‘अंदर की बात’ हा ‘स्पॉटिफाय’ या अॅपवर प्रसारित होणारा एक विनोदी कार्यक्रम आहे. या पॉडकास्टमध्ये स्टॅण्ड अप कॉमेडियन अमित टंडन सत्य स्थिती वा घटना विनोदी पद्धतीने खुलवत रंगवून सांगतो. श्रोत्यांचे मनोरंजन हा त्याच्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तो त्याच्या विनोदी कथनशैलीने सहजसाध्य करतो. अमित टंडनने त्याच्या या पॉडकास्टच्या १० व्या भागात लग्नात घडणाऱ्या गमतीजमती सांगण्यासाठी वेडिंग प्लॅनर कशिश हिला कार्यक्रमात बोलावून घेतले होते. कशिशशी गप्पा मारत तिला आलेले अनुभव श्रोत्यांना ऐकवले. या भागात अमित टंडनसोबत गप्पा मारताना कशिशने २०२१ मध्ये घडलेली घटना सांगितली.
वर ऐकवलेलं वाक्य हे थोडंसं गमतीशीर आहे. ते वाक्य लक्षात राहण्याचं कारणही कशिशने सांगितलेल्या या गमतीशीर घटनेतच आहे. ती म्हणते, मी लग्नात अनेक विचित्र प्रकार बघितले आहेत. अनेक जोडप्यांना त्यांचं लग्न युनिक प्रकारे व्हावं असं वाटत असतं, इतरांपेक्षा वेगळय़ा पद्धतीने लग्न करण्याची त्यांना आवड असते; पण २०२१ मध्ये कोविडकाळात एका जोडप्याने त्यांचं लग्न एअरप्लेनमध्ये केलं. कोविडमध्ये लग्न समारंभाला ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी होती; पण त्या जोडप्याला त्यांचं संपूर्ण कुटुंब या लग्नात हजर राहावं असं वाटत होतं. म्हणून त्यांनी वेडिंग प्लॅनरच्या साहाय्याने एअरप्लेनमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. अगदी लग्नात काही मानपमान झाले आणि नातेवाईकांना राग जरी आला तरी ते लग्नातून निघून जाऊ शकणार नाहीत, अशी त्यांची त्यामागची भन्नाट कल्पना होती.
मी व्यवसायाने एक फोटोग्राफर आहे. मी वेगवेगळय़ा इव्हेंटसाठी फोटोग्राफी करतो. या सगळय़ात जास्त गमतीदार आणि तेवढाच तापदायक इव्हेंट असतो तो म्हणजे लग्न. लग्नात नातेवाईकांपासून ते नवरा-नवरीपर्यंत सगळय़ांची मनं राखत आम्हाला काम करावं लागतं. मी नुकताच असाच एका लग्नाचा कार्यक्रम संपवून आलो होतो. तेव्हाच मी हा पॉडकास्ट ऐकला आणि मनापासून हसलो. नुकताच लग्नसोहळा अनुभवला असल्याने तो पॉडकास्ट अगदी रिलेट झाला. प्रत्येक क्षेत्रातील अनेक किस्से या पॉडकास्टमध्ये अमित टंडन सांगत असतो. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या कामातून वेळ काढून असे मनोरंजनात्मक पॉडकास्ट नक्की ऐकावेत.- संजय हांडे (फोटोग्राफर)
शब्दांकन: श्रुती कदम