नेमका महत्त्वाचा मेल बघायचा आहे आणि मोबाइल लॅग झाला म्हणून तो खिडकीतून फेकून द्यावासा वाटतोय? ऑफिसच्या डेडलािनमुळे डोकं उठलंय? ब्रेकअप तर झालंय, पण काहीतरी ‘ब्रेक’ करायची खुमखुमी शिल्लक आहे? या इमोशन्स सगळ्यांनाच प्रत्येक पिढीत वाटत आल्या आहेत, असं नाहीये की फक्त आताच्या जनरेशनला असं वाटतं. फक्त आताच्या जनरेशनला त्यावर त्याच एनर्जीचा उपायही मिळाला आहे.

कोणतंही नुकसान करून घेण्यापेक्षा आता एक नवा, ‘हटके’ आणि एकदम कूल पर्याय तरुणाईला खुणावतोय, तो म्हणजे – ‘रेज रूम’! सध्या जेन झी आणि मिलेनियल्समध्ये या संकल्पनेला भरपूर प्रतिसाद पाहायला मिळतो आहे. सोशल मीडिया स्क्रोल करताना कधीतरी पीपीई किटसारखे गियर घालून, हातात बॅट घेऊन तोडफोड करणारे लोक दिसले असतीलच.

ही नुसती तोडफोड नाही, तर हा एक नवा स्ट्रेस-बस्टर पॅटर्न आहे. रेज रूम किंवा ‘स्मॅश रूम’ म्हणजे नक्की काय? तर ही एक अशी सुरक्षित आणि ‘नो जजमेंट’ जागा असते, जिथे हातात बॅट, हातोडा किंवा गोल्फ स्टिक देऊन एका खोलीत सोडलं जातं. या खोलीत जुने टीव्ही, काचेच्या बाटल्या, प्रिंटर, लॅपटॉप, खुर्च्या आणि बरंच काही मांडून ठेवलेलं असतं. यात प्रत्यक्ष काम फक्त एकच… ‘तोडा, फोडा आणि मोडा!’ पण, इथे सुरक्षाही महत्त्वाची असते. त्यामुळे हेल्मेट, ग्लोव्हज, शूज आणि जाड जॅकेट वगैरे प्रोटेक्टिंग गीअर्स दिले जातात. बॅकग्राउंडला हेवी मेटल किंवा रॉक म्युझिक लावून मनातला सगळा साचलेला राग, फ्रस्ट्रेशन आणि वैताग त्या निर्जीव वस्तूंवर काढता येतो. तिथे कुणीही पाहत नसतं, जज करत नसतं किंवा ओरडत नसतं. उलट जितकी जास्त तोडफोड, तितकं जास्त ‘रिलॅक्सेशन’!

आकडेवारीकडे पाहिलं तर हा ट्रेंड किती वेगाने वाढतोय हे लक्षात येईल. २०२० मध्ये जगभरात केवळ ८०० च्या आसपास असलेल्या रेज रूम्सची संख्या आता २०२६ पर्यंत ४,००० च्या पार गेली आहे. विशेषतः मुंबई, पुणे, दिल्ली आणि बेंगळुरूसारख्या मेट्रो शहरांत वीकेंडला या रूम्स ‘हाऊसफुल्ल’ असतात. साधारण ८०० ते ३००० रुपयांपर्यंतचे वेगवेगळे पॅकेजेस इथे मिळतात. कुणी एकटं येतं, तर कुणी ग्रुपमध्ये. तरुणाईला हे सगळं इतकं का आवडतंय? याचं कारण म्हणजे इथे मिळणारा ‘इन्स्टंट रीलिफ’! आजच्या पिढीला तासनतास कोणाशी तरी बोलून मन हलकं करण्यापेक्षा १५ मिनिटं तोडफोड करून घाम गाळणं जास्त सोपं आणि ‘सॅटिस्फाईंग’ वाटतं आहे. त्यात पुन्हा फोडलेल्या वस्तूंसोबतचे ‘स्लो-मो’ व्हिडिओज इन्स्टाग्राम रील्सवर शेअर करण्याचा ट्रेण्ड वेगळा!

मानसशास्त्रात ‘कॅथर्सिस’ नावाची एक संकल्पना आहे. याचा सोपा अर्थ म्हणजे मनातल्या साचलेल्या तीव्र भावनांना, विशेषतः रागाला मोकळी वाट करून देणं. जेव्हा आपण एखादी काचेची बाटली जोरात भिंतीवर मारतो आणि ती हजार तुकड्यांत विखुरते, तेव्हा आपल्या मेंदूला एक प्रकारचं ‘रिलीज’ मिळतं. अशा वेळी शरीरात ‘एंडोर्फिन्स’ नावाचे हॅप्पी हार्मोन्स तयार होतात. यामुळे स्ट्रेस लेव्हल क्षणार्धात खाली येते आणि एकदम हलकं वाटतं. हा एक प्रकारे सुरक्षित मार्गाने राग व्यक्त करण्याचा पर्याय आहे. समाजात आपण राग व्यक्त केला तर लोक आपल्याला ‘शॉर्ट टेम्पर्ड’ म्हणतात, पण इथे मात्र रागाला रोखून ठेवायची गरज पडत नाही. मात्र, रेज रूम हा काही कायमस्वरूपी मानसोपचार नाही.

तो एक मजेशीर आणि तात्पुरता स्ट्रेस-बस्टर आहे. जर रोजच प्रचंड राग येत असेल, ज्याला शास्त्रीय भाषेत अँगर इश्यूज म्हणतात, तर नक्कीच कोणाशी तरी बोलणं गरजेचं आहे. पण, कधीतरी कामाचा कंटाळा आला, ट्रॅफिकचा वैताग आला किंवा कोणावर तरी प्रचंड चिडचिड झाली, तर मग मात्र रेज रूमसारखा दुसरा झकास पर्याय नाही. तिथे गेल्यावर जाणवेल की, एखादे वेळा वस्तूंची मनसोक्त तोडफोड केल्यावर मिळणारा आनंद हा सुट्टीच्या आनंदापेक्षा कमी नसतो!

गंमत म्हणजे, आता या रेज रूम्स फक्त रागाचे सिंबॉल उरल्या नाही आहेत. तर चक्क ‘ब्रेकअप पार्टी’, ‘डिअॅडिक्शन सेलिब्रेशन’ किंवा ‘कॉर्पोरेट टीम आऊटिंग’ म्हणूनही लोक इथे येतात. ग्रुपने मिळून एकत्र करायची ॲक्टिविटी म्हणूनही रेज रूमकडे बघितलं जातं. मित्र-मैत्रिणींचे ग्रुप्स एकत्र येऊन एकमेकांना चिअर करत वस्तू फोडतात, ज्यामुळे त्यांचं बाँडिंग तर वाढतंच, पण मनातली सगळी नकारात्मकतासुद्धा निघून जाते. हे एक प्रकारचं ‘इमोशनल डिटॉक्स’ आहे असं म्हणायला हरकत नाही.