पुस्तकांचं जग मुळातच रम्य. ज्ञान, मनोरंजनाबरोबरच विविध विषयांवरील कुतूहल निर्माण करण्याचं काम पुस्तकं करतात. आणि मग आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर वाचनावाटांना प्रारंभ होतो. अभिनेत्री शुभांगी भुजबळच्या वाचनवाटाही अशाच खास आहेत. अभिनेत्री, रेडिओ जॉकी, निवेदिका आणि कलाक्षेत्रात आनंदाने कारकिर्द घडवणारी शुभांगी एक उत्तम वाचकही आहे. पुस्तकांमुळे आपल्या सामाजिक जाणिवा अधिक रेखीव होत जातात, असं ती मानते. ‘आपण एका विशिष्ट विश्वात जगत असतो. पुस्तकांमुळे महत्वाचा काय बदल घडत असेल तर तो म्हणजे तुमच्या रोजच्या जगण्याच्या पलीकडील विविध पैलू तुमच्यासमोर हळूहळू उलगडत जातात. त्यामुळे पुस्तकं सामाजिक जाणिवा देतात, असं मला वाटतं. आज जे तुम्हाला विचारस्वातंत्र्य आहे ते मिळविण्यासाठी आधीच्या पिढीतील कितीतरी समाजसुधारकांनी खस्ता खाल्य्या आहेत. पुस्तकं हा सारा इतिहास आपल्यासमोर उलगडतात आणि आपल्यातील वैचारिक भान जागृत करतात’, असं शुभांगीचं मत आहे.

शुभांगीला लहानपणापासूनच वाचनाची गोडी होती. मुळात तिची आई शिक्षिका असल्याने घरात वाचनाचं वातावरण होतंच. शुभांगी म्हणते, ‘आईने मला मोठ्यानं वाचायची सवय लावली. इतकं मोठ्यानं वाचायचं की ती स्वयंपाकघरात आणि मी खोलीत असेन तर मी वाचलेलं तिला ऐकू जायला हवं. त्यामुळे एक झालं अभ्यासक्रमात असणार्‍या सगळ्या कवितांचं पाठांतर उत्तम झालं. मला त्या कविता आवडू लागल्या. अगदी आजही कुणी मला बालपणीच्या कविता म्हणून दाखवायला सांगितलं, तरीही मी न चुकता सगळ्या कविता म्हणून दाखवते.’ तिनं मोठ्यानं वाचायची हीच सवय तिच्या घरातील सगळ्या मुलींना लावली आहे. वाचनासाठी हव्या असणार्‍या नव्या पुस्तकांची यादी स्वत:हून देतात, असं ती सांगते.

सध्या आमची मुलं वाचनापासून दुरावली आहेत, अशी तक्रार पालक सतत करत असतात यावर तिचा आक्षेप आहे. ती म्हणते, ‘आपल्या आई वडिलांनी किंवा आजी-आजोबांनी आपल्याला वाचनाची गोडी लावण्यासाठी जितके प्रयत्न केले होते, त्याच्या पावपट प्रयत्नही आपण करत नाही. आपणच आपल्या मुलांना गोष्टी वाचून दाखवायला हव्यात, उत्तमोत्तम साहित्याची ओळख करून द्यायला हवी. त्यांना आवडेल त्या माध्यमात पुस्तकं उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. अशा छोट्या-छोट्या कृतीतून मुलांमधील वाचक घडण्यास मदत होते, असा तिचा स्वत:चा अनुभव आहे. शुभांगीला पहिलं पुस्तक शाळेत असताना तिच्या मामाने भेट दिलं होतं. ती म्हणते ‘ज्ञानातून मनोरंजन’ हे आशा परुळेकर यांचं पुस्तक मामानं भेट दिलं आणि माहितीचा एक खजिनाच माझ्या हाती आला. आता जेव्हा मी याविषयी विचार करते, तेव्हा जाणवतं की या पुस्तकाने शालेय वयात माझं कुतूहल जागृत केलं होतं. आणि तेव्हा मला जाणवलं होतं की आपण कितीतरी विषयांवर अधिक वाचायला हवं.

सध्या शुभांगी खलील जिब्रान लिखित ‘द प्रॉफेट’ हे पुस्तक वाचते आहे. तिला एकाच वेळी अनेक पुस्तकं वाचायची सवय आहे. ती म्हणते, कोणतीही पुस्तकं वाचत असले तरीही मी अखंड महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील साहित्य किंवा संदर्भ ग्रंथांचं वाचन करत असते. त्यामुळे सध्या मी ‘कृष्णराव भालेकर समग्र वाङ्मय – सत्यशोधक चळवळीतील महात्मा फुले यांचे सहकारी’ हे सीताराम रायकर यांनी संपादित केलेलं पुस्तक वाचते आहे. शुभांगीने मुंबई विद्यापीठातून ‘नाट्यशास्त्र’ या विषयात पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. तिथे शिक्षण घेत असताना ‘नाट्यशास्त्र’ या पुस्तकावरील अनेक पुस्तकं तिने वाचून काढली. ती म्हणते, शिक्षण घेत असताना अवांतर वाचन करण्यासाठी वाव असतो. एम.ए पूर्ण करत असतात मी झपाटल्यासारखी पुस्तकं वाचायचे. त्यातही नाटकांच्या संहिता वाचणं हा माझा आवडता उद्योग होता. मग त्यात अगदी एक नाटककार निवडला की त्यांची सगळी नाटकं सलग वाचून काढायची मला सवय होती. त्यामुळे त्यावेळी विजय तेंडुलकर, सतीश आळेकर अशा कितीतरी नाटककारांची नाटकं मी वाचली आहेत, असं तिने सांगितलं.

अनेकांची उमलत्या वयात पुस्तकांशी मैत्री होते. मग काही साहित्यप्रकार आवडू लागतात. तिथली मुशाफिरी सुरु होते, मात्र काही साहित्य प्रकारांची ओळख अंमळ उशिराच होते. शुभांगीला साहित्य वाचनाची आवड होतीच, मात्र तिची कवितेच्या प्रांताची भ्रमंती जरा उशिराने सुरु झाली. कविता अर्थाच्या अनेक छटा आपल्याला दाखवतात आणि त्यामुळे जगणं अधिक समृध्द होत जातं, असं ती सांगते. गुलजार, अरुण कोलटकर, किरण येले, नलेश पाटील ही तिची काही आवडती कवी मंडळी. ती म्हणते, या कवींसोबतच कितीतरी कवींनी मला माणूस म्हणून अधिक प्रगल्भ केलं आहे. त्यामुळे या सगळ्यांचे मी कायमच आभार मानेन.

प्रवासात, चित्रीकरणाच्यावेळी किंवा अगदी डॉक्टरकडे वगैरे जाताना किमान एखादं पुस्तक तरी शुभांगीच्या सोबत असतंच. प्रवासादरम्यान मिळणारा वेळ ती वाचनात घालवते. तिची वाचनाची आवड पाहून ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी काही पुस्तकं तिला भेट दिली होती, याची आठवण तिने संगितली. कुठल्या नव्या गावात किंवा शहरात चित्रीकरण असलं म्हणजे तिथली वाचनालयं किंवा पुस्तकांची दुकानं यांना भेट देण शुभांगीला आवडतं. काही वर्षांपूर्वी ‘गाव गाता गजाली’ या मालिकेचं चित्रीकरण कुडाळ येथे सुरु होतं. तेव्हा मधल्या वेळेत ती तिथल्या वाचनालयात जात असे. त्या दरम्यान मी खूप पुस्तकं वाचून काढली, असं तिने सांगितलं. शिवाय, एखाद्या शहरात पदपथावरील पुस्तकांच्या दुकानातही अनेक दुर्मीळ पुस्तकं हाती लागतात, हा तिचा अनुभव आहे. दिल्ली, मुंबई, पुणे अशा कितीतरी शहरात तिला काही मौलिक पुस्तकं मिळाली आहेत. यात संगीत नाटक अकादमीने प्रकाशित केलेल्या ‘संगीत नाटक – सिल्वर ज्युबिली व्हॉल्यूम’ आणि ‘स्टेज म्युजिक ऑफ महाराष्ट्र’ या दोन पुस्तकांचा समावेश आहे.

शुभांगीची आवडत्या पुस्तकांची यादी फार मोठी आहे. मात्र, त्यातही मंगला गोडबोल लिखित ‘ज्ञानपीठ लेखिका’, ‘युगांत’ – इरावती कर्वे, ‘पर्व’ – एल.एस. भैरप्पा, ‘बखर बिम्मची आणि मुग्धाची रंगीत गोष्ट’ – जी. ए. कुलकर्णी, ‘दोन हात’ – डॉ. वि. ना श्रीखंडे, ‘शैली’ – श्रीकांत सिनकर, ‘जगलींग्स एलिफंट्स’ – जोन्स लॉफ्लिन अँड टॉड मुसिग, ‘जोयानाचे रंग’ – कविता महाजन, ‘सटायर फटायर’ – शफाअत खान, ‘मोराची बायको’ – किरण येले, ‘त्रिवेणी’ – गुलजार, ‘महाकाव्य’ – कवी यशवंत , ‘शोधयात्रा’ – अरुण साधू, ‘ड्रीमरनर आणि बाइज्जत बरी’ (अनुवादित) – सोनाली नवांगुळ, ‘पेरूगन मुरुगन’ – वर्जेश सोलंकी, ‘इट प्रे लव्ह’ – एलिझाबेथ गिल्बर्ट आणि ‘टू सीट ऑन स्टोन अँड अदर शॉर्ट्स’ – रामू रामनाथन या पुस्तकांचा समावेश आहे. तसंच, माधुरी पुरंदरे, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, जयंत पवार ही तिची काही आवडती लेखक मंडळी आहेत. अरुणा ढेरे, रेणू गावस्कर, माधुरी पुरंदरे आणि दस्तूरखुद्द गुलजार यांच्या झालेल्या भेटी शुभांगीच्या स्मरणात आहेत. मात्र, इरावती कर्वे, पु. ल. देशपांडे, अब्दुल कलाम आणि जे कृष्णमूर्ती आदींना भेटायला फार आवडलं असतं, असं तिने सांगितलं.

पुस्तकं अनेक पातळीवर आपल्या समृद्ध करतात, असं ती मानते. त्यामुळे अखंड वाचनात रमणं, त्याची टिपणं काढणं, संदर्भ साहित्य शोधणं आणि या सगळ्याचा वापर आपल्या अभिव्यक्तीत करणं हा शुभांगीचा आवडता छंद आहे. लहान मुलांना काही भेट द्यायचं असेल तर आवर्जून पुस्तकं भेट द्या, असं ती सुचवते. भाषा, संस्कार आणि महत्वाचं म्हणजे ‘विचारांची संस्कृती’ टिकवायची असेल तर वाचन गरजेचं आहे, असं तिने सांगितलं. पुस्तक वाचनाचं महत्व अधोरेखित करताना तिने नाटककार सफदर हश्मी यांच्या ‘किताबे कुछ कहना चाहती है’ या कवितेतील शेवटचं कडवं म्हणून दाखवलं,

किताबों में रॉकिट का राज़ है

किताबों में साइंस की आवाज़ है

किताबों का कितना बडा संसार है

किताबों में ज्ञान की भरमार है |

क्या तुम इस संसारमें नहीं जाना चाहोगे?

किताबें कुछ कहना चाहती हैं,

तुम्हारे पास रहना चाहती हैं!

viva@expressindia.com