रसिका शिंदे
महाविद्यालयातील प्रत्येक नाटय़प्रेमी आणि एकांकिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे पुरुषोत्तम करंडक १९६३ मध्ये ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ संस्थेचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र वझे यांच्या स्मरणार्थ पुरुषोत्तम करंडक स्पर्धा सुरू केली गेली. या स्पर्धेच्या गेल्या ५७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धेत सादर झालेली कोणतीही एकांकिका करंडक मिळवण्याइतकी दर्जेदार नसल्याचं कारण देत परीक्षकांनी करंडक न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निकालाबाबत कला क्षेत्रातील मान्यवरांनी, नाटय़कर्मीनी याआधीच निषेध नोंदवला आहे. करोनानंतर खरंतर दोन वर्षांनी महाविद्यालयीन विद्यार्थी एकांकिका स्पर्धाना सामोरे जात आहेत. या दोन वर्षांत आर्थिक-सामाजिक घडीपासून मनोरंजनाच्या व्याख्येपर्यंत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे विविध आव्हानांना सामोरं जात एकांकिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध एकांकिका स्पर्धामधील सहभाग आणि मिळणारे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र त्याऐवजी करंडकच न देण्याच्या निर्णयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न व्हिवाने केला..

कोणतीही एकांकिका स्पर्धा म्हटली की एक-दोघे नाही तर संपूर्ण टीम एकांकिका स्पर्धेचं जेतेपद मिळवण्यासाठी अथक परिश्रम करत असते. एकांकिकेसाठी सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, वास्तववादी अशा अनेक आशयांचा विचार करत एकांकिकेचा नेमका विषय निवडावा लागतो. मग त्याचे लेखन, संवाद, संगीत या सगळय़ा बाबी एकेक करत जोडल्या जातात. या सगळय़ांना एकत्रित आणतो तो म्हणजे एकांकिकेचा संपूर्ण सेट. सेटवर कोणत्या प्रॉपर्टी लागणार? काय वेशभूषा करावी लागणार? या सगळय़ांच्या मागे विद्यार्थ्यांची मोठी टीम अथक परिश्रम करत असते. या सगळय़ा मेहनतीचे फळ म्हणजे त्या त्या स्पर्धेचं विजेतेपद. पण जर ते फळ त्या विद्यार्थ्यांना मिळत नसेल तर? यासंदर्भात बोलताना मुंबईतील साठय़े महाविद्यालयाचा निर्विघ्न भोसले म्हणतो, ‘‘नाटकाच्या तालमीसाठी किंवा नाटकात भाग घेण्यासाठी घरच्यांकडून परवानगी मागणे हे खरं तर आमच्यासमोरचं पहिलं मोठं आव्हान असतं. त्यानंतर अभ्यास सांभाळत तालीम करणे हे दुसरं महत्त्वाचं समीकरण आम्हा विद्यार्थ्यांना सांभाळावं लागतं’. घरच्यांकडून परवानगी मिळाली तरी पुढे एकांकिकेच्या तयारीसाठी महाविद्यालयाचे सहकार्य लाभणंही तितकंच गरजेचं असतं, असं तो सांगतो. महाविद्यालयं कधी कधी आर्थिक सहकार्य करत नाहीत त्यामुळे सेट उभारणं, संगीत तयार करणं, नाटकासाठी कपडे भाडय़ाने आणणं या सगळय़ाच गोष्टींसाठी अडथळा येतो आणि त्यातून वाट काढत आम्ही या स्पर्धापर्यंत पोहोचत असतो, असं तो सांगतो.

एकांकिकांची तयारी करताना कायमच अडचणींना तोंड द्यावं लागतं, मात्र गेल्या दोन वर्षांत हा अडचणींचा पाढा वाढला आहे, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. याबाबत बोलताना मुंबईतील गुरु नानक खालसा महाविद्यालयाची विद्यार्थिनी मल्लिका जयश्री म्हणते, ‘‘महाविद्यालयाकडून आर्थिक सहकार्य मिळत नाही, पाठबळ मिळत नाही. तालमीसाठी मोठी जागा मिळत नाही. दहा बाय दहाच्या वर्गात तालीम करावी लागते. या सगळय़ा आव्हानांना तोंड देत आम्ही मेहनत करत असतो पण तरीही जर स्पर्धेत यश मिळाले नाही तर खूप जास्त वाईट वाटतं’’. किमान एकांकिका करणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना कुठले विषय सादरीकरणासाठी घ्यावेत अशापध्दतीचे मार्गदर्शन करायला हवे, अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करताना दिसतात. ह्णकोणत्याही एकांकिका स्पर्धेत जर एकांकिकेचा एकही विषय आणि तो संघ पात्र नसेल असं परीक्षकांकडून सांगितलं जात असेल तर वाईट वाटतंच’’, अशी भावना साठय़े महाविद्यालयाच्या प्रतीक सावंतने व्यक्त केली. असं असेल तर स्पर्धेआधीच विद्यार्थ्यांना किमान एकांकिकेच्या सादरीकरणासाठी कोणते विषय घ्यायचे हे सांगावं, कारण नाटक करताना नव्या मुलांना नाटक समजावून सांगण्यापासून ते त्यांच्या घरच्यांना समजवण्यापर्यंत सर्व गोष्टी आम्ही विद्यार्थी करत असतो. आणि इतकं करूनही जर विजेते होत नसू तर खूप वाईट वाटतं, असं तो म्हणतो.

तर ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धेत एकांकिका सादर करणाऱ्या पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयाच्या पार्थ मवाळनेही जे घडले ते निराशाजनक होते, अशी भावना व्यक्त केली. या स्पर्धेसाठी इतर महाविद्यालयांप्रमाणेच आम्हीही जून महिन्यात तयारी सुरू केली, संहिता निवडण्यापासून ते आत्ता सप्टेंबरच्या १७ तारखेला अंतिम फेरीत एकांकिका सादर करेपर्यंत अनेक अडथळे आले. आम्ही सामोरंसुद्धा गेलो आणि एक एकांकिका उभी केली. रंगभूमीवर जाऊन आपली गोष्ट सादर करण्यासाठी १५ जणांच्या संघात प्रत्येकाने अफाट कष्ट केले, असं तो म्हणतो. एकूणच एकांकिका स्पर्धा, त्यासाठीची तयारी हा प्रत्येकाचा जिव्हाळय़ाचा विषय आहे. अतोनात मेहनत करूनही जेव्हा यश मिळत नाही किंवा परीक्षकांकडून निराशेचा सूर ऐकू येतो तेव्हा नव्याने एकांकिका सादर करण्यासाठी आलेल्या मुलांचाही आत्मविश्वास डळमळीत होतो. मात्र स्पर्धेतील यश – अपयश असंच असतं. येईल त्या आव्हानांना तोंड देत पुन्हा तयारीनिशी नव्याने स्पर्धेत उतरायला हवं, असा विचार एकांकिका स्पर्धेत सातत्याने भाग घेत आलेली स्वराज सातार्डेकरसारखी अनुभवी विद्यार्थी मंडळी मांडताना दिसतात. फग्र्युसन महाविद्यालयातील स्वराजच्या मते निकाल निराशाजनक लागल्यामुळे विद्यार्थी खूप नाराज झाले. पण स्पर्धा इथे संपत नाही. पुढच्या करंडकसाठी जोरदार तयारी करू आणि जिंकू असा निर्धार विद्यार्थ्यांनी करायला हवा, असं प्रामाणिक मत तो मांडतो. त्याचं महाविद्यालयातील हे शेवटचं वर्ष असल्याने खूप उत्साहाने तो या स्पर्धेत सहभागी झाला होता. आमची एकांकिका अंतिम फेरीत पोहोचली होती, त्यामुळे खरंतर अतीव आनंदात होतो, असं सांगणाऱ्या स्वराजने विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा जोरदार तयारी करायला हवी, असं आवाहन केलं. एकांकिका पूर्णत्वास नेण्यासाठी असंख्य आव्हानांना तोंड देत विद्यार्थी जेतेपद मिळवायची धडपड करत असतात. घरच्यांचा विरोध पत्करत तालमींना येण्यापासून ते महाविद्यालयाने फंड दिला नाही तर स्वत:च्या खिशातून पैसे घालून अत्यंत मेहनतीने आपली कला सादर करत ते रंगभूमीवर निर्धाराने उभं राहतात. तरुणाईची कला आणि अथक प्रयत्नांतूनच यशस्वी एकांकिका साकार होत असते. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी दर्जेदार एकांकिका सादर करण्यासाठी त्यांच्यातील तरुण कलाकार कायम धडपडत राहील, यात शंका नाही.
viva@expressindia.com