‘मी सांगितल्याशिवाय आई बाबांना काही सांगू नकोस…’
‘माझा चार्जर कुठे आहे?’
‘तू माझा फोटो मला न विचारता का टाकलास’
‘रोज शॉवर चालू ठेवतोस!’

इथपासून ते ‘सगळ्यात पहिला आयफोन मला माझ्या भावाने दिला’…, ‘पहिल्या इंटरनॅशल ट्रिपमधून ताईसाठी मेकअप किट आणायचाय’, ‘त्या परिस्थितीत फक्त ताई होती म्हणून निभावलं’…

बालपणातल्या या छोट्या-छोट्या भांडणातून सुरू झालेलं भावंडांचं नातं कधी मोठं होत जातं, हे कळतही नाही. मोठी बहीण धाकट्या भावाची आई होते आणि मोठा भाऊ धाकट्या बहिणीचा सगळ्यात पहिला चीअरलीडर आणि प्रोटेक्टर बनतो.

कालपर्यंत एकाच खोलीसाठी भांडणारी भावंडं आज वेगवेगळ्या शहरांत, वेगवेगळ्या देशांत आणि वेगवेगळ्या आयुष्यांमध्ये व्यग्र असतात. तरीही ‘काय रे, सगळं ठीक आहे ना?’ हा एक फोन अनेकदा बाकीच्या सगळ्या नात्यांपेक्षा जास्त जवळचा वाटतो. भावंडं मोठी झाल्यावर एकमेकांचे मित्र जास्त होतात आणि तीच या नात्याची सुंदर गोष्ट असते.

एकाच घरात एकत्र वाढणारी मुलं नात्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यातून जात असतात. जसजशी मोठी होतात, तसं भांडणाची जागा समजूतदारपणा घेतो आणि एकमेकांसाठी मनातला एक हळुवार कोपरा तयार होतो. म्हणूनच आजच्या पिढीची राखी पौर्णिमेची व्याख्या ही ‘तू माझं रक्षण कर’ यापेक्षा ‘आपण एकमेकांसाठी आहोत.’ ही भावना जपणारी आहे.

सिबलिंग्स डेट ट्रेंड

‘ऊं३ी’ म्हटलं की गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, नवरा-बायको ही जुनी कल्पना. सोशल मीडियामुळे आणि जेन झी पिढीच्या सगळ्याच बाबतीतल्या हटके पद्धतीमुळे अनेक नवीन ट्रेंड्स येऊ लागले आहेत त्यातला एक भाग म्हणजे ‘सिबलिंग डेट’. लहानपणी एकत्र घालवलेला वेळ, मोठं झाल्यावर इतका अमूल्य वाटेल असं कधीच वाटलं नव्हतं, असं आजच्या पिढीतली भावंडं सांगतात. २४ तास एकत्र किंवा मनात येईल, आठवण येईल तेव्हा भेटण्यापासून ते आता मुद्दाम ठरवून भेटणं यामुळे सिबलिंग्स डेटला आता प्राधान्य मिळतं आहे. कॉफीला जाणं, एकत्र सिनेमा पाहणं, शॉपिंग करणं, लॉन्ग ड्राइव्हला जाणं, एखाद्या नवीन रेस्टॉरंटमध्ये जेवणं किंवा अगदी घरच्या गच्चीवर बसून दोन तास गप्पा मारणं… यालाच ही भावंडं आता ‘डेट’ म्हणू लागली आहेत.

ठाण्याची सानिका कुलकर्णी आणि तिचा भाऊ नचिकेत सांगतात, ‘आम्ही दोघंही वेगवेगळ्या शहरांमध्ये शिकायला आणि नोकरीला आहोत. प्रयत्न असतो की आम्ही निश्चित दिवस ठरवून घरी एकत्र येऊ. आम्हाला आता गिफ्ट्सपेक्षा वेळ जास्त महत्त्वाचा वाटतो. एकत्र भेटल्यावर लहानपणी ज्या ज्या जागांवर जायचो तिथे आम्ही जातोच, आमच्या घराजवळची बाग, पाणीपुरीवाला, आईस्क्रीमवाला, या जागा आम्हाला पुन्हा आमच्या लहानपणात घेऊन जातात. तिथे गेल्यावर आम्हाला जो आनंद, समाधान मिळतं तेच आमच्यासाठी एकमेकांचं गिफ्ट आहे.’

आजच्या पिढीसाठी मैत्रीचं महत्त्व वाढलं आहे. त्यांना नात्यांना लेबल्स देणं आवडत नाही, कारण ते भावनिक संबंधांवर जास्त विश्वास ठेवतात. एकमेकांना महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये सपोर्ट करणं. एकमेकांच्या निर्णयांमध्ये सोबत राहणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. मुंबईची आकांक्षा सांगते, ‘मी गेल्यावर्षी माझं ब्युटी चॅनेल सुरू केलं. पूर्णवेळ नोकरी सोडून मी हे करण्याचा निर्णय घेतला तो सुरुवातीला माझ्या आईवडिलांना अर्थातच पटला नाही. पण, तिला जे आवडतंय ते करू दे, हे त्यांना समजावण्याचं काम दादाने केलं. हा निर्णय घेताना अगदी सुरुवातीपासून माझ्या पाठीशी उभी राहणारी एकमेव व्यक्ती म्हणजे माझा दादा!’ नुकताच चॅनेलने मोठ्या संख्येच्या सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठला. यंदाच्या राखीपौर्णिमेला दादाने माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं आहे. मला जे आवडतं त्या सगळ्या गोष्टी म्हणजेच स्पा, कॉन्सर्ट्स, शॉपिंग हेही त्यात असू शकतं, असा माझा अंदाज आहे. आजचा दिवस मी माझ्या सगळ्यात जवळच्या, आवडत्या व्यक्तीसोबत पूर्णवेळ घालवणार आहे, असं तिने सांगितलं.

भावंडांचं नातं हे काही सख्ख्या भावंडांपुरतं मर्यादित नसतं. लहानपणी सगळीच मुलं एकत्र वाढत असतात, सणसमारंभांमध्ये भेटतात. ‘कझिन्स बॉण्ड’ हा एक संपूर्ण वेगळा, जिव्हाळ्याचा विषय आहे. पुण्याची शलाका सांगते, ‘आम्ही सगळी भावंडं रक्षाबंधनासाठी शक्यतो भेटायचं प्रयत्न करतोच. यावर्षी वीकएंड लागून आल्यामुळे ते अधिक शक्य झालं. एक दिवस हा आईकडच्या भावंडांचा आणि एक दिवस बाबांकडच्या भावंडांसाठी असा राखीव असतो. यावर्षी आम्ही डेस्टिनेशन रक्षाबंधन करणार आहोत. फक्त आम्ही भावंडं लोणावळ्याला आउटिंगसाठी चाललोय. एकमेकांसाठी गिफ्ट्स, सरप्रायझेस प्लॅन केलेत. तसंच, एक दिवस आम्ही पॉटलक करणार आहोत. म्हणजे, एकमेकांच्या आवडीचे पदार्थ आम्ही स्वत: बनवून एकत्र पार्टी करणार आहोत. सहवासात दुरावा आला असला तरी तो नात्यांमध्ये येऊ नये, कोणीही कोणासाठी एका फोनवर ॲव्हेलेबल असावं हाच या मागचा उद्देश असतो. आता आमच्यातल्या बर्‍याच जणांची लग्नं झाली आहेत, काहींना मुलं झाली आहेत, त्यामुळे पुढच्या पिढीचंही गोड रक्षाबंधन आम्ही साजरं करणार आहोत’.

रक्षाबंधन म्हटलं की बहिण-भाऊ आलेच, पण बहिणी-बहिणींचा बॉण्ड आणि त्यांचं सेलिब्रेशनही तितकंच खास असतं. एकत्र शॉपिंग, कॉफी डेट, लंच किंवा स्पा ते अगदी लहानपणीच्या आठवणी पुन्हा जागवण्यासाठी एखादा जुना फोटो रिक्रिएट करण्यापर्यंत बहिणी रक्षाबंधन वेगवेगळ्या पध्दतीने साजरी करतात. नाशिकची सुकन्या सांगते, ‘आम्ही आमच्या भावांसोबत तर राखीपौर्णिमा साजरी करतोच, पण आम्हाला आमची सिस्टर डेट साजरी करायलाही आवडतं. आम्ही यावर्षी सलोन डेटवर जाणार आहोत. हेअर स्पा, हेअर स्टाईल, कलर करणार आहोत. आम्हाला चॉकलेट सँडविच आणि मॅगी खूप आवडतं. मग सिस्टर डेटमध्ये आम्ही असे लेटनाईट प्लॅन्स घरातच करतो. शेअरिंग हे बहिणींमध्ये लहानपणापासून असतंच. अशा पद्धतीच्या शेअरिंगने, वेळ घालवल्याने बॉण्ड अधिकाधिक स्ट्राँग होतो, असं आम्हाला वाटतं’.

सस्टेनेबल गिफ्टिंग हा तरुणाईमध्ये वेगाने महत्त्वाचा ठरणारा ट्रेंड आहे. आजच्या जेन झी आणि मिलेनिअल्ससाठी भेटवस्तू म्हणजे फक्त सुंदर दिसणं किंवा महाग असणं पुरेसं राहिलेलं नाही; ते कुठून आलं, कशापासून बनलं आणि त्याचा पर्यावरणावर किती परिणाम होतो, याचाही विचार केला जातो. त्यामुळे प्लास्टिकऐवजी इको-फ्रेंडली बॉक्सेस, हॅण्डमेड प्रॉडक्टसना मागणी वाढली आहे. तसंच, शारीरिकदृष्ट्या तरुण मंडळी खूप सजग आणि चांगल्या आरोग्यासाठी आग्रही झाले आहेत. हेल्दी स्नॅक्स, नैसर्गिक, ऑरगॅनिक पदार्थ याची मागणी वाढली आहे.

गोव्याचा अतिशय सुंदर पर्यावरण फ्रेंडली ब्रँड ‘ एं१३ँपूर्ण’ च्या सुचेता भंडारे सांगतात, ‘मिलेट्स म्हणजेच आपली भारतीय भरड धान्यं आता पुन्हा रोजच्या जीवनशैलीत महत्त्वाची झाली आहेत. आम्ही शेतकर्‍यांकडून धान्य घेतो आणि त्याचे गिल्ट फ्री लाडू बनवतो, सुरुवातीला फक्त एवढाच बिझिनेस होता. आता तरुण पिढीच्या अनुषंगाने आम्ही खूप नवीन नवीन प्रॉडक्टस आणले आहेत. हॅण्डपेन्टेड टोट बॅग्स, क्लिप्स, पिन्स, फ्रिज मॅग्नेटस जे सगळं पर्यायवरण पूरक आहे, आमच्या कुठल्याही प्रॉडक्टसमधून कोणालाही जीवितहानी, पर्यावरणाची हानी नाही. अगदी आम्ही पॅकिंग करतो ते बॉक्सेससुद्धा बायोडिग्रेडेबल आहेत. या हॅम्पर्स मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ‘सीड राखी’ देतो. आमच्यासारखंच पर्यावरणपूरक उत्पादनाचं काम करणार्‍या ‘यज्ञांग सत्याग्रही शेती’ यांच्याकडून आम्ही ती बनवून घेतो. काही काळानंतर राखी ही शेवटी टाकूनच दिली जाते, त्या ऐवजी आपल्या भावाची, बहिणीची छान आठवण म्हणून आपण त्या राखी मधल्या बियाण्यांपासून झाड लावू शकतो’.

पूर्वी राखी म्हणजे मनगटावर बांधलेला धागा, ताटातली मिठाई आणि भावाकडून मिळणारं पाकीट. आज मात्र भावंडांचं नातं ‘गिफ्ट’च्या किमतीपेक्षाही एकमेकांसोबत असण्यासाठी आसूसलेलं आहे. सिबलिंग डेटपासून पर्सनलाइज्ड हॅम्पर्सपर्यंत आणि लहानपणीच्या आठवणी ते लॉन्ग-डिस्टन्स सेलिब्रेशनपर्यंत… गेल्या काही वर्षांत रक्षाबंधनाचा उत्सव नव्या पद्धतीने साजरा होतोय. लहानपणी एकाच रिमोटसाठी भांडणारी, एकमेकांची गुपितं आई-बाबांना सांगण्याची धमकी देणारी, एकमेकांच्या वस्तू परवानगीशिवाय वापरणारी भावंडं मोठी होतात आणि नकळत एकमेकांच्या आयुष्यातली कायमची ‘सेफ-स्पेस’ बनतात.

‘राखी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा!’

viva@expressindia.com