तेजश्री गायकवाड viva@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दागिन्यांसाठी सोने खरेदी आणि त्यासाठी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हा खास मानला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत दागिन्यांसाठी सोन्याऐवजी प्लॅटिनमला जास्त पसंती मिळते आहे. नुकत्याच झालेल्या अक्षय्य तृतीयेला सोन्या चांदीच्या दागिन्यांबरोबरच प्लॅटिनमच्या दागिन्यांचीही मोठय़ा प्रमाणावर खरेदी झालेली दिसून आली. प्लॅटिनमचे काहीसे नाजूक आणि वेगवेगळय़ा डिझाइन्समध्ये घडवलेले दागिने सध्या तरुणाईचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत..

सध्याचा ट्रेण्ड पाहता यंदा सोने-चांदीबरोबर प्लॅटिनम या धातूचीही चांगलीच विक्री झालेली दिसून आली. सर्व मौल्यवान धातूंमध्ये प्लॅटिनम हा दुर्मीळ धातू आहे. त्यातील एकमेवाद्वितीय अशा रासायनिक आणि भौतिक गुणधर्मामुळे तो मोठय़ा प्रमाणात औद्योगिक आणि पर्यावरणविषयक वापरासाठी महत्त्वाचा ठरतो. दागिने घडविण्यासाठी लागणाऱ्या सर्व धातूंमध्येही प्लॅटिनम हा सर्वश्रेष्ठ धातू मानला जातो. आता तरुणाईला सोने-चांदीसारख्या धातूंची क्रेझ राहिलेली नाही. आता ट्रेण्ड आहे तो प्लॅटिनमचा. सोने-चांदीचे वाढते भाव बघता आणि लिमिटेड डिझाइन्स बघता आता देशात प्लॅटिनमची विक्री जोरात सुरू आहे. काही वर्षांपूर्वी जागतिक स्तरावर प्लॅटिनमची आयात करणारा भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला होता. देशात चेन्नई, गुजरात, मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी सर्वाधिक प्लॅटिनमची विक्री होते. ‘प्लॅटिनम गिल्ड इंटरनॅशनल’च्या वैशाली बॅनर्जी म्हणाल्या, ‘‘अक्षय्य तृतीया हा भारतीय उत्सव दिनदर्शिकेतील सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे जो नवीन सुरुवात करण्यासाठी ओळखला जातो. यंदा या सणाला सोन्या-चांदीच्या दागिन्यांबरोबरच प्लॅटिनमच्या दागिन्यांनाही तितकीच मागणी होती. हा चमकदार पांढरा धातू आहे. प्लॅटिनम आयुष्यभर सफेद राहते, त्याची शुभ्र चमक कधीही गमावत नाही.’’ त्यांच्या मते प्लॅटिनमच्या या वैशिष्टय़ामुळेच त्याला तरुणाईकडून जास्त पसंती मिळत असावी.

आजकाल अगदी साखरपुडय़ाची अंगठी असो वा कोणा खास व्यक्तीला द्यायचं गिफ्ट आता तरुणाई प्लॅटिनमची ज्वेलरी प्राधान्याने विकत घेताना दिसते. प्लॅटिनमचा रंग, आकर्षक डिझाइन्स आणि किंमत यामुळे तरुणाईचा कल याकडे आहे हे जाणवतं. यंदा प्लॅटिनममध्ये नक्की कोणत्या प्रकारची ज्वेलरी ट्रेण्डमध्ये आहे हे जाणून घेऊयात.

पेंडन्ट

प्लॅटिनममध्ये पेंडन्टच्या नवीन पद्धतीचे डिझाइन्स ट्रेण्डमध्ये आहेत. यामध्ये आजच्या तरुणाईला आवडतील अशा नाजूक डिझाइन्स आहेत. प्लॅटिनम आणि रोझ गोल्डचे कॉम्बिनेशन असलेले पेंडन्ट जास्त पसंत केले जातात. नाजूक आणि आकर्षक पेंडन्ट रोजच्या दैनंदिन वापरण्यासाठी मुलींकडून प्राधान्य दिले जाते. कोणत्याही पद्धतीच्या कपडय़ांवर प्लॅटिनमचे पेंडन्ट सूट होतात.

ब्रेसलेट्स

सूटबूट असो वा टी-शर्ट, जीन्स कोणत्याही आऊटफिटवर ब्रेसलेट  सहज घालता येतं. छोटंसं ब्रेसलेटही संपूर्ण लूकमध्ये हायलाइट ठरतं. मुलांनी हातात घातलेल्या ब्रेसलेटवरून त्यांच्या  शैलीचा प्रभाव दिसून येतो. प्लॅटिनममध्ये ब्रेसलेट्सचे उत्तर प्रकार उपलब्ध आहेत. नाजूक साखळीचे ते काडय़ांसारखे दिसणारे ब्रेसलेट्स उपलब्ध आहेत. मुलींच्या ब्रेसलेट्समध्ये वेगवेगळय़ा रंगांचे खडे लावलेले डिझाइन्स सध्या ट्रेण्ड करत आहेत. एक साखळी, दोन साखळी ब्रेसलेट्स, काळे, निळे आणि सिल्व्हर मणी असलेले ब्रेसलेटही सध्या उपलब्ध आहेत. 

अंगठी

लग्नाची अंगठी वगळता पुरुष सहसा अंगठी घालत नाहीत. पण आता वेगवेगळय़ा प्रकारच्या अंगठया वापरण्याचा ट्रेण्ड सेट होतो आहे. ब्रेसलेट आणि अंगठी एकमेकांना साजेशी दिसेल अशीही स्टायिलग केली जाते आहे. वेगवेगळय़ा रंगांचे खडे, बारीक कलाकुसर केलेली, मॅट फिनिश असलेल्या प्लेन रंगाच्या प्लॅटिनमच्या अंगठयम सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. नवीन वर्षांत आलेल्या कोविड-१९च्या तिसऱ्या लाटेच्या आधी, २०२१च्या चौथ्या तिमाहीत भारतातील प्लॅटिनम दागिन्यांच्या व्यवसाय पुन्हा एकदा जोर धरताना दिसून आला. या कालावधीत प्लॅटिनमच्या दागिन्यांची किरकोळ विक्री ३० ते ३५ टक्क्यांनी वाढली आहे. देशाच्या आर्थिक विकासामुळे औद्योगिक मागणीतील वाढ आणि शहरी भागात प्लॅटिनमच्या दागिन्यांना मिळत असलेले प्राधान्य यामुळे अलीकडच्या वर्षांत भारतात प्लॅटिनमची मागणी सातत्याने वाढते आहे.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Platinum is preferred over gold for jewellery zws
First published on: 13-05-2022 at 02:09 IST