स्नेह एरंडे
आजचा शब्द आहे लार्पिंग ( Larping). पहिल्यांदा ऐकल्यावर हा शब्द थोडा खेळ किंवा नाटकाच्या जगातला वाटतो. आणि खरं सांगायचं तर मूळ अर्थाने तो तसाच आहे. छअफढ्रल्लॠ म्हणजे Live- Action Role – Playing . सोप्या भाषेत सांगायचं तर, एखाद्या काल्पनिक पात्रासारखं तयार होऊन, त्या पात्राप्रमाणे वागणं, बोलणं आणि त्याच वेळी एक कथा खेळणं. हे थोडं अभिनयासारखं आहे, थोडं खेळासारखं आहे आणि थोडं आपल्या लहानपणीच्या ‘चल तू पोलीस आणि मी चोर’ या खेळासारखं आहे.
फरक एवढाच की लोक यात वेशभूषा करतात, हातात वेगवेगळ्या वस्तू वापरतात, ठरलेले नियम पाळतात आणि एखाद्या काल्पनिक जगात पूर्णपणे शिरतात. कुणी जुन्या काळातील योद्धा बनतो, कुणी जादूगार, कुणी तपासनीस, कुणी राजा, कुणी गुप्तहेर. जणू आपण एखादी कथा फक्त
बाहेरून पाहत नाही, तर स्वत:चं पात्र घेऊन त्या कथेत आत जातो. मला यातली मजा ही वाटते की आपण सगळ्यांनी आयुष्यात कधी ना कधी लार्प केलं आहे. लहानपणी कुणी सुपरमॅन झालं असेल, कुणी स्पायडर मॅन, कुणी शिक्षक बनून काल्पनिक वर्ग घेतला असेल, कुणी आईसारखं बोलण्याची नक्कल केली असेल.
तेव्हा आपल्याला ‘रोल प्लेइंग’ हा शब्द माहिती नव्हता, पण आपण तेच करत होतो. एखाद्या पात्रात शिरणं, त्याचा आवाज काढणं, त्याच्यासारखं चालणं आणि थोडा वेळ स्वत:ला विसरून दुसरं कोणी बनणं. यात एक निरागस कल्पकता असते. पण इंटरनेटच्या युगात लार्पिंगचा अर्थ थोडा बदलला.
आता ऑनलाइन स्लँगमध्ये लार्पिंग म्हणजे एखादी व्यक्ती अशी गोष्ट भासवतेय, जी वास्तवात तशी नाही. म्हणजे कुणी आपण स्वत: खूप श्रीमंत आयुष्य जगत असल्यासारखं दाखवतंय, पण ते सगळं भाड्याने घेतलेलं, उधार घेतलेलं किंवा फक्त कॅमेर्याच्या कोनाची जादू असते.
किंवा कुणी एखाद्या विषयात अचानक खूप मोठा जाणकार बनून फिरतंय, पण त्याला साध्या साध्या गोष्टीही माहिती नाहीत. किंवा कुणी ऑनलाइन
खूप कणखर, गहन, गूढ किंवा बुद्धिमान असल्याचा आव आणून बसलंय, पण खर्या आयुष्यात तो स्वभाव कुठेच दिसत नाही. तेव्हा लोक म्हणतात, ‘‘ब्रो इज लार्पिंग.’’ हा शब्द थोडाफार टोमणे मारणे या उद्देशाने वापरला जातो, कारण यात खोटेपणा पकडला जातो. पण मला वाटतं लार्पिंग फक्त चेष्टा करण्यासाठी नाही. कधी कधी आपण सगळे थोडंफार लार्प करतो. मुलाखतीत आपण जास्त आत्मविश्वासू रूप दाखवतो.
सोशल मीडियावर आपण स्वत:चं जास्त नीट, सुंदर आणि शांत रूप दाखवतो. पहिल्या भेटीत आपण जरा जास्त संयमी असतो. मित्रांच्या गटात आपण आपल्या मजेशीर अवतारात येतो. म्हणजे प्रत्येक वेळेस ते खोटं नसतं. कधी कधी ते आपल्याच स्वभावाचं वेगळं रूप असतं. म्हणून लार्पिंग हा शब्द मला रंजक वाटतो. एकीकडे तो कल्पनाशक्ती, अभिनय आणि खेळकरपणाबद्दल आहे. दुसरीकडे तो इंटरनेटवरच्या खोट्या रूपाला नाव देतो. आपण कोण आहोत आणि आपण कोण असल्याचं दाखवतो, यामधली छोटीशी गॅप हा शब्द पकडतो.मग तुमचं काय? तुम्ही लहानपणी कोणत्या कॅरेक्टरसारखं रोल प्ले केलं आहे का? आणि आजकाल ऑनलाइन कोणाला लार्प करताना क्लॉक केलं आहे का?
viva@expressindia.com
