शब्दांकन : राधिका कुंटे viva@expressindia.com

आपला औषधांशी संबंध येतो ते फक्त आजारपणात ती घेण्यापुरता.. त्याही पलीकडे जाऊन या क्षेत्रात बऱ्याच संधी उपलब्ध आहेत, त्यातला हा एक कवडसा.

dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
pune rte marathi news
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलांनंतर पहिल्यांदाच नोंदणी प्रक्रिया सुरू… कसा आहे पालकांचा प्रतिसाद?
way of dharavi redevelopment is cleared railway land finally transferred to DRP
धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, रेल्वेची २५.५७ एकर जमीन अखेर ‘डीआरपी’कडे हस्तांतरित
Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा

प्रत्येकाच्या आवडीचे आणि अभ्यासाचे विषय वेगवेगळे असतात. मला रिसर्च आणि फार्मास्युटिकल फील्डमध्ये रस आहे. डी. जी. रुपारेल महाविद्यालयात बीएस्सी (केमिस्ट्री) आणि एमएस्सी (अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री) करताना प्राध्यापकांच्या सरस शिकवण्यामुळे माझा या विषयांतला रस वाढला. शिवाय गेल्या काही वर्षांत आजारांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता त्या अनुषंगाने संशोधन व्हायला हवं, असं वाटत होतं. त्यामुळे औषधांच्या संदर्भात अधिक संशोधन व्हायला हवं, हा विचार डोक्यात आला. भारतात संशोधनाला तितकीशी संधी उपलब्ध नाही. तुलनेने, परदेशात संशोधनाला चांगली संधी आणि वाव आहे. तिथे इंडस्ट्री आणि मेडिसीनमध्ये प्रयोग करायला वाव मिळेल, असं वाटलं. म्हणून मग परदेशात शिक्षणासाठी जायचं ठरवलं. शिक्षणाने मिळालेल्या माहितीच्या-ज्ञानाच्या साहाय्याने औषध कसं निर्माण होतं, त्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात, इत्यादी गोष्टी अभ्यासायला मिळू शकेल, हा विचार यामागे होता.

माझ्या महाविद्यालयातील ध्रुवेश पाटील या सीनिअरकडून औषध उत्पादन क्षेत्राविषयी थोडी माहिती मिळाली. इथलं संशोधन खूप प्रगत असल्याचं कळलं. परदेशात गेल्यावर स्वावलंबन आणि सक्षमपणे निर्णय घेता येणं हे दोन गुण आवश्यक ठरत असल्याने हे गुण मी अंगी बाणवायचा प्रयत्न केला. लोकांसोबत संवाद साधायला शिकलो, कारण इथे ओळखीचं कुणी नसल्याने प्रसंगी अनोळखी लोकांकडे मदत मागावी लागू शकते. इथल्या हवामानाचा नूर जाणून घेऊन या सततच्या बदलत्या हवामानाशी शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा जुळवून घेतलं. शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये राहिल्याने घराबाहेर राहायची सवय होती आणि घरच्यांचा भक्कम पािठबा मिळाला. एक जमेची बाजू म्हणजे अपरिचित वातावरणाशी जुळवून घ्यायला मला फार वेळ लागत नाही.

साधारणपणे पहिले दोन महिने सगळय़ा प्रकारची कागदपत्रं जमा करण्यात गेले. त्यात रेफरन्स लेटर आणि शिक्षणसंस्था किंवा कामाच्या ठिकाणाहून वर्क रेफरन्स यांचा समावेश असतो. कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर मी तीन विद्यापीठांत अर्ज केले. त्यापैकी किंगस्टन आणि नॉटिंगहम या दोन विद्यापीठांकडून ऑफर लेटर आलं. त्यातही किंगस्टन लंडनमध्ये असून तिथे पुढे करिअरसंधी मिळण्याची अधिक शक्यता असल्याने किंगस्टनला होकार कळवला. मी ऑगस्टमध्ये अर्ज केला होता आणि ऑक्टोबर २०२१ मध्ये होकार आला. कंडिशनल लेटर, अनकंडिशनल लेटर हे दोन टप्पे झाल्यावर विद्यापीठाने पाठवलेल्या कॅस लेटरच्या आधारे व्हिसासाठी अर्ज केला. सुदैवाने या सगळय़ा प्रक्रियेत कोणताही अडथळा आला नाही. फक्त माझा अभ्यासक्रम सुरू होणार होता १७ जानेवारीला आणि डिसेंबरअखेरीस भारतात करोना वाढायला लागला. म्हणून ठरल्यापेक्षा आधीच यूके गाठावं लागलं. २६ डिसेंबरलाच तिथे गेलो. भारतात असतानाच मी घर वगैरे बघून ठेवलं होतं. एका अ‍ॅपवरून संपर्क साधला आणि इथे आल्यावर पैसे भरून राहायची सोय झाली. फक्त जानेवारीत सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना मास्कचा वापर सक्तीचा होता. आता नेहमीसारखं जीवनमान जगता येतं आहे. इथे यायला दोनदा लसीकरण होणं आवश्यक आहे. लसीकरण पूर्ण होऊन ठरावीक दिवस झाले नसतील तर दहा दिवस विलगीकरणात राहावं लागतं. करोनासंदर्भातले नियम आणि अटी काही वेळा बदलतात. 

मी फार्मास्युटिकल अ‍ॅनालिसिस विथ मॅनेजमेंट स्टडीज मास्टर्स या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे. त्यात औषध कसं तयार झालं आहे, याचं विश्लेषण केलं जातं. क्लिनिकल ट्रायल कशा चालतात, औषध तयार करण्याचे विविध टप्पे आदी विषय शिकवले जातात. दुसरा भाग येतो तो मॅनेजमेंटचा. त्यात फार्मास्युटिकल फील्डमधल्या मॅनेजमेंटविषयी माहिती मिळते. आम्हाला हा भाग सप्टेंबरमध्ये शिकवला जाणार आहे. सध्या अ‍ॅनालिसिस आणि फिजिकल ट्रायल शिकवत आहेत. या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात दुसऱ्या वर्षी प्लेसमेंट आहे.    

मी एमएस्सी (अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री) केल्यामुळे अभ्यासात फार अडचण येत नाही. आधीच्या शिक्षणाचा या अभ्यासक्रमात अर्थात उपयोग होतो आहे आणि पुढे प्लेसमेंटच्या वेळी नि नंतर नोकरीत ते उपयोगी पडू शकेल. हैद्राबादमधल्या  अ१ंॠील्ल छ्रऋी र्रूील्लूी ढ५३ छ३मिध्ये अ‍ॅनालिटिकल आर अ‍ॅण्ड डी विभागात मी ज्युनिअर रिसर्च असोसिएट म्हणून आठ महिने काम केल्याचा अनुभव मला गाठीशी बांधता आला. तिथले सगळे इन्स्ट्रुमेंट मी आधी हाताळले आहेत. ‘एलसीएम’ या उपकरणाच्या सॉफ्टवेअरपासून त्यातल्या सगळय़ा बारकाव्यांसह ते माहिती आहे. शिवाय त्याचा मेकॅनिझम, ते कसं उपयोगात आणलं जातं, त्यात कसे इनपुट द्यायला लागतात, कोणते सोल्युशन्स असतात, तेही मला माहिती आहेत. आता मे महिन्याच्या अखेरीस माझं प्रोजेक्ट सुरू होणार असून ते याच उपकरणावर आधारित असल्याने मला आधीच्या अनुभवाचा फायदा मिळणार आहे.

इथले एक प्राध्यापक डॉ. स्टीफन बार्टन हे नवनवीन कल्पनांना कायमच प्रोत्साहन देतात. अमुक एका प्रकारे औषध तयार करता येऊ शकतं, असं काही वेळा गृहीतक असतं. त्याची अद्याप माणसांवर क्लिनिकल ट्रायल केलेली नसते. पण ते औषध कसं तयार केलं जाणार आहे आणि ते मानवी जीवनाला कसे आणि किती लाभदायी ठरणार आहे, याचा सखोल विचार केला जात असल्याने नवीन विचार व कल्पनांना नेहमीच प्रोत्साहन दिलं जातं. इथे काम करावं लागत असलं तरी फक्त त्याच त्या चौकटीत न अडकता नवीन विचारांना चालना मिळू शकते. प्राध्यापकांसोबत संवाद साधून आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळवता येतात. विचारांची आवर्तनं इतरांसोबत शेअर करून चर्चा करता येते.

सध्या मी सेल्समध्ये पार्ट टाइम नोकरी करतो आहे. त्यातून थोडासा खर्च भागवता येतो, मात्र त्यामुळे असाइनमेंट करताना वेळेची जाम कसरत करावी लागते. वेळेचं व्यवस्थापन करावं लागतं. मात्र कामाच्या अनुभवामुळे विषय माहिती असल्याने थोडासा वेळ वाचतो. उदाहरणार्थ – माझं ‘असेसमेंट ऑफ द इफेक्ट्स ऑफ कोआग्युलेशन ऑन मेजर्ड इथेनॉल कॉन्सन्ट्रेशन इन ह्युमन सब्जेक्ट’ या विषयावर प्रोजेक्ट होतं, ते करणं इतरांच्या तुलनेने सोपं गेलं. बऱ्याच देशांमधले विद्यार्थी फ्रेण्ड्स झाले आहेत. नोट्स, असाइनमेंट, अभ्यास असो किंवा दैनंदिन जगणं ते कायम मदतीस तयार असतात.

सप्टेंबरमध्ये शेवटचं सेमिस्टर असेल. नंतर जानेवारीपर्यंत कॉलेज सुरू असेल आणि मग प्लेसमेंट होईल. दरम्यान, मी पूर्ण वेळ नोकरीसाठी अर्ज करायचा विचार करत असून इंटर्नशिप हा दुसरा पर्याय आहे. इथे नेहमीच अनुभव आणि व्यक्तीचं त्या विषयातलं ज्ञान याला प्राधान्य दिलं जातं. या क्षेत्रात यायचं झाल्यास स्वावलंबी असणं आवश्यक आहे. ैनाहीै हा शब्द जणू तुमच्या शब्दकोशात नाहीच, असं स्वत:च्या मनावर ठसवायला हवं. इतरांशी संवाद साधणं आणि संपर्क वाढवणं, ही गोष्ट भविष्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी चिकाटी, सहनशीलता, प्रयत्नांतलं सातत्य, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे. प्राध्यापकांशी सुसंवाद साधता आल्यास त्यांचं चांगलं मार्गदर्शन मिळतं. माझ्या या सगळय़ा धडपडीला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास मला वाटतो.  

कानमंत्र

* खरोखर शिकायची तळमळ असेल तरच परदेशी शिक्षण घ्या.

* स्वयंअध्ययन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. (संजोग दाभोळकर ) फार्मास्युटिकल अ‍ॅनालिसिस विथ मॅनेजमेंट स्टडीज मास्टर्स, किंगस्टन युनिव्हर्सिटी, यूके