viva14इंटरनेटच्या युगात सोशली अपडेट होताना आजची तरुण पिढी असंवेदनशील होताना दिसतेय. व्हायरल होणारे व्हिडीओ, सतत सेल्फी काढून अपलोड करण्याची क्रेझ बघून उपलब्ध असणाऱ्या साधनांचा काही वेळा अयोग्य वापर होताना दिसतोय. त्यातूनच कुठे तरी अश्लीलता आणि विकृती जन्माला येते. अशा या व्हायरल व्हिडीओविषयी तुम्हाला काय वाटत?  संवेदना हरवली आहे का? असे प्रश्न ‘व्हिवा’मधून (दि. १ मे) विचारण्यात आला होता. त्यावर आलेली ही प्रातिनिधिक मत-मतांतरं..
 
आत्मभान गरजेचं!
आज प्रत्येकाच्या हातात फास्ट कम्युनिकेशनची साधनं तर आली आहेत, पण त्यांचा वापर कसा करावा आणि तो करताना काय तारतम्य बाळगावं याचं भान प्रत्येकाला आहेच असं नाही. एखाद्या आदरणीय व्यक्तिमत्त्वाच्या निधनाच्या बातमीचं पोस्ट लाइक करणारेही यातलेच. असं केल्यामुळे कुणाचं वैयक्तिक नुकसान होत नाही. पण व्हायरल व्हिडीओजमुळे ते होतं. समाजभान नसण्याचं हे लक्षण वाटतं. कुठलीही बंधनं नसल्यामुळे असे व्हिडीओज् सर्रास शेअर होतात. ‘माय लाइफ माय चॉइस’ असं म्हणताना त्याचा समोरच्याला त्रास होत नाही ना,  याचा विचार आपण करतच नाही. या वृत्तीला बेलगाम तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे या व्हायरल व्हिडीओसारख्या घटना घडतात. बघणारे गप्प बसून बघतात म्हणून करणारे करत राहतात. अशा गोष्टींच्या बाबतीत काय योग्य आणि काय नाही याचं भान असलंच पाहिजे.
– कौस्तुभ दीक्षित, बंगळुरू, कर्नाटक.

असंवेदनशील ‘मज्जा’
फोटोज किंवा व्हिडीओज शेअर करणं याची सुरुवात होते ती ‘फनी’ या शब्दापासून. अभ्यासाच्या व्यापातून विरंगुळा किंवा मज्जा म्हणून विद्यार्थी अशा गोष्टी करतात. पण ते कधी चुकीच्या वळणावर जातात आणि कधी त्याच्या अधीन होतात हे त्यांना समजत नाही. ज्या व्यक्तीचा तो फोटो किंवा व्हिडीओ असतो त्याच्या भावनांचा आणि परिणामांचा विचार केला जात नाही.
– राज जाधव, पुणे</strong>

असे पब्लिसिटी स्टंट नको!
एखाद्याचे फोटोज किंवा प्रायव्हेट व्हिडीओज निष्काळजीपणाने शेअर केले जातात. पण त्याआधी तरुणांनी दुसऱ्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विचार करणं गरजेचं आहे. कोणी हे पब्लिसिटी स्टंट म्हणून करत असेल तर त्याकडे गुन्हा म्हणून पाहायला हवं. सोशल मीडियावर उपलब्ध असणाऱ्या सेफ्टी पर्यायांचा वापर पोस्ट आणि चॅटच्या सेफ्टीसाठी करायला हवा. तुम्हाला काय सांगायचं आहे याचं सामाजिक भान असणं गरजेचं आहे.
– मेधा जोशी, नाशिक.

वेड ते विकृती
सेल्फी काढणे आणि ते अपडेट करणे हे आजकाल एक खूळ झालंय. सेल्फी काढताना वेळ, काळ याचे भानसुद्धा राहत नाही.  कोणतीही खातरजमा न करता सर्वात आधी बातमी, फोटो/ व्हिडीयो ग्रुपमध्ये शेअर केलं जातं. सोशली अपडेट असणं याची सध्या तरुणाईत क्रेझ आहे. काही विकृत, अश्लील, असभ्य गोष्टीही शेअर होत राहतात आणि व्हायरल होतात. याचा अर्थ संपूर्ण तरुण पिढी विकृत नाही, पण विकृत तरुणांचं प्रमाण जास्त होत चाललंय हे मात्र नक्की. प्रत्येकाला दुसऱ्याच्या खासगी आयुष्यात काय चालू आहे याचं भारी कुतूहल असतं, तर सेलेब्रिटीबद्दल ही जिज्ञासा कैकपटीने जास्त असते. म्हणून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ जास्त व्हायरल होतात. यात बऱ्याच वेळी कलाकारांच्या भावना दुखावत असतील, त्यांच्या इमेजला धक्का पोचत असेल. पण काही बाबतीत तो पब्लिसिटी स्टंटसुद्धा असू शकतो.
– गणेश जाधव, आर्वी, सातारा.
 
हा तर मानसिकतेचा खून
सोशल मीडियावर विचित्र फोटो किंवा अश्लील फोटोज किंवा व्हिडीओ अपलोड करणे चुकीचे आहे. काही विकृत लोकांमुळे मुलींच्या सामाजिक प्रतिष्ठेला तडा जातो. काही सामान्य मुला-मुलींच्या बाबतीत जेव्हा असे होते, तेव्हा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अशा प्रकारांतून मुलींचे मन मारले जाते. माझ्या मते हे एखाद्याचे मानसिक खच्चीकरण आहे. सायबर बुलिंग म्हणजे मानसिकरीत्या केलेला खून आहे. ज्यात मुलगी शरीराने जिवंत असते पण मनाने नाही. या सर्वासाठी काही तरी कठोर पाऊल उचलले गेले पाहिजे.
– नूपुर चौधरी

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
सध्याच्या धावत्या जगात सोशली अॅक्टिव्ह असणं महत्त्वाचं आहेच, पण प्रत्येकाची ही पण जबाबदारी आहे की, त्याचा वापर करताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ  नयेत. व्हायरल व्हिडीओज शेअर करणं ही एक विकृतीच म्हणावी लागेल, कारण हे सगळं करताना त्यांची संवेदनशीलताच संपून गेल्यासारखी वाटते. आजच्या तरुण पिढीसमोर अपडेट राहण्यासाठी एवढे पर्याय उपलब्ध असताना त्याचा योग्य तोच वापर व्हावा असे मला वाटते.
– प्रणिता ताठे, ठाणे.
 
कधी होशील माणूस?
आजकाल संवेदनशीलता लोप पावत चालली आहे. विकसनशील राष्ट्र होण्यासाठी तरुणांच्या नैतिक मूल्यांचा पाया भक्कम नसेल तर आधुनिकतेची कास धरून काही उपयोग नाही. एखादी व्यक्ती संकटात असताना त्यांना मदत करण्याऐवजी त्याचं चित्रीकरण करणारी लोकं बघितल्यावर मला एकच प्रश्न पडतो माणसा माणसा कधी होशील माणूस?
– ज्योती भनारकर,  अणुशक्तीनगर, मुंबई.
(संकलन- कोमल आचरेकर)