scorecardresearch

‘ब्रॅण्ड’ टेल: वीरे दा ब्रॅण्ड बिबा

एकाच पारंपरिक पोशाखाला नवतेचा साज चढवत देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध संस्कृतींच्या स्त्रियांना एकत्र जोडून घेण्याची किमया कोणी साधू शकेल, अशी कल्पनाही कोणी एरवी केली नसती.

तेजश्री गायकवाड
एकाच पारंपरिक पोशाखाला नवतेचा साज चढवत देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध संस्कृतींच्या स्त्रियांना एकत्र जोडून घेण्याची किमया कोणी साधू शकेल, अशी कल्पनाही कोणी एरवी केली नसती. दिल्लीतील आपल्या घरात दोन मुलांचे पालनपोषण करण्यात आणि घरसंसारात पूर्णपणे रमलेल्या मीना बिंद्रा नामक गृहिणीनेही हा विचार कधी केला नव्हता. त्यांच्या हातात कला होती आणि मनात उंच भरारी घेण्याची आस होती. यातूनच जन्माला आला स्त्रियांना अस्सल भारतीय पोशाखातून सौंदर्य बहाल करणारा त्यांचा ब्रॅण्ड ‘बिबा’!
‘बिबा’ या शब्दातच स्त्री आहे. पंजाबी भाषेत स्त्रीला ‘बिबा’ म्हटले जाते. मीना बिंद्रा यांनी पंजाबी ड्रेस हा प्रकार देशभरात लोकप्रिय केला. आज हाच पंजाबी ड्रेस पटियाला, कुर्ता-चुडीदार, कुर्ता-पलाझो, अनारकली अशा वेगवेगळय़ा अवतारांत देशभरात गल्लीतून मॉलपर्यंत सगळीकडे लोकप्रिय आहे. याचं सगळं श्रेय हे पूर्णपणे मीना बिंद्रा यांना जातं. गेल्या कित्येक दशकांत फॅशन अनेक पद्धतीने बदलली असली, तरी पंजाबी ड्रेस या प्रकाराला अजूनही पर्याय नाही, असंच म्हणावं लागेल. ही किमया मीना यांनी कशी साधली आणि त्यांचा ‘बिबा’ हा पंजाबी ड्रेस किंवा कुर्ता-पायजमा या मूलभूत प्रकाराभोवती गुंफलेला ब्रॅण्ड आज आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा लोकप्रिय झाला, याची गोष्ट फार रंजक अशी आहे.
मीना यांनी कधीच उद्योजिका व्हायचं स्वप्न पाहिलं नव्हतं. घरातल्या घरात मुलांना सांभाळून काही तरी काम करावं म्हणून त्यांनी ड्रेस शिवायला सुरुवात केली. छंद म्हणून त्यांनी हे काम हाती घेतलं होतं, ज्यातून वेळही जाईल आणि काही पैसे हातात येतील, एवढाच विचार त्यामागे होता. उद्योग उभारण्यासाठी किंवा आपला छंद जोपासण्यासाठी वयाची अट असते, या गैरसमजालाही त्यांनी सुरुंग लावला. ३९ व्या वर्षी त्यांनी अगदी लहान स्तरावर या व्यवसायाची सुरुवात केली. बँकेकडून ८००० रुपयांचे कर्ज घेतले, व्यवसायासाठीची ही त्यांची पहिली गुंतवणूक होती. आपल्याच ओळखीतील स्त्रिया, मैत्रिणींना त्यांनी आपण शिवलेले ड्रेस पाहण्यासाठी बोलवले आणि अशा पद्धतीने सुरुवातीच्या काळात त्यांनी डिझाईन केलेले, शिवलेले ड्रेस विकले गेले.
१९८३ साली त्यांनी कामाला सुरुवात केली होती, मात्र ‘बिबा’ हा ब्रॅण्ड म्हणून जन्माला यायला अजून अवकाश होता. रेडिमेड कुर्ता-पायजमा ही संकल्पनाच मुळी स्त्रियांना फारशी माहिती नव्हती. त्यातूनही ड्रेस शिवून घ्यायचे असतात ही गोष्ट इतकी मुरलेली होती की त्यापलीकडे जाऊन रेडिमेड ड्रेस विकत घेणं हा विचारही त्यांच्या मनाला शिवणं कठीण होतं. त्या काळात मीना यांनी स्त्रियांना रेडिमेड पंजाबी ड्रेसची ओळख करून दिली आणि ते उपलब्धही करून दिले. मुळात हे करणंही आज वाटतं तितकं सोपं नव्हतं. इतक्या मोठय़ा प्रमाणावर कापड मिळवणं, प्रिंट करून देणारे शोधणं, डिझाईननुसार ते शिवून देणारे मिळणं अशा किती तरी गोष्टी त्यांना शोधून काढाव्या लागल्या. मॉल्स नव्हते, ठरावीक ब्रॅण्ड नव्हते, दुकानदार- कारागीर या गोष्टी शोधून देणारं गूगलही हातात नव्हतं. त्यांनी आठ हजारांचं जे कर्ज घेतलं होतं, त्यातून त्यांनी एक गाडी भाडय़ाने घेतली. या गाडीत बसून रोजच्या रोज घाऊक बाजारात जाऊन विविध फॅब्रिक्स शोधणं, ब्लॉक प्रिंटर शोधणं हा उद्योग त्यांनी सुरू केला. सगळय़ा गोष्टी जमवल्यानंतर त्यांनी स्मॉल, मीडियम आणि लार्ज अशा तीन साइजमध्ये ४० ड्रेस शिवले. ते प्रत्येकी १७० रुपयांना त्यांनी विकले. त्यातून जवळपास तीन हजार रुपयांचा नफा झाला. त्या काळात एवढा नफा मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती. या यशानंच त्यांची या क्षेत्रातील वाटचाल पक्की केली.
फॅशनच्या क्षेत्रात तुमच्याकडे नुसतं डिझाईिनग कौशल्य असून भागत नाही, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचता येणंही तितकंच महत्त्वाचं असतं हे आजवरच्या नामांकित ब्रॅण्डची यशोगाथा उलगडून पाहिली की लक्षात येतं. मीना बिंद्रा आणि त्यांचा व्यवसायही याला अपवाद नव्हता. दिल्लीस्थित असल्याने आपण शिवलेले कपडे मोठय़ा प्रमाणावर विकणं हे फारसं अवघड नसलं तरी असं किती दिवस घरातून काम होणार होतं? या छोटेखानी उद्योगाला व्यवसायाचं स्वरूप देण्याची संधी मीना यांना बेंझर फॅशन स्टोअरमुळे मिळाली. मुंबईत लोकप्रिय असलेल्या या स्टोअरने मीना यांच्याकडून कलेक्शन विकत घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे मीना यांचे कलेक्शन मोठय़ा प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचू लागलं आणि दुसरं म्हणजे बिल बनवणं, पावतीपुस्तक असणं अशी व्यवसायाची शिस्त म्हणून असणाऱ्या गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. हे सगळं करायचं म्हणजे तुमचा ब्रॅण्ड आला आणि त्यासाठी नाव ठेवणंही तितकंच गरजेचं झालं. कला आणि व्यवसाय दोन्ही गोष्टींच्या संगमातून १९८८ साली ‘बिबा’ या ब्रॅण्डचा अधिकृतरीत्या जन्म झाला.
सतत नव्याचा शोध घेत राहणं हे मीना याचं वैशिष्टय़ं ‘बिबा’ या ब्रॅण्डची खरी ओळख ठरलं असं म्हणता येईल. वैविध्यपूर्ण कपडे, डिझाईन्सच्या शोधात केलेल्या भटकंतीत त्यांना कधी तरी पटियाला पायजम्याचा शोध लागला. कधी तरी पंजाबमधील एका शहरापुरता मर्यादित असलेला हा प्रकार आज देशभरात लोकप्रिय आहे. आपण डिझाईन केलेले कपडे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणखी एक हुकमी माध्यम मीना यांनी शोधून काढलं. ते होतं हिंदी चित्रपटांचं.. ‘देवदास’. ‘बागबान’, ‘हलचल’सारख्या चित्रपटांसाठी ‘बिबा’कडून कलेक्शन्स डिझाईन केलं गेलं. अगदी ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात करीनाने घातलेला ड्रेसही ‘बिबा’चा होता.
इथपर्यंतच हे चक्र थांबलं नाही. तर साध्या पंजाबी ड्रेसला त्यांनी वेगवेगळय़ा रूपात सजवलं. कॉलर असलेल्या हरियाणवी कुत्र्याला खिसा शिवला. खिशामुळे या कुत्र्यांना जास्त पसंती मिळाली. त्याचप्रमाणे त्यांनी हैदराबादी पायजमा डिझाइन केला, जो आज पलाझो पँट्स म्हणून ओळखला जातो. प्लीट्ससह भोपाली कुर्ती, पेशवाई ड्रेसच्या मध्यभागी शिवलेले योक आणि कफ असलेली बाही अशा विविध पद्धतीने डिझाईन केलेल्या कुर्तीज हे ‘बिबा’चं वैशिष्टय़ आजही कायम आहे. फॅशन हा शब्दही जेव्हा आपल्याकडे फारसा रूढ झाला नव्हता, तेव्हा भारतीय पारंपरिक पोशाखाला नवा साज चढवत मीना बिंद्रा यांनी ‘बिबा’ हा फॅशनेबल ब्रॅण्ड म्हणून नावारूपाला आणला.
नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला मुंबईतील इनॉर्बिट मॉलमध्ये त्यांनी ‘बिबा’चे पहिले एक्स्लक्लूजिव्ह स्टोअर सुरू केले होते. आज, ‘बिबा’ भारताच्या ७६ शहरांमध्ये १९२ विशेष ब्रॅण्ड आऊटलेट्ससह आणि २५० हून अधिक मल्टी-ब्रॅण्ड आऊटलेट्समध्ये उपलब्ध आहे. आता मीना यांच्या हाताखाली डझनभर डिझाईनर्स आहेत, तरीही मीना स्वत: जातीने डिझाईन्सवर लक्ष ठेवून असतात. तुमची आवड असेल आणि काही वेगळं करण्याचा ध्यास तुमच्यात असेल तर अशा अगदी स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात साकार होऊ शकतात, हा विश्वास या ब्रॅण्डच्या माध्यमातून आपण कमावला आहे असं त्या सांगतात.
viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rand tale veere da brand biba cultures traditional dress fashion amy

ताज्या बातम्या