|| सौरभ करंदीकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन लेखांमधून आपण मानवी मेंदूची संरचना, त्याची क्षमता या विषयांवर माहिती मिळवली. मानवी जनुकाप्रमाणेच मानवी मेंदूच्या प्रत्येक सूक्ष्म भागाचा, त्याच्या कार्याचा आणि त्यातील उलाढालींचा नकाशा का तयार करू नये? असा नकाशा तयार झाला की मेंदूच्या प्रक्रियेबद्दल, त्याची क्षमता वाढवण्याबद्दल आणि अल्झायमर्स, डिप्रेशन, ऑटिझम, स्किझोफ्रेनिया इत्यादी व्याधींवरील उपाययोजनांबद्दल संशोधन करणे सोपे होईल.

प्रसिद्ध दर्यावर्दी क्रिस्तोफर कोलंबसकडे ‘गूगल मॅप्स’, किंवा ‘गूगल अर्थ’ असतं, तर त्याने आपल्या सफरी वेगळ्या रीतीने आखल्या असत्या. भारतात पोहोचण्यासाठी स्पेनच्या पश्चिमेला कूच करून पृथ्वी प्रदक्षिणा वगैरे करण्याच्या फंदात तो पडला नसता. एखाद्या स्थळाकडे जाण्याचा मार्ग ओळखीचा असला तर प्रवास चटकन करता येतो. अनोळखी वाटा शोधायला मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती आणि साहसाची गरज भासते. जगातील प्रत्येक नकाशामागे साहजिकच कठोर तपश्चर्या आणि अथक परिश्रमांचा इतिहास असतो.

इसवी सन पूर्व २५ हजार वर्षांपूर्वीपासून भूभागाचा नकाशा बनवण्याचं काम मनुष्य करू लागल्याचे दाखले आहेत. जगाचा परिपूर्ण नकाशा अस्तित्वात यायला सोळावं शतक उजाडावं लागलं. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा वेग जसा वाढला तसा माहितीच्या विविध प्रकारच्या आलेखांची रचना करणं सोपं, गतिमान होऊ लागलं. मनुष्याला आपल्या भोवतालच्या जगाबद्दल, पृथ्वीबद्दल, सागरतळाबद्दल, अंतराळाबद्दल जितकं कुतूहल वाटतं त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक कुतूहल त्याला स्वत:च्या शरीराच्या रचनेबद्दल वाटतं. शारीरिक रचनेबद्दल, आरोग्याबद्दल, आयुर्मर्यादेबद्दल जाणून घेणं हे अर्थातच सर्वात महत्त्वाचं. आपल्या शरीराचा अंतर्बाह्य नकाशा इसवी सन पूर्व १६०० वर्षांपासून तयार केला जाऊ लागला. आज वैद्यकशास्त्राची नजर मानवी शरीराच्या अणूरेणूंपर्यंत पोहोचलेली आहे.

मागील लेखात म्हटल्याप्रमाणे मानवाच्या जडणघडणीला जबाबदार असलेल्या मानवी जनुकाची नोंद करण्याचा उपक्रम (ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट) १९९० साली हाती घेण्यात आला. एका पिढीचे गुणदोष पुढच्या पिढीकडे नेण्याचं काम आपल्या शरीरातील जीन्स करतात. त्या जीन्समधील प्रथिनांच्या रचनेवर (डीएनए) पुढील पिढ्यांचे शारीरिक गुणधर्म ठरतात. ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट २००३ साली पूर्ण झाल्याचं घोषित केलं गेलं, परंतु मानवाच्या जनुकांचा संपूर्ण आराखडा (कम्प्लिट जीनोम) हाती आला तो २०२१च्या मे महिन्यात .

हा नकाशा तयार करायचा खटाटोप कशासाठी? मानवी जनुकातील प्रथिनांची कुठली साखळी, कुठला भाग शरीरातील कुठले गुणदोष ठरवतो, हे जर समजलं तर वैद्यकशास्त्राला आनुवंशिक आजारांपासून मुक्तता देणारी औषधं तयार करता येतील. एखाद्या व्यक्तीला कुठल्या व्याधी कोणत्या वयात जडतील याची पूर्वकल्पना त्याच्या जनुकाच्या अभ्यासाने येऊ शकेल. आणि त्यावर वेळीच उपाय करून मानवाचं आरोग्य राखण्यास आणि वयोमर्यादा वाढवण्यास मदत होईल. या आणि अशा अनेक शक्यतांवर आज संशोधन सुरु आहे.

गेल्या दोन लेखांमधून आपण मानवी मेंदूची संरचना, त्याची क्षमता या विषयांवर माहिती मिळवली. मानवी जनुकाप्रमाणेच मानवी मेंदूच्या प्रत्येक सूक्ष्म भागाचा, त्याच्या कार्याचा आणि त्यातील उलाढालींचा नकाशा का तयार करू नये? असा नकाशा तयार झाला की मेंदूच्या प्रक्रियेबद्दल, त्याची क्षमता वाढवण्याबद्दल आणि अल्झायमर्स, डिप्रेशन, ऑटिझम, स्किझोफ्रेनिया इत्यादी व्याधींवरील उपाययोजनांबद्दल संशोधन करणे सोपे होईल. अशी महत्त्वाकांक्षा अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील मज्जासंस्थेचे संशोधक राफाएल युस्टे आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील आनुवंशिकता संशोधक जॉर्ज चर्च यांनी २०१३ साली व्यक्त केली. ‘ब्रेन अ‍ॅक्टिव्हिटी मॅप प्रोजेक्ट’च्या अंतर्गत सूक्ष्म पदार्थविज्ञान (नॅनो टेक्नॉलॉजी) आणि मानसशास्त्र या शाखेतील संशोधकांनी एकत्र काम करायचं ठरवलं. त्याकाळी एका वेळेस उपकरणांच्या साहाय्याने जिवंत मेंदूतील काही शेकडा पेशींचं (न्यूरॉन्स) अवलोकन करता येत असे. ‘एकाच वेळेस ८,६०० कोटी न्यूरॉन्सचं निरीक्षण करता येईल अशी प्रणाली आम्ही तयार करणार आहोत,’ असं उद्दिष्ट या प्रोजेक्टच्या जाहीरनाम्यात ठेवलं गेलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘जीनोम प्रोजेक्ट नंतरचं अमेरिकेचं पुढचं महान पाऊल’ या शब्दात या उपक्रमाला आपला पाठिंबा दर्शवला.

त्याआधी स्वित्झर्लंड मधील ‘इकोल पॉलिटेक्निक फेडरल द लुसर्न’ येथील मानसशास्त्रज्ञ हेनरी माक्र्रम यांनी २००९ साली संगणकाच्या साहाय्याने मेंदूचं त्रिमितीय चित्र तयार करायचं काम हाती घेतलं. २००९च्या ‘टेड’ व्याख्यानमालेत ‘हे त्रिमितीय चित्र पूर्ण झालं की त्याच्या मदतीने मेंदूतील प्रत्येक पेशी (न्यूरॉन) कसं काम करते? कुठल्या विचारांनी कुठल्या न्यूरॉन्सची साखळी विद्युत संदेशांनी उद्दिपित होते याची नोंद करता येईल,’ असं माक्र्रम म्हणाले. या कामासाठी आपल्याला दहा वर्षं लागू शकतील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला. युरोपियन युनियनने या उपक्रमासाठी १३० कोटी युरोची मदत जाहीर केली. या दोन उपक्रमांनी प्रेरित होऊन जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, दक्षिण कोरिया आणि इस्रायल यांनीदेखील मेंदूचा ठावठिकाणा घेण्याचे प्रयत्न सुरू केले. 

आज आपण एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात पदार्पण केलेलं आहे. युरोपियन आणि अमेरिकन प्रयत्नांचा गेल्या दशकातला प्रवास खडतर ठरला आहे. दोन्ही उपक्रमांच्या सुरुवातीपासूनच शास्त्रीय जगतात निंदकाची घरं निर्माण झाली. मेंदूच्या रचनेबद्दलचे, कार्याबद्दलचे आणि एकंदरच या संशोधनाबद्दलचे मतभेद समोर येऊ लागले. मेंदूवर चाललेल्या इतर संशोधनांना मिळणारा निधी हे उपक्रम खेचून घेत आहेत असे आरोप होऊ लागले. २०१५ साली माक्र्र मची हकालपट्टी झाली. नवीन प्रमुखांनी या संशोधनाच्या लक्ष्याबद्दलच शंका घेतली. मेंदूचा नकाशा तयार झाला की करायचं काय? कुठच्या पद्धतीने त्या माहितीकडे पाहायचे? इत्यादी मूलभूत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. युरोपियन उपक्रमाचा कालावधी २०२३ साली संपेल. अमेरिकन उपक्रमाकडे २०२६ पर्यंतचा निधी उपलब्ध आहे. पुढच्या काही वर्षांत या संशोधनाने काही साध्य केले तरच त्यामध्ये अधिक निधी ओतला जाईल आणि शास्त्रीय जगताचे स्वारस्य टिकेल.

परंतु विज्ञानाची प्रगती अशा वेळापत्रकाप्रमाणे होत नसते. मानवाला आपल्या मेंदूबद्दल सर्वज्ञान कधी प्राप्त होईल ते सांगणं कठीण आहे. राफाएल युस्टे आणि जॉर्ज चर्च यांनी ‘तंत्रज्ञानातील प्रगती आणि नवीन उपकरणं यांच्या साहाय्याने उपक्रमाचा वेग वाढला आहे, परंतु आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बरंच काम अजूनही बाकी आहे,’ अशी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. मानवी मेंदू ‘अथांग सागर’ आहे आणि आता कुठे संशोधनाची सफर सुरु झाली आहे, असंच म्हणावं लागेल.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Structure of the human brain capability information on these topics akp
First published on: 15-10-2021 at 00:00 IST