श्रृंगार मराठमोळा

गुढीपाडवा हा आनंदाचा, नव्या वर्षांचा उत्साह घेऊन येणारा सण.

sahi tamahnkar

रसिका शिंदे-पॉल

गुढीपाडवा हा आनंदाचा, नव्या वर्षांचा उत्साह घेऊन येणारा सण. मुळात कोणताही सण आला की समस्त जनांच्या आनंदाला पारावार राहात नाही. त्यात जर गुढीपाडव्याचा सण असेल तर तरुणाईतही आनंदाची लहर उठते. नववर्ष स्वागतयात्रा आणि त्यानिमित्ताने अगदी पारंपरिक वेशभूषा, दागिने यांचा साजश्रृंगार करत एकमेकांच्या भेटीगाठी घेणं ही प्रथाच पडून गेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गुढीपाडव्याच्या सणाला नटायचं तर पारंपरिक कपडे आणि पारंपरिक बाजाचे दागिने या दोन्ही गोष्टी मस्ट आहेत. त्यामुळे खास या सणाच्या निमित्ताने मराठमोळया दागिन्यांचे नवनवे डिझाइन्स, जुन्या पद्धतीचे दागिने वा जुन्या पद्धतीच्या दागिन्यांना नव्या रूपात, ढंगात सादर केलेले कलेक्शन असा खास नव्या-जुन्याचा संगम असलेल्या दागिन्यांचा खजिनाच पाहायला मिळतो. यातला तुमच्या साडीवर नेमका कोणता दागिना खुलून दिसेल बरं..

जुनं तेच सोनं..
मराठमोळय़ा दागिन्यांची बाजारपेठ मिरवणारे काही परिसर आहेत. मुंबईत दादर परिसरात जुन्या बाजाचे दागिने अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. गेल्या तीन पिढय़ा पारंपरिक दागिने घडवणाऱ्या ‘शिववैभव आर्ट ज्वेलर्स’च्या ऋतुजा भोसले यांच्या मते दागिन्यांच्या बाबतीत जुनं तेच सोनं हा ट्रेण्ड पुन्हा रुळला आहे. मधल्या काळात पारंपरिक नऊवारी किंवा सहावारी साडी नेसून त्यावर पाश्चिमात्य पद्धतीचेच दागिने घातले जात होते. परंतु आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीतील पारंपरिक दागिने स्त्रियांना आपलेसे वाटू लागले आहेत. त्यामुळे त्यांचा कल जुन्या वळणाच्या दागिन्यांकडे वाढल्याचे ऋतुजा सांगतात. कोल्हापुरी साज, चिंचपेटी, तण्मणी, नथ, खोपा या पारंपरिक दागिन्यांबरोबरच मोत्याची चिंचपेटी, तन्मणीही मोठय़ा प्रमाणात बाजारात उपलब्ध असून त्यांना मागणीही अधिक असल्याचे त्या सांगतात.

पारंपरिकतेला नव्याचा साज
तसं पाहायला गेलं तर सणासुदीला आपण कितीही पारंपरिक पद्धतीने नटलो तरी हीच आपली संस्कृती आहे हे ठामपणे आपल्याला सांगणारी एक पिढी काळाआड गेली आहे. त्यामुळे आपल्या पारंपरिक दागिन्यांच्या संकल्पनेलाही काहीसा पाश्चिमात्य संस्कृतीचा स्पर्श झाला आहे. म्हणून तन्मणी, चिंचपेटी, मोत्याचे तोडे, मोत्याचे कानातले या सर्व पारंपरिक दागिन्यांना मॉडर्न टच दिला जात असल्याची माहिती ‘कांक्षिणी ट्रॅडिशनल ज्वेलर्स’च्या स्नेहा यांनी दिली. कोल्हापुरी साज असो किंवा तन्मणी, वजट्रीक असो सणाच्या निमित्ताने स्त्रियांच्या सोयी आणि आवडीनुसार या दागिन्यांना मॉडर्न टच देऊन बाजारात उपलब्ध केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे तुम्ही जर पाडव्याला पेशवाई नऊवारी नेसून तसा लूक करणार असाल तर त्यावर वजट्रीक, कोल्हापुरी साज, नथ आणि खोपा, शाही हार, दुर्वा हार यांची तुमच्या आवडीनुसार सांगड घालून पारंपरिक लुक साधू शकता. शिवाय हे दागिने तुम्हाला एक ग्रॅम सोन्यातही बाजारात उपलब्ध आहेत. आणि जर का तुम्ही पैठणी, खण, इरकल अशा साडय़ा नेसणार असाल तर त्यावर मोत्याच्या दागिन्यांच्या साज करून तुमच्या श्रृंगारात अधिक भर घालू शकता. मग यात तुम्ही गळय़ालगत चिंचपेटी किंवा नेकलेसप्रमाणे चिंचपेटी, तन्मणी घालून हातात मोत्याचे पारंपरिक तोडे किंवा रामराज तोडे यांचीही जोड देऊ शकता.

एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांना अधिक पसंती
गेल्या काही वर्षांत इमिटेशन वा एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांकडे स्त्रियांचा कल वाढला असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक दागिना सोन्यात घडवून घेता येणं शक्य नाही. अशा वेळी इमिटेशन ज्वेलरी हौस भागवण्यासाठी महत्त्वाची ठरते. एक ग्रॅम सोन्यात खऱ्या सोन्याच्या दागिन्यांची हुबेहूब नक्कल घडवणाऱ्या ‘परी’ या ब्रॅण्डच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खास गुढीपाडव्यासाठी सोन्याच्या दागिन्यांचा लुक देणाऱ्या एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांमध्ये राणी हार, पट्टी हार यांना अधिक पसंती मिळते. याशिवाय मोत्यांचे दागिने म्हणजे स्त्रियांचे अधिक आवडते दागिने असेच म्हणावे लागेल. मोत्यांमध्ये गुट्टा पुसालू हा आंध्रप्रदेशमधील नेकलेस चा प्रकार बाजारात लोकप्रिय झाला आहे. याशिवाय गुजराती महिला प्रामुख्याने परिधान करत असलेल्या चंदन हारालाही महाराष्ट्रीय महिलांची पसंती मिळते आहे. त्याचबरोबर कान, कमरपट्टा, बाजूबंद हे दागिनेदेखील एक ग्रॅम सोन्यात घडवले जातात. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांऐवजी या दागिन्यांनाही महिला गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्राधान्य देऊ शकतात.

तरुणींसाठी टु-इन-वन दागिने
अलीकडच्या काळात तरुणी पारंपरिक दागिने घालतात, पण त्यातही त्यांना टु-इन-वन पद्धतीने तो उपयोगात आणण्याची सोय हवी असते. म्हणजे काय तर चिंचपेटी असेल तर अनेकींना चिंचपेटी हे नाव माहिती नसतं. मग त्यांना ते चोकरसदृश भासत असल्याने त्यांचाही उल्लेख चोकर असाच केला जातो. मग हे चोकर त्यांना मोठय़ा हाराच्या स्वरूपात आणि गळय़ालगतदेखील हवे असतात. तर त्यांच्या आवडीनुसार अशा पद्धतीचे कस्टमाईज दागिनेदेखील बाजारात उपलब्ध असल्याची माहिती ऋतुजा यांनी दिली. तसेच, बाजूबंद घालण्याची आवडही पुन्हा निर्माण झाली आहे. त्यामुळे हाच बाजूबंद कधीतरी गळय़ात चोकर म्हणून घालायचा असेल तर त्या पद्धतीने तो तयार केला जात असल्याचेही ऋतुजा यांनी सांगितले. त्यामुळे एकीकडे पारंपरिक दागिन्यांचाही हट्ट आहे. आणि हेच दागिने थोडय़ा नव्या स्वरूपात वापरता येण्याची सोय उपलब्ध झाली तर ते अधिक फॅशनेबल पद्धतीने बिनधास्त वेगवेगळय़ा पेहरावांवर पेअर केले जातात. गुढीपाडव्याच्या निमित्ताने थोडी बाजारपेठेत चक्कर मारली तर नव्या-जुन्याचा संगम असलेल्या पण पारंपरिक बाज कायम जपणाऱ्या दागिन्यांचे कलेक्शनच तुम्हाला पाहायला मिळेल. हे अनोखे दागिने आणि तुमचा पारंपरिक वा इंडो फ्युजन प्रकारातील पोशाख अशी सांगड घालत एक वेगळया लुकमध्ये नव्या वर्षांचं जय्यत स्वागत करण्याची ही संधी दवडता कामा नये!


(कांक्षिणी ट्रॅडिशनल ज्वेलर्स)

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 03:27 IST
Next Story
फुडी आत्मा: खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी!
Exit mobile version