भाषा हा मुळातच देखणा प्रांत. आपल्या सगळ्यांचा भाषिक प्रवास हा मातृभाषेपासून सुरू होतो. त्यामुळे आपलं सुरुवातीचं वाचन हे प्रामुख्याने मातृभाषेतच होतं. पुढे अनेक नव्या भाषांची आपल्याला ओळख होते, त्यातील काही भाषांशी आपली चांगलीच गट्टी जमते. ती भाषा अवगत झाली की त्यातील समृद्ध साहित्य हळूहळू आपल्याला भेटू लागतं. प्रथमेश डोळे या युवा कवीच्या बहुभाषिक वाचनाच्या नोंदी या वैविध्यपूर्ण आहेत. यात मुख्यत: फ्रेंच भाषेतील साहित्य अधिक असले, तरीही पोर्तुगीज, स्पॅनिश, अरबी, फारसी अशा भाषांचा देखील समावेश आहे. ‘भाषा या मानवाला मिळालेल्या निसर्गदत्त वरदानावर माझं निरतिशय प्रेम आहे’, असं प्रथमेश सांगतो. जगभरचे भाषाप्रवाह धुंडाळणारा हा कवी अनुवाद या साहित्य प्रकारातही रमतो. विविध भाषेतील साहित्य वाचताना सांस्कृतिक आणि सामाजिक बिंदूही तो सहज जोडत जातो.

प्रथमेश मूळचा सातारा जिल्ह्यातला. घरी वाचनाचे वातावरण असल्याने त्यालाही लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण झाली. वाचनाचे संस्कार आई-वडिलांकडून मिळाले असले, तरीही वाढत्या वयानुसार माझी स्वत:ची वाचनाची अशी स्वतंत्र अभिरुची निर्माण होत गेली, असं तो सांगतो. शालेय वयातही त्याला वाचनाची आवड होती. पुढे त्याची फ्रेंच भाषेशी ओळख झाली आणि त्याने उच्च शिक्षणासाठी याच भाषेची निवड केली. त्यामुळे साहित्याच्या तसेच संस्कृतीच्या एका नव्या दालनाची त्याला ओळख झाली. विद्यापीठाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून काही वर्षे तो फ्रान्समध्ये वास्तव्यास होता. अनेकविध मार्गांनी त्याच्यासमोर फ्रेंचसह विविध भाषांचे पैलू उलगडत गेले. सध्या प्रथमेश मुंबईत फ्रेंच भाषेचा प्राध्यापक म्हणून काम करत असून तो अनुवादविषयक विविध उपक्रम आणि व्यावसायिक कामातही सहभाग नोंदवीत असतो.

मराठी साहित्याचं वाचन लहानपणापासूनच होत गेलं, असं प्रथेमश सांगतो. मग पुढे कविता हा प्रांत अधिक आवडत गेला, त्यामुळे अनेक कवींची पुस्तकं त्याने वाचून काढली. त्याला विद्रोही साहित्य वाचायला आवडतं. मराठी साहित्यातील काही लेखक – कवी त्याचे आवडते आहेत. यात बालकवी, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, ग्रेस, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ, अरुण कोलटकर, जी. ए. कुलकर्णी, मल्लिका अमर शेख, इंदिरा संत, श्रीनिवास विनायक कुलकर्णी आणि म. म. देशपांडे ही त्याची काही आवडती साहित्यिक मंडळी आहेत. तो म्हणतो, ‘या सगळ्यांच्या साहित्याने मला अक्षरश: वेडं केलं. मात्र, नामदेव ढसाळांच्या साहित्याने मला शब्दश: झपाटलं. कवितेच्या वेगळ्या पैलूंसह कवितेची भाषा वेगळी असू शकते हे मला ढसाळांमुळे समजलं. आपल्या जगण्याहून काही वेगळं जाणून घ्यायचं असेल तर नामदेव ढसाळांचं साहित्य आवर्जून वाचायला हवं. तसंच, कोलटकरांनी तर एक समृद्ध जगच पुढ्यात ठेवलं. त्यांची ‘भिजकी वही’, ‘जेजुरी’,‘काळा घोडा पोएम्स’ ही माझी काही आवडती पुस्तकं आहेत. कविवर्य वा. रा. कांत यांचे चिरंजीव मु. वा. कांत याचं ‘पोरके आभाळ’ हे दुर्मीळ पुस्तक प्रथमेशच्या संग्रही आहे.

प्रथमेशची इंग्रजी वाचनाचीही एक वेगळी अभिरुची आहे. इंग्रजी साहित्यही मी हळूहळू वाचू लागलो आणि अनेक पुस्तकं मला आवडत गेली, असं तो सांगतो. विविध भाषेतील साहित्य वाचनाने अनेक विषय नव्याने कळत जातात आणि जणू मग त्या वाचनातून एक साहित्यिक श्रृंखलाच पुढे येते. भाषा हाच प्रथमेशचा मूळ अभ्यासाचा प्रांत असल्याने फ्रेंच भाषेसोबतच इतर काही भाषेतील साहित्याचं वाचनही तो करत असतो. मेक्सिकन दिनदर्शिकेवरील ‘पीएद्रा देल सोल’ ही ऑक्टाव्हियो पाझ लोझानो यांची दीर्घ कविता आहे. दिलीप चित्रे यांनी त्याचा ‘सूर्यपाषाण’ या नावाने मराठीत अनुवाद केला आहे. तो अतिशय सुंदर आहे. एडुआर्डो गॅलेनो दे हे माझे आवडते मेक्सिकन कवी आहेत. विल्यम डेल्रिम्पल यांच्या ‘द अनार्की: द रिलेंटलेस राइज ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठीत ‘अराजकता’ या नावाने रेश्मा कुलकर्णी पाठारे यांनी अनुवाद केला आहे, जो जरूर वाचण्यासारखा आहे. याचबरोबर अल्बेर काम्यू यांच्या ‘ला पेस्ट’ आणि ‘लेत्रांजे’ या दोन कादंबर्‍या मला खूप आवडतात. या दोन्ही कादंबर्‍या मी मराठी आणि फ्रेंच भाषेत वाचल्या आहेत. मराठीतही या पुस्तकाचा अवधूत डोंगरे आणि अभिजीत रणदिवे या दोघांनी फार सुंदर अनुवाद केला आहे. हे अनुवाद आवर्जून वाचावेत असे आहेत. ॲनी एर्नो या फ्ऱेंच लेखिकेचे ‘ला प्लास’, ऐमे फर्नांड डेव्हि सेझैरचं ‘किये द अँ रूतूर ओ पेई नाताल’ ( इंग्रजी – नोटबुक ऑफ होमकमिंग ) तसंच, लेओपोर सेदार सेंगोर यांची ‘दि तमिळ नाईट’ ही कविता मला प्रिय आहे, असं त्याने सांगितलं. सध्या प्रथमेश ‘शरद पवार फेलोशिप’ अंतर्गत ॲनी एर्नो या आपल्या आवडत्या लेखिकेच्या ‘ला प्लास’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद करतो आहे.

प्रथमेशची बहुभाषिक वाचनाची यादी मोठी असली तरीही आणखी काही पुस्तकंही त्याने सुचवली आहेत. दावीद मांदेसी दिओपयांचा ‘कू द पिलों’ (हॅमर ब्लोज) हा कविता संग्रह अत्यंत गहिरा आणि तितकाच बोचरा आहे, असं त्याने सांगितलं. रनार बे, दादिये, गाब्रियेल गार्सिया मार्केझ हेदेखील प्रथमेशचे आवडते साहित्यिक आहेत. मार्केझ यांची ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ (मूळ स्पॅनिश : सिएन आन्योस दे सोलेदाद) ही महाभारतानंतर सर्वात गहिरी साहित्यकृती आहे, असं प्रथमेशचं मत आहे. दिलीप चित्रे यांनी त्यांच्याच ‘द ऑटम ऑफ द पेट्रीआर्क’ या कादंबरीवर ‘हुकूमशहाचा संधीऋतू’ नावाने एक कविता लिहिली आहे. तीही वाचण्यासारखी आहे, असं त्याने सांगितलं. यांसह खुलीओ कोर्ताजार, पाब्लो नेरुदा, निकोलास गुलियेन, मारियो वर्गाआस योसा, खोर्खे लुई बोर्खेज, फर्नांदो पेस्सोआं, झोरान झिवकोविच, कार्लोस मारिया डोमिंगेज, आहलेम मोस्तेघानेमि, नगीब माहफूझ ही माझी काही आवडती साहित्यिक मंडळी आहेत, असं त्याने सांगितलं. स्वत:च्या भाषेतील साहित्य आपण आवर्जून वाचायला हवं. मात्र, त्याबरोबरच इतर भाषेतील साहित्यही आपण वाचायला हवं, कारण त्यामुळे एका व्यापक विश्वाची आपल्याला ओळख होते, असं प्रथमेश सांगतो.

viva@expressindia.com