अराऊंड द फॅशन : स्ट्रीट फॅशन

सौंदर्य आणि नावीन्य याच्याबरोबर विरुद्ध दिशेने वाटचाल करणारी फॅशनम्हणजे ‘स्ट्रीट फॅशन’.

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री हसबनीस

फॅशन जितकी अजमावून आपण पाहू तितकेच त्यातील प्रकार हे प्रत्यक्ष वापरात येतात. विविध संकल्पना विकसित होत जातात. मानवी स्वभावात नुसतेच काळे-पांढरे असे काही नसते. तर एक ग्रे शेडही असते, तशीच ती फॅशनच्या बाबतीतही आहे.कोणाला ती कळते, तर कोणाला कळतच नाही. सौंदर्य आणि नावीन्य याच्याबरोबर विरुद्ध दिशेने वाटचाल करणारी फॅशनम्हणजे ‘स्ट्रीट फॅशन’.

शहरी जीवनात कृत्रिम सौंदर्याला म्हणजे उंच इमारती, क्लब्ज, मॉल्स, हॉटेल्स यांना जितकं महत्त्व असतं तितकंच ते अंगावरील फॅशनेबल कपडय़ांनादेखील असतं. मागच्या लेखात आपण ज्या स्ट्रीट शॉपिंग आणि त्याच्याशी जुळणाऱ्या आपल्या जीवनशैलीचा एक पदर जाणून घेतला तसंच आता स्ट्रीट फॅशननामक रुजलेल्या फॅशनवर्तुळातील एका वेगळ्या संकल्पनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ग्लोबल महागाई आणि ग्लोबल खरेदी आज समांतररीत्या वाढत जाते आहे. जसे कपडे खरेदीला उधाण येतं तसेच त्यावरील किमतीही वाढत जातात. ज्या पद्धतीने लोक विविध स्टाइल्सच्या कपडय़ांना आपलंसं करत आहेत त्याचबरोबर आजच्या काळात फॅशनच्या कक्षा किती रुंदावत जात आहेत याचा प्रत्यय येतो. त्यातून स्ट्रीट फॅशनचं वर्चस्व अधिकाधिक वाढत जाते. स्ट्रीट फॅशन ही सर्वात जास्त महागडी फॅशन, असा काहीसा समज आहे. कारण स्ट्रीट फॅशनचं रूप पाहिलं की जगद्विख्यात ब्रॅण्ड्सची हजेरी तिथं दिसते. जनसामान्यांपासून ते मोठय़ा चेहऱ्यापर्यंत या फॅशनचा अवलंब अनेक जण करतात. थोडक्यात, ग्लॅमरस दिसणं आणि अतिशय फॅशनबेल राहणं या दोन गोष्टी स्ट्रीट फॅशनशी जोडल्या गेलेल्या आहेत.

शहरी भागात वावरणाऱ्या आपल्या दैनंदिन आयुष्याला फॅशनशी जोडण्याचा प्रयत्न म्हणजे स्ट्रीट फॅशन. स्ट्रीट फॅशन म्हणजे त्या त्या काळानुसार प्रचलित असंस्ट्रीट वेअर वापरणं असं म्हणता येईल. स्ट्रीट वेअरमध्ये हिप हॉप लुक, स्निकर्स, जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्सवेअर, जिमवेअर, इअरफोन्स, सनग्लासेस, बूट, मोजे या गोष्टींचा समावेश आहे. इन्टाग्रामवर तर स्ट्रीट फॅशनचा चांगलाच बोलबाला आहे. स्ट्रीट फॅशनची सुरुवात ही पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळेच झाली. १९९० पासून स्ट्रीट फॅशनग्लोबल झाली आणि आता मात्र ती जगभरात लोकप्रिय आहे. खेळसंस्कृतीचा या फॅशनवर बराच पगडा आहे. प्रामुख्याने अ‍ॅक्शन स्पोर्ट्स, उदाहरणार्थ, सर्फ-बोर्डिग, स्केटबोर्डिग इत्यादी. खेळाच्या माध्यमातून समोर आलेल्या स्ट्रीट फॅशनला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं ते यूथ सबकल्चरमुळेच.. स्ट्रीट फॅशनमध्ये कुठल्याही अ‍ॅस्थेटिक्स किंवा क्रिएटिव्हिटीचा आग्रह नसतो. ही फॅशन जास्तकरून आपल्या आवडीनिवडीवर अवलंबून असते. किंवा आपल्या स्वभावाचं प्रतिबिंब या फॅशनच्या निवडीवर उमटतं. आपल्या रोजच्या जगण्यातल्या आपल्या वागणुकीचा आणि इच्छेचा आपल्या कपडय़ांवर उमटलेला बदल इथं सहज दिसून येतो. त्यामुळे स्ट्रीट फॅशनही व्यक्तिगणिक बदलत जाते. आपण त्याला इन्डिव्हिज्युअल फॅशनअसंही म्हणून शकतो. तरुणांमधील स्वतंत्र विचार, आवड, राहणीमान, स्वभाव, वर्तन या सगळ्याला यूथ सबकल्चर असं म्हणतात. ज्यातून विविध व्यक्तिमत्त्वांच्या जोडीने या फॅशनला एक वेगळा चेहरा प्राप्त होतो. हिप्पी, हिप्सटर, प्रेपी आणि अर्बन अशा काही यूथ सबकल्चर स्टाइल्स विकसित होण्याचा काळ आणि स्ट्रीट फॅशनरुजण्याचा काळ हा एकच. कारण १९५० पासून ज्या प्रकारे यूथ सबकल्चर स्टाइल्स लोकांना आपल्याशा वाटू लागल्या त्यानंतर बऱ्याच काळाने यूथ सबकल्चर स्टाइल्स यांचं स्ट्रीट फॅशनमध्ये परावर्तन झालं. या सर्वातही सगळ्यात लोकप्रिय ठरली पंक (स्र्४ल्ल‘) फॅशन. याचा अवतार हा कुठल्याही कलेच्या चौकटीत बसत नाही. यात बदलही फारसा होत नाही. आपलं व्यक्तिमत्त्व कसं दिसतं? किंवा आपण कसे दिसतो, याचा विचार यात होत नाही. जितकं  तुम्ही विक्षिप्त दिसता तितकीच तुमची पसंती सामान्यांपर्यंत पोहोचते. १९८० मध्ये या फॅशनचा खूप प्रभाव होता, पण सध्या स्ट्रीट फॅशनया नावाने ही फॅशनआता पूर्वीसारखी ओळखली जात नाही. फक्त रॉक बॅण्ड, पॉप, ग्लॅमरस दिसण्यासाठी यांचा बऱ्यापैकी उपयोग होतो.

स्ट्रीट फॅशनची स्वत:ची अशी वेगळी ओळख नाही. सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने ती खुलवली. याचं सर्वात उत्तम उदाहरण देता येईल ते जॅपनीज स्ट्रीट फॅशन. या फॅशनची मात्र एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली. या फॅशनची ओळख ही फक्त स्थानिक स्ट्रीट फॅशनअशी नसून त्याची ओळख जगभरात आहे, कारण या फॅशनचं अनुकरण मोठय़ा प्रमाणावर आंतरराष्ट्रीय रॅम्पवर केलं जातं. यंदा ‘मिलान फॅशन वीक’मध्येदेखील या फॅशनची झलक दिसली. मुळात आंतरराष्ट्रीय रॅम्पवर जितकी लाऊ ड फॅशन,जितके गडद रंग आणता येतील तितका सध्या या स्ट्रीट फॅशनला क्रिएटिव्ह कलेक्शन करण्यासाठी वाव निर्माण झाला आहे. फॅशनमधील रंगसंगती, ओबडधोबड नक्षी, फं की लुक, हेवी मेकअप, केशरचना या स्ट्रीट फॅशनमधील एरवी आपण ज्या गोष्टींना विचित्र म्हणतो त्यातील सौंदर्याला पसंती मिळू लागली आहे. किंबहुना यातून अनोखी आणि नावीन्यपूर्ण स्टाइल स्टेटमेंट तयार होऊ  शकतं. पूर्वी स्ट्रीट फॅशन ही कल्पनाच मुळात रुजत होती तेव्हा वैयक्तिक स्टाइल स्टेटमेंटचा पगडा होता. त्यामुळे जसजशी ही फॅशन पुढे पुढे विकसित होत गेली तशी ही फॅशननेमकी कशी असेल, याची कल्पनाच येईनाशी झाली. त्या बाबतीत बराच गोंधळ उडालेला दिसत होता. पण सध्या विविध फॅशनवीकमधून बाहेर येणाऱ्या कलेक्शनकडे पाहता एके काळी विचित्र म्हणून दुर्लक्षिली गेलेली ही फॅशन सध्या हटके स्टाइल स्टेटमेंट म्हणून अधिक लोकप्रियता मिळवते आहे, असं एक निरीक्षण आहे.

सीझनल वेअर हेसुद्धा स्ट्रीट फॅशनमध्ये मोडतात. पण त्यातही इतका गोंधळ होता की सीझनल स्टाइल स्टेटमेंट कशी करावी हे कळत नसे. जगातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांत आपण गेलो तर प्रत्येक ठिकाणी स्टाइल स्टेटमेंट ही वेगळी आहे. डिझाईन्स वेगळ्या आहेत. त्यामागची फिलोसॉफी वेगळी आहे. लुक फॅक्टर सतत बदलणारा आहे. त्यामुळे आज जागतिक स्तरावर स्ट्रीट फॅशनमध्येएकसुरीपणा अजिबात उरलेला नाही. १९५० सालची स्ट्रीट फॅशनपाहिली तर त्या कृष्णधवल काळात कपडय़ांचे रंग दिसत नसले तरी तेव्हाची स्टाइल स्टेटमेंट इतकी साधी असायची की आपण कोणीही ती ग्रेसफुली कॅरी करू शकत होतो. साठच्या दशकात मात्र स्टॉकिंग्ज, हाय हिल्स, बूट्स आले. तेही विविध रंगांच्या छटांचे आणि पॅटर्नचे. एका गोष्टीची सवय जाऊ न दुसऱ्या सवयीला आपण आयुष्यात स्थान देतो त्याचप्रमाणे ओपन लेग्ज ठेवण्याची सवय सोडून त्यावर स्टॉकिंग्ज, लेगिंग्स, सॉक्स घालण्याची सवय लागली. यातील प्रेरणा कितीही बालिश असो, पण अशी स्टाइल स्टेटमेंट ठेवण्याची आयडिया ही कामी आली. पुढच्या काळात म्हणजे १९७० च्या दशकात बेलबॉटम आपली लोकप्रियता वाढवत होती आणि त्यासोबत बेल्ट घालण्याचा नवा फंडा रुजला. हा बदल अपेक्षित नव्हता, कारण बेलबॉटमची इतकी छान स्टाइल असताना त्यावर बेल्ट घालून स्टाइल अगदीच फॉर्मल झाली होती. १९८० साली डेनिमने धुमाकूळ घातला. स्ट्रीट फॅशनमध्ये बोहेमियन, ड्रेनपाइप, बॉन्डेज, बटण-अप शर्ट्स, जड कोट्स अशा स्टाइल स्टेटमेंट तयार व्हायला लागल्या. डेनिमचा वापर खरं तर खूप चपखल होत होता. अर्थात प्रयोग करत राहणं हे स्ट्रीट फॅशनमध्ये जमून गेलं असतं, पण नव्वदच्या दशकात वैयक्तिक स्टाइल स्टेटमेंटचा पूरच आला. तरुणाईच्या जीवनशैलीवरील आधारित चित्रपटांतूनदेखील याचा प्रत्यय आला.

स्ट्रीट फॅशनमध्ये सध्या प्रयोग करण्याची हिंमत दाखवली जात असली तरी सामान्य माणसाला अजूनही आजूबाजूला वावरण्यासाठी साधेपणाची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन आधुनिक काळात (सस्टेनेबलच्या आग्रही काळात) ब्रॅण्ड्सची अतिशयोक्ती डिझाईन्स सोडून हलक्याफुलक्या पण क्रिएटिव्हली तयार केलेल्या आधुनिक स्टाइलच्या स्ट्रीट फॅशनला हमखास जोरदार मागणी असेल!

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Street fashion global shopping abn