कुsssलsss फ्रेण्ड…

एक चिमुरडी.. सतरा वेळा आरशात पाहत्येय.. तिचा चेहरा खट्ट होतोय.. तेवढय़ात तिचा चिमखडा भाऊ येऊन म्हणतो, ‘अरे, बुद्धू.. अब तू हो गयी मेरे जैसी..’ हे म्हणताना तो तोंड उघडतो.. ती बघत राहते नि दोघांची ‘दातपडकी हालत’ पाहून आपल्या चेहऱ्यावर हसू उमटतं..

एक चिमुरडी.. सतरा वेळा आरशात पाहत्येय.. तिचा चेहरा खट्ट होतोय.. तेवढय़ात तिचा चिमखडा भाऊ येऊन म्हणतो, ‘अरे, बुद्धू.. अब तू हो गयी मेरे जैसी..’ हे म्हणताना तो तोंड उघडतो.. ती बघत राहते नि दोघांची ‘दातपडकी हालत’ पाहून आपल्या चेहऱ्यावर हसू उमटतं.. तिकडं त्या चिमुरडीचा खट्टपणा कुठल्या कुठं पळून जातो, कारण आई-बाबा ‘हर छोटी खुशी का बडा साथी’ आणतात.. मोठय़ा आनंदानं मिटक्या मारत ही साथ स्वीकारली जाते.. फ्रेण्ड्स, सही जबाब!
ये साथी है.. ‘आइस्क्रीम’..
मे महिना संपत आल्यावर या आइस्क्रीमच्या गोष्टी कशाला.. असं आठय़ांचं जाळं काही चेहऱ्यावर पसरलेलं दिसतंय मला. पण मे महिना संपत आला असला तरी अजून वैशाख वणव्याच्या झळा भाजून काढताहेत. नुसतं हाश्यऽऽऽहुश्ऽऽऽ होतंय. मग या परिस्थितीत आइस्क्रीमसारखा साथी सोबत हवाच. आता ‘फ्रेण्ड’ म्हटल्यावर आपल्या पद्धतीनुसार त्याचं ‘प्रोफाईल’ बघायला हवं.. तरच ‘रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट’ करता येईल..
आइस्क्रीम एके काळी केवळ राजेमहाराजांपुरतं मर्यादित आणि भारी खíचक होतं. ते साधारण एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं. आइस्क्रीम हा दूध किंवा क्रीमपासून तयार केलेला फ्रोझन डेझर्टचा प्रकार आहे. त्यात स्वादासाठी फळांचा रस आणि इतर घटकद्रव्यं वापरली जातात. साखर किंवा स्वीटनरचा वापर करतात. आइस्क्रीम बनवताना त्यातील हवेचं प्रमाण वाढवता आल्यानं चांगल्या गुणवत्तेचं आइस्क्रीम तयार होऊ लागलं. जगभरातल्या आइस्क्रीम प्रेमाची साक्ष ‘आइस्क्रीम’ शब्द टाइप करून तो सर्चला टाकला की पुढय़ात आलेल्या ढीगभर साइट्स देतात.
आपापल्या आजी-आजोबांच्या लहानपणच्या आइस्क्रीम पार्टीची गम्मत अनेकांनी ऐकली असेल. नसेल त्यांच्यासाठी सांगते की, त्या काळात आजच्यासारखी आइस्क्रीम आऊटलेट्स नव्हती. घरीच केलं जायचं आइस्क्रीम. उन्हाळ्याच्या सुट्टीत आइस्क्रीम करण्याचा जंगी कार्यक्रमच असे. त्यासाठी आइस्क्रीम पॉटची शोधाशोध करणं, आइस्क्रीमसाठी म्हणून जास्तीचं दूध घेणं, खडे मीठ आणणं, बर्फाची मोठ्ठी लादी आणणं वगरे कामं मुलं करायची. कारण पोटभर आइस्क्रीम चापायचं आमिष असे. मग आइस्क्रीम पॉटमध्ये दूध भरायचं. झाकण घट्ट लावून त्याच्या सर्व बाजूंनी बर्फाचे मोठ्ठे तुकडे खच्चून भरून त्यावर खडेमीठ थापायचं. मग प्रत्येकानं पॉटला जोडलेले हॅन्डल फिरवायचं. आता आइस्क्रीम झालं असेल का, अशी उत्सुकता वाटे. हॅन्डल फिरविणं अशक्य झाल्यावर आइस्क्रीम तय्यार.. असा क्लू मिळे.. आणि एकदाचं ते मलईदार आइस्क्रीम पुढय़ातल्या डिशमध्ये अवतरायचं. त्यावर ताव मारल्यावर वाट पाहिली जायची ती पुढच्या उन्हाळी मोसमाची.. पुढं आइस्क्रीमची दुकानं आणि आता आइस्क्रीम आऊटलेट्स निघाल्यावर हे पॉटचं आइस्क्रीम मोठय़ांच्या आठवणींपुरतंच उरलंय.
सध्याच्या चकाचक आइस्क्रीम आऊटलेट्समध्ये ‘क्वालिटी’, ‘अमूल’, ‘नॅचरल्स’,  ‘पेस्तनजी’, ‘दिनशॉज’, ‘बस्किन्स अ‍ॅण्ड रॉबिन्स’, ‘जिलेटो’ असे मोठे ब्रॅण्ड्स आणि लोकल ब्रॅण्ड्स आइस्क्रीमप्रेमींसाठी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. व्हॅनिला, चॉकलेट, बटरस्कॉच, मँगो, चिकू, टेंडर कोकोनट, वॉटरमेलन, पपया-पायनॅपल, रोस्टेड अल्मंड, कॉफी वॉलनट, अंजीर, स्ट्रॉबेरी, काजू-पिस्ता, कसाटा, लिची, द्राक्षं, फणस आदी चिक्कार आइस्क्रीम फ्लेव्हर्स आहेत. त्यातही ‘अमूल’ आणि ‘नॅचरल्स’चे फॅमिली पॅक नि ‘क्वालिटी’चे कप्स-कोन घेणारे आइस्क्रीमप्रेमी अधिक आहेत. सर्वाधिक पसंती व्हॅनिला फ्लेव्हरला दिली जाते. त्यापाठोपाठ चॉकलेट, टेंडर कोकोनट, मँगो फ्लेव्हर्स आवडीनं घेतले जातात. शिवाय मधापासून मिरचीपर्यंत आणि जांभळापासून खरबुजापर्यंत अनेक फ्लेव्हर्स येताहेत. त्यानुसार त्यांची टॉपिंग्जही बदलताहेत. चॉकलेट टॉिपग अधिकांशी लोकांना आवडतं. आइस्क्रीम बारा महिने नि चोवीस तासांत केव्हाही, कधीही नि कुठंही खाल्लं जातंय.. तरीही उन्हाळ्यातला थंडगार दिलासा म्हणजे आइस्क्रीम.. पुढय़ात आलेलं आइस्क्रीम नाकारण्याआधी मनापासून चिक्कार वेळा होकार दिलेला असतो.. पण खरे खवय्ये एवढाही वेळ दवडत नाहीत.. हेही खरंच.. से, फ्रेण्ड्स.. हे होतं आपल्या ‘कुऽऽऽलऽऽऽ फ्रेण्ड’चं प्रोफाईल. मी त्याची रिक्वेस्ट केव्हाच अ‍ॅक्सेप्ट केलेय.. आता नकार की होकार.. ते तुमच्याच हातात आहे.

आइस्क्रीमचं टॉपिंग

–    आइस्क्रीम खाणं एन्जॉय करण्यासाठी जगभरात अनेक ठिकाणी अनेक कालखंडात आइस्क्रीम तयार करण्याच्या अनेक पद्धती शोधण्यात आल्या.
–    अभ्यासकांच्या मते आइस्क्रीमचं मूळ इ.पू. ३७ ते ६८ या सालामध्ये आहे.
रोमनसम्राट निरोनं हिमाच्छादित शिखरांवरील बर्फ आणून त्यात फळांचे तुकडे टाकून त्याचं आइस्क्रीम बनवलं.
–    चीनमधील शांग राज्याचा अधिपती तांगनं ६१८च्या सुमारास दूध आणि फळांचा रस घालून आइस्क्रीम तयार करण्याची पद्धत शोधली.
–    जुल हा आइस्क्रीम महिना म्हणून साजरा केला जातो.
–    जुल महिन्याचा तिसरा रविवार असतो नॅशनल आइस्क्रीम डे.
–    हवा ही आइस्क्रीमचा आधार आहे. हवा नसल्यास आइस्क्रीम सॉफ्ट राहणार नाही.
–    इटली आणि फ्रेंच राजदरबारात आकर्षक काचेच्या ग्लासमधून आइस्क्रीमचा आस्वाद घेण्यासाठी पार्टी करत.
–    जेवणानंतर आइस्क्रीम ‘मस्टच’ची सुरुवात झाली ती अमेरिकेत.
–    एका आइस्क्रीम विक्रत्याने १८९६ मध्ये आइस्क्रीम कोनचा शोध लावला.
–    भारतात पावणेदोनशे फ्लेव्हर्सचं आणि जगभरात चारशेहून जास्त फ्लेव्हर्सचं आइस्क्रीम मिळतं.
–    सर्वाधिक आवडता फ्लेव्हर आहे व्हॅनिला.
–    चॉकलेट, बटर, स्ट्रॉबेरी, चॉकलेट चिप्स हे फ्लेव्हर्सही अनेकांना आवडतात.
–    टॉपिंगसाठी सर्वाधिक पसंती चॉकलेट सिरपला दिली जाते.
–    दोनशे ग्रॅम आइस्क्रीममध्ये साधारणपणे ३५० कॅलरीज आणि सात ग्रॅम फॅट्स असतात.
–    आइस्क्रीम खाल्ल्यानंतर अनेकांना फ्रेश वाटतं.

फोटो : आशिष सोमपुरा / मॉडेल : वैभवी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Summer and ice cream