अश्विनी खांडेकर
बऱ्याचदा आपण ऑफिसमध्ये जातो, पण तिथेही घरचे कॉल्स, घरी काय झालं आणि पुढे काय करणार आहोत याविषयी बोलत राहतो. आणि घरी आल्यावर ऑफिसमध्ये काय झालं याच्याच चर्चा सुरू असतात. कदाचित, आपण वीकएंडला बाहेर गेलेलो असलो तरी मन या दोन गोष्टींमध्येच अडकलेलं असतं. मनुष्यस्वभाव असा आहे की आपण भूतकाळात किंवा भविष्यकाळात जगत असतो, पण यामुळे खरं तर स्ट्रेस वाढतो. कारण आपण एखादी गोष्ट पुनःपुन्हा जगत असतो, विशेषतः ती इतरांना सांगताना किंवा वारंवार त्याची पुनरुक्ती करताना… आणि या स्ट्रेसमुळे कधी कधी प्रोक्रॅस्टिनेशनला वाव मिळतो.

प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे एखादं काम करायचं आहे हे माहिती असूनही, त्यातून येणारा ताण, वाद किंवा अनकम्फर्टेबल परिस्थिती टाळण्यासाठी ते पुढे ढकलत राहणं. म्हणजे आपल्याला एखादा काहीतरी मोठा इव्हेंट करायचा आहे आणि त्याला पर्याय नाही. सहा महिने आहेत, पण मग तो स्ट्रेस आतापासून कशाला म्हणून त्यावर काम सुरूच केलं जात नाही. तो स्ट्रेस तीन महिन्यांनी घेऊ किंवा वेळ आली की बघू, म्हणत ते टाळलं जातं. जसं कॉलेजमध्ये असाइनमेंट सबमिट करायला एक आठवडा असतो, पण काम सुरूच होत नाही आणि मग एक रात्र आधी जागून कॉपी केलं जातं किंवा खूप शोधाशोध करून पूर्ण केलं जातं.

आता यात वाईट काहीच नाही, कारण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. काहीजण वेळ घेऊन प्लॅन करून काम करतात, तर काहीजण शेवटच्या क्षणी पूर्ण करतात. पण, शेवटच्या क्षणी काम करणाऱ्यांच्या बाबतीत एक गोष्ट नक्की असते, कामापेक्षा त्याआधीचा ओढवलेला स्ट्रेस त्यांना जास्त थकवणारा असतो. म्हणून ‘Eat That Frog’ ही एक संकल्पना आहे. म्हणजे दिवसात तुम्हाला जे काम सगळ्यात कठीण वाटतं ते आधी पूर्ण करा. तुमच्या कामाच्या यादीतले सगळ्यात कठीण आणि नकोसे वाटणारे टास्क आधी संपवा. जर दोन, तीन कठीण टास्क असतील, तर सगळ्यात कठीण टास्क आधी, मग दुसरी आणि मग उरलेली कामं. म्हणजे स्ट्रेस कमी होईल आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढेल. कारण, जी कामं आपण पुढे ढकलतो किंवा जे डिस्कशन्स आपण पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो, तेच जास्त महत्त्वाचे असतात. म्हणून पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं ठेवता आलं की फोकस वाढतो. मी स्वतःला भाग्यवान समजते, मला हा सल्ला आयुष्यात लवकर मिळाला. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याचा एकमेकांवर परिणाम कमीत कमी असायला हवा आणि त्याची सुरुवात आपल्यापासूनच होते.

जिथे काम करतो तिथे कामाच्या भूमिकेत राहणं आणि घरी आलो की घरातल्या गोष्टींमध्ये रमणं, ही सवय जाणीवपूर्वक लावावी लागते. याचा अर्थ असा नाही की आपण ऑफिसमधलं काहीच घरी बोलायचं नाही किंवा घरचं काहीच ऑफिसमध्ये आणायचं नाही, पण त्याला मर्यादा असणं गरजेचं आहे. छोट्या बाउंड्रीज ठेवल्या की मनाला समजतं, आता भूमिका बदलली आहे. त्यामुळे गिल्ट कमी होतो आणि वर्तमानात राहणं सोपं होतं. वर्क लाइफ बॅलन्स साधायला मदत होते. यासाठी काही छोट्या सवयी मदत करू शकतात.

हेही वाचा
  • एक वही कायम जवळ ठेवा. त्यात सगळे टास्क व्यवस्थित नोंद करा.
  • दिवसातलं कठीण काम आधी पूर्ण करा. पुढे ढकललेला स्ट्रेस कमी होतो आणि मन मोकळं राहतं.
  • ऑफिस संपल्यावर छोटा पॉज घ्या. दुसऱ्या दिवशीची कामं लिहा आणि मगच कामातून बाहेर पडा.
  • एक कट ऑफ टाइम ठेवा. त्यानंतर फक्त खूप अर्जंट काम असेल तरच प्रतिसाद द्या.
  • घरी किंवा ऑफिसमध्ये बोलण्याची मर्यादा ठेवा. सगळं मनात ठेवू नका, पण सतत त्याच गोष्टी रिपीटही करू नका.
  • जिथे आहात तिथे प्रेझेंट राहण्याचा नियम ठेवा. ऑफिसमध्ये काम, घरी माणसं आणि स्वतःकडेही लक्ष द्या.

शेवटी सेप्रेशन म्हणजे दोन वेगवेगळी विश्व निर्माण करणं नाही, तर मनाला योग्य वेळी योग्य जागी ठेवणं आहे. जेव्हा आपण भूतकाळाच्या आणि भविष्याच्या विचारांमध्ये अडकणं कमी करतो आणि आहे त्या क्षणात पूर्णपणे जगण्याचा प्रयत्न करायला लागतो, तेव्हा स्ट्रेस कमी होतो, प्रोक्रॅस्टिनेशन कमी होतं आणि आयुष्य थोडं अधिक हलकं आणि स्पष्ट वाटायला लागतं.