स्नेह एरंडे

रेज बेट (Rage bait) हा शब्द २०२५ मध्ये ऑक्सफर्डकडून वर्ड ऑफ द इयर म्हणून निवडला गेला होता. एवढा मोठा प्रेझेन्स असलेला हा शब्द आजच्या इंटरनेट कल्चरचा महत्त्वाचा भाग बनला आहे. डिक्शनरीमध्ये या शब्दाचा अर्थ असा आहे की, जाणीवपूर्वक असा एखादा मजकूर, व्हिडीओ किंवा विधान तयार करणं ज्यामुळे लोकांमध्ये चीड निर्माण होईल, ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतात, लोकांना राग येतो आणि परिणामस्वरूप ते वेगवेगळ्या रिॲक्शन्स आणि कमेंट्स देतात. मुख्यत: हा प्रकार सोशल प्लॅटफॉर्म्सवर होतो. आजच्या काळात इंटरनेटमुळे लोकांचं लक्ष वेधून घेणं फारच महत्त्वाचं झालं आहे आणि म्हणूनच रेज बेटसारख्या गोष्टी सहज पसरतात. 

‘रेज बेट’सारखाच ‘क्लिक बेट’ हाही एक शब्द आहे. क्लिक बेट म्हणजे मुद्दाम आकर्षक, अतिशयोक्त किंवा कुतूहल वाढवणारा मजकूर, फोटो किंवा ओळ वापरून लोकांना लिंकवर क्लिक करायला भाग पाडणं, जिथे आतला कंटेन्ट अनेकदा अपेक्षेपेक्षा साधा किंवा वेगळाच असतो. आम्ही जेन झी लहानपणापासून अशा बेट्समधून वाट काढत काढत मोठे झालो आहोत, पण रेज बेट आणि क्लिक बेट नेहमीच वाईट असतात असं नाही. क्लिक बेट कधी कधी अगदी विनोदीही ठरू शकतं. उदाहरणार्थ, आपण एखादी विनोदी रील पाहात असतो आणि अचानक मध्येच अलख पांडेजी येतात आणि म्हणतात, ‘‘क्यूँ नही हो रही है पढाई?’’ ज्यामुळे ते विनोदी रीलसुद्धा संपत नाही आणि एकदम अभ्यासाची आठवण आपल्याला होते. त्याचा प्रभाव इतका पडतो की कधी कधी आपण खरंच उठून अभ्यास करायलासुद्धा लागतो आणि हसूही येतं. थोडक्यात ते अनॉइंग असलं तरी अनइंटेन्शनली फनी वाटतं. 

रेज बेटिंग तर आजकाल डेली बेसिसवर केलं जातं. रेज बेटिंग ही एक कला आहे आणि ती अगदी छोट्या गोष्टींसाठी वापरली जाते. जसं की आपल्या नवी मुंबई, डोंबिवली, कल्याणमध्ये राहणार्‍या मित्रमैत्रिणींना मुद्दाम सांगणं, ‘‘तू तर मुंबईचा नाहीस, त्यामुळे तू काही सांगू नकोस’’. जरी त्या गप्पांमध्ये शहराचा काहीही संबंध नसला तरी मुद्दाम असं बोललं जातं. किंवा कोल्हापूरच्या माणसाला सांगायचं की कोल्हापूरपेक्षा पुण्यात चांगली मिसळ मिळते आणि मग त्या व्यक्तीचं त्यावर पुढचं तासाभराचं लेक्चर ऐकायचं. ते ऐकून झाल्यावरही पुन्हा पुण्याच्याच मिसळीचं गुणगान गात राहायचं.

या सगळ्यात एक वेगळीच मजा असते. म्हणूनच रेज बेट ही नेहमीच दुखावणारी नसते, तर अनेकदा हसवणारीही असते. ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन, ऑक्सफर्ड डिक्शनरीमधली रेज बेटची डेफिनेशन कितीही बरोबर असली तरी मला जेन झीने दिलेली डेफिनेशन जास्त आवडते. जेन झीच्या भाषेत रेज बेट म्हणजे एखादी जाणूनबुजून चुकीची, अतिशयोक्त किंवा उचकवणारी गोष्ट बोलायची ज्यामुळे ऐकणारे लोक ‘‘हे काय आहे?’’ असं म्हणत चिडतात, पण त्यातही एक हलकाफुलका, विनोदी टोन असतो.

तुम्हाला रेज बेट व्हायला आवडतं की रेज बेट करायला?

viva@expressindia.com