आजचा आघाडीचा अभिनेता, लेखक-कवी, निवेदक किंवा सादरकर्ता म्हणून सर्वाना परिचित असणार्या संकर्षण कर्हाडेच्या सर्वच अभिव्यक्तीत ‘भाषा’ हा कायमच महत्त्वाचा असा प्रांत आहे हे लक्षात येतं. धार्मिक ग्रंथांच्या सहवासात त्याची जडणघडण होत गेली आणि पुढे मराठी साहित्य वाचनाची गोडी त्याला लागली. त्याच्या कलाप्रवासात ‘पुस्तक वाचन’ हा सर्वाधिक जिव्हाळ्याचा छंद राहिला आहे. वाचन फार गरजेचं आहे, असं त्याचं मत आहे. सध्या मन एकाग्र करण्यासाठी सहज करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘वाचन’! वाचनाने केवळ शब्दसंपदा वाढत नाही, तर वाचनाने चित्त स्थिर राहतं. कारण, ती वेळ देऊन शांतपणे करण्याची गोष्ट आहे. सध्या मी कमीत कमी जोपासत असणारा सर्वाधिक आवडीचा छंद म्हणजे ‘वाचन’ होय, असं संकर्षणने सांगितलं. वेळ मिळेल तसं वाचन करणं आणि मग लेखननिर्मिती करणं यावर माझा भर असतो. नुकतेच मी दोन नाटकांचे प्रवेश लिहून पूर्ण केले, असंही संकर्षण म्हणाला.
संकर्षणची सहजसुंदर अभिव्यक्ती पाहिली की त्याचं बालपण कसं होतं हा प्रश्न आपल्याला पडतो. विविध श्लोक, कवितेच्या ओळी त्याला मुखोद्गत आहेत. याबाबत सांगताना तो म्हणाला, ‘आमच्या घरी पूर्वीपासूनच कुलधर्म-कुळाचार, पोथ्या-पुराणांचं वाचन असं धार्मिक वातावरण आहे. आणि ते केवळ आमच्याच घरात आहे असं नव्हे, तर माझ्या आजोळीही असंच वातावरण आहे. माझ्या आईचे आई-वडील रोज रात्री हरिपाठ आणि रामरक्षा यांचं वाचन करायचे. त्यामुळे ‘हरिपाठ’ या पुस्तकाची सर्वप्रथम ओळख झाली ती त्यांच्याकडून. ‘भगवद्गीता’, ‘बालोपासना’ असे अनेक धार्मिक ग्रंथ मला लहानपणीच माहितीचे झाले. विविध प्रकारच्या आरत्या, त्यातील नाद हा मला खूप जास्त आवडू लागला. त्यामुळे या सगळ्यातील नाद, लय आणि काव्यात्मकता ही हळूहळू कुठे तरी माझ्यात भिनत गेली असावी, असं मला वाटतं. मी जे काही काव्य लेखन करतो त्याचं मूळ कुठे तरी या सगळ्या ‘नाद संस्कारात’ असावं’. यातूनच पुढे संकर्षण हळूहळू मराठी साहित्याच्या वाचनाकडे वळला. शालेय वयातही त्याला भाषेचा प्रांत अधिक प्रिय होता. मला शाळेत असताना बाकीच्या विषयात कमी गुण असायचे, पण मराठी आणि हिंदी या दोन विषयांत मला उत्तम गुण मिळायचे. पुढे मी संस्कृत ही भाषा निवडली आणि सुभाषितांमध्ये असणार्या अर्थपूर्ण गोष्टींमुळे मला त्यात अधिकच रुची निर्माण झाली.
कवितेच्या प्रांतात मुक्त संचार करणार्या संकर्षणच्या अनेक कविता आपण ऐकलेल्या किंवा पाहिलेल्या असतात. या प्रांतात मुशाफिरी सुरू केल्यानंतर अर्थात त्याने विविध कवींची पुस्तकं वाचून काढली. कवी ‘बी’ म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते यांनी लिहिलेली ‘गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या, का गं गंगायमुनाहि या मिळाल्या’ अशा त्यांच्या कविता वाचून मला तेव्हाही भरून यायचं. मुलीला कुणी तरी बोल लावल्यानंतर बापाच्या मनात उमटणार्या भावनांचे चित्रण या कवितेत आहे. ग. दि. माडगूळकर, मंगेश पाडगावकर अशा किती तरी कवींच्या कवितांचं मला वेड लागलं. हे सगळं कुठे तरी मनात रुजत होतं आणि पुढे माझ्या अभिव्यक्तीत कविता मला भेटू लागल्या’, असं तो सांगतो. संकर्षण महाविद्यालयात असताना त्याला त्याची पहिलीवहिली कविता सुचली, पण ती प्रेमावर वगैरे नव्हती, तर बँकेत नोकरी करणार्या आणि बदलीमुळे इतर गावी मुक्काम कराव्या लागणार्या आपल्या वडिलांवर होती. ‘अनेक सज्जन लोकांच्या मोजण्याइतक्या संख्येत आहे, नाकासमोर चालणारा हा माझा बाबा बँकेत आहे, फार मोठ्या कष्टाने त्याने मोठी पोस्ट साधली, नियमाप्रमाणे गौरवपत्र आणि चार वर्ष बदली!’ अशा आशयाची कविता त्याने लिहिली होती. ती जेव्हा त्याने घरच्यांना ऐकवली, तेव्हा घरातून त्याचं कौतुकच झालं.
व्यग्र दिनक्रम आणि कामाच्या व्यापामुळे सध्या संकर्षणचं वाचन काहीसं कमी झालं आहे, असं त्याने सांगितलं. तरीही तो वेळ मिळेल तसा वाचनाची आवड जपण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तो वाचत असलेल्या पुस्तकांच्या काही पानांचे फोटो काढून प्रवासात जसा वेळ मिळेल तशी ती वाचण्याचा त्याचा प्रयत्न असतो. काही प्रवासात मात्र तो केवळ धार्मिक ग्रंथांचंच वाचन करतो. ‘प्रवासाची काहीशी भीतीच वाटते. अशा वेळी अगदी परदेश दौरा वैगैरे असेल तर मी विमानप्रवासात पूर्ण वेळ ‘हरिपाठा’चं वाचन करतो’, असं त्यानं संगितलं. त्याला नुकतंच शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावरील पुस्तक भेट म्हणून मिळालं आहे. तेच पुस्तक तो सध्या वाचतो आहे. त्याआधी त्यानं देवा झिंझाड यांचं ‘एक भाकर तीन चुली’ हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. या पुस्तकाविषयी सांगताना तो म्हणाला, ‘हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. म्हणजे अगदी या पुस्तकातून आपण प्रेरणा घ्यावी असं मला वाटलं’. आनंद यादव यांचं ‘झोंबी’ आणि ‘नांगरणी’ ही दोन पुस्तकं त्याच्या अत्यंत आवडीची आहेत. वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा व्हावी, त्यातून इतरांची मतं कळावी असं वाटत असलं तरीही सगळ्यांच्याच आयुष्याचा वाढलेला वेग पाहता अशा चर्चा कुणाशी होत नाहीत, अशी खंतही त्याने व्यक्त केली. पुस्तकांचा सहवास हा कायमच आनंद देणारा असतो, असं त्याचं मत आहे. कधीकधी काही ग्रंथालयं, पुस्तकाची दुकानं इतकी सुंदर असतात की तिथेच काही वेळ घालवावा असं आपल्याला वाटतं. नुकतीच संकर्षणने अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या अलिबाग येथील फार्महाऊला भेट दिली. तेथील पुस्तकांचा संग्रह त्याला फारच आवडला. वंदना गुप्ते यांचे पती शिरीष गुप्ते यांनी त्या घरात एक कृत्रिम झरा केला आहे आणि त्याच्या भोवती पुस्तकांची कपाटं असून त्यात सुंदर रीतीने पुस्तकं रचून ठेवली आहेत. ती जागा बघताच क्षणी मला इतकी आवडली की आपण थेट इथे दोन-तीन दिवस मुक्काम ठोकायला हवा, असं वाटल्याचं त्यानं सांगितलं.
पुस्तकांवर व्यक्त होतानाच तो आपल्या आवडीच्या म्हणजेच ‘भाषा’ या विषयावरही व्यक्त झाला. ‘आपण भाषा जगवायला हवी असं मी कधी म्हणत नाही, कारण भाषाच आपल्याला जगवत असते. सध्याच्या आपल्या सगळ्यांच्या जीवनशैलीचा विचार केला तर आपण मनाने आणि शरीराने धावतो आहोत. थोडंसं मन स्थिर करायचं असेल तर वाचन अतिशय गरजेचं आहे. ‘वाचाल तर वाचाल’ हे शब्दश: खरं आहे. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा आपण प्रत्येकानेच वाचत राहायला हवं आणि जगणं समृद्ध करायला हवं, असं संकर्षण आवर्जून सांगतो.
viva@expressindia.com
