गंधर्व कलामंचने केली आहे. अरुणा ढेरे यांच्या ‘पुरुष असाही असतो – अनय’ या कवितेला अनुसरून या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व गीतलेखन स्वत: निनाद कदम याने केले आहे. या नाटकाचे संगीत हे लाइव्ह स्वरूपाचे असून कथ्थक नृत्याचे सादरीकरणसुद्धा नाटकात करण्यात येते.

सध्या व्यावसायिक नाटकांना चांगला प्रतिसाद मिळत असून प्रायोगिक रंगभूमीवरसुद्धा निरनिराळे विषय अनेकांकडून हाताळले जात आहेत. याचसोबत विविध केंद्रांवर महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरीसुद्धा सुरू असल्यामुळे प्रायोगिक नाटय़वर्तुळात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते आहे. मात्र तालमीसाठी जागा मिळवण्यापासून अनेक समस्या आजही तशाच आहेत. ‘नाशिकमध्ये ऋतुरंग आणि वसंत व्याख्यानमाला हे दोनच हॉल्स तालमीसाठी सहज उपलब्ध होतात. स्वत:ला महत्त्वाच्या संस्था म्हणवणाऱ्या नाशिकमधील काही संस्था तालमीसाठी मात्र हॉल देत नाहीत आणि जर दिला तर भरमसाट भाडे आकारतात, हे खूप चुकीचे आहे. जर तुम्हाला एक नाटय़चळवळ व नाटय़सृष्टी म्हणून पुढे जायचे असेल, तर तालमीसाठी जागा उपलब्ध करून देत एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. नाटक पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने प्रेक्षकांनी नाटय़गृहांकडे वळले पाहिजे, तरच नाटय़क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतील. तालमीच्या जागेचा हा प्रश्न सहसा मुंबईत उद्भवत नाही’, असे लेखक प्राजक्त देशमुख सांगतो. सध्या प्राजक्त देशमुख यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले ‘जाळियेली लंका’ हे संगीतमय दीर्घाक स्वरूपातील नाटक रंगभूमीवर सुरू आहे. माध्यमांचे मुख्य काम हे जनतेशी संवाद साधणे आहे, पण अलीकडच्या काळात माध्यमांकडून चुकीच्या पद्धतीने संवाद कसा साधला जातोय, यावर हे नाटक भाष्य करते. या नाटकाची निर्मिती ही आगाज प्रॉडक्शन्स – प्रयोगपर्व यांनी केली आहे. तर रुईया नाटय़वलयचे या नाटकासाठी सहकार्य लाभले असून रुईया महाविद्यालयात तालमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचसोबत दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘तो राजहंस एक’ या दीर्घाक स्वरूपातील प्रायोगिक नाटकात अनिता दाते, प्रणव प्रभाकर या कलाकारांसह प्राजक्त देशमुख स्वत: अभिनय करतो आहे.

अभिनय, कल्याण या संस्थेचे अभिजित झुंजारराव सांगतात की, करोनाच्या काळानंतर खूप चांगले स्थित्यंतर प्रायोगिक रंगभूमीवर पाहायला मिळते आहे आणि मागील दीड वर्षांच्या कालखंडामध्ये चांगल्या विषयांवर आधारित नाटकं रंगभूमीवर सादर होत आहेत. समाजकारण, राजकारण, पर्यावरण, भौगोलिक परिस्थितीत झालेले बदल, जगण्याची बदललेली परिभाषा या सगळय़ा गोष्टींचा विचार करून निरनिराळे विषय रंगभूमीवर तरुण रंगकर्मीकडून हाताळले जात आहेत. मात्र, तालमीच्या जागेचा प्रश्न आजही कायम असल्याचं ते सांगतात. करोनानंतर आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी हॉल मालकांनी भाडेवाढ केली आहे. यामुळे जर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तालमीसाठी जागा उपलब्ध करून दिली तर खर्च आटोक्यात येईल. याचसोबत प्रायोगिक नाटकांच्या सादरीकरणासाठी सहज नाटय़गृहे उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे विविध शहरांमध्ये सादरीकरणासाठी जागा उपलब्ध झाल्या पाहिजेत, असा आग्रह धरणाऱ्या झुंजारराव यांनी एकांकिका स्पर्धा व राज्य नाटय़ स्पर्धा पुन्हा सुरू होणे, ही  प्रायोगिक नाटक करणाऱ्या कलाकारांसाठी जमेची बाजू असल्याचं मत व्यक्त केलं. सध्या त्यांची प्रायोगिक रंगभूमीवर ‘साम्राज्यम’, ‘जीर्णोद्धार’, ‘रंगीत संगीत गोंधळ’, ‘ए आपण चहा घ्यायचा?’ ही नाटकं सुरू आहेत.

नाटकाची प्रसिद्धी करणं, नेपथ्य उभारणं, वेशभूषा – रंगभूषा, वाहतूक, नाटय़गृहाचे बुकिंग इ. गोष्टींसाठी जेवढा खर्च व्यावसायिक रंगभूमीला लागतो, तेवढाच खर्च हा प्रायोगिक रंगभूमीलासुद्धा येतो. मनोरंजनात्मक विषय हे व्यावसायिक नाटकांमधून आणि वैचारिक विषय हे प्रायोगिक नाटकांमधून हाताळले जातात, असं नेहमी बोललं जातं. पण नाटक हे नाटक असतं. व्यावसायिक आणि प्रायोगिक हा भेदभाव खोडून काढत तसंच ही दरी मिटवत आम्ही ‘वैचारिक रंगभूमी’ असा नवा पायंडा रचला आहे, असं ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्स’ या संस्थेची सायली पावसकर सांगते. सध्या या संस्थेचं मंजुल भारद्वाज लिखित व दिग्दर्शित ‘गोधडी’ हे नाटक सुरू आहे. निसर्गासोबत मनुष्याची जगण्याची एक पद्धत होती. त्या पद्धतीला अनुसरून मानवी विवेकाचा धागा कसा विणला जातो, यावर हे नाटक भाष्य करतं. या नाटकातील कलाकार हे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन पठारावर आणि मातीने लेपलेल्या जमिनीवर तालीम करतात. तर नदीच्या पात्रात उतरून आवाजाचा व स्वरांचा अभ्यासही केला जातो, असं तिने सांगितलं. ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्स’ ही संस्था सहयोग तत्त्वावर काम करते. नाटकानंतर प्रेक्षकांना भेटून त्यांच्याबरोबर आमची टीम नाटकाच्या विषयावर, संकल्पनेवर चर्चा करते. पुन्हा नाटक पाहायला येण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन केलं जातं. प्रेक्षकांना जमतील तेवढे पैसे तिकिटासाठी घेतले जातात. परिणामी नवीन प्रेक्षक येत राहतात आणि रंगभूमी बळकट होते, असं संस्थेचे तुषार म्हस्के सांगतात. असंख्य अडचणी सोसूनही वेगवेगळे विषय घेऊन प्रायोगिक रंगभूमी बळकट करण्यासाठी तरुण रंगकर्मीची सुरू असलेली धडपड नक्कीच सुखावणारी आहे.

‘मानसरंग शिष्यवृत्ती’ अंतर्गत प्रायोगिक रंगभूमीवर तीन नवी नाटकं डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेली साताऱ्याची ‘परिवर्तन’ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्यावर काम करते आहे. सध्या ही संस्था डॉ. हमीद दाभोलकर हे चालवीत आहेत. या संस्थेने अलीकडेच अभिजित झुंजारराव, क्षितीश दाते आणि सचिन शिंदे यांना मानसिक आरोग्यावर आधारित नाटक सादर करण्यासाठी ‘मानसरंग प्रकल्प’ अंतर्गत आर्थिक शिष्यवृत्ती दिली आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत सध्या अभिजित झुंजारराव दिग्दर्शित आणि श्रीपाद देशपांडे लिखित ‘रंगीत संगीत गोंधळ’, क्षितीश दाते दिग्दर्शित आणि ओंकार गोखले लिखित ‘न केलेल्या नोंदी’ व सचिन शिंदे दिग्दर्शित आणि दत्ता पाटील लिखित ‘तो राजहंस एक’ ही प्रायोगिक नाटकं सुरू आहेत. या तिन्ही नाटकांच्या संघांना डॉ. हमीद दाभोलकर, अतुल पेठे, डॉ. मोहन आगाशे, चंद्रशेखर फणसळकर, अश्विनी जोशी या दिग्गज मंडळींनी मार्गदर्शन केले आहे. ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी या नाटकांचा शुभारंभ करण्यात आला आणि या नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळून सकारात्मक चर्चासुद्धा झाली होती. या तिन्ही प्रायोगिक नाटकांचे येत्या काळात महाराष्ट्रभर प्रयोग होणार आहेत.

More Stories onविवाViva
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peeking experimental theatre audience to theaters professional theater ysh
First published on: 25-11-2022 at 00:02 IST