देशी झाडं, दुर्मीळ वनस्पती यांचा अभ्यास करणारे, बिया गोळा करून त्यांचं निःस्वार्थपणे वाटप करणारे लातूरचे शिवशंकर चापूले हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरलं आहे. बीज संकलनाच्या माध्यमातून या अवलियाने हजारो लोकांना वृक्षप्रेमी बनवत निसर्गाशी जोडून घेतलं आहे.
शिवशंकर चापूले यांचं शिक्षण बारावीपर्यंतच झालं आहे, पण त्यांना लहानपणापासूनच निसर्गाची ओढ होती. पक्षी, फुलपाखरं, डोंगर, तळी आणि झाडं यांचं सतत निरीक्षण करणं हा त्यांचा छंद. एकीकडे उदरनिर्वाहासाठी गॅस एजन्सीमध्ये खासगी नोकरी करत असताना त्यांनी सुट्टीच्या वेळेचा सदुपयोग आपल्या छंदासाठी करून घेतला. या सुट्टीच्या कालावधीत ते स्थानिक डोंगरदऱ्यांमधील जैवविविधतेचा सातत्याने अभ्यास करत असत. शेतबांधावरील झाडं, लहान-लहान जंगलं आणि गावठी प्रजातींची झाडं यांचा शोध घेताना त्यांनी स्थानिकांकडून त्यांचा उपयोग आणि गुणधर्म समजून घेतले. प्रत्यक्ष निरीक्षणातून अभ्यास सुरू असतानाच, समाजमाध्यमांवरील वनस्पतीविषयक ग्रुप आणि छत्रपती संभाजीनगरचे वनस्पतीतज्ज्ञ मिलिंद गिरीधारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपला अभ्यास अधिक शास्त्रशुद्ध झाला, असं ते सांगतात.
निसर्गाचं निरीक्षण, स्थानिकांकडून मिळणाऱ्या माहितीबरोबरच वनस्पती, पक्षी-प्राणीविषयक अभ्यासक, तज्ज्ञ यांच्या भेटीतूनही त्यांची वेगवेगळ्या विषयातील जाण वाढत गेली, असं त्यांनी सांगितलं. उदाहरणार्थ, लातूरचे छायाचित्रकार व वन्यजीव अभ्यासक धनंजय गुट्टे यांच्यामुळे त्यांची पक्षी आणि फुलपाखरांबद्दलची जाण वाढली, अशी माहिती देतानाच बीजसंग्राहक म्हणजे नेमकं कोण? हेही त्यांनी सविस्तर समजावून सांगितलं. ‘बीज संग्राहक म्हणजे अशी व्यक्ती जी झाडांची, वनस्पतींची किंवा पिकांची बियाणं जमा करते, साठवते आणि त्यांचं जतन करते. जंगल, डोंगर, शेती, नदीकाठी, स्थानिक परिसरातून या बिया गोळा केल्या जातात. त्यानंतर बियांचं वर्गीकरण केलं जातं. कोणती बियाणं औषधी वनस्पतींची आहेत, कोणती फुलझाडांची, फळझाडांची आहेत हे पाहून त्यानुसार त्यांची वर्गवारी केली जाते. त्यानंतर बियांची योग्य काळजी घेणं म्हणजेच बिया स्वच्छ करणं, वाळवणं, योग्य तापमान आणि आर्द्रतेमध्ये साठवणं आणि मग शेवटचा टप्पा म्हणजे भविष्यासाठी त्या बियाणांची जतन प्रक्रिया किंवा इतरांना लागवडीसाठी मोफत किंवा विनिमयाने बियाणं देणं’ अशा शब्दांत बीज संग्राहक नेमकं कशा पद्धतीने काम करतो याची माहिती चापूले यांनी दिली.
पारंपरिक, स्थानिक प्रजातींची झाडं ही पर्यावरणासाठी जशी महत्त्वाची असतात, तशीच त्या त्या स्थानिक प्रदेशासाठी ती अत्यंत महत्त्वाची असतात, हे त्यांच्या लक्षात आलं. तसंच, आपल्या प्रांतातील वनस्पती वा झाडाझुडपांऐवजी अनेकदा लोक विदेशी प्रजातींना (जसं गुलमोहोर, रेन ट्री, टेबूबिया) प्राधान्य देतात, हेही त्यांना समजलं. या दोन्ही गोष्टी जैवविविधतेसाठी अपायकारक ठरत आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी देशी झाडांविषयी लोकांना माहिती द्यायला सुरुवात केली. आणि देशी झाडांच्या माहितीच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी आधुनिक माध्यमांचा उपयोग करून घेतला.
झाडं, त्यांच्या बिया याविषयीची त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली. आणि त्यातूनच ‘सीडबँक’ ही संकल्पना जन्माला आली. ‘आज माझ्या घरात एक खोली फक्त बियांसाठी राखीव आहे. बिया स्वच्छ करणं, वाळवणं, पॅकिंग करणं हे सगळं मी घरच्या घरीच करतो. आज माझ्या सीडबँकेत मोखा, पाडळ, दहीपळस, रामवड, भोरसाल, बिजा, पिवळा पळस, उंडी, बहावा यांसारख्या ३०० पेक्षा जास्त प्रजातींच्या बिया उपलब्ध आहेत’ अशी माहिती चापूले यांनी दिली. गेल्या सहा वर्षांमध्ये ५ हजार हून अधिक लोकांना त्यांनी मोफत बिया वितरित केल्या आहेत. याशिवाय, लातूर वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, पुण्याची देवराई फाउंडेशन, नांदेडची ऋत फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगरच्या जनसहयोग संस्थेसारख्या अनेक संस्थांना त्यांनी मोठ्या प्रमाणात बिया दिल्या आहेत.
दरवर्षी किमान १ हजार रोपं तयार करून शिवशंकर चापूले इच्छुकांना ती मोफत देतात. बियांचं प्रदर्शन हा त्यांचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ठरला आहे. पुणे, नागपूर, लातूर आणि सातारा येथे आतापर्यंत त्यांनी या प्रदर्शनांचं आयोजन केलं आहे. सध्या शिवशंकर चापूले हे जंगलात जाऊन बीज संकलन करतात. मोफत बियांचं व रोपांचं वाटपही ते करतात. त्याचबरोबर शाळा तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निसर्ग सहलीही आयोजित करतात आणि विवध ठिकाणी बीजप्रदर्शनही ते आयोजित करतात. चापूले यांना लातूर वनविभागाचा पुरस्कार, निसर्गदूत पुरस्कार, डॉ. पा. वा. सुखात्मे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, मित्र जिवांचे पुरस्कार, जिनोम सेविअर अवॉर्ड (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) आणि प्रयास पर्यावरण भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
कुठल्याही पदवीशिवाय शिवशंकर चापूले यांनी निसर्गस्नेही संशोधन, लोकप्रबोधन आणि देशी झाडांच्या प्रचार – प्रसाराचं कार्य सुरू ठेवलं आहे. बीज संग्राहक म्हणून केवळ विविध प्रजातीच्या झाडांची, पिकांची बीजं गोळा करणं एवढंच त्यांचं काम नाही. तर या कामातून त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात निसर्गसेवेचं बीज पेरलं आहे. या बीजाला अंकुर फुटेल आणि भविष्यात त्यातून नव्या वृक्षप्रेमींची एक पिढीच निर्माण होईल. भविष्याची पेरणी करणाऱ्या शिवशंकर चापूले यांचं कार्य म्हणूनच अतुलनीय आहे.