संशोधनमात्रे : एका कुतूहलाचा प्रवास

राधिका कुंटे viva@expressindia.com ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलाला वृत्तपत्र – पुस्तकांतून वाचलेल्या – ऐकलेल्या खगोलशास्त्राविषयी कुतूहल वाटलं. मग सुरू  झाला त्याच्या अभ्यासाचा प्रयास. विविध शैक्षणिक टप्पे पार करत मांडवे ते अ‍ॅरिझोना हा कुतूहलाचा प्रवास सुरूच आहे. जाणून घेऊया शब्बीर शेखचं करिअर आकारणाऱ्या संशोधन प्रवासाविषयी.  ‘स्थळ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांडवे. विद्यार्थी – शब्बीर शेख. इयत्ता […]

राधिका कुंटे viva@expressindia.com
ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलाला वृत्तपत्र – पुस्तकांतून वाचलेल्या – ऐकलेल्या खगोलशास्त्राविषयी कुतूहल वाटलं. मग सुरू  झाला त्याच्या अभ्यासाचा प्रयास. विविध शैक्षणिक टप्पे पार करत मांडवे ते अ‍ॅरिझोना हा कुतूहलाचा प्रवास सुरूच आहे. जाणून घेऊया शब्बीर शेखचं करिअर आकारणाऱ्या संशोधन प्रवासाविषयी. 

‘स्थळ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांडवे. विद्यार्थी – शब्बीर शेख. इयत्ता पाचवी. विद्यार्थी स्वभावविशेष –  विविध गोष्टींविषयी कुतूहल वाटणं’. शब्बीरच्या प्रगतीपुस्तकावर ही नोंद असावी. त्याला सहावीत ‘विश्व’ नावाचा धडा होता. त्यातल्या रंगीत पानावर एका बाजूला एनसीएल आणि दुसऱ्या बाजूला आकाशगंगेचं चित्र होतं. त्याला आकाशगंगेविषयी कुतूहल वाटू लागलं. विज्ञान शिक्षिका संगीता माने यांनी धडा शिकवल्यानंतर खगोलशास्त्राची छोटीशी पुस्तिका वर्गात वाचून दाखवली आणि तो याविषयी अधिक वाचायला लागला. त्याच्या गावात तेव्हा वृत्तपत्र हेच जगाशी संवाद साधायचं माध्यम होतं. त्यातून त्याला या विषयाच्या बातम्या – माहिती कळू लागली. आठवी ते दहावी तो ‘काकासाहेब म्हस्के माध्यमिक विद्यालया’त शिकला. शब्बीर सांगतो की, ‘आठवीत दिवाळीच्या सुट्टीच्या सुरुवातीला गणिताचे शिक्षक कल्याण ठोंबरे यांनी शाळेच्या छोटेखानी ग्रंथालयातील पुस्तकं घरी वाचायला न्यायला सांगितली. आम्ही ती घेतली. माझ्या छोटय़ा पुस्तकाचा दोन दिवसांत फडशा पडल्यावर मित्रांच्या मोठय़ा पुस्तकांकडे मोर्चा वळवला. त्यात जयंत नारळीकर यांच्या विज्ञानकथांसह काही पुस्तकं होती. सुट्टीनंतर शाळेत आल्यावर सरांना विचारून आणखी पुस्तकं वाचायचा झपाटा लावला. मग वाचनाचा छंद वाढत गेला. या गोष्टींमध्ये रस वाटत गेला आणि आपल्यालाही संशोधन करायला आवडेल असं वाटलं’.

तो अहमदनगरमधल्या ‘न्यू आर्ट्स महाविद्यालया’त अकरावी – बारावी विज्ञान शाखेत गेला. दहावीपर्यंत मराठी माध्यम होतं. तेव्हा अनेकांनी इंग्रजीचा बागुलबुवा उभा केला, पण त्याच्याबाबतीत तो दूर झाला. कारण शाळेतल्या विज्ञानाच्या बबन खांदवे सरांनी बोलता बोलता सहज सांगितलं होतं की, ज्यांना विज्ञान शाखेत जायचं आहे, त्यांचे पुस्तकाच्या शेवटी दिलेले पारिभाषिक इंग्रजी शब्द पाठ पाहिजेत. शब्बीरने ते आचरणात आणलं आणि त्याचा शब्दसंग्रह वाढत गेला. त्याने नववी – दहावी इंग्रजीची पुस्तकं आणायला सांगितली. आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे घरच्यांनी त्याचे पुस्तकांचे लाड पुरवले. त्या मागवलेल्या इंग्रजी पुस्तकातलं त्याला फारसं काही समजलं नाही, ते घोकून ठेवल्याने पुढच्या गोष्टी जास्त कठीण वाटल्या नाहीत. आता विचार करताना त्याला जाणवतं की, अशा अनेक छोटय़ा वाटणाऱ्या गोष्टींनी आपल्या करिअरच्या घडणीला सुरुवात झाली असावी. घरच्यांनी नेहमीच त्याच्या निर्णयांना ठाम पाठिंबा दिला.

काही वेळा नेमक्या माहितीचा अभाव शिक्षणाच्या आड येतो. विज्ञान शाखेतलं शिक्षण घेताना संशोधक व्हायचं म्हणजे पीएचडी करावी लागते आणि त्यासाठी बीएस्सी, एमएस्सी नि पीएचडी हेच टप्पे असतात असं शब्बीरच्या डोक्यात होतं. बाकी आयसर, आयआयटी वगैरे पर्यायांची योग्य माहितीच नव्हती. कोचिंग क्लास लावायचा नाही हे डोक्यात पक्कं होतं. कारण स्वअभ्यासाला प्राधान्य देत सगळ्या संकल्पना समजावून घ्यायच्या होत्या. अभ्यासाच्या पुस्तकांखेरीज एनसीईआरटीची काही पुस्तकं त्याने वाचली. न्यू आर्ट्स महाविद्यालयात बीएस्सीला असताना काही प्राध्यापकांनी फार चांगलं शिकवलं, मार्गदर्शन केलं. उदाहरणार्थ- प्रा. रंगराव भामरे सरांनी शिकवल्यामुळे गणिताची गोडी अधिक वाढली. पहिल्या वर्षांनंतर भारतातील ‘मॅथमॅटिक्स ट्रेनिंग अ‍ॅण्ड टॅलेंट सर्च प्रोग्रॅम ऑफ नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथमॅटिक्स’च्या समर स्कूलसाठी प्राध्यापकांनी त्याची शिफारस केली. त्याला पहिल्या लेव्हलसाठी इंदोरला जायची संधी मिळाली. शिस्तबद्ध आणि तर्कशुद्ध पद्धतीने कसा विचार करायचा हे कळलं. जाम कठीण अभ्यासक्रम असतो हा महिन्याभराचा. दुसऱ्या वर्षी त्याने पुढल्या लेव्हलचा अभ्यासक्रम पूर्ण केला. बीएस्सी तिसऱ्या वर्षांसाठी भौतिकशास्त्र हा विषय स्पेशल घेतला होता. प्रा. विष्णू धस सरांमुळे या विषयातील नवनवीन आयामांची गोडी वाढीस लागली.

पुढे एमएस्सीसाठी त्याने पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथल्या प्रा. पी. एस. जोग यांच्यामुळे प्रेरणा मिळाली. शिकवताना ते वर्गात इंटरेस्टिंग नि ट्रिकी प्रश्न विचारायचे आणि त्यांची विचारपूर्वक उत्तरं द्यायला मज्जा यायची. दुसऱ्या वर्षांला असताना अ‍ॅस्ट्रोनॉमी आणि अ‍ॅस्ट्रोफिजिक्स हे स्पेशल विषय घेतले होते. हे विषय आयुकामधले प्राध्यापक शिकवायचे. तोपर्यंत आयुका हे नाव तो ऐकून होता. जयंत नारळीकर सरांची काही पुस्तकं वाचली होती. दरम्यान त्याने आयुकाची प्रवेश परीक्षा दिली. नंतर मुलाखत होऊन त्याची निवड झाली. तेव्हाच टीआयएफआर, नेट परीक्षाही दिली. त्यातही पास झाला. एमएस्सीला त्याने सुवर्ण पदक पटकावलं. पुढे आयुकातच पीएचडी करण्याचा निर्णय पक्का झाला. शब्बीर सांगतो, आयुकामध्ये पहिलं वर्ष कोर्सवर्क असतं. त्यानंतर पीएचडीचं संशोधन सुरू होतं. तिथे मी साधारण साडेसहा वर्ष होतो. हा काळ माझ्यासाठी फार मोलाचा ठरला. त्या काळात मागे वळून पाहताना वाटलं की, लहानपणापासून वाटलेल्या कुतूहलाचा प्रवास पुढे सुरू राहील या दृष्टीने काही करावं. मला मिळालेली ही संधी सगळ्यांना मिळतेच असं नाही. आयुकामध्ये अभ्यासकांना अभ्यास आणि कामकाजाच्या दृष्टीने सर्वतोपरी साहाय्य केलं जातं. त्या काळात अनेक ज्येष्ठ, जाणकारांशी बोलण्याची संधी मिळाली’.

खगोलशास्त्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काही संस्थांनी मिळून मेहनतीने केलेल्या संशोधनाचा वसा सतत पुढे जात असतो. खगोलशास्त्रातल्या निरीक्षणांचं विश्लेषण करणं आणि ते गणित, भौतिकशास्त्राच्या साहाय्याने अभ्यासणं, त्यांची सांगड घालणं हेही महत्त्वाचं काम असतं. याविषयीची तोंडओळख पहिल्या वर्षांत होते. नंतर विद्यार्थी आपला कल मार्गदर्शकांना सांगतात आणि विचारांती पीएचडी संशोधनाचा विषय ठरतो. त्याचे मार्गदर्शक होते प्राध्यापक तरुण सौरदीप. त्याच्या पीएचडीचा ‘स्टडी ऑफ कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊं ड अ‍ॅनोमलीज अ‍ॅण्ड वीक लेन्सिंग’ हा प्रबंध वैश्विक मायक्रोवेव्ह प्रारणाच्या अभ्यासाशी निगडित होता. ‘विश्वरचनाशास्त्रात (कॉस्मॉलॉजी) वैश्विक मायक्रोवेव्ह प्रारण (प्रकाश) हे विश्वाच्या अभ्यासाचा एक मुख्य घटक आहे. या अभ्यासाच्या साहाय्याने विश्वाचं वय, विश्वातील वेगवेगळ्या घटकांचं वस्तुमान अतिशय अचूकपणे मोजता आलं आहे. विश्वाची निर्मिती आणि उत्क्रांतीविषयीच्या सिद्धांताची पडताळणी करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक म्हणून वैश्विक मायक्रोवेव्ह प्रकाशाकडे पाहिलं जातं. आईनस्टाईनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार प्रकाश हा स्थलकालाला वस्तुमानामुळे आलेल्या वक्रतेमुळे सरळ रेषेत प्रवास करत नाही. या परिणामाला ‘ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग’ असं म्हणतात, कारण काचेच्या भिंगातून जाताना प्रकाशाचा मार्ग विचलित होतो, तसंच काहीसं इथे होतं. वैश्विक मायक्रोवेव्ह प्रकाश हेसुद्धा एका विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश असल्यामुळे आपल्यापर्यंत येताना तो त्याच्या मूळ दिशेतून काही अंशी विचलित होतो. या परिणामाच्या काही वैशिष्टय़ांचा गणितीय अभ्यास हा माझ्या प्रबंधाचा एक भाग होता. विश्वाच्या अभ्यासात असं गृहीत धरलं जातं की विश्व हे सर्व दिशेत सरासरी एक सारखंच आहे. अशा विश्वात उदाहरणार्थ— एका दिशेत असणाऱ्या दीर्घिकांची सरासरी संख्या ही दुसऱ्या दिशेत आढळणाऱ्या दीर्घिकांच्या सरासरी संख्येएवढीच असणार. विज्ञानाच्या अभ्यासात सर्व गृहीतकं तपासून पाहणं गरजेचं असतं. गेल्या काही दशकांमधे सर्व दिशेने येणाऱ्या वैश्विक मायक्रोवेव्ह प्रकाशाचं अचूक निरीक्षण आणि मोजमाप करण्यात आलं आहे. या निरीक्षणाच्या आधारे विश्व हे वेगवेगळ्या दिशेत किती प्रमाणात एकसारखं आहे हे तपासून पाहण्याची संधी मिळते आणि तोच माझ्या प्रबंधाचा दुसरा भाग होता’, असं तो सांगतो.

सर्जनशील आणि तर्कशुद्ध विचार करून काम करताना वेळेचं भान बाळगणं महत्त्वाचं ठरतं, पण ते जोखड ठरता कामा नये. संशोधन करताना काही अडीअडचणी येतात, त्या त्यालाही आल्या. त्याच्या कामाचं स्वरूप फक्त तो आणि मार्गदर्शक इतकं मर्यादित नव्हतं. तर पॅरिसच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ या संस्थेतील काही सदस्यांचाही त्यात समावेश होता. कधी कधी काही वेळा गणित चटकन सुटे तर कधी फार वेळ लागे. कधी दिवसभर त्यावर काम केलं तरी त्याचं उत्तर सापडतच नाही तर कधी अपरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तर मिळून जातं. कधी असं काही झालं तर चालायला गेल्यावर काही सुचायचं. अभ्यासातल्या काही गोष्टींमधील त्रुटी तेव्हा उलगडायच्या तर काही मित्रांशी गप्पा रंगवताना स्पष्ट व्हायच्या. कधी सीनिअर्स किंवा जाणकारांशी केलेल्या चर्चेमुळे दिशा मिळून जायची. कधी कधी एखाद्या वेळी गोष्टी पुढे सरकायच्या नाहीत किंवा किंचित निराशेने झाकोळला जायचो तेव्हा आपण हे सगळं का नि कशासाठी करतो आहोत, हा प्रश्न पडायचा. पीएचडीच्या तृतीय वर्षांत त्याने ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंगशी निगडित पहिला शोधनिबंध लिहिला. दुसऱ्या शोधनिबंधाच्या वेळी लिखाण पक्कं होत आल्यावर त्यात अजून काही भर घालायला हवी, असं वाटायला लागलं होतं. ‘आपली ध्येयनिश्चिती ठरवल्याप्रमाणे होत नाही आणि अनेक प्रकारचे विचार मनात डोकावतात. संशोधन क्षेत्रात अशा प्रकारची परिस्थिती, खास करून नवीन संशोधकाच्या मनात, बहुतांशी वेळी उपस्थित होते. शिवाय अपेक्षित प्रगती न झाल्यास कधी कधी स्वत:च्या क्षमतेबाबत संशय वाटू लागतो. त्याला इम्पोस्टर सिंड्रोम म्हणतात. मलाही काही काळ काही कारणांमुळे तसं वाटलं होतं. अशा वेळी असं वाटायचं की मी माघार घेतली तर ती माझी हार असेलच, पण त्याचबरोबर मी ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपैकी एक आहे, त्यांचासुद्धा तो एक प्रकारे पराभव असेल. असा विचार करून मी माझ्या मनाची समजूत काढायचो’, असं शब्बीर सांगतो.

संशोधनादरम्यान विविध परिषदा, चर्चासत्रांमध्ये सहभागी व्हायची संधी त्याला मिळाली. पॅरिसमधल्या ‘इन्स्टिटय़ूट हेन्री पॉईनकेअर ’(आयएचपी) या संस्थेच्या तीन महिन्यांच्या कार्यशाळेत सहभागी व्हायची संधी मिळाली. तेव्हा प्रा. बेंजामिन वॉन्डेल्ट यांच्यासोबत चर्चा करता आली. त्यांनी त्याच्या प्रश्नांना नेहमीच ठोस, ठाम आणि दिशादर्शक उत्तरं दिली. संशोधनाबरोबरच इतर बाबतीतही त्यांनी महत्त्वाचे सल्ले दिले. तिथे त्याच्या कामाविषयीचं व्याख्यान ऐकल्यावर, ‘तू थोडय़ा मोठय़ा आवाजात बोलायला पाहिजेस. ऐकायला विचित्र वाटेल पण मोठय़ा आवाजात बोलशील तर तुझं बोलणं जास्तीत जास्त लोक लक्ष देऊन ऐकण्याची शक्यता आहे. शेवटच्या रांगेतल्या व्यक्तीपर्यंत आपलं म्हणणं पोहोचलं पाहिजे, अशा तऱ्हेनं बोलणं गरजेचं आहे’, असा सल्ला त्यांनी दिला. परदेश आणि आपल्याकडच्या संशोधनात बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत आणि काही फरकही आहे. तिथे अनेक लोक एकत्र येऊन समूहाने लवकरात लवकर काम करून समस्या सोडवण्याची कार्यसंस्कृती चांगलीच रुजली आहे. त्या दृष्टीने आपण थोडे मागे पडतो. आपल्याकडे बहुतांशी संशोधक एकटे काम करणं पसंत करतात. समूहाने एकत्र येऊन एखाद्या प्रश्नासाठी काम करण्याची पद्धत अजून म्हणावी तितकी रुजलेली नाही. ती युरोप, जपान, अमेरिका इत्यादी ठिकाणी प्रचलित आहे, असं त्याला वाटतं. वैज्ञानिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुकामध्ये ‘मुक्तांगण विज्ञानशोधिका’ हे केंद्र आहे. या केंद्राद्वारे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याअंतर्गत विज्ञान समजून सांगायची विशेषत: मराठी भाषेत व्याख्यानं आणि प्रश्नमंजूषेच्या निमित्ताने त्याला लोकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधायची संधी मिळाली.

पीएचडीनंतर भुवनेश्वरच्या ‘राष्ट्रीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थे’त दीड वर्ष पोस्टडॉक म्हणून संशोधन केलं. इथेही त्याने वैश्विक मायक्रोवेव्ह प्रारणच्या निरीक्षणाशी निगडित विश्लेषणात्मक संशोधन केलं. पुढील संशोधनासाठी तो अमेरिकेतील अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून रुजू होत आहे. तिथे तो वैश्विक मायक्रोवेव्ह प्रारण आणि ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग परिणामाशी निगडित संशोधन करणार आहे. यासाठी ‘अटाकामा कॉस्मॉलॉजी टेलिस्कोप’ या चिले देशातील अटाकामामध्ये असणाऱ्या दुर्बिणीने केलेल्या निरीक्षणाचा तो उपयोग करणार आहे. खरं तर फेब्रुवारी २०२० मध्येच त्याची या विद्यापीठात निवड झाली होती. पण मार्चमधल्या करोनाच्या संकटामुळे त्याचं अमेरिकेत जाणं पुढे ढकललं गेलं. यंदा एप्रिलमध्ये व्हिसाचं काम झालं तरी अजून तिथे जाणं शक्य झालेलं नाही. त्यामुळं सध्या भारतातच राहून तो ‘रिमोट वर्क’ करतो आहे. त्याच्या सध्याच्या संशोधनासाठी लागणारा निरीक्षणाचा डाटा आणि इतर माहिती इंटरनेटद्वारे प्राप्त करता येते. म्हणून अमेरिकेत न जाता इथून काम करणं शक्य होत आहे. दर आठवडय़ात दोन ते तीन ऑनलाइन टेलिकॉनद्वारे कामाची प्रगती आणि त्यात येणाऱ्या अडीअडचणींवर चर्चा केली जाते. प्रत्यक्षात अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये काम करायची संधी कधी मिळेल, याची तो आतुरतेने वाट पाहतो आहे. शब्बीरच्या संशोधन प्रवासासाठी त्याला अनेक शुभेच्छा.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Researcher shabbir shaikh career journeys zws

ताज्या बातम्या