स्नेह एरंडे
हॅलो… मी स्नेह एरंडे. एक होमस्कूलर आणि सध्या टेक्नॉलॉजी, XR (एक्स्टेंडेड रिॲलिटी) प्रयोग करणारा, नवं काही शोधू पाहणारा तरुण. सतत बदलणाऱ्या या इंटरनेट कल्चरमध्ये नवे ट्रेंड्स, नवे शब्द आणि नवे व्हाइब्स कसे तयार होतात, हे ऑब्झर्व्ह करणं आणि त्याचा अर्थ लावणं मला आवडतं. ‘स्लँग बुक’ या कॉलममधून जेन झीच्या दैनंदिन आयुष्यातले असेच काही मजेशीर आणि वेगळे शब्द, त्यांच्या गमतीजमती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे! चला तर मग शिकू यात जेन झीच्या slangs…
ॲटिट्यूड हा तसा सगळ्याच पिढ्यांच्या आयुष्यातला परवलीचा शब्द. पूर्वी ‘वाइब्स’, ‘ॲटिट्यूड’, ‘कॅरिझ्मा’ हे शब्द अधिक वापरले जायचे, पण आमच्या जेन झी आणि जेन अल्फा यांच्या आयुष्यात एका नवीन शब्दाने भारी एन्ट्री मारली आहे, तो म्हणजे ‘ऑरा’. डिक्शनरी म्हणते, ‘एखाद्या व्यक्तीकडून जाणवणारी वातावरणाची किंवा ऊर्जेची भावना’. आमच्यासाठी मात्र हा ‘ऑरा’ म्हणजे सरळ सरळ कूलनेसचं मोजमाप आहे.
ऑरा (Aura) वेगवेगळ्या माध्यमांतून येतो. कोणी फुटबॉल खेळताना एखादा छानसा गोल करतो, किंवा कोणी रात्रभर पार्टी करूनही दुसऱ्या दिवशीच्या परीक्षेत उत्तम मार्क्स मिळवतो. या भन्नाट कृती नव्या भाषेत ऑरा गेनिंग, W aura किंवा १०० ऑरा पॉइंट्स अशा वेगवेगळ्या शब्दांत व्यक्त केल्या जातात. हे पॉइंट्स म्हणजे प्रत्यक्षात काही मोजमाप नसतं, पण त्या क्षणी निर्माण होणारी कूलनेसची भावना किती प्रमाणात आहे हे व्यक्त करण्याचा हा एक सोपा मार्ग असतो. काही लोक हा ऑरा दाखवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. अशा लोकांना ऑरा फार्मर्स असंही म्हटलं जातं.
ऑरा फार्मिंग हे कधी कधी चांगलं आणि नैसर्गिकही वाटू शकतं, कारण काहीजण खरंच effortless cool असतात, पण कधी कधी हे असं अतिच जाणवतं आणि मग ते थोडं pick-me सारखं वाटायला लागतं. याच सगळ्याची दुसरी बाजू म्हणजे ‘एल ऑरा’. काही वेळा अशा छोट्या चुका होतात की ऑराच हरवल्यासारखं वाटतं. उदाहरण द्यायचं तर एखाद्या महत्त्वाच्या प्रेझेंटेशनदरम्यान माइक चालू आहे हे विसरून स्वतःलाच ‘काय बरळतोय मी…’ असं म्हणणं. त्या क्षणी मनात लगेच – ८० ऑरा उतरलो आहोत असं वाटतं.
आणखी एक हमखास फसवणारा प्रसंग म्हणजे कुणीतरी हात हलवताना दिसतं आणि आपणही मोठ्या उत्साहाने हात हलवतो, पण लगेच कळतं की तो इशारा आपल्या दिशनेे नव्हताच. हा क्षण इतका ऑकवर्ड करणारा असतो की ऑरा थेट मायनस इन्फिनिटीला पोहोचतो आणि मग ‘मी असं का केलं?’ हा एकच विचार मनात बराच काळ घुमत राहतो. अजून एक रोजच्या आयुष्यातला एल ऑरा म्हणजे मित्रांच्या ग्रुपमध्ये कुणीतरी आपल्याला पेट नेमने हाक मारणं. घरात लाडाने घेतलं जाणारं ते नाव अचानक बाहेर ऐकू आलं की हा ऑरा हलकेच खाली जातो.
खरं म्हणजे ही मोजमापाची सगळी स्टाइल स्पोर्ट्समधून आली आहे, पण आता आमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाली आहे. घरात, कॉलेजमध्ये, मित्रांमध्ये, गेमिंगमध्ये अगदी कुुठेही ‘ऑरा’ हा शब्द सहज फेकला जातो. अप्रिसिएशन द्यायचं असेल तर डब्ल्यू ऑरा आणि एखादी गोष्ट बिनसली तर एल ऑरा एवढंच. शेवटी कूल असण्याची इच्छा कधीच जुनी झालेली नाही, फक्त तो कूलनेस मोजण्याची एक पट्टी आम्ही तयार केली आहे.
