स्नेहलता तावडे-वसईकर

भूमिकेसाठी वजन वाढवणं, कमी करणं ही त्या त्या मालिकेची गरज असते.

|| प्रियांका वाघुले

‘सोयरा बाईसाहेब’ म्हणून घराघरांत पोहोचलेली, करिअरच्या सुरुवातीलाच नकारात्मक शेड असलेली भूमिका तितकीच चोख वठवत प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी अभिनेत्री म्हणजे स्नेहलता तावडे-वसईकर. सध्या मराठी मालिका-चित्रपट विश्वात आपल्या फिटनेससाठी आवडीने मेहनत घेणाऱ्या काही मोजक्याच अभिनेत्री दिसतात. फिटनेस फ्रीक म्हणून ओळखली जाणारी स्नेहलता हे यातलंच एक नाव..

भूमिकेसाठी वजन वाढवणं, कमी करणं ही त्या त्या मालिकेची गरज असते. त्यामुळं एकीकडे त्या दृष्टीने हेल्दी प्रयत्न केले तर त्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावरही सकारात्मकच परिणाम होतो. फिटनेससाठी जे जे करावं त्याचा वैयक्तिक फायदाच जास्त असतो, असं स्नेहलता म्हणते.

व्यायाम किंवा फिटनेससारख्या गोष्टींना वेळच मिळाला नाही आजवर म्हणून त्या गोष्टी पूर्णपणे सोडून देण्यापेक्षा जेव्हा त्याची गरज लक्षात येते किमान तेव्हापासून उमेदीने व्यायामाची सुरुवात करायला हवी, असं ती म्हणते. नियमित व्यायाम करणे फिट राहण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. पण तसं शक्य नसल्यास आठवडय़ातून किमान तीन ते चार वेळा व्यायाम करायलाच हवा. हे सर्वज्ञात असलं तरी सगळ्या गोष्टींचा पाठपुरवठा करून स्वत:साठी तेवढा वेळ देण्याची जिद्द असायला हवी आणि बऱ्याचदा तीच कमी पडते. त्यामुळे फिटनेस मागे राहतो हा स्वानुभव प्रत्येकाच्याच गाठीशी असतो, असं ती म्हणते. त्यामुळे मुळात फिटनेसची सुरुवात करायची तर मनाची आणि मनापासून तयारी आवश्यक आहे यावर तिने जोर दिला.

फिटनेसाठी स्वत:ला तयार करणे, त्यासाठी नियमित वेळ देणे या गोष्टी काटेकोरपणे केल्यास त्याचा शारीरिक फायदा होतोच, मात्र मानसिक स्वास्थ्यही मिळते हे लक्षात घ्यायला हवं, असं ती सांगते. फिटनेससाठी स्नेहलताने जिमपासून अनेक व्यायाम प्रकार हाताळले आहेत. जिममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआऊट सुरू असतेच. त्याचबरोबरीने झुंबासाठीही वेळ देत असल्याचे तिने सांगितले. सातत्याने व्यायाम करणं मलाच आवडतं, त्यामुळे त्यासाठीचे वेगवेगळे पर्यायही मीच शोधते आणि ते फॉलो करते. अगदी जिममध्ये वर्कआऊट जमलेच नाही तरी अगदी घरच्या घरी माझ्या मुलीला दोन्ही हातांनी वर उचलून घेऊन जिना चढणं-उतरणं हाही एक व्यायामाचा भाग समजूनच मी ते करते, असं तिने सांगितलं.

जिम वर्कआऊट, कधी कधी झुंबा, तर कधी सायकलिंग करत असल्याचं स्नेहलता सांगते. शरीराचं वजन कमीअधिक करतानादेखील आपण नको ती चरबी न वाढवता नैसर्गिकरीत्या ते करण्यावर भर देतो, असं ती म्हणते. आहारातही मैदा, साखर यांचे प्रमाण योग्य ठेवूनच त्यातही समतोल साधण्याचा आपला प्रयत्न असतो, असं स्नेहलताने सांगितलं.

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Snehlata tawde vasaikar

Next Story
व्हिवा
ताज्या बातम्या