तेजश्री गायकवाड

गेलं वर्ष म्हणजे ‘लॉकडाऊनचं वर्ष’ म्हणता येईल.  वर्षांनुवर्षे अविरतपणे सुरू असलेल्या अनेक गोष्टींना अचानक थांबा लागला. साहजिकच याचा परिणाम प्रत्येक उद्योगधंदे, काम, इंडस्ट्रीवर झालाच. करोनामुळे जगभरात अनेक देशातील इंडस्ट्रीला मोठय़ा प्रमाणात फटका बसला. या सगळ्यात आपल्या रोजच्या वापरातील गोष्ट अर्थात कपडे आणि फॅशनइंडस्ट्री तरी कशी वाचेल? अडचणींवर मात करत नित्यनूतन शोधत राहण्याची सवय असलेली फॅशन इंडस्ट्री यावर्षीही तीच सळसळती ऊर्जा घेऊन जुन्याला नवा साज चढवण्याच्या प्रयत्नात आहे..

प्रत्यक्षात सगळं जग बंद होतं तेव्हा ऑनलाइन का होईना काही प्रमाणात जगरहाटी सुरू होती.  लॉकडाऊनमुळे आजची तरुण पिढीच नाही तर सगळ्याच वयातील लोक ‘डिजिटल’ झाले. फक्त काही गोष्टींवर ऑनलाइन डिपेन्डन्ट असलेले आपण आता जवळ जवळ ऐंशी टक्के  ऑनलाइन खरेदीकडे वळलो आहोत. फॅ शनच्या बाबतीत तर खरेदीपासून स्टाईलिंगपर्यंत सगळंच ऑनलाइन झालं आहे. गेल्या वर्षांच्या अखेरीस हळूहळू फॅशन इंडस्ट्रीने डिजिटल प्रमोशन आणि सेलकडे मोर्चा वळवला होता. निव्वळ आपलं कलेक्शन लोकांसमोर आणण्यासाठी बनवलेल्या  सोशल मीडिया, सोशल मेसेंजरला शस्त्र बनवून आपला व्यवसाय करायला सुरुवात झाली. या नव्या वर्षांतही फॅ शन इंडस्ट्री हेच शस्त्र वापरताना दिसणार आहे.  ‘लॅक्मे  फॅशन वीक’सारख्या देशातील मोठय़ा कंपनीने ‘नेक्सा’सोबत हातमिळवणी करत  तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगळे प्रयोग आणि प्रेरणादायक नवकल्पना आणल्या आहेत. ‘लॅक्मे  फॅशन वीक’च्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिले ‘नेक्सा डिजिटल कुटूर’ सादर होणार आहे. यामध्ये  डिझाइनर अशा पद्धतीने स्के च तयार करत आहेत,  जे नंतर थ्रीडी व्हच्र्युअल कपडय़ात रूपांतरित होईल आणि शोकेसमध्ये ते सादर करता येईल. यामुळे आभासी आणि भौतिक जगातील अंतर कमी करत डिझाइनर ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला व्हच्र्युअल ड्रेस  त्यांच्या विनंतीनुसार प्रत्यक्षात डिझाइन करून देऊ शकतात किंवा ग्राहकांना डिजिटलरीत्या परिधान करता येणारी वस्तू म्हणून विकू शकतात. असे अनेक प्रयोग फॅशन इंडस्ट्रीमध्ये होण्यास सुरुवात झाली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन झालं आणि त्यामुळे फॅशनमध्ये महत्त्वाचे बदल झालेत. हे बदल यावर्षी लोक अंगीकारताना दिसणार आहेत. फॅशनचा मूळ गाभा म्हणजे स्टाईल, रूप, रंग एवढंच नसतं तर  फॅशनमधला कम्फर्टही महत्त्वाचा असतो. घरीच असल्यामुळे लोकांनी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त कम्फर्टेबल कपडय़ांनाच पसंती दिली. यात अर्थातच मुलांनी  लूज टी—शर्ट, शर्ट,  स्लीव्हलेस टी—शर्ट, शॉर्ट्स, ट्रॅक पॅण्ट्स अशा कपडय़ांना पसंती दिली. तर मुलींनी लॉन्ग आणि शॉर्ट मॅक्सी ड्रेसेस, लॉन्ग आणि लूझ टी— शर्ट, टॉप्स, शॉर्ट्स, ट्रॅक पॅण्ट्स, पलाझो अशा कपडय़ांना पसंती दिली. नाइट सूटही कम्फर्टेबल फॅशनचाच एक भाग आहेत. वर्षांनुवर्षे अजिबात ट्रेण्डमध्ये नसणारे नाइट सूट यंदा अचानक ट्रेण्डिंग झाले आहेत,  याचं कारण अर्थातच लॉकडाऊन. नाइट सूटमुळे अगदी घरी बसूनही फॅ शनेबल लूक मेन्टेन करणे तरुणींना सोपे गेले. नाइट सूटची ही सोयीची फॅशनअनेकांच्या अंगवळणी पडली आहे. त्यामुळे हा ट्रेण्ड यावर्षी महत्त्वाचा ठरणार आहे.

पुन्हा एकदा सगळं सुरू झालं असलं तरी अजूनही लोकांचा नवीन कपडे घेण्याकडे कल दिसत नाही आहे,  कारण अजूनही अनेक ठिकाणी ट्रायल रूम बंद आहेत. त्यामुळे सगळे र्निबध उठेपर्यंत नवीन कपडे विकत घेण्याकडे लोकांचा कल थोडा कमी असेल.  परंतु याचा अर्थ असा नाही की फॅशन करायची नाही, उलट यातून मार्ग काढत  जे आपल्याकडे आहे त्याच  डीआयवाय किंवा मिक्स-मॅच करण्याच्या टेक्निकवर लोकांचा भर असेल. घरी जे उपलब्ध आहे त्याच्या मदतीनेच स्टायलिंग करण्यावर भर दिला जाईल. यामुळे अनेक नवीन फॅशन ट्रेण्ड्सही सेट होतील. यात ब्लाऊजच्या ऐवजी  स्पोर्ट्स ब्रा, क्रॉप टॉप, लॉन्ग टॉप वरती साडी नेसण्याचा ट्रेण्ड, साडीवर छानसं जॅकेट घालणे अशी  स्टाईल दिसून येईल. लॉन्ग स्कर्ट आणि टॉपला मॅच करून लॉन्ग मॅक्सी ड्रेसची स्टाईल करणे, साडीला स्कर्ट प्रमाणे दिसेल असे नेसणे, असे अनेक मिक्स आणि मॅचचे ट्रेण्ड सेट झाले. यावर्षी या ट्रेण्डमधील आणखी नवनवे प्रयोग पाहायला मिळतील.  लॉकडाऊनमध्ये घरी वेळ असल्यामुळे अनेकांनी आपल्या जुन्या कपडय़ांना नवीन लूक देण्याचा प्रयत्न केला.  जुन्यालाच नवा साज देण्याचा हा प्रयोग यंदाही फॅशनमध्ये बहार आणेल यात शंका नाही.

viva@expressindia.com