विनय जोशी

भाष्यते अनया इति भाषा. ज्या माध्यमातून आपण बोलतो, व्यक्त होऊ शकतो ते माध्यम म्हणजे भाषा होय. शब्दातून नेमकं व्यक्त होता येणं हे मानवाला निसर्गाकडून मिळालेलं वरदानच म्हणावं लागेल, पण भाषा फक्त अभिव्यक्तीचं माध्यम नसते. तर ती त्या भाषिक समूहाच्या सांस्कृतिक, सामाजिक, तत्त्वज्ञानिक अशा अनेक पैलूंचं प्रतिबिंब असतं. भारत हा तर बहुभाषिक देश. त्यात दर काही कोसांवर भाषा बदलताना दिसते. या भाषिक वैविध्यतेत एक भाषा अगदी प्राचीन काळापासूनच भारताच्या समृद्ध वारशाचं दर्शन घडवते आहे ती म्हणजे संस्कृत. श्रावण शुद्ध पौर्णिमा हा ‘संस्कृत दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती’ म्हणून जिचा गौरव केला जातो, त्या संस्कृत भाषेचं महत्त्व यानिमित्ताने जाणून घेणं अगत्याचं ठरतं.

संस्कृत ही इंडो-युरोपियन भाषाकुलांतील एक प्राचीन भाषा. हिच्या उगमाविषयी जरी मतमतांतरं असली तरी हिचे प्रचंड साहित्यभांडार, नियमबद्ध व्याकरण आणि गोडवा हे सगळं मात्र वादातीत आहे. संस्कृतचं शास्त्रशुद्ध व्याकरण हे जगातील सर्वोत्तम व्याकरण मानलं जातं. प्रत्येक संस्कृत शब्दाच्या निर्मितीमागे व्याकरणाचे नियम आहेत. या शास्त्रीय व्याकरणामुळे इतर भाषांपेक्षा संस्कृत वेगळी ठरते. मराठीत आपण ‘वाघ ससा खातो’ या वाक्यातील क्रम बदलून ‘ससा वाघ खातो’ असं म्हटलं तर अर्थ बदलेल. पण संस्कृतमध्ये ‘व्याघ्र: शशकं खादति’ या वाक्यातील शब्दक्रम बदलून ‘शशकं व्याघ्र: खादति’ असं केलं तरी अर्थ तोच राहतो.

आजच्या प्रगत उच्चारणशास्त्राच्या (phonology) दृष्टीने विचार केला तर संस्कृतमध्ये अगदी सुरुवातीपासूनच प्रातिशाख्यांमध्ये वर्णाच्या उच्चारणाचे प्रयत्न व उच्चारस्थान यांचा अगदी शास्त्रीय विचार केला आहे. म्हणून संस्कृतमध्ये जे बोलतो तेच लिहिलं जातं. यामुळेच लेखनकलेशिवाय फक्त मौखिक परंपरेतून संस्कृत वाङ्मय कुठलीही चूक न होता पिढ्यानपिढ्या संरक्षित राहू शकलं. धार्मिक साहित्यासोबतच नीतिशास्त्र, वैद्याक, नाट्यशास्त्र, संगीत, अर्थशास्त्र, प्राचीन खगोलशास्त्र अशा अनेक विषयांवर संस्कृतमध्ये विपुल ग्रंथसंपदा आहे.

विपुल शब्दभांडार हे संस्कृतचं अजून एक वैशिष्टय. नवनिर्मिती क्षमतेमुळे आधुनिक काळातल्या शब्दांनादेखील संस्कृतमध्ये नवनवीन पर्यायी शब्द निर्माण करता येतात. स्मृतीशलाका (पेनड्राइव्ह), पारपत्रम् (पासपोर्ट), संप्रवेश (लॉगिन) ही काही प्रातिनिधिक उदाहरणं. त्यामुळे इतर भाषांमधून शब्दांची उसनवारी करण्याची गरज संस्कृतला भासत नाही.

हेही वाचा >>> फेनम स्टोरी: यंगेस्ट ऑलिम्पियन अमन

धार्मिक कार्यात संस्कृतचा वापर असल्याने ही फक्त धर्म आणि कर्मकांड यांची भाषा आहे असं वाटणं स्वाभाविक आहे. शाळेत असताना संस्कृत व्याकरणाचा धसका घेऊन अनेकांना आयुष्यभर ही अवघड आणि क्लिष्ट भाषा वाटत राहते. संस्कृत बोलणारी मंडळी आसपास दिसत नसल्याने ही मृत भाषा आहे असंही अनेकांना वाटतं. संस्कृतमध्ये धार्मिक साहित्यापेक्षाही कथा, नाटक, काव्यं, शास्त्रीय ग्रंथ यांचंही प्रमाण लक्षणीय आहे. कालिदास, भास, भवभूति, बाण या साहित्यिकांच्या साहित्यकृतींची जगभरातील रसिकांना भुरळ पडली आहे. संस्कृतमध्ये आर्यभटीय, बृहतसंहिता (खगोलशास्त्र), शुल्बसूत्रे (भूमिती), लीलावती (गणित), समरांगणसूत्रधार, प्रसाद मण्डन (स्थापत्यशास्त्र), रसरत्नाकर, रसार्णव, रसहृदय, रसेन्द्रचुडामणी (रसायनशास्त्र), कृषीपराशर (कृषीशास्त्र) असे अनेक शास्त्रीय विषयांवरचे ग्रंथ आहेत. संस्कृत आता संपली, मृत भाषा झाली या गैरसमजाला आजची तरुणाई अगदी चोख प्रत्युत्तर देते आहे. विविध माध्यमातून तरुणांमध्ये संस्कृत ट्रेण्डिग असल्याचं दिसून येतं आहे.

कॉलेजमध्ये असताना नाटक करणं, नाट्य स्पर्धांमध्ये सहभागी होणं हा तरुणांचा वीकपॉइंट्च. मुळात भारतीय रंगभूमीची नांदीच संस्कृत नाटकांमधून घातली गेली. तेव्हापासून आतापर्यंत रंगभूमीवर प्राचीन संस्कृत नाटकं सादर होतच होती, पण फर्ग्युसन महाविद्यालयाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या डॉ. रा. ना. दांडेकर संस्कृत एकांकिका स्पर्धेने समृद्ध संस्कृत नाट्य परंपरेशी तरुणाईला नव्या स्वरूपाने जोडण्याचं मोठं कार्य करून दाखवलं आहे. या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर हैद्राबाद, बंगळूरु असे देशभरातून महाविद्यालयीन संघ सहभागी होतात. यात संस्कृत शाखेइतकीच इतर शाखांतील विद्यार्थ्यांची संख्यादेखील लक्षणीय असते. या स्पर्धेविषयी माहिती देताना फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख अंकित रावल म्हणाले, ‘गेल्या २५ वर्षांपासून आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत १०० हून अधिक संस्कृत नाटकं लिहिली, भाषांतरित केली गेली व सादर झाली आहेत.’

तन्मय भोळे हा तरुण भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील संकल्पना आधुनिक नाटकात कशा वापरता येतील या दृष्टीने प्रयत्नरत आहे. लेखन-दिग्दर्शन, नेपथ्य यात नाट्यशास्त्रात सांगितलेली काही तंत्रं वापरत संस्कृत रंगभूमीवर नवे प्रयोग तो करतो आहे. त्याच्या ‘वंदे गणपतिं’ सारख्या नाटकाचे व्यावसायिक प्रयोग यशस्वी झाले आहेत. संस्कृत नाटकांच्या प्रसारासाठी रेणुका येवलेकर आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी सुरू केलेली ‘नाट्यहोत्र’ ही अशीच संस्कृतप्रेमी तरुणांकडून चालवली जाणारी नाट्यसंस्था आहे. ‘मृच्छकटिकम्’ सारख्या अभिजात नाटकापासून तर व. पु. काळे यांच्या ‘मीच तुमची वहिदा’ या कथेवर आधारित ‘अहमेव ते वहिदा’ आणि आदिवासी समाज जीवनावर आधारित ‘काथोडी’ यासारखी नवीन नाटकं या संस्थेच्या तरुण मंडळींनी सादर केली आहेत.

संस्कृत फक्त नाटक आणि काव्यातूनच सादर केली जाते, या ठोकळेबाज कल्पनेलादेखील काही तरुणांनी छेद दिला आहे. तरुणांना ट्रेण्डी वाटेल अशा स्वरूपात संस्कृत आणण्यात ‘संस्कृत फॉर यू’ सारख्या स्टार्टअपचा मोठा वाटा आहे. यांची संस्कृत वाक्ये असणारे टीशर्ट, कॉफी मग, बुकमार्क, रामायण-महाभारत यांवर आधारित कार्डगेम अशा अनेक भन्नाट उत्पादनांना तरुणांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. नेहमीच्याच टीशर्टच्या भाऊ गर्दीत ‘एकांते सुखमास्यताम’, ‘स्वयमेव मृगेंद्रता’, ‘स्वरस्तु प्रेमकृत् सदा’ अशी भारदस्त संस्कृत वाक्य असणारी टीशर्ट्स भाव खाऊन जातात. सध्याचा काळ आपल्याला जे आवडतं ते बिनधास्तपणे व्यक्त (Flaunt) करण्याचा आहे. संस्कृत भाषेची आपली आवडही नावीन्यपूर्ण पद्धतीने तरुणाईला अभिव्यक्त करता यावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ‘संस्कृत फॉर यू’चं कार्य चालतं, असं डॉ. प्रतिमा वामन यांनी सांगितलं.

दिवाळी-दसरा यांसारख्या सणांच्या शुभेच्छा असोत किंवा अगदी फ्रेण्डशिप डे, व्हॅलेन्टाइन डे अशा प्रसंगी प्रियजनांना देण्याचे खास संदेश असोत, हे जर संस्कृतमध्ये असतील तर अधिकच भन्नाट वाटू शकतं. हीच गरज ओळखून ‘री संस्कृत’ने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर ‘रेडी टू सर्व्ह’ संस्कृत शुभेच्छा पोस्ट करायला सुरुवात केली. बघता बघता ५ लाखांच्या आसपास फॉलोअर्स मिळवणारी ही कल्पना अगदी हिट ठरली. आता बरेच तरुण विविध प्रसंगी ‘री संस्कृत’ने डिझाइन केलेल्या शुभेच्छा आवर्जून पोस्ट करताना दिसतात.

‘संस्कृत भारती’ ही स्वयंसेवी संघटना संस्कृत जनभाषा व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नरत आहे. देशभर चालणाऱ्या नि:शुल्क संस्कृत संभाषण शिबिरातून हजारो लोक सोपं संस्कृत बोलायाला शिकले आहेत. आजचा ट्रेण्ड लक्षात घेऊन संस्कृत भारतीकडून संस्कृत शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलसारख्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन केलं जातं. या माध्यमातून अनेक शॉर्ट फिल्ममेकर्स संस्कृत भाषेतून शॉर्ट फिल्म बनवायला प्रवृत्त होत आहेत.

संस्कृत शिकून पुढे काय करायचं? असा व्यावहारिक प्रश्न अनेकांना पडतो, पण सध्याच्या बदलल्या परिस्थितीत संस्कृतमध्ये अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध झाल्या आहेत. अनेक तरुण मंडळी आपल्या संस्कृतच्या ज्ञानाचा उपयोग करत करिअरचे नवे मार्ग चोखाळत आहेत. संस्कृत कन्टेन्ट आणि रिसर्च कन्सल्टंट असणारी रुचिता पंचभाई सांगते, ‘हल्ली बऱ्याच कंपन्या आपल्या ब्रॅण्ड आणि उत्पादनांसाठी युनिक, हटके नावांच्या शोधात असतात. कमीतकमी शब्दांत उत्पादनाची नेमकी ओळख सांगता आली पाहिजे आणि नावही कॅची हवं हे आव्हान पूर्ण करायचं तर संस्कृत मदतीसाठी सज्ज आहे.’ रुचिता अशी संस्कृत नावं, बोधवाक्यं तयार करून देते. तसंच एखाद्या विषयांसाठी लागणारे संस्कृत संदर्भदेखील ती पुरवते.

संस्कृतमधून लग्नपत्रिका, एखाद्या व्यावसायिक कार्यक्रमाचं उद्घाटनपत्र, स्पर्धेचं प्रमाणपत्र, सन्मानपत्र लिहिण्याचं प्रमाण वाढतं आहे. यामुळे संस्कृत कन्टेन्ट लेखकांचीदेखील सध्या मागणी वाढली आहे. हैद्राबाद विद्यापीठातून एम. ए. संस्कृत करणारा ऋग्वेद देशपांडे अशा संस्कृत लेखनातून शिकता शिकता कमवतो आहे. संस्कृत अभ्यासक आणि हस्तलिखित जतन तज्ज्ञ असणारी अनिता जोशी सांगते, ‘भारतात विविध ठिकाणी असणाऱ्या लाखो हस्तलिखितांचं जतन आणि डॉक्युमेंटेशनचं काम जोरात सुरू आहे. संस्कृत अभ्यासकांची या क्षेत्रात मोठी मागणी आहे.’

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ने भारतीय ज्ञान परंपरेचं (Indian Knowledge Systems) महत्त्व अधिक अधोरेखित केलं आहे. या पार्श्वभूमीवर विविध ज्ञानशाखांमधील प्राचीन भारतीय शास्त्रांची पाळंमुळं शोधण्यासाठी संस्कृत अभ्यासकांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. अनेक व्यावसायिक चित्रकार, वास्तुविशारद, फॅशन डिझायनर, सेट डिझायनर आपल्या कलाकृतींच्या संकल्पना रेखनासाठी संस्कृत संदर्भ घेत असतात. या आयडीएशन प्रक्रियेत संस्कृत अभ्यासक मोलाची भूमिका पार पाडू शकतात. अनेक परदेशी नागरिक संस्कृत शिकण्यासाठी उत्सुक आहेत, यामुळे ऑनलाइन संस्कृत कोर्सेसनाही मोठी मागणी आहे.

या सगळ्या नवनव्या वाटा संस्कृतमधून उत्तम रोजगार मिळवण्याच्या संधी देत आहेत. अनेक तरुण संस्कृतला आधुनिक रूपात सादर करत आहेत. संस्कृत न येणाऱ्या तरुणाईतही नवनव्या माध्यमातून संस्कृतची क्रेझ वाढते आहे. यातूनच काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेली आपली ही अतिप्राचीन भाषा पुढील अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहावी आणि प्रत्येक पिढीत अशीच ट्रेण्डिंग राहावी, याच संस्कृत दिनानिमित्त सदिच्छा!

viva@expressindia.com