स्नेह एरंडे
आजचे शब्द आहे Lock In (लॉक इन) आणि Grind (ग्राइंड). साध्या भाषेत सांगायचं तर लॉक इन म्हणजे स्वत:चं पूर्ण लक्ष एका गोष्टीवर केंद्रित करणं. बाहेरचा गोंधळ, आळस, कारणं, भीती, सगळं थोडा वेळ बाजूला ठेवून, ‘आता हे करायचंच’ या अवस्थेत जाणं.
जेन झीला लॉक इन हा शब्द जास्त रिलेट होतो. कुणी ठरवलं की आता अभ्यासावरच लक्ष द्यायचं, कुणी तरी ठरवलेलं असतं की आता फक्त शरीरावर काम करायचं, तर कुणी आता स्वत:ला कामात सिद्ध करायचं असं मनाशी पक्कं ठरवलं आहे, अशा प्रसंगांमध्ये आपण म्हणतो, ‘तो लॉक इन झाला आहे.’
लॉक इनची आणखी काही उदाहरणं सांगता येतील. परीक्षा जवळ आली आहे म्हणून फोन बाजूला ठेवला आहे, गप्पा कमी झाल्या आहेत आणि मन एकदम पुस्तकात गढलं आहे. तर ही आहे त्या व्यक्तीची लॉक इन सिच्युएशन.
किंवा नोकरी करणारा एखादा तरुण ठरवून टाकतो की आता कामं वेळेच्या आधी पूर्ण करायची, नवीन काही तरी शिकायचं आणि चांगली ग्रोथ करायची. यालाही लॉक इन असं म्हणता येईल. एखादा मुलगा किंवा मुलगी रोज जिममध्ये जाऊन थोडं थोडं का होईना… स्वत:मध्ये बदल करायचं ठरवतो. यालासुद्धा लॉक इन होणं असं म्हटलं जातं.
लॉक इनचा अर्थ लक्षात घेतला की मग इथंच येतो दुसरा शब्द तो म्हणजे ॅ१्रल्लि (ग्राइंड). लॉक इन म्हणजे मनाची तयारी तर ग्राइंड म्हणजे रोज उठून त्यासाठी घाम गाळणं, म्हणजेच कठोर परिश्रम करणं. एकदा एखादी गोष्ट करायचा निर्धार केला की रोज उठून तेच करणं, पुन:पुन्हा करणं. कंटाळा आला तरी करत राहणं.
आपण घेत असलेल्या कष्टाचं फळ लगेच मिळालं नाही तरीही ती गोष्ट करत राहणं. म्हणून अनेकदा वैयक्तिक स्तरावर लॉक इन होणं यालाच ग्राइंड म्हटलं जातं. पण लॉक इन हे नेहमीच एकट्याचं नसतं. कधी मित्रांचा ग्रुप मिळून ठरवतो की आपण सगळे मिळून जिमला जायचं. ग्रुपमधला एक जण जरी टाळाटाळ करत असला तरी दुसरा त्याला ओढून नेणार. हे झालं ग्रुपचं लॉक इन. ऑफिसमधले सहकारी मिळून ठरवतात की यावेळचं सेल्स टार्गेट सर्वात आधी आपणच गाठायचं. हे झालं पुन्हा ग्रुपचं लॉक इन. आणि कधी कधी तर संपूर्ण मानवजात लॉक इन करते.
एक काळ असा होता, जेव्हा माणूस पुन्हा चंद्रावर जाईल ही खूप दूरची गोष्ट वाटत होती, पण आपण तिथे फक्त विचार करून थांबलो नाही. चंद्रावर मानवाचं पहिलं पाऊल पडलं त्या घटनेला आता पन्नास वर्षांहून अधिक काळ उलटून गेला, तरी आपण पुन्हा चंद्रावर जाण्याचा विचार थांबवला नाही. आर्टेमिस- २ मिशनसाठी शेकडो, हजारो लोकांनी एकत्रित प्रयत्न केले. सगळ्यांनी त्या मिशनवर लक्ष केंद्रित करत अभ्यास, मेहनत, चुका, पुन्हा प्रयत्न, पुन्हा मेहनत अशा पद्धतीने काम केलं. आणि मग पुन्हा एकदा मानवाने चंद्राच्या दिशेने गगनभरारी घेतली. या वेळी माणसाने पृथ्वीपासून आत्तापर्यंतची सर्वांत दूरची झेप घेतली.
नासाने दिलेल्या माहितीनुसार आर्टेमिस- २ ने ६ एप्रिल २०२६ रोजी मानवाने आत्तापर्यंत पृथ्वीपासून गाठलेलं सर्वांत जास्त अंतर पार केलं आणि अपोलो १३चा जुना विक्रम मोडीत काढला. एखादी गोष्ट ध्येय म्हणून पक्की करणं आणि त्यासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीशी जोडलेले लॉक इन आणि ग्राइंड हे फक्त शब्द नाहीत, असं मला वाटतं. आपल्यातल्या अमर्याद क्षमतांची जाणीव करून देण्याची ताकद या शब्दांमध्ये आहे. एक माणूस लॉक इन झाला, तर त्याचं आयुष्य बदलू शकतं. एक समूह लॉक इन झाला, तर संपूर्ण जग बदलू शकतं आणि कधी कधी इतिहासही…
तुम्ही लॉक्ड इन आहात का?
viva@expressindia.com
