आपण कसे गातो ह्य़ापेक्षा आपल्याला ते गाणं गावंसं वाटणं. ह्य़ात खूप काही असतं. आपली स्थिरता, त्या गाण्याची स्मृती, रुंजी घालणं. थोडक्यात, आपलं तळं शांत असणं.
मला नेहमी प्रश्न पडतो. आपल्याला गुणगुणावंसं वाटतं- म्हणजे काय? ते गुणगुणणं स्वत:साठी असतं की आसपासच्या माणसांसाठी? कुणाचेही गुणगुणण्याचे क्षण मला फार गोड वाटतात. स्वत:च्या नादात असण्याचे. मला स्वत:ला फारसं ‘हमिंग’ नाही करता येत. एखाद्-दुसरी ओळ गावीशीच वाटते हळू आवाजात. सायकल, स्कूटर किंवा कार- कुठलंही वाहन चालवताना मला गाणी सुचतात. म्हणजे आनंदी असताना मी गाते का? म्हणजे रिलॅक्स्ड असताना! आता कावेरीला- माझ्या मुलीला सारखी गाणी ऐकायची असतात. तिच्यासाठी माझ्या आठवणीतली कुठली कुठली गाणी वर येतायत हल्ली.. गंमत म्हणजे तिलाही ‘हमिंग’ आवडत नाही. नुसतं गुणगुणलं तर ती लगेच निषेध व्यक्त करते. तिला गाणं शब्दांसकट लागतं. मला न जाणवलेली माझी आवड इतक्या लहानपणी तिच्यात परावर्तित झालेली पाहून मला मौजच वाटते.
माझ्या ओळखीच्या दोन गजरेवाल्या आहेत. तामिळ. रस्त्याच्या कडेला गजरे ओवत ओळीनी बसतात ना त्यातल्या. एकीचा बॉबकट आहे, दुसरीच्या तेलकट स्प्रिंगसारख्या केसांचा लहानसा अंबाडा असतो. काळीशार कांती, त्यावर झळकून दिसणारे सोन्याचे किंवा सोनेरी लहान लहान दागिने. नाकात मोठय़ा मोरण्या. स्वच्छ, हसरे डोळे आणि सतत दोऱ्यात फुलं ओवणारी बोटं. त्या दोघी गातात. ठरवून असं नाही. पण मधूनच सुरू करतात. एकमेकींसाठी. अगदी हलकेच. भाजी घेताना किंवा फळवाल्याला पैसे देताना मागे सुरेल, दुहेरी आवाजातलं गाणं ऐकू येतं. त्यांच्या मोगरा, सायली, अबोली, चाफा ह्य़ा फुलांइतकंच प्रसन्न आणि सुंदर. मी नक्की फुलांसाठी की गाण्यासाठी त्यांच्याकडे खेचली जाते- माहिती नाही. कधी कधी मी काही न बोलता दहा रुपयांची नोट पुढे करते. मग दोघींतली एक पानात गुंडाळून माझ्या आवडीचे गजरे देते. कधी चाफा मागितला आणि किती झाले विचारलं, तर ते तरल गाणं किंवा हसणं न थांबवता खुणेनी त्या सांगतात. मीही शक्यतो त्यांना डिस्टर्ब न करता पैशाची, फुलांची देवाणघेवाण पूर्ण करते. नंतर कधीच त्यांची सुरावट आपला पाठलाग करत नाही. त्या वेळी त्यांच्या आसपास असताना छान वाटतं फक्त.
ह्य़ाउलट माझी एक कॉलेजमधली मैत्रीण. गप्पा सुरू झाल्या की ही मध्येच टिपेच्या सुरात गुणगुणायला लागायची. आपण चहा करायला उठलो किंवा ही पुस्तके वगैरे शोधायला लागली तर कहरच व्हायचा. चेहऱ्यावर अनाकलनीय गहिरे भाव, गाताना कपाळाला आठय़ा आणि मुख्य म्हणजे अनोळखी बिनशब्दांची सुरावट. तिच्या गाण्याचा आणि मूडचा अंदाज घेताना आपली उगीचच तारांबळ! एवढीच हौस आहे तर स्वच्छ गा की- असं मनात यायचं. सगळे मित्रमैत्रिणी जमले आहेत, आपण सगळे काही तरी मजेचं बोलतोय, हसतोय. आणि हीच फक्त मिस. गूढता होऊन वातावरणात ताण निर्माण करत राहणार!
ह्य़ापेक्षा बाथरूम सिंगर प्रकारातले लोक मला फार आवडतात. हल्ली अशी गाणी वगैरे म्हणत निवांत आंघोळ करण्याची ऐपत राहिली नाहीए म्हणा आपली. तरी भोवतालचा थोडा विसर पडून, स्वत:च्याच तंद्रीत हरवल्यानंतर एखादं गाणं म्हणून बघणं- फार छान वाटतं. अनेकदा, स्वैपाक करायला लागलं- की माझ्या मनात गाणी घोळतात. म्हणजे आपण आपल्यातच असतो. एखादा पदार्थ करताना छान तल्लीन झालेले असतो. हाताची सवय आणि अनुभवानी आलेला अंदाज- ह्य़ामुळे आपल्यात एक सहजता येते. अनेकदा मला जाणवतही नाही की मी गुणगुणत होते. तबला-पेटीच्या साथीशिवाय, कुठल्याही श्रोत्यांसाठी नसलेलं गाणं गाण्याची सवड- आपण शोधलीच पाहिजे. ते बेसावध, नॉन-स्पेसिफिक क्षण जगू शकण्याची सवलत आपण आपल्याला दिलीच पाहिजे.
माझ्या एका मित्राला साध्या गाण्यालाही टाळी हवी असते. आता भेटल्यावर गप्पा मारताना, एखाद्या नाटकावर वगैरे वाद घालताना हा मधूनच मोठय़ानी गुणगुण करत येणार आणि समेवर दाद मागत आपलं लक्ष विचलित करणार. मला तर डोळे वटारून चूप्प बस- असं त्याला सांगावंसं वाटतं. तो परवडला असा एक बालकलाकार एकदा मला भेटला. शूटिंगचे चाळीस-पन्नास दिवस आम्ही एकत्र. तो चौथी-पाचवीत होता. सतत आणि अखंड गात असायचा. कम्पलसिव्ह टॉकर असतात तसा बळजबरी गायक! एखाद्या सीनची तयारी करताना ह्य़ा बालकाच्या गाण्यानी डोकं उठायचं अक्षरश:. त्यावर मी खूप मार्ग काढले. त्याला चित्रकलेचं साहित्य आणून दिलं, क्यूब आणून दिला, वाचायला पुस्तकं दिली. पण हा आपला सतत शिकलेल्या आलापी नाही तर सिनेमातली गाणी गाऊन उच्छाद मांडायचा. भेंडय़ा तरी किती खेळणार ना त्याच्याबरोबर? त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावरून तर कौतुक ओसंडून वाहत असायचं. एकदा मात्र मी न राहवून त्याला बजावलं.. की मी महत्त्वाची वाक्यं पाठ करतीए-  तर अज्जिबात गाणी म्हणायची नाहीत थोडा वेळ. एकदम गप्प बसायचं. दोन मिनिटं शांत बसल्यावर त्या चळवळ्या मुलानं काय करावं? तो खुर्चीच्या दांडय़ावर टकाटका ताल धरून शिट्टी वाजवायला लागला. देवा! माणसांसाठी ‘म्यूट’चं बटण असतं तर किती बरं झालं असतं?