उन्हाळा म्हटलं की कडक ऊन, घशाला पडणारी कोरड हे सारं आलंच. त्यात वाढत्या तापमानामुळे अंगाची होणारी लाही लाही असह्य होते आहे. सततच्या घामाने सर्वच हैराण झालेले आहेत. कडक ऊन आणि त्यामुळे शरीरात निर्माण होणारी पाण्याची कमतरता या समस्यांपासून दूर ठेवत शरीर आणि मनाला थंडावा देणारी पारंपरिक पेयं आपल्याकडे घरोघरी केली जातात. या काळात मानवी शरीरातील पाण्याचं संतुलन योग्य प्रमाणात ठेवणं गरजेचं असतं. वैद्यकीय अभ्यासानुसार रोज जवळपास १० ते १५ ग्लास पाणी पोटात जाणं आवश्यक आहे. सध्या उन्हामुळे घशाला पडणारी कोरड दूर करण्यासाठी प्रत्येक जण थंड पेयांकडे वळतो आहे, मात्र भारतीय पारंपरिक पेयं नुसती घशाची कोरड दूर करत नाहीत तर उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासदेखील मदत करतात.
सत्तूचं सरबत
आयुर्वेदात सत्तूला पोषक तत्त्वांनी समृद्ध मानलं जातं. त्यामध्ये प्रथिनं, फायबर, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियमचं उत्तम मिश्रण आहे. हरभरा आणि इतर धान्याच्या पिठापासून बनवलेल्या सत्तूला देसी प्रोटीन शेक म्हणतात. सत्तूचं सरबत प्यायल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. हे केवळ शरीराला थंड ठेवत नाही तर पचन सुधारतं, उष्माघातापासून संरक्षण करतं आणि डिहायड्रेशनपासून आराम देतं. हे सरबत प्यायल्यानंतर बराच काळ पोट भरल्यासारखं वाटतं. या सर्व फायद्यांसाठी उन्हाळ्यात सत्तूचं सरबत पिणं खूप फायदेशीर मानलं जातं. आरोग्यासाठी सत्तू हे अत्यंत पोषक तत्त्व आहे, यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि लवकर थकायला होत नाही. म्हणूनच आजही सत्तूचं सेवन भारतामध्ये अधिक प्रमाणात केलं जातं. उत्तर भारतात सत्तूचं सरबत विशेष लोकप्रिय आहे. सत्तूचं सरबत बनविण्यासाठी सोललेले चणे अथवा चण्याची डाळ कढईत भाजून घ्यावी. थंड झाल्यावर त्याचं पीठ करावं. एका ग्लासमध्ये थंड पाणी घेऊन त्यात २-३ चमचे सत्तू चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर हे मिश्रण एकजीव करा. लिंबाचा रस आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घाला आणि हे सरबत प्या. सत्तूचा पचनक्रियेवर अधिक परिणाम होत असल्याने ज्या व्यक्तींना पहिल्यापासूनच पोटात गॅस, अपचनाची समस्या असेल त्यांनी सत्तू खाऊ नये अथवा कमी प्रमाणात खावं.
बुरांश सरबत
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यांसारख्या डोंगराळ भागात अशी अनेक झाडं, वनस्पती आणि औषधी वनस्पती आढळतात, ज्याचा उपयोग आरोग्य आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी केला जातो. यापैकी एक आहे बुरांश. बुरांश ही वनस्पती डोंगराळ भागात आढळते. या वनस्पतीच्या फुलांपासून हे पेय तयार केलं जातं. हाड मजबूत करण्यासाठी, डिहायड्रेशनसाठी तसेच मधुमेहींना हे पेय फायदेशीर आहे. या सरबताची हवाबंद बाटली बाजारामध्ये उपलब्ध असते.
कुलुक्की
हे केरळ राज्यातील सुप्रसिद्ध उन्हाळी पेय आहे. मल्याळम भाषेमध्ये कुलुक्की या शब्दाचा अर्थ घुसळणं असा होतो. हे सरबत तयार करताना जितकं जोरात घुसळलं जाईल किंवा वर-खाली हलवलं जाईल तितकी याची चव खुलते. त्यावरून या पेयाला कुलुक्की हे नाव पडलं. हे सरबत तयार करण्यासाठी दोन चमचे सब्जा पाण्यात भिजवत ठेवा. सब्जा भिजेपर्यंत एका ग्लासात लिंबाचा एक स्लाइस, एक उभी चिरलेली मिरची, पुदिना, चवीनुसार मीठ, साखर टाका. यात आवश्यक असेल तर आल्याचे बारीक तुकडेही घालू शकता. त्यानंतर त्यात सब्जा, लिंबाचा रस व बर्फाचे तुकडे घालून जोरात शेक करा. या सरबतामध्ये आंबट, गोड आणि तिखट या तिन्ही चवींचा संगम आहे.हे सरबत करोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक जण नियमित घेत होते.
पनकम
हे पेय तमिळनाडू राज्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. रामनवमीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांना या पेयाचा नैवेद्य अर्पण केला जातो. साखरेऐवजी यात गूळ वापरून गोडवा आणला जातो. हे सरबत बनवण्यासाठी दोन वाट्या पाण्यात अर्धी वाटी गूळ विरघळत ठेवा. त्यामध्ये चवीनुसार लिंबाचा रस, पाव चमचा सुंठपूड, अर्धा चमचा वेलचीपूड, अर्धा चमचा काळी मिरीपूड, चिमूटभर मीठ, चिमूटभर कापूरची पूड घालून व्यवस्थित ढवळून घ्या. तमिळनाडूमध्ये हे पेय मातीच्या भांड्यात बनवलं जातं.
टांका तोरणी
हे ओडिशा राज्यातील मसालेदार पेय आहे. हे पेय आंबलेल्या तांदळाच्या पाण्यापासून तयार केलं जातं. यात पुदिन्याची पानं, खडा मीठ, दही, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्या आणि लिंबाची पानं घातली जातात.
चिंचेचं सरबत
ज्या पदार्थाचं नाव काढताच तोंडाला पाणी सुटतं ती म्हणजे चिंच. भारतामध्ये सर्वाधिक उष्णता राजस्थानमध्ये जाणवते. तिथं ‘इमली का अमलाना’ हे थंडगार पारंपरिक पेय उन्हाळ्यात घरोघरी केलं जातं. हे सरबत बनवण्यासाठी चिंच आधी पाण्यात दोन ते अडीच तास भिजवून नंतर त्याचं पाणी गाळून घेतात. या पाण्यात साखर किंवा गूळ, काळं मीठ, काळी मिरी, पुदिन्याची पानं थोडीशी कुस्करून एकजीव केली जातात. राजस्थानमध्ये सर्वाधिक उष्माघाताचा त्रास होतो, त्यामुळे तिथं चिंचेचं सरबत करून पितात. उन्हाळ्यात मंदावलेल्या पचनक्रियेसाठी चिंचेच्या सरबताचा फायदा होतो. चिंचेमध्ये अशी काही पोषक तत्त्वं असतात जी पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. अन्नपचन होणारा रस तयार करण्याचं काम चिंचेद्वारे केलं जातं. त्यामुळे पचनक्रिया उत्तम होते आणि खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतं. .
नीरा
उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात घेतलं जाणारं महाराष्ट्रातील एक पेय म्हणजे नीरा. विविध जीवनसत्त्वं, कर्बोदकं, प्रथिनं यात असल्याने हे पेय शरीरासाठी उपयुक्त आहे. नीरेत लोह, व्हिटॅमिन बी, ए आणि सी असते. रक्तवर्धक असलेली नीरा प्यायल्याने उन्हाळ्यातील उष्णतेच्या तक्रारी कमी होऊन शरीरास थंडावा मिळतो. पचनाच्या तक्रारी दूर होतात. विशेष म्हणजे मधुमेही व्यक्तींनाही नीरा उपयुक्त आहे. पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादींमुळे हृदयासाठीही उपयुक्त आहे.
उन्हाळ्यात शरीराला निरोगी ठेवणारा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे ही उन्हाळी पेयं होत. बाजारातील कृत्रिम थंड पेयांपेक्षा घरची पारंपरिक पेयं अधिक सुरक्षित, ताजी आणि आरोग्यदायी आहेत. त्यामुळे या उन्हाळ्यात आपल्या रोजच्या आहारात या थंडगार पेयांचा समावेश केल्यास शरीर आणि मन दोन्हीही प्रसन्न राहतील.
शिकंजी
लिंबूपाणी हे लोकप्रिय भारतीय सरबत आहे. शिकंजी हा लिंबाच्या रसाचाच एक प्रकार आहे. साध्या लिंबूपाण्यापेक्षा चवीनं थोडी वेगळी आणि मसालेदार अशी शिकंजी उत्तर भारतात विशेष प्रसिद्ध आहे. शिकंजीत काळं मीठ, थोडी भाजलेली जिरेपूड घालून त्याची चव वाढवली जाते. शिकंजी हे पेय उन्हाळ्यात शरीराचे तापमान संतुलित राखण्यास मदत करतं. शिकंजीमध्ये वापरलेलं काळं मीठ आणि जिरेपूड पचनक्रियेसाठी देखील उपयुक्त आहे. शिकंजी करण्यासाठी सर्वप्रथम ताज्या लिंबांचा रस काढला जातो. या रसात साखर किंवा गूळ घालून तो व्यवस्थित विरघळवायचा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, चिमूटभर काळं मीठ आणि भाजलेली जिरेपूड घालायची. काही जण त्यात बारीक चिरलेली पुदिन्याची पानं किंवा थोडंसं किसलेलं आलंही घालतात, ज्यामुळे शिकंजीला एक वेगळीच चव येते. हे सगळं मिश्रण थंड पाण्यात चांगलं ढवळून घेतलं की शिकंजी तयार होते. त्यात भिजवलेला छान फुललेला सब्जा घालायचा. हवे असल्यास त्यात बर्फाचे तुकडे घालून ती आणखी थंडगार करता येते.
ताक
फक्त उन्हाळ्यातच नाही तर वर्षभर ताक घेण्याने नक्कीच फायदा होतो. संस्कृतमध्ये ताकाचं माहात्म्य सांगणारं एक सुभाषित प्रसिद्ध आहे. ‘अमृतं दुर्लभं नृणां देवानामुदकं तथा’ तक्रं शक्रस्य दुर्लभम् याचा अर्थ असा, ज्याप्रमाणे मनुष्य प्राण्यास अमृत, स्वर्गातील देवांस पाणी दुर्लभ आहे, त्याप्रमाणे साक्षात इंद्रास ताक दुर्लभ आहे. ताक किती आरोग्यदायी आहे हे वर्णन करताना अतिसुंदर उपमा इथं दिलेली दिसते. उन्हाळ्यामध्ये पातळ पदार्थ नेहमीच फायद्याचे असतात, पण ताकातून बराच थंडावा शरीरास मिळतो. उष्णतेमुळे शरीरावर होणारे परिणाम आपण ताकामुळे टाळू शकतो. विविध प्रकारचे क्षार मिळतात जे उन्हाळ्यात शरीराला आवश्यक आहेत. दुधामध्ये विरजण घालून दही बनविले जाते. या दह्यामध्ये पाणी घालून घुसळून ताक बनवलं जातं. जिरे, धने, हिंग, पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर, सैंधव मीठ इत्यादी अनेक पदार्थ त्यामध्ये आवडीनुसार मिसळले जातात. ताकाबरोबरच त्यापासूनच तयार केला जाणार मठ्ठा जास्त चविष्ट असतो. मसालेभात किंवा जिलेबी असेल तर त्यासोबत आवर्जून मठ्ठा केला जातो.
सोलकढी
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर प्यायलं जाणारं पेय म्हणजे सोलकढी. नारळाचं दूध व कोकमाचा सार याचं मिश्रण म्हणजे ही कमाल रेसिपी होय. अगदी फार सामग्री नसल्याने झटपट करता येणारी ही रेसिपी आहे. शरीराचं तापमान आणि अपचन टाळण्यासाठी या पेयाला पसंती दिली जाते. सोलकढीत चवीनुसार हिंग, कढीपत्ता, आलं आणि जिरं टाकलं जातं. कोकमात ॲन्टीऑक्सिडंट, फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात. तर ओल्या नारळात प्रथिनं, व्हिटॅमिन सी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, परिणामी शरीराला या कोकम अधिक खोबरं कॉम्बोचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
कैरीचं पन्हं
कैरीचं पन्हं हे महाराष्ट्रातील आणखी एक लोकप्रिय पेय, जे आजकाल हवाबंद बाटलीतून सर्वदूर उपलब्ध झालं आहे. कैरीचा गुणधर्म थंड असतो. त्यामुळे कैरीचं पन्हं पोटाला थंडावा देतं. उन्हाळ्यात उष्माघाताचा सर्वाधिक त्रास होतो, पण तुम्ही कैरीचं पन्हं पिऊन घराबाहेर पडलात तर उष्माघातापासून तुमचा बचाव होईल. उन्हाळ्यात जास्त घाम आल्याने शरीरात लोह, सोडियम क्लोराईडची कमतरता निर्माण होते. उन्हाळ्यातील हे आरोग्यदायी पेय शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवते. लोहाची कमतरता भरून काढते आणि शरीर हायड्रेटेड ठेवते, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.
कांजी
उन्हाळ्यात आतड्याच्या आरोग्यासाठी घरगुती आंबवलेल्या पेयांचा पर्याय शोधला जातो, ज्यात कांजीचा समावेश होतो. बीट, रताळं व तांदूळ यांची कांजी करून सेवन करण्याचं प्रमाण भारतात अधिक आहे. पारंपरिकपणे कांजी ही उत्तर भारतात आढळणार्या काळ्या गाजरांपासून बनवली जाते, परंतु आता ती रताळं, बीट किंवा लाल गाजरांपासूनही बनवली जाते. कांजी सर्वसाधारण तापमानात किंवा सौम्य उन्हात नैसर्गिकरीत्या दोन-तीन दिवस आंबवली जाते. आंबटसर आणि सौम्य तिखट चवीचं हे पेय त्याच्या समृद्ध प्रोबायोटिक गुणधर्मांसाठी ओळखलं जातं. नाव जरी सारखं असलं तरी दक्षिण भारतात ‘कांजी’ हा शब्द बहुतेकदा आंबवलेल्या पेयाऐवजी तांदळाची पेज किंवा पातळ आहार (कांजी वेल्लम) यासाठी वापरला जातो. कांजी शरीरातील पाण्याचं संतुलन आणि पचनास मदत करण्यासाठी प्यायली जाते. हे पेय तांदळाचं पाणी आंबवूनही बनवलं जातं.अनेकदा त्यात थोडं ताक घातलं जातं. या पेयाने शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी, आतड्यांच्या आरोग्यासाठी आणि पचनसंतुलनासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होते. राजस्थानमध्ये कांजी अधिक तिखट स्वरूप धारण करते. राई आणि लाल तिखट वापरून तयार केलेली ही कांजी पारंपरिकपणे कांजी वड्यासोबत खाल्ली जाते. म्हणजे आंबवलेल्या पेयात भिजवलेले डाळीचे वडे. हा चविष्ट प्रकार फक्त राजस्थानमध्येच चाखायला मिळतो.
viva@expressindia.com
