scorecardresearch

अवकाशाशी जडले नाते : अंतराळाच्या लेकी

येत्या आठवडय़ात ८ मार्चला महिलांनी आपल्या हक्कासाठी दिलेल्या लढय़ाच्या स्मरणार्थ जागतिक महिला दिन साजरा होणार आहे.

viva3 space

विनय जोशी

येत्या आठवडय़ात ८ मार्चला महिलांनी आपल्या हक्कासाठी दिलेल्या लढय़ाच्या स्मरणार्थ जागतिक महिला दिन साजरा होणार आहे. सगळय़ाच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणाऱ्या नारीशक्तीचा गौरव या निमित्ताने होतो. यात चूल आणि मूल हे बंधन झुगारून अंतराळात झेपावलेल्या महिला विशेष उल्लेखनीय ठरतात. पण इतर क्षेत्रासारखा इथेही  महिलांना स्वत:ला सिद्ध करायला लढा द्यावा लागला आहे. पुरुषप्रधान अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात अगदी सुरुवातीपासूनच महिला शास्त्रज्ञ अनेक अंतराळ मोहिमांचा अविभाज्य भाग राहिल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला अंतराळवीरांचे प्रमाण कमी असले तरी अंतराळ विज्ञानातील इतर क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षणीय आहे ‘यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’ या पुरुषप्रधान छाप वाक्याला मागे टाकत प्रत्येक यशस्वी अंतराळ मोहिमांमागे अनेक महिलांचा मोठा हातभार असतोच हे या गगनवनितांनी वारंवार सिद्ध केले आहे.

पहिली महिला अंतराळात जायलासुद्धा स्पेस रेस कारणीभूत ठरली आहे. १९६१ मध्ये पहिला पुरुष अंतराळवीर युरी गागारीन अंतराळात जाऊन आल्यानंतर अंतराळात जाणारी पहिली महिलासुद्धा रशियाचीच असावी या ईर्षेने रशियाने मोहीम हाती घेतली. यासाठी आलेल्या ४०० हून अधिक अर्जातून पेशाने यंत्रमाग कामगार असणाऱ्या वालेंतिना तेरेश्कोवा यांची निवड झाली. त्यांनी सोव्हिएत वायुसेनेमध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. आणि अखेर १६ जून १९६३ रोजी ‘वोस्तोक ६’ हे अंतराळ यान उडवत त्यांनी अंतराळात प्रवेश केला. त्यांनी २ दिवस २३ तास अंतराळात राहात पृथ्वीभोवती ४८ प्रदक्षिणा घातल्या. महिलांच्या अंतराळ प्रवासाची मुहूर्तमेढ १९६३ मध्ये रोवली गेली असली तरी पुढील महिला अंतराळात जायला तब्बल १९ वर्षे लागली. १९८२ मध्ये रशियाच्या स्वेतलाना सवित्सकाया ‘सोयुझ टी-५’ या अंतराळ यानातून अंतराळात गेल्या. १९८५ मध्ये आपल्या दुसऱ्या अंतराळ मोहिमेत त्या स्पेसवॉक करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. अंतराळात जाणाऱ्या पहिल्या दोन्ही महिला जरी रशियाच्या असल्या तरी रशियाने आतापर्यंत फक्त चार रशियन महिलांना अंतराळात जाण्याची संधी दिली आहे. सर्वाधिक महिला अमेरिकेद्वारा अंतराळात गेल्या आहेत.

अंतराळात जाणारी पहिली अमेरिकन महिला होण्याचा मान सॅली क्रिस्टेन राईड यांना १९८३ मध्ये ‘एसटीएस-७’ मोहिमेदरम्यान मिळाला. त्यांनी चॅलेंजर स्पेस शटलवर सात दिवस घालवले. यानंतर अंतराळ मोहिमांतील महिलांचा सहभाग वाढला. १९८४ मध्ये अमेरिकेच्या जूडिथ रेसनिक, कॅथरीन सुलिवन, एना ली फिशर या महिला विविध मोहिमांतून अंतराळात गेल्या. एना ली फिशर या अंतराळात जाणाऱ्या पहिल्या आई ठरल्या. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती अंतराळात घेते भरारी’ हे जणू त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले. अंतराळवीर पेगी व्हिटसन २००० मधील ‘इंटनॅशनल स्पेस स्टेशन’ मोहिमेच्या पहिल्या महिला कमांडर होत्या. दहा स्पेसवॉकमध्ये ६० तास आणि २१ मिनिटे असा सर्वाधिक काळ अंतराळात चालण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

१९९१ मध्ये ब्रिटनच्या हेलेन शर्मन यांनी मीर स्पेस स्टेशनला भेट दिली. कॅनडाच्या रोबर्टा बोंडर (१९९२), जपानच्या चिआकी मुकाईया (१९९४),  फ्रान्सच्या क्लाउडी हेंगेरे (१९९६), कोरियाच्या ई सो-येओन (२००८), चीनच्या लियू यांग(२०१२), इटलीच्या सामन्था क्रिस्टोफोरेटी(२०१४) या महिला आपल्या आपल्या देशाच्या पहिल्या अंतराळवीर ठरल्या. भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांनी ‘एटीएस-८७ कोलंबिया’ या अवकाशयानातून १९ नोव्हेंबर १९९७ मध्ये  अंतराळात झेप घेतली. या मोहिमेत त्या ३७६ तास आणि ३४ मिनिटे अंतराळात राहिल्या. २००३ मध्ये आपल्या दुसऱ्या अंतराळ मिशन दरम्यान कोलंबिया स्पेस शटल परतीच्या प्रवासात दुर्घटनाग्रस्त झाले आणि कल्पना चावला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला सुनीता विल्यम्स २००७ मध्ये पहिल्यांदा अंतराळात गेल्या होत्या. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम त्यांनी केला आहे. सिरिशा बांदला या तिसऱ्या भारतीय वंशाच्या महिला अंतराळवीर ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक युनिटी २२ स्पेस फ्लाइट’मधून २०२१ मध्ये अंतराळात जाऊन आल्या आहेत.

अंतराळ विज्ञानात  फक्त अंतराळवीर इतपतच महिलांचा सहभाग मर्यादित नाही. जगभरातील विविध अंतराळ संस्थांमध्ये शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंता, संशोधक, गणितज्ञ अशा विविध पदांवर अनेक महिला अगदी सुरुवातीपासूनच कार्यरत आहेत. नासाच्या आरंभीच्या अंतराळ मोहिमेत यानाची कक्षा ठरवण्याचे गणित कॅथरीन जॉन्सन यांनी आखून दिले. ‘अपोलो १३ मिशन’ दरम्यान नासाच्या कक्षातील सगळे कॉम्प्युटर बंद पडून मिशन कायमचे आटोपल्यात जमा असताना कॅथरीन यांनी कागदावर आकडेमोड करून सगळा प्रश्न सोडवला. अपोलो मिशनसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात मार्गारेट हॅमिल्टन यांचा मोठा सहभाग होता. जोन मॉर्गन यांनी ‘अपोलो ११  मिशन’च्या लाँच काउंटडाउनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अपोलो १३ मोहिमेतील अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्यात पोपी नॉर्थकट यांचे योगदान होते. या मिशन्समधून चंद्रावर उतरलेले पुरुष जगप्रसिद्ध झाले, पण पडद्यामागे राहात कार्य करणाऱ्या महिला मात्र दुर्लक्षित राहिल्या. डोरोथी वौगन, कॅथरीन जॉन्सन आणि मेरी जॅक्सन यांच्या आयुष्यावर आधारित ‘हिडन फिगर्स’ या चित्रपटाने अंतराळ संशोधन क्षेत्रात महिलांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर प्रकाश टाकला होता. हबल दुर्बिणीच्या उभारणीत नॅन्सी रोमन यांचा मोलाचा वाटा होता. हबलसारख्या स्पेस टेलिस्कोपची गरज जगासमोर आणणे, हबलची प्राथमिक  कल्पना मांडणे  इतकेच नाही तर यासाठी सरकारी निधी मिळवणे अशा सर्वच आघाडय़ांवर त्यांनी लढा दिला. यामुळेच त्यांना ‘मदर ऑफ हबल’ म्हटले जाते. शनीकडे झेपावलेल्या कॅसिनी मोहिमेत कॅरोलिन सी. पोर्को यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

महिला शास्त्रज्ञ म्हटले की मॉडर्न कपडय़ातली स्मार्ट वुमन अशी प्रतिमा बहुतेकांच्या डोळय़ासमोर येते, पण २०१४ ला भारताचे ‘मंगलयान’ मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या दाखल झाले आणि जगभरातल्या मीडियात इस्रोच्या नियंत्रण कक्षातील महिला शास्त्रज्ञांचा फोटो झळकला. काठापदराची साडी नेसलेल्या, केसात गजरा माळलेल्या महिला आनंद साजरा करतानाचा फोटो सोशल मीडियावरदेखील हिट झाला. साडी नेसणारी स्त्री म्हणजे ‘काकूबाई’ अशी ठोकळेबाज प्रतिमा बदलली गेली. मार्स ऑर्बिट मिशनच्या उपसंचालक रितू करीधल गेली १८ वर्षे इस्रोमध्ये काम करत आहेत. नंदिनी हरिनाथ यादेखील  मंगलयान मोहिमेत उपसंचालक होत्या. इस्रोमध्ये २० वर्षे कार्य करत असताना त्यांनी १४ प्रकल्पांत महत्त्वपूर्ण कार्य केले. मौमिता दत्त या मिशनच्या सिस्टीम इंजिनीअर होत्या. या मोहिमेत प्रकल्प व्यवस्थापक म्हणून मीनल रोहित आणि उपग्रह पर्यवेक्षकतज्ज्ञ म्हणून कृती फौजदार यांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली. या मिशनला भारताच्या मिसाईल वुमन डॉ. टेसी थॉमस यांचेदेखील मार्गदर्शन होते. वनिता मुथय्या आणि रितू करीधल ‘चांद्रयान २’ या मोहिमेच्या प्रकल्प संचालक होत्या.

भविष्यातील अनेक मिशन्समध्ये महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढतो आहे. पुढील वर्षी नासाच्या आर्टेमिस मिशनद्वारे पहिल्यांदा महिला चंद्रावर उतरणार आहे. दीर्घकाळ अंतराळात राहणाऱ्या अंतराळवीरांच्या मन:स्थितीत एक सकारात्मक  बदल होत असतो, याला विहंगावलोकन प्रभाव(Overview effect) म्हटले जाते. अंतराळातून देशांच्या सीमारेषा न दिसता पृथ्वी अत्यंत सुंदर दिसते. धर्म, जाती, वंश, वर्ण अशा  भेदांची बंधने दूर होत सगळे मानव समान वाटू लागतात. हाच दृष्टिकोन पृथ्वीवरील विविध अंतराळ संस्थांमध्ये येत महिला-पुरुष हा भेददेखील नाहीसा व्हावा आणि अधिकाधिक महिलांना या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करायची संधी मिळावी, या महिला दिनाच्या निमित्ताने सदिच्छा!

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 00:02 IST