आजची आघाडीची अभिनेत्री आणि निर्माती म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी प्रिया बापट ही प्रयोगशील कलाकार म्हणून ओळखली जाते. तिच्या वाचनवाटाही खास आहेत. वाचनाने काय बदल झाला याविषयी सांगताना ती म्हणाली, ‘पुस्तकं वाचताना मी सगळ्यात जास्त माणूस म्हणून लिबरल झाले. यामुळे माझे पूर्वग्रह गळून पडले आणि मी अधिक मोकळ्या स्वभावाची झाले. माझा नात्यांकडे आणि माणसांकडेही पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आपली जडणघडण ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीनेच आपले विचार ठरत असतात, मात्र जेव्हा तुम्ही अधिक व्यापक अनुभव घेता, अधिक वाचता, पाहता तेव्हा तुम्हाला हळूहळू लक्षात येऊ लागतं की चूक किंवा बरोबर असं काही नसतं. माणूस जे काही निर्णय घेत असतो हे त्यावेळच्या परिस्थितीनुसार घेत असतो. हे सगळं मला पुस्तकांमुळे जास्त शिकता आलं.’

तिच्या वाचनवाटा खरंतर इतर चारचौघांसारख्या घरापासूनच सुरू झाल्या. तिच्या घरात वाचनाचे वातावरण असल्याने लहानपणापासूनच तिला पुस्तकं वाचनाची सवय होती, मात्र मुख्य पुस्तक वाचनाची अधिक आवड ही महाविद्यालयीन जीवनात निर्माण झाली, असं तिने सांगितलं. ती म्हणते, ‘मला वाचनाची आणि त्यातही इंग्रजी पुस्तकांची गोडी महाविद्यालयात असताना लागली. आणि तेव्हापासून मग इंग्रजी पुस्तकांचं वाचन अधिक करू लागले.’ सध्या ती मनू जोसेफ यांचं ‘व्हाय पुअर डोन्ट किल अस’ नावाचं एक पुस्तक वाचते आहे. भारतीय ही एक वृत्ती आहे आणि आपण भारतीय कसं वागतो याचं उत्तम चित्रण या पुस्तकातून मनू जोसेफ यांनी केलं आहे. यामुळे हे पुस्तक वाचताना फार मजा येते आहे, असं ती म्हणाली. तिला वैचारिक किंवा तत्त्वज्ञानावर आधारित असणाऱ्या पुस्तकांहून काल्पनिक पुस्तकं वाचायला अधिक आवडतात, असं तिने सांगितलं. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपण वाचत राहायला हवीत, असं प्रियाचं मत आहे. एकाच विचारधारेची पुस्तकं वाचली तर तेच विचार अधिक आत्मसात करण्याची शक्यता असते. यामुळे वैचारिक वगैरे वाचणाऱ्या व्यक्तीने विविध मतप्रवाहांवरील पुस्तकं वाचून मगच त्यावरील आपलं मत व्यक्त करायला हवं, असं ती म्हणते. यावेळी तिने कादंबरी किंवा एकंदरीतच काल्पनिक पुस्तकांचं महत्त्वही अधोरेखित केलं. ती म्हणाली, ‘विशेषतः काल्पनिक पुस्तकांमध्ये माणसांचे स्वभाव इतके सुंदर उलगडलेले असतात, की तुमचे माणसांबद्दलचे पूर्वग्रह गळून पडतात आणि ते मला अधिक महत्त्वाचं वाटतं. पुस्तकांमुळे माझे विचारही फार प्रगल्भ झाले, त्यामुळे अनेक गोष्टींकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. पुस्तकांमुळे माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन ‘ग्रे’ होतो’, असं अनुभवावर आधारित मत तिने व्यक्त केलं.

प्रसिद्ध जपानी लेखक मुराकामी आणि आयरिश लेखिका सॅली रूनी ही प्रियाची आवडती लेखक मंडळी. ती म्हणते, ‘सॅली रूनी माझी प्रचंड आवडती लेखिका आहे. तिची पुस्तकं मी अधूनमधून वाचत असते. मी तिचं ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ फ्रेंड्स’ नावाचं पुस्तक जेव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हाच या लेखिकेचं इतर साहित्यही आपण वाचायला हवं असं मला वाटलं. त्यांनतर मी तिचं ‘नॉर्मल पीपल’ आणि ‘ब्युटीफुल वर्ल्ड, वेअर आर यू’ ही दोन्ही पुस्तकं वाचली. तिचं ‘इंटरमेझो’ नावाचं पुस्तकंही मी लवकरच वाचायला घेणार आहे. आजच्या काळातील विषयांचं चित्रण ती खूप सुंदरपणे आपल्या साहित्याच्या माध्यमातून करते’. तर मुराकामी या लेखकाबद्दलही प्रिया भरभरून बोलते. ‘प्रसिद्ध जपानी लेखक हारुकी मुराकामी हा मानवी नात्यांच्या ‘डारकेस्ट साईड्स’ एक्स्प्लोर करणारा लेखक आहे. माझ्या मित्राने, अभय महाजनने मला हारुकी मुराकामीच्या साहित्यविश्वाची ओळख करून दिली होती. त्यामुळे मी मुराकामीच्या पुस्तकांकडे वळले आणि नंतर मुराकामीच्या साहित्याची मोठी चाहती झाले’, असं तिने सागितलं. जपानला कधी भेट दिलीच तर तिचं एक खास स्वप्न आहे. या स्वप्नाबाबत सांगताना ती म्हणाली, ‘जपानला जर मी कधी गेलेच, तर मुराकामीने त्याच्या पुस्तकांमध्ये उल्लेख केलेल्या जागा, कॅफेज पाहायला फार आवडेल.’

अनेकदा व्यग्र दिनक्रम आणि दौरे यामुळे फारसं पुस्तकांचं वाचन करणं शक्य होत नाही, असं प्रियाने सांगितलं. मात्र जेव्हा जेव्हा तिला कामांमधून उसंत मिळते, तेव्हा ज्या काही मोजक्या गोष्टी ती आनंदाने करते त्यात पुस्तक वाचन ही एक गोष्ट आहे, असं ती म्हणाली. ‘मी जेव्हा सोलो ट्रिप्सना जाते किंवा सुट्ट्या असताना जो मोकळा वेळ असतो तेव्हा मला पुस्तकं वाचायला आवडतात. त्यातही माझी तंद्री लागली, तर मी भराभरा वाचन करते. प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन ते वाचण्याचा आनंद वेगळा असतो’, असं तिचं मत आहे. याबाबत सांगताना ती म्हणाली, ‘मला किंडल किंवा इतर माध्यमातून वाचन करायला फारसं आवडत नाही, मला पुस्तक हातात धरून वाचायला फार मजा येते, कारण प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा आनंदच निराळा असतो. तो आनंद किंडल किंवा स्क्रीनवर पुस्तक वाचताना मिळत नाही.’ पुस्तकांवर मित्र-मैत्रिंणींशी किंवा अगदी सहकाऱ्यांशी चर्चा आणि देवाणघेवाण होते आणि यातून उत्तम पुस्तकं आपल्याला कळतात, असंही तिने पुढे सांगितलं. प्रियाची मैत्रीण कल्याणी आणि तिच्यात अशा अनेक पुस्तकांची देवाणघेवाण होत असते. तसंच, तिची एक सहकारी प्रियांका शहा हीसुद्धा उत्तम वाचक असून ती सतत प्रियाला नवी पुस्तकं सुचवत असते, यामुळे ती प्रियाची ‘बुक रिकमेंडर’ आहे, असं ती म्हणते. अभिनेत्री प्राजक्ता कोळीसुद्धा खूप सुंदर पुस्तकं वाचत असते, त्यामुळे अनेकदा तिने वाचलेली पुस्तकंही मी वाचते, असंही प्रियाने सांगितलं.

प्रियाला पुस्तकं खरेदी करायलाही फार आवडतात. पुस्तक खरेदीच्या अशा आवडत्या जागांविषयी सांगताना ती म्हणाली, ‘मुंबईत ‘नंदन कॅफे’ नावाची एक जागा आहे, तिथे कॉफीचा आनंद घेतानाच पुस्तकं खरेदीही करता येतात किंवा अगदी तिथं बसून वाचताही येतात. कोची येथे अशी सुंदर वाचनालयं आणि कॅफेज आहेत, असं तिने सांगितलं. यामुळे तिला कोचीला भेट द्यायला फार आवडतं. पाँडिचेरी, हिमालय, मेघालय अशा ठिकाणी प्रवास करताना मला पुस्तकं वाचायलाही आवडतात. म्हणजे अगदी मी प्रवासात नदीकाठी दगडावर झोपूनही पुस्तक वाचनाचा आनंद घेते, असं तिने सांगितलं.

सर्जनशील माणसाने उत्तम निरीक्षण करायला हवं, नव्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात, असं तिचं मत आहे. वेगवेगळ्या संस्कृती, चित्रपट, वेब सिरीज, आपल्या आजूबाजूच्या समाजाच्या निरीक्षणातूनही आपल्याला अनेक गोष्टी कळत जातात. एखाद्या गोष्टीवर आपलं स्वतःचं मत व्यक्त करायचं असेल तर केवळ समाज माध्यमांवरील माहिती किंवा इंटरनेटवर असणारी माहिती पुरेशी नाही तर आपण त्या विषयावर अधिक सखोल वाचन करायला हवं आणि मगच आपलं मत व्यक्त करायला हवं, असं प्रियाचं ठाम मत आहे.