मन:स्पंदने: लैंगिकता उलगडताना

आजकालची पिढी पाश्चात्त्य संस्कृतीकडे झुकून प्रगतीच्या नावाखाली काय नवनवीन गोष्टी शोधून काढते आहे, या अशा वागण्यामुळेच आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे,

मृण्मयी पाथरे
आजकालची पिढी पाश्चात्त्य संस्कृतीकडे झुकून प्रगतीच्या नावाखाली काय नवनवीन गोष्टी शोधून काढते आहे, या अशा वागण्यामुळेच आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे, असे संबंध अनैसर्गिक (unnatural) आणि अनैतिक ( immoral) आहेत, यातूनच चीटिंगसारखे प्रकार जन्माला येतात.. या शंकांची गाडी कधीकधी थांबतच नाही.

अन्विता आणि आनंदिता गेली तीन-चार वर्ष एका हॉस्टेलमध्ये एकत्र राहत होत्या. त्यांची भेट कॉलेजमध्येच झाली आणि पुढे नोकरीही एकाच शहरात मिळाल्यामुळे दोघींनी मिळून एक घर भाडय़ाने घेतलं. या दोघी जणी अनोळख्या शहरात एकत्र राहून एकमेकांना आधार देत आहेत, हा विचार करून त्यांच्या घरच्यांना हायसं वाटलं. पुढे त्या आर्थिकदृष्टय़ा सेटल झाल्यांनतर अन्विताच्या घरच्यांनी तिला लग्नाबद्दल विचारलं, तेव्हा अन्विता ‘मला कोणत्याच पुरुषाशी लग्न करायचं नाही,’ असं म्हणाली. तिचं कुटुंब काही काळ बुचकळय़ात पडलं. पुरुषाशी लग्न करायचं नाही म्हणजे? आयुष्यभर असं बॅचलरसारखंच रूममेटसोबत राहणार का? अन्वितावर प्रश्नांचा भडिमार सुरू झाला.

‘मला माहिती आहे तुम्हाला हे पचवणं थोडं कठीण जाईल, पण मी लेस्बियन (lesbian) आहे. माझं आनंदितावर प्रेम आहे आणि ती माझी जोडीदार आहे,’ अन्विताने धीर एकवटून तिच्या कुटुंबाला सांगितलं.विनय आणि विनीता गेले चार-पाच महिने एकमेकांना डेट करत आहेत. इतर कोणत्याही नवीन कपलप्रमाणे त्यांची डेटिंग लाइफ मस्त सुरू होती. ते दोघंही एकमेकांसोबत त्यांच्या आयुष्यातील लहान-मोठय़ा गोष्टी शेअर करायचे, जीवनातील अवघड प्रसंगांत एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायचे. एके दिवशी विनय विनीताला म्हणाला, ‘‘मला तू खूप आवडतेस, पण आपण गोष्टी पुढे नेण्याआधी मला तुला काही तरी सांगायचंय.. मी पॅनसेक्शुअल ( pansexual) आहे.

आपल्या आजूबाजूचे लोक स्त्री-पुरुषांतील आकर्षणाबद्दल बऱ्याचदा बोलतात; पण मी समोरच्या व्यक्तीची जेंडर आयडेंटिटी ( gender identity) काहीही असो – स्त्री असो, पुरुष असो किंवा एखादी नॉन-बायनरी (non- binary) व्यक्ती असो, मला कोणाबद्दलही आकर्षण वाटू शकतं. कदाचित हे समजून घेणं तुझ्यासाठी खूप अवघड असेल. तुझ्या मनात जे काही प्रश्न किंवा शंका असतील तर मला विचार; पण माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे.’’ विनीताला काय बोलावं, हे सुचलंच नाही; पण विनय तिच्यावर खरंच प्रेम करत होता हे तिला त्याच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत होतं. मात्र, ‘उद्या त्याला इतर कोणी आवडलं तर?’ ही शंका तिच्या मनात घर करून बसली होती.

वरील दोन्ही उदाहरणं वाचताना आपल्यापैकी अनेकांच्या मनात अनेक वेगवेगळे विचार आले असतील – आजकालची पिढी पाश्चात्त्य संस्कृतीकडे झुकून प्रगतीच्या नावाखाली काय नवनवीन गोष्टी शोधून काढते आहे, या अशा वागण्यामुळेच आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे, असे संबंध अनैसर्गिक (unnatural) आणि अनैतिक (immoral) आहेत, यातूनच चीटिंगसारखे प्रकार जन्माला येतात.. या शंकांची गाडी कधीकधी थांबतच नाही.
मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे आपण आतापर्यंत पिढय़ान् पिढय़ा केवळ दोन भिन्न प्रजनन संस्था, दोन जेंडर आयडेंटिटीज (स्त्री, पुरुष) आणि एक लैंगिकता ( sexuality – विषमिलगी संबंध म्हणजेच heterosexuality) यावरच जास्त भर दिला आहे. त्यामुळे ज्या गोष्टींवर जास्त भर दिला जातो, त्याच गोष्टी कालांतराने ‘नॉर्मल’ वाटू लागतात.

लैंगिकता हा शब्द ऐकला किंवा वाचला, तर आपल्याला केवळ शारीरिक आकर्षणच डोळय़ासमोर येतं (कारण, शाळा-कॉलेजमध्ये जर लैंगिक शिक्षण म्हणजेच (sex education) झालं असेल, तर बहुतेकदा हेच शिकवलेलं असतं). पण लैंगिकतेची ही मर्यादित व्याख्या हळूहळू कालबाह्य होत चालली आहे. लैंगिकता म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण नसून त्यात भावनिक (emotional intimacy), वैचारिक ( intellectual attraction) आणि रोमँटिक आकर्षणाचाही समावेश असतो, हे फार कमी जणांना माहिती आहे.

LGBTQIA (अर्थात, लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीअर, इंटरसेक्स, एसेक्शुअल) व्यक्ती याआधीही आपल्या समाजात होत्या आणि याचे संदर्भ रामायण, महाभारतासारख्या पौराणिक कथांमध्येही वाचायला मिळतात. आताही कित्येक समलैंगिक आकर्षण अनुभवणाऱ्या पन्नाशीतील आणि अगदी ऐंशीतील व्यक्तीही आपल्या आसपास आहेत. मात्र, लोक काय म्हणतील आणि त्यांना आपल्या लैंगिकतेबद्दल कळलं, तर आपल्याला त्यांचा द्वेष आणि टोमणे सहन करावे लागतील, आपल्याला आपल्याच घरातून बाहेर काढतील या भीतीने कित्येक जण मनातून असमाधानी असतानादेखील विषमिलगी व्यक्तीसारखं आयुष्य जगत आले आहेत. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने काढलेलं क्वीअर आयडेंटिटीचं हे नवं ‘फॅड किंवा ट्रेण्ड’ आहे, असं मुळीच नाही.

क्वीअर व्यक्तींना आपल्या समाजात हळूहळू सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी त्यांच्या हक्कांची लढाई अजून संपली नाही आहे. ‘आपली खरी ओळख जगासमोर आली आणि आपल्याला वाळीत टाकण्यात आलं तर?’ या भीतीपोटी कित्येक क्वीअर व्यक्ती त्यांच्या ओळखीच्या माणसांसमोर आपली खरी ओळख लपवून ‘डबल लाइफ’ जगत आहेत. आपल्याला शाळा/ कॉलेज/ कामावरून काढून टाकण्यात येईल म्हणून मनाला पटत नसतानाही समाजमान्य चाकोरीत राहण्यासाठी स्त्री किंवा पुरुष म्हणून वावरत आहेत. आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असेल आणि तिलाही आपण आवडत असू, तर त्या व्यक्तीसोबत कायदेशीरपणे एकत्र राहण्याचा, लग्न करण्याचा, मुलांना जन्म देण्याचा/ दत्तक घेण्याचा आणि त्यांना वाढवण्याचा हक्क आपल्यापैकी बहुतेकांना जन्मत:च सहज मिळतो; पण क्वीअर व्यक्तींना त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्याची, समाजात इतरांकडून मिळणाऱ्या तिरक्या नजरा आणि भेदभावाला सामोरं जाऊन स्वत:ची वैयक्तिक आणि व्यावसायिक ओळख निर्माण करण्याची लढाई अजूनही नाइलाजाने लढावी लागते आहे.

या लढाईत त्यांना त्यांच्या कुटुंबाचा, जोडीदाराचा किंवा मित्रमंडळींचा पाठिंबा नसला, तर त्यांना कित्येकदा एकाकीपणा, आपल्या माणसांत राहूनही परकेपणा आणि असहायता अनुभवावी लागते. आपल्याला समजून घेणारं आणि आपण जसे आहोत तसं आपल्याला स्वीकारणारं आपल्या आसपास कोणीच नाही, या भावनेमुळे काही जण स्वत:ला इजा करून घेणं किंवा आयुष्य संपवण्यासारखी टोकाची पावलंही उचलतात. कधीकधी क्वीअर व्यक्तींच्या जोडीदारांना, पालकांना, इतर कुटुंबीयांना आणि मित्रमंडळींना त्यांच्या समस्यांची पूर्णत: माहिती नसली, तरी त्यांना समजून घेण्याची इच्छा असते; पण आपणच आपल्या मनातील शंका-कुशंका आणि स्टीरीओटाइप्सशी (stereotypes) इतका वेळ झुंजत असतो की आपली ही इच्छा आणि समजून घेण्याची मनाची तयारी क्वीअर व्यक्तींपर्यंत वेळेत पोहोचवली जात नाही, जे फार गरजेचं आहे. आपल्याला क्वीअर व्यक्तींच्या सगळय़ाच गोष्टी समजत किंवा पटत नसल्या, तरीही माणुसकी म्हणून त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी लढणं, त्यांना त्यांचं आयुष्य कसं जगायचं आहे हे ठरवण्यासाठी आधार देणं यांसारख्या किती तरी गोष्टी आपण त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी सहज करू शकतो. अगदी हेसुद्धा अवघड वाटलं, तर क्वीअर व्यक्तींच्या सहमतीने त्यांच्यासह आपण एखाद्या क्वीअर अफर्मेटिव्ह (queer affirmative) मानसशास्त्रज्ञाकडे जाऊन त्यांच्यासाठी ‘सेफ स्पेस’ कशी तयार करता येईल याबद्दल माहिती मिळवू शकतो.

‘ब्रूकलिन नाइन-नाइन’ या सिटकॉममधील कॅप्टन रेमंड होल्ट म्हणतात त्यानुसार ‘एव्हरी टाइम समवन स्टेप्स अप अॅनण्ड सेज हू दे आर, द वल्र्ड बिकम्स अ बेटर, मोर इंटरेिस्टग प्लेस..’
viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sexuality western culture immoral cheating relationships amy

Next Story
‘फॅशन’सरी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी