उन्हाळा तर ऑलरेडी ऑफिशियली सुरूच झाला आहे, मात्र यावेळी फक्त उकाडा नाही, अगदी ट्रॉपिकल वातावरण आजूबाजूला आहे. दिवसभर सूर्य तळपतो आहे आणि रात्री मस्त मंद गार वारे वाहत आहेत. त्यामुळे हा सीझन दरवर्षीसारखा सिंपल समर सीझन राहिलेला नाही. हलकी, रंगीत आणि आरामदायी फॅशन हीच या उन्हाळ्याची खास ओळख! यावर्षीचे समर फॅशन ट्रेंड्स खूप फ्रेश, युथफुल आणि एक्स्प्रेसिव्ह आहेत. कॉलेज, ट्रॅव्हल, कॅज्युअल आउटिंग किंवा अगदी डे-टू-डे वापरासाठीही हे फॅशन ट्रेंड्स सहज कॅरी करता येतील.कपड्यांच्या बाबतीत फॅब्रिक इतकंच रंगांनाही महत्त्व असतं. यंदा ब्राइट आणि सॉफ्ट पेस्टल दोन्हीही रंग खूप ट्रेंडमध्ये आहेत. बेबी पिंक, मिंट ग्रीन, स्काय ब्लू, लॅव्हेंडर असे सौम्य रंग डोळ्यांना थंडावा देतात आणि खूप शांत, कूल लुक देतात. हे रंग दिवसभरात खूप फ्रेश वाटतात, उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करताना कम्फर्ट देतात आणि संध्याकाळच्या वातावरणातही उठून दिसतात. त्याचबरोबर नियॉन ग्रीन, सनशाईन यलो, कोरल आणि ऑरेंज असे ब्राइट रंगदेखील सध्या खूप पॉप्युलर आहेत. या रंगांमुळे एकदम उठावदार लुक मिळतो आणि सहज लक्ष वेधून घेतात. मिक्समॅचचा ट्रेंड एव्हरग्रीन असतो, त्यामुळे अनेक जण आता एकाच आउटफिटमध्ये पेस्टल आणि ब्राइट रंग मिक्स करून नवा, प्लेफुल लुक तयार करताना दिसतात. विरुद्ध रंग जसे की पिवळा आणि हिरवा, त्यात विरुद्ध शेड्स जसं की सनशाईन येलो आणि पिस्ता / पेस्टल ग्रीन, अशी रंगांची कॉम्बिनेशन्स आपापल्या क्रिएटिव्हिटीच्या जोरावर करत प्रत्येकाचा काहीतरी हटके आऊटफिट ट्राय करण्याचा प्रयत्न असतो.

डिझाइन्समध्ये फ्लोरल्स हे ऑल-टाइम फेवरेट आहेत. छोटे छोटे फ्लोरल प्रिंट्स असलेले ड्रेस, टॉप्स किंवा स्कर्ट्स खूप क्यूट आणि फ्रेश लुक देतात. हे ड्रेस उन्हाळ्याच्या हलक्या मूडला अगदी परफेक्ट जुळतात. त्याचबरोबर मोठे, बोल्ड फ्लोरल्सही ट्रेंडमध्ये आहेत. यामुळे लुकला थोडा ड्रामॅटिक आणि कॉन्फिडंट टच मिळतो. फ्रिल्स असलेले टॉप्स आणि ड्रेसेस यावर्षीसुद्धा खूप दिसत आहेत. फ्रिल्समुळे आउटफिटला सॉफ्ट आणि फ्लोइ फील येतो, तसेच थोडा प्लेफुल मूडही तयार होतो. काही जण फ्रिल्सचा वापर स्लीव्हज, नेकलाइन किंवा हेमलाइनवर करून साध्या कपड्यांनाही स्टायलिश बनवत आहेत. बीच वाइब्स देणारे किंवा ट्रॉपिकल फील देणारे आऊटफिट्स सध्या खूप पॉप्युलर आहेत. पाम ट्री प्रिंट्स, शेल्स, हलके ब्लू-ग्रीन शेड्स यामुळे समर हॉलिडे मूड तयार होतो. अशा स्टाइलिंगमुळे कोणत्याही लोकेशनवर लुकमध्ये मात्र रिलॅक्स्ड आणि हॉलिडे फील येतो. टाय-डाय पॅटर्न्स आणि सॉफ्ट वेव्ही प्रिंट्स वापरूनही हा ट्रॉपिकल मूड कॅरी केला जातो आहे.

कपड्यांच्या स्टाइलमध्ये कम्फर्टला खूप महत्त्व आता गेल्या काही काळात आलेलं आहे. लूज फिट्स, ओव्हरसाईज शर्ट्स, फ्लोई ड्रेसेस आणि वाईड-लेग पॅन्ट्स खूप ट्रेंडमध्ये आहेत. टाइट कपड्यांपेक्षा हलके, एअरी कपडे लोक जास्त पसंत करत आहेत, कारण ते दिवसभर घातले तरी त्रास होत नाही. कॉटन आणि लिननसारखे फॅब्रिक्स सर्वात बेस्ट मानले जातात, कारण ते घाम शोषतात आणि त्वचेला श्वास घेऊ देतात. त्यामुळे स्टायलिश दिसण्याबरोबरच दिवसभर फ्रेशही राहता येतं. हलक्या कपड्यांमुळे मूव्हमेंटही सोपी होते. आऊटफिट्समध्ये को-ऑर्ड सेट्स हा अजूनही खूप मोठा ट्रेंड आहे. तसंच, क्रॉप टॉप्स आणि हाई-वेस्ट स्कर्ट्स, शॉर्ट्स किंवा वाइड फिट पॅन्ट्स ही कॉम्बिनेशन्सही खूप ट्रेण्डिंग आहेत. यामध्ये समर फ्रेंडली लेयर्स जसं की श्रग्स, सी-थ्रू जॅकेट्स असे पर्याय ॲड करून वेगवेगळे लुक्स तयार करता येतात.

ॲक्सेसरीजमध्येही मिनिमलीजम आणि स्टेटमेंट दोन्ही दिसून येत आहे. मोठे सनग्लासेस चेहऱ्याला स्टायलिश लुक देतात, तर रंगीत हेअर क्लिप्स आणि हलकी ज्वेलरी आउटफिटला फन टच देतात. स्लिंग बॅग्स, टोट बॅग्स आणि स्ट्रॉ हॅट्स हे समर सीझनमध्ये फक्त फॅशनेबलच नाही तर उपयोगीही आहेत. फुटवेअरमध्ये फ्लॅट्स, सॅन्डल्स आणि स्नीकर्स हेच जास्त वापरले जात आहेत, कारण ते कम्फर्ट आणि स्टाइल दोन्ही देतात. यावर्षीचा आणखी एक ट्रेण्ड म्हणजे मिक्स अँड मॅच. वेगवेगळे प्रिंट्स, रंग आणि टेक्सचर्स एकत्र करून स्वतःचा वेगळा लुक तयार करणं खूप ट्रेण्डी आहे. यात थोडी क्रिएटिव्हिटी लागते, पण एकदा जमलं की लुक खूप युनिक आणि पर्सनल वाटतो. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या आऊटफिट्सवर मेहनत घेताना दिसतात.समर फॅशन म्हणजे हलकेपणा, रंग, आणि आनंद! यावेळचा सीझन ट्रेण्ड हा पर्सनल फॅशन फॉलो करणं. त्यामुळे या उन्हाळ्यात फ्रिल्स, फ्लोरल्स, ब्राइट कलर्स आणि कम्फर्टेबल स्टाइल्ससोबत लुक एकदम फ्रेश ठेवून, नवीन स्टाइल्स ट्राय करणं आणि स्वतःचं स्टाइल स्टेटमेंट बनवणं याकडेच बहुतेकांचा कल दिसून येतो आहे.