वैष्णवी वैद्य मराठे
मे महिना सरत आला तरी उन्हाचा तडाखा कमी व्हायला तयार नाही. पाऊस एखाद वेळी मध्येच आपलं अस्तित्व दाखवत असला तरी उन्हाच्या झळाही तितक्याच तीव्र आहेत. तुमची उन्हाळी फॅशन किंवा उन्हाळय़ातले खास वॉर्डरोब अजून महिनाभर तरी फॉलो करायला हरकत नाही. या वेळी निरखून मार्केटचं निरीक्षण केलं तर कपडय़ांमध्ये प्रिंट्सना फॅशन क्षेत्रात मानाचं स्थान मिळालेलं दिसतं आहे.
प्रिंटेड कपडय़ांमध्येही हल्ली वेगवेगळं नावीन्य दिसून येतं. अगदी लहानग्यांपासून ते मोठय़ांपर्यंत सगळय़ांच्याच कपडय़ांमध्ये प्रिंट्सचा भरपूर वापर होताना दिसतोय. उन्हाळय़ातली प्रिंट फॅशन ही बऱ्याचदा नेचर-इन्स्पायर्ड प्रिंट्स, अॅक्वा अॅनिमल प्रिंट्स अशा थीम डिझाइनमध्ये दिसते. सध्या बाजारात सगळय़ाच कापडांमध्ये प्रिंट्स ट्रेण्डिंग आहेत, परंतु उन्हाळय़ात खास करून कॉटनमध्ये प्रिंटेड कपडय़ांचे नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत. सध्याचा कडक उन्हाळा लक्षात घेत तरुणाईने कॉटन कपडय़ांना जास्तच महत्त्व दिलेलं दिसतं आहे. त्यामुळे कॉटनबरोबरच इतरही फॅब्रिकमध्ये सध्या प्रिंटेड फॅशन कुठल्या कुठल्या प्रकारात ट्रेण्डमध्ये आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखातून केला आहे.
कॉटन प्रिंटेड कुर्ते
सद्य:स्थितीत कॉटन प्रिंटेड कुर्त्यांची फॅशन फारच ट्रेण्डमध्ये आहे. त्यातही खास करून लखनवी किंवा चिकनकारी प्रिंट असलेले कुर्ते तरुणाईच्या आवडीचे झाले आहेत. यासोबत तुम्ही ट्रॅडिशनल किंवा अगदी इंडो वेस्टर्न लुकही ट्राय करू शकता. अनारकली स्टाइलचे लाँग आणि शॉर्ट कुर्ते तुम्ही जीन्स अथवा मॅचिंग लेगिंग्सवर घालू शकता. उन्हाळय़ात असे कुर्ते घालताना गुलाबी, पिस्ता, फिकट जांभळा, निळा, पांढरा, राखाडी अशा सौम्य रंगाच्या कुर्त्यांची निवड करा. ऑफिसला जाणाऱ्या महिलांनाही हा सिम्पल, पण एलिगंट लुक फार छान दिसतो.
प्रिंटेड कफ्तान
कफ्तान हा अतिशय आधुनिक आणि सुंदर असा फॅशन ट्रेण्ड आहे. सुटसुटीत कपडे ज्याला म्हणतात त्याचं नवं स्वरूप म्हणजे कफ्तान. या प्रकारातही अनेक प्रिंट्स उपलब्ध आहेत. उन्हाळय़ात सगळय़ात जास्त वापरला जाणारा कपडय़ातला हा प्रकार आहे. लॉन्ग कुर्ते, शॉर्ट टॉप, नाइट ड्रेस, गाऊन असे अनेक पेहराव तरुण मुली कफ्तान प्रकारात अगदी आनंदाने वापरतात. विशेषत: जर इंडिगो ब्लॉक प्रिंटेड कफ्तान मिळाले तर ते अधिकच सुंदर आणि आकर्षक दिसतात. कुठल्याही प्रकारच्या शरीरयष्टीला साजेसा आणि आकर्षक दिसणारा कफ्तान प्रकार म्हणूनच सध्या ट्रेण्डमध्ये आहे.
प्रिंटेड साडय़ा
साडीची फॅशन पुन्हा नव्याने येऊ लागली आहे यात वादच नाही. मध्ये असा एक काळ होता जेव्हा साडय़ा म्हटल्यावर मुली नाकं मुरडायच्या; परंतु आता साडय़ा इतक्या आवडीने नेसल्या जातात की, त्यामध्येही हटके आणि ट्रेण्डी प्रयोग होताना दिसतायेत. त्यातलाच एक प्रयोग म्हणजे प्रिंटेड साडय़ा. सिंगल कलर आणि हॅण्ड ब्लॉक प्रिंटचा प्रकार सध्या खूप गाजतो आहे. या साडय़ा अतिशय देखण्या, सुबक व हलक्या असतात. सगळय़ाच कापडांमध्ये अशा साडय़ा मिळतात, पण कॉटनवर जो एलिगन्स येतो तो जास्त भावतो. प्रिंटेड इंडिगो साडय़ा सध्या सगळय़ात जास्त खरेदी केल्या जात आहेत.
प्रिंटेड फॉर्मल्स
ऑफिसला जाणाऱ्यांसाठी प्रिंटेड फॉर्मल्स ही पर्वणीच आहे. बिझिनेस फॉर्मल्स ज्यांना घालावे लागतात त्यांच्यासाठी प्रिंटेड फॉर्मल शर्ट्स, फॉर्मल ड्रेस, वन पीस हे प्रकार लोकप्रिय आहेत. अॅमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्टसोबत आता मोठमोठे ब्रॅण्ड्ससुद्धा प्रिंटेड फॉर्मल्सची फॅशन आणू लागले आहेत. प्रिंटेड फॉर्मल्समध्ये फ्लोरल पॅटर्न अधिक खुलून दिसतो. कॉटन प्रिंटेड कपडे उन्हात घालून बाहेर पडताना मात्र त्यावर स्वेट मार्क दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.
प्रिंटेड को-ऑर्डस
फॉर्मल्स आणि बिझिनेस कॅजुअल्समधला आधुनिक प्रकार म्हणजे को-ऑर्डस. टॉप आणि पॅन्ट सेम रंगाचे, कापडाचे आणि पॅटर्नचे असल्यावर त्याला को-ऑर्डस म्हणतात. हल्ली हा प्रकार तरुणाईमध्ये फार लोकप्रिय आहे. कुठल्याही पद्धतीचा इन्फॉर्मल ओकेजनला हा परफेक्ट आऊटफिट आहे असं तरुणींचं म्हणणं आहे. प्लेन सिंगल कलरचे को-ऑर्डससुद्धा छान दिसतात, पण प्रिंटेड पॅटर्नमधील को-ऑर्डस अधिक उठावदार दिसतात.
प्रिंटेड टीशर्ट ड्रेस
टीशर्ट ड्रेस हा प्रकार मुलींमध्ये अत्यंत सुपरहिट झाला आहे. टीशर्ट ड्रेस म्हणजे साधारण गुडघ्याच्या थोडं वपर्यंत असलेली थोडी लूज मॅक्सी. नाइट ड्रेस म्हणूनच याचा वापर केला जातो. अनेक शॉपिंग साइट्सवर हे प्रकार उपलब्ध आहेत. यावर बऱ्याचदा कार्टून प्रिंट्स लोकप्रिय आहेत. पूर्वी लहान मुलांचे पेटीकोट प्रकार असायचे त्यातलाच हा थोडा आधुनिक प्रकार. ‘बेवकूफ’च्या साइटवर या प्रकारातील बरेच कपडे मिळतात. टीशर्ट ड्रेस कॉटनमध्ये फारसे नसतात, पण मिक्स फॅब्रिकमध्येही देखणे रंग आणि डिझाइन्समध्ये ते उपलब्ध आहेत. आजकाल थीम पार्टी, गेट-टुगेदरसारख्या निमित्ताने तरुणींचा हा आवडता पेहराव झाला आहे.
प्रिंटड श्रग्स
श्रग्सचा साधा अर्थ म्हणजे थोडे कॅज्युअल आणि लॉन्ग जॅकेट्स. हासुद्धा अतिशय ट्रेण्डी प्रकार आहे. इंडो-वेस्टर्न स्टायिलगमधला तरुणांचा आवडता एलिमेंट आहे. स्कार्फसारखा मल्टियुज कपडय़ाचा हा प्रकार आहे. विविध कापड, रंग, प्रिंट्समध्ये श्रग्स उपलब्ध असतात. डेनिम, लोकर, सिल्क, कॉटन, मिक्स फॅब्रिक अशा अनेक प्रकारांत श्रग्स मिळतात. अगदी मोठमोठय़ा ब्रॅण्ड्सपासून ते स्ट्रीट मार्केटपर्यंत कुठेही मिळणारा हा हटके प्रकार आहे. सध्या कॉटन, रेयॉन, कॉटन ब्लेंड, शिफॉन अशा फॅब्रिकमधले श्रग्स ट्रेण्डी आहेत. जीन्स आणि क्रॉप टॉप, स्कर्ट-टॉप, कुर्ता या कशावरही श्रग अगदी उठावदार आणि ट्रेण्डी दिसतो.
viva@expressindia.com