‘बोल्ड’, ‘ग्लॅमरस’ अशी ओळख असणारी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची तारका प्रत्यक्षात किती साधी-सरळ, मनमोकळी आहे हे तिच्याशी रंगलेल्या गप्पांमधून जाणवलं. केसरी प्रस्तुत व्हिवा लाउंजच्या निमित्ताने सई ताम्हणकरबरोबरचा हा संवाद दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात रंगला. दिशा डायरेक्टच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात अरुंधती जोशी आणि रोहन टिल्लू यांनी सईला बोलतं केलं.  या दिलखुलास गप्पांमधून मराठी चित्रपटसृष्टीचं बदलतं चित्र समोर आलं, तसं नव्या पिढीच्या एका मनस्वी अभिनेत्रीचा दृष्टिकोनही स्पष्ट होत गेला. या संवादाची काही क्षणचित्रं आणि शब्दचित्रं..

सांगली ते मुंबई</strong>
मी मूळची सांगलीची. कॉलेजचं शिक्षण तिथेच झालं. मी एका लिबरल फॅमिलीमधून आलेय. आमच्या घरी वातावरण अगदी मोकळं होतं. मला आज जी बंडखोर, बोल्ड वगैरे लेबलं लावली जातात, त्याचं मूळ कदाचित तिथून आलंय. वडील र्मचट नेव्हीमध्ये होते आणि आई गृहिणी. वर्षांतून एकदाच बाबा घरी यायचे. आईनंच मला त्या अर्थाने वाढवलं. तिनेच मला स्वावलंबी व्हायला, स्पष्टपणे व्यक्त व्हायला शिकवलं. माझ्या मते बंड किंवा रिबेल शब्दाचा अर्थ प्रतिकूल परिस्थितीत तुमचा फोकस कायम ठेवून वाटचाल करणं. सांगलीहून v03आल्यावर माझीही परिस्थिती तशी प्रतिकूल होती.. या अर्थाने की, मी आई-वडिलांची एकुलती एक मुलगी.. लाडावलेली. माझी लाइफस्टाइल जी आई-वडिलांमुळे मला मिळाली होती, ती मुंबईत आल्यावरसुद्धा कायम ठेवणं किती अवघड आहे, हे मला मुंबईला आल्यावर समजलं. इथे आल्यावर आपापली जागा शोधणं, सार्वजनिक वाहतुकीनं गर्दीत केलेला प्रवास, काम शोधणं.. या सगळ्याच गोष्टींनी मला घडवलं. मला स्वावलंबी केलं. मुंबई हे असं शहर आहे, जे आपले दोन्ही हात फैलावत प्रत्येक नव्या येणाऱ्या माणसाला आपल्या कवेत घेतं. मुंबईत लोकांना आपलंसं करण्याची ही नेमकी काय ताकद आहे, मी अजूनही शोधतेय. या मुंबईनं आणि या इंडस्ट्रीनं मला आपलंसं केलं. खूप कष्ट घेऊन मी इथवर पोचलेय आणि त्याचा मला आनंद आहे.v08
आधे अधुरे
कुमारवयात सगळ्यांचीच खूप वेगवेगळी स्वप्नं असतात. मलाही दररोज काही वेगळं व्हायचं असायचं तेव्हा.. कधी एअर होस्टेस, पायलट, डॉक्टर सगळं काही. मी शाळेत होते तोपर्यंत माझा अभिनयाशी, नाटकाशी काही संबंध नव्हता. लहानपणी एकच नाटक केलं होतं.. मूकनाटय़. त्यामध्ये मी झाड झाले होते. माझा कल तेव्हा खेळाकडेच होता. कबड्डीची मी राज्यस्तरीय खेळाडू होते. पण कॉलेजमध्ये असताना आईच्या खास मैत्रिणीच्या आग्रहाखातर एका नाटकात काम केलं. एवढय़ा एकाग्रतेने, तन्मयतेनं आत्तापर्यंत कुठलीच गोष्ट केली नाहीय हे तेव्हा जाणवलं. नाटकात काम करण्याची इच्छा वाढली. अजून एक नाटक करण्याची आवड त्यातून निर्माण झाली. अल्फा महाकरंडक एकांकिका स्पर्धा त्या वेळी व्हायच्या. त्यामध्ये मी एक नाटक केलं. मला विभागीय स्तरावर त्यासाठी पारितोषिकही मिळालं. मी केलेलं पहिलं नाटक – ‘आधे-अधुरे’ मला अजून लक्षात आहे.. विजय तेंडुलकरांनी मराठीत रूपांतरित केलेलं.. खूपच वेगळा, प्रगल्भ रोल होता माझा त्यात. त्या पहिल्या स्पर्धात्मक नाटकांमधूनच मला एका मालिकेसाठी विचारण्यात आलं. मालिकेच्या शूटिंगसाठी १९ वर्षांची असताना मी एकटी मुंबईत आले. आईनंही मला विश्वासानं पाठवलं. प्रोत्साहन दिलं. जबाबदारीची जाणीव तेव्हाच आली. मुंबईत आल्यानंतर आता आपण पूर्ण डेडिकेशननं काम केलं पाहिजे हा फोकस तेव्हा मिळाला.v02पुरुषप्रधान चित्रपट ही संकल्पनाच अमान्य
पुरुषप्रधान किंवा स्त्रीप्रधान चित्रपट हे भेद किंवा संकल्पनाच मला मान्य नाहीत. असं सतत बोलून आपण पुरुषी वर्चस्वाच्या वृत्तीला महत्त्व दिलंय. स्त्री- पुरुष एकमेकांना पूरक आहेत. खऱ्या आयुष्यातही ते अशीच पूरक भूमिका बजावतात. मुळात स्त्री मल्टिटास्किंग करू शकते. फोनवर बोलता बोलता माझा नवरा इतर गोष्टी करू शकत नाही पण मी करू शकते. बाईची जात म्हणजे काय? आम्ही तितकेच सशक्त आहोत. दोघं एकमेकांना पूरक आहोत आणि भूमिकाही तशाच असतात.मुंबई मेरी जान
आज वाटतंय की, मुंबईत राहणं हे काही इतकं सोपं नव्हतं. पण तेव्हा केलं सगळं. नाइट शिफ्टमध्ये शूटिंग असेल तेव्हा मला सोडायला गाडी आहे, असं मी घरी सांगायचे खरी. पण तशी सोय नसायची. मी एकटीच रिक्षा-टॅक्सीनं यायचे. दारं-कडय़ा नीट लावून घे, हे सांगायला आई तोवर जागी राहायची. आजसुद्धा इतक्या वर्षांनीही ती मला हे सांगते. स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाची गरज तेव्हा फार जाणवली नव्हती. पण आत्मविश्वास होताच. मी कराटेचं शिक्षण घेतलेलं होतं. एक छंद म्हणून – आवड म्हणून लहानपणीच हे केलेलं होतं. मी तशी पहिल्यापासूनच धडाडीची आणि डेअिरगबाज मुलगी आहे. कुणी छेडलं तर कानाखाली दोन मारायला मी कमी करणार नाही. मुंबईचं हे वैशिष्टय़ आहे की, तुम्ही अडचणीत आहात असं कळलं तर लोक हमखास मदतीला येतात. आत्ताची परिस्थिती मला माहिती नाही. पण तेव्हा हा विश्वास नक्कीच होता. आता लोक मोबाइलमधून शूट करण्यात जास्त बिझी असतात. टेक्नॉलॉजी कम्फर्टसाठी आहे. त्याचा वापर योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि गरज असेल तेव्हाच करा. कुणी अडचणीत असेल तर शूट करण्यापेक्षा त्याला जाऊन मदत करा, असं माझं तरुणाईला सांगणं आहे.v04बोल्ड नव्हे स्पष्टवक्ती
मला बोल्ड अभिनेत्री का म्हणतात हा प्रश्नच आहे. कदाचित माझ्या हातून चौकटीबाहेरच्या गोष्टी बऱ्याच घडल्या. ते वैचारिक बाबतीत असेल नाही तर दिसण्याच्या. पण मी हे ठरवून केलं नव्हतं. या इमेजबद्दल माझी तक्रारही नाही. मला कुठलंही लेबल लावलं तरी चालेल, माझं काम तुम्हाला आवडलं पाहिजे, हेच महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच मी वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि करत राहीन. इमेज बनतेय का, मोडतेय का आणि काय नावं ठेवली जातात याच्याशी मला फार देणं-घेणं नाही़  मी बोल्ड नाही पण स्पष्टवक्ती नक्कीच आहे. माझ्या सुदैवानं मला कायम चांगली माणसं भेटली. आमची इंडस्ट्री सगळ्या कारणांसाठी बदनाम असली तरी खरी माणसंही इथे खूप आहेत. इथे माझ्या स्पष्ट स्वभावाचा फायदाच झाला. मी नाही म्हणते तेव्हा परिणामांचा विचार करत नाही.
v06भूमिकेसाठी थोडा त्रास झालेला आवडतो
एखादी भमिका निवडताना त्या भूमिकेची लांबी, महत्त्व फार बघत नाही. भूमिका वेगळी पाहिजे याकडे लक्ष देते. या भूमिकेने मला किती त्रास होणार आहे, हे आधी पाहते. त्रास देणारी भूमिका करायला मला आवडते. ‘पुणे ५२’ चित्रपटासाठी मला गिरीश कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णीसारख्या कसलेल्या अभिनेत्यांसमोर उभं राहायचं होतं. त्या भूमिकेचा मी इतका विचार करत होते की, त्या काळात माझी आणि माझ्या नवऱ्याची प्रचंड भांडणं व्हायची. काही कारण नसताना मी चिडायचे. रिअॅक्ट व्हायचे. स्वप्नही पडायची की माझ्याशेजारी गिरीशच आहे आणि अमेय (माझा नवरा) नाहीय. स्वप्नांमधून मी रडत उठलीय कितीदा. असा त्रास भोगून एखादा कलाकार एखादी भूमिका सादर करतो, तेव्हा ती नक्कीच भावते. कारण ते आतून आलेलं असतं. भूमिकेमुळे मलाच माझी नवीन बाजू कळणार आहे का, माझ्यात माणूस म्हणून काही बदल होणार आहे का, याचा विचार मी सर्वप्रथम करते. त्यानंतर दिग्दर्शक, निर्माता कोण आहे हे पाहते.पॅकेजिंग आकर्षकच हवं
तुम्ही एखादी क्रिएटिव्ह गोष्ट लोकांपुढे ठेवताय तेव्हा त्या प्रॉडक्टचं पॅकेजिंग आकर्षकच हवं, असं माझं मत आहे. चित्रपटातलं माझं दिसणं लोकांना आकर्षक वाटतं. त्यामागे हेच कारण असावं. मी स्वत: v05कण्टेण्टएवढंच पॅकेजिंगला महत्त्व आहे असं मानते. चित्रपट कलाकारांचा लुक ही म्हणूनच मला महत्त्वाची गोष्ट वाटते. तुम्ही केवळ चित्रपटातच नाही तर बाहेरही कसे राहता हेही बघितलं जातं. चांगलं राहण्याची, व्यवस्थित राहण्याची आवड माझ्या डीएनएमध्येच आहे, असं म्हणावं लागेल. माझ्या आई-वडलांचा चॉइसही खूप टेस्टफूल असायचा. मी जाणीवपूर्वक लुक्सवर लक्ष देते. अर्थात त्यासाठी खूप खर्च करावा लागतो. मी तो करते. इतरांच्या मानानं माझं कमी सेव्हिंग होत असेल त्यामुळे कदाचित, पण मी स्वत:वर पैसे खर्च करणं पसंत करते. याबाबतीत हळूहळू सेलेब्रिटी, निर्माते आणि प्रेक्षकही जागरूक होताहेत. एखाद्या अभिनेत्रीमुळे बाकीच्या अभिनेत्रींसाठी संधी वाढणार असतील, तर मला आनंद आहे.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
albatya galbatya 3d movie coming soon vaibhav mangle play Chinchi Chetkin Role
रंगभूमी गाजवल्यानंतर रुपेरी पडद्यावर 3D मध्ये पाहायला मिळणार ‘अलबत्या गलबत्या’ चित्रपट, ‘हा’ अभिनेता दिसणार चेटकिणीच्या भूमिकेत
Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी

वेगळं नाटक करायचंय
मी रंगभूमीवर फार काम केलं नाही, त्यामागे वेळ नव्हता हे महत्त्वाचं कारण आहेच. मी मध्ये एक नाटक केलं होतं. त्याचे खूप कमी प्रयोग झाले. नंतर चित्रपटामध्ये खूप गुंतले गेले. पण ‘आऊट ऑफ बॉक्स’ नाटक मिळालंच नाही. वेगळ्या विषयाचं नाटक मिळो आणि त्या वेळी माझ्या हातात ते करण्यासाठी भरपूर वेळ असो, अशी माझी इच्छा आहे. आठ तास चित्रीकरण आणि त्यानंतर नाटक असं मला करायचं नाहीये. नाटकासाठी स्वत:ला वाहून घेतलं पाहिजे. तेवढा वेळ आणि इच्छा निर्माण होईल तेव्हा नक्कीच नाटक करेन.

‘अनुबंध’ ते ‘दुनियादारी’
सुरुवातीच्या काळात चांगले कपडे घालायचे. छान राहते तेव्हा लुक्सचीच चर्चा जास्त व्हायची. मी चांगला अभिनयही करू शकते हे लोकांना पटवून देण्यातच काही र्वष गेली. ‘अनुबंध’मुळे हे चित्र बदललं. त्यानंतर खूप प्रतिक्रिया आल्या की, ‘अच्छा, हिला अभिनयही करता येतो तर..’ इथपासून! मी चांगलं काम करू शकते, हे सांगण्यातच माझा अर्धा वेळ गेलाय. पण त्या काळात मीही खूप शिकले. माझ्या बाकीच्या गोष्टीची आपोआप दखल घेऊ लागले. ‘दुनियादारी’ हा दुसरा मैलाचा दगड ठरला. त्यातल्या शिरीननं माझी लोकप्रियता प्रचंड वाढवली.v07बिकिनीपासून नऊवारीपर्यंत
बॉलीवूडची अभिनेत्री होण्यासाठी काही वेगळे गुण असावे लागतात, असा विचार मी इतके दिवस  करत होते. पण तसं नाहीय हे लक्षात आल्यावर आता मी हिंदी चित्रपटसृष्टीची दारं ठोठावायला तयार आहे. हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित ‘हंटर’ हा चित्रपट करतेय. अनुराग कश्यप हा चित्रपट प्रेझेंट करतोय. या चित्रपटाने मला हिंदीची दारं उघडतील असं वाटतं. अर्थात, हिंदी आणि मराठी या दोन इंडस्ट्रीजमध्ये भाषा सोडली तर काही फार फरक नाही. मीडिया मात्र वेगळा आहे. आपल्याकडील माध्यमं आम्हा कलावंतांशी खूप आपुलकीने वागतात पण तिकडची माध्यमं खूप रोखठोक आहेत. ‘व्यावसायिकते’चं ते नाव घेत असले तरी माझ्या मते व्यावसायिकतेची व्याख्या व्यक्तिगणिक बदलते. माझ्यासाठी व्यावसायिकता म्हणजे चित्रीकरणाच्या वेळा पाळणं, तक्रारी न करणं, तुमच्याकडून जे अपेक्षित आहे ते देणं. एखाद्या सीनसाठी तुम्ही बिकिनी घालणं आवश्यक असेल आणि दुसऱ्या भूमिकेची अपेक्षा नऊवारीची साडीची असेल तर अभिनेत्री म्हणून दोन्हीमध्ये तितक्याच सहजतेने मला वावरता यायला हवं आणि यालाच प्रोफेशनलिझम म्हणत असावेत. ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटासाठी मी बिकिनी घालताना फार विचार केला नाही. बिकिनीतला सीन असल्याचं कळलं तेव्हा नवऱ्याला सांगितलं.
त्याचा अर्थातच आक्षेप नव्हता. ‘घरी फारसं आवडणार नाही’, असं त्याने मला सांगितलं होतं. मीही ते तितक्याच सहजतेने केलं.
माध्यमांनी मात्र हे सगळं खूप सहज आणि चांगल्या पद्धतीने समोर आणल्याबद्दल मी माध्यमांची आभारी आहे.
या चित्रपटानंतर पुण्यात एका कार्यक्रमासाठी गेले असता, एका आजींनी मला सांगितलं की, ‘बरं झालं
तू हे बिनधास्तपणे केलंस, नाही तर आपल्याकडचा पैसा बाहेरच्या मुलींवर खर्च होत होता.’
पुण्यातून असा अभिप्राय मिळणं हे थक्क करणारं होतं. पण आता आपला प्रेक्षकही
तितका सुजाण होत आहे.

मराठीत एक्सक्लुझिव्हिटीचं वलय नाही
हिंदी चित्रपटतारकांना अनेक ब्रॅण्डचा चेहरा म्हणून करारबद्ध केलं जातं. त्यांची लोकप्रियता हे कारण त्यामागे आहे तसंच आणखी एक आहे. मराठीमध्ये हिंदीइतकी ‘एक्सक्लुझिव्हिटी’ नाही. मराठी चित्रपटसृष्टीतले तारे त्या अर्थाने वलयांकित नाहीत. आपली अभिनेत्री कुठेही दिसते. ती पाल्र्यात भाजी घेतानाही दिसू शकते. त्यामुळे एखाद्या मोठय़ा बॅ्रण्डची प्रतिनिधी म्हणून लोकांना तिच्याकडे पाहता येत नाही. सेलेब्रिटी स्टेटस असेल तर तुम्ही कुठे जाता, हेही महत्त्वाचं आहे. हळूहळू चित्र बदलतं आहे.
खऱ्या आयुष्यातली सई
खऱ्या आयुष्यातली सई फार वेगळी नाही. विशेषत: ‘दुनियादारी’नंतर मिळालेल्या ‘सेलेब्रिटी स्टेटस’मुळे हल्ली पूर्वीसारखं सहज बाहेर जाता येत नाही. आता पुण्यात ‘वैशाली’तसुद्धा तितक्या सहजपणे जाऊ शकत नाही. पण मला त्याचं दु:ख नाही. जे काही मिळतं त्याबरोबर काही तरी गमवावं लागतंच. बाकी घरातली सई v09अगदी सामान्य स्त्री असते. मला सर्व स्वयंपाक येतो. दुधातलं पिठलं मी छान बनवते. माझ्या आईकडूनही त्यासाठी कॉम्प्लिमेंट मिळवलेय मी. फक्त पोळ्या आणि भाकऱ्या जमत नाहीत. एक गोष्ट खरी की, मी खूप पसारा करणारी मुलगी आहे. मी सुट्टीच्या दिवशी खूप झोपते. अगदी बेडरूममधून बाहेरही येत नाही.
काम हे माझं पहिलं प्रेम आहे. लग्न ठरलं तेव्हाच सासूबाईंना स्पष्टपणे सांगितलं होतं की, माझं पहिलं प्रेम माझं कामं आहे. त्यानंतर तुमचा मुलगा. त्यांनीही ते मान्य केलं होतं. काम करणाऱ्या स्त्रीला घरातून पाठिंबा मिळणं महत्त्वाचं असतं. लग्नानंतर खरं तर तुम्ही मनानं स्थिरावता. मनातून हवाहवासा आळशीपणा येतो. मग शारीरिक बदलही तुम्हाला जाणवू लागतात. पूर्वी दोन गोष्टींसाठी धावत असाल, तर आता चार गोष्टींकडे पाहायला लागतं. घरात नवरा आणि माझ्यात भेदभाव केल्याचा अनुभव मला तरी आला नाही. माझ्या पायाला कायम भिंगरी लावलेली असते, हे त्यांनी स्वीकारलं आहे. लग्नानंतरही माझा मोठा मित्रपरिवार कायम आहे. तुमचा नवरा किती समजूतदार आहे आणि घरचे काय विचार करतात हे महत्त्वाचं आहे. त्या बाबतीत मी खूप लकी आहे.

वादग्रस्त इमेजपेक्षा काम मोठं
काही वर्षांपूर्वी आमच्याबरोबर एक वाईट प्रसंग पुण्यामध्ये घडला. शहानिशा न करता माझा चेहरा, नाव वृत्तवाहिन्यांवर खूप वेळा फ्लॅश केलं जात होतं. त्या प्रसंगातून मी शिकले की, प्रत्येक अभिनेत्री सतत स्कॅनरखाली असते. तुम्ही काय करता यावर इतरांची बारीक नजर असते. आपल्यावर खरंच प्रेम करणारे आणि वरवरचं प्रेम दाखणारे किती लोक आहेत हेदेखील त्या वेळी कळलं. कधी कधी अनोळखी लोक अशा प्रसंगांत तुमच्या पाठीशी खंबीरपणे असतात हे अनुभवलं. अशा प्रसंगांनंतर तुमच्या आत्मविश्वासाला तडा जातो. मोठा हादरा बसतो आणि त्याचा तुमच्या कामावर परिणाम होतो. मी मात्र त्यातून हिरिरीनं बाहेर पडले आणि या अशा वादांपेक्षा आपलं काम मोठं करायचं, हे ठरवलं आणि त्यात यशस्वीही झाले.

ऐतिहासिक आणि अ‍ॅक्शनपट करायचेत
माझ्या चित्रपटांच्या संख्येवर माझी असिस्टंटदेखील आक्षेप घेते. मी इतके चित्रपट करू नयेत, असं अनेकांचं म्हणणं असतं. पण मी वर्कोहोलिक आहे. चांगल्या भूमिकेच्या बाबतीत हावरट आहे, असं म्हटलंत तरी चालेल. एखाद्या भूमिकेमुळे माझ्यात काही बदल होणार आहे, काही वेगळं माझ्या वाटय़ाला येत असेल तर मी ते काम करते. मग इतक्या चित्रपटांतून दिसता कामा नये वगैरे विचार करत नाही. पण लोकांना माझा कंटाळा येणार नाही याची काळजी नक्कीच घेते. संख्या जास्त असली तरी वेगळे चित्रपट करेन हे नक्की.  कुठली भूमिका करायला आवडेल याचं उत्तर मला ऐतिहासिक भूमिका करायला आवडेल, असं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी सईबाईंची भूमिका करायची इच्छा आहे. ज्यांचं नाव मिळालं, त्या स्त्रीला जाणून घ्यायची माझी इच्छा आहे. तसंच मला अ‍ॅक्शन रोल करायचे आहेत. मराठीमध्ये अ‍ॅक्शनपट येतील, तेव्हा मला त्यात करण्यासारखी भूमिका असेल, अशी मला आशा आहे. आवडता सहकलाकार विचाराल तर सुबोध भावे.
सुबोधसोबत खूप र्वष काम केलं नाही. तो एक ताकदीचा अभिनेता आणि छान मित्र तर आहेच, पण चित्रीकरणादरम्यान आमच्यात संवादांची छान देवाण-घेवाण होते. कारण कसं रिअ‍ॅक्ट व्हायचं हे आम्ही आधी ठरवत नाही, त्यामुळे दर वेळी काही तरी वेगळेच भाव कॅमेरात उमटतात. खरे भाव बाहेर येतात. मजा येते.

सांगलीकडची भाषा
सांगलीतून मुंबईला आले तेव्हा तिथल्या भाषेतले काही शब्द तोंडात होते. ‘उभी आहे’, असं म्हणायच्या ऐवजी मी ‘उभारलेय’ असं म्हणायचे. सांगली-सातारकडचं ‘करुया की’ वगैरे ‘की’ बोलण्यात असायचं. ती सवय जायला थोडा वेळ गेला. अजूनही काही लोक माझ्या मराठीला इंग्रजीचा अ‍ॅक्सेंट असतो, असं म्हणतात. मी त्यावरही मेहनत घेतेय. आगामी चित्रपटात मात्र माझ्या तोंडी खेडवळ मराठी भाषा आहे. मी जाणीवपूर्वक त्यासाठी प्रयत्न केलाय. मी कुंभार मुलीचं काम करतेय त्यात. म्हणून सध्या मडकी बनवण्याची कला – पॉटरी शिकतेय.

सुरक्षित अंतर राखणं महत्त्वाचं
चित्रपटसृष्टीत किंवा इतर कुठेही वावरताना तुम्ही चार लोकांशी कसं वागता, कसं वावरता हे महत्त्वाचं असतं. पहिल्या दिवसापासून लोक तुमच्या वागण्याकडे बघूनच तुमच्याविषयी ग्रह करत असतात. तुम्हाला कुणी गृहीत धरता कामा नये अशी तुमची वागणूकच हवी. आज माझ्या जवळच्या चार व्यक्ती सोडल्यास मला रात्री दहानंतर कोणी फोन करत नाही. आपल्या आजूबाजूला सीमा तयार करायला वेळ लागत नाही. पण समोरच्याला त्याची जाणीव करून द्यायला वेळ लागतो. एकाच व्यवसायातले लोक भेटल्यावर सहज मिठी मारायला येतात, पण मला एखाद्याला मिठी मारायची नसेल तर मी सरळ हात पुढे करते, जेणेकरून त्याचा अपमानही नाही होत आणि त्याचं त्याला उमगतं. आपलं अंतर राखलं जातं.

मालिकांमुळे घराघरांत पोचता येतं
मालिका करणं मला आवडतं कारण त्यामुळे तुम्ही घराघरांत पोहोचता. एक मालिका साधारणपणे वर्षभर चालते, त्यामुळे तुम्हाला तुमचं काम सुधारण्याची संधी त्यात मिळते. मी मालिका करायचे तेव्हा काही फार चोखंदळपणा दाखवण्याच्या परिस्थितीत नव्हते, पण आज मी मालिका करायची ठरविल्यास त्यांना अटी सांगू शकते. मालिकांच्या चित्रीकरणाच्या वेळा इतक्या विचित्र असतात, की तुम्हाला स्वत:कडे पाहायला वेळही मिळत नाही, त्यामुळे इतकी मेहनत करून स्वत:साठी वेळ मिळत नसेल, तर त्या कामाचा काय उपयोग? मला चित्रपट हे माध्यम अधिक आवडतं. कारण चित्रपट अमर असतो, तो कायम डीव्हीडीमध्ये साठवून ठेवता येतो. चित्रपट करताना कमी वेळात पात्र उभं करायचं आव्हान असतं.

शब्दांकन : अरुंधती जोशी, मृणाल भगत

सर्व छायाचित्रे : गणेश शिर्सेकर