scorecardresearch

Premium

पर्यावरणपूरक फॅशन

तरुण पिढी ज्यांना आजकालच्या भाषेत  genZ असे म्हणतात, त्यांनी पर्यावरणपूरक फॅशनमध्ये अनेक नवीन संकल्पना आणल्या आहेत.

Sustainable Fashion Concepts ,
पर्यावरणपूरक फॅशन (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम

वैष्णवी वैद्य मराठे

फॅशन विश्व गतिमान आहे. क्षणोक्षणी त्याची व्याख्या, प्रकार, पद्धती बदलत असतात. २०२० च्या वर्षांची सुरुवात ज्या प्रकारे झाली त्याचे पडसाद आपण अजूनही काही प्रमाणात अनुभवतो आहोत. पर्यावरणातील बदल काय अनर्थ घडवून आणतात हे संपूर्ण जगाने पहिले. नैसर्गिक साधन-संपत्तीचा जो गैरवापर मानवाने चालू ठेवला आहे त्याला शक्य त्या प्रकारे आपण आळा घालणे गरजेचे आहे. या दिशेने जाणारे एक पाऊल म्हणजे ‘सस्टेनेबल फॅशन’. हा शब्द काही फार नवीन नाही. जगभरात जे फॅशन शोज आणि तत्सम सोहळे पार पडतात त्यातला वर्षांनुवर्षे गाजणारा हा विषय आहे, परंतु या क्षेत्रातही अनेक बदल सतत होत असतात. तरुण पिढी ज्यांना आजकालच्या भाषेत  genZ असे म्हणतात, त्यांनी पर्यावरणपूरक फॅशनमध्ये अनेक नवीन संकल्पना आणल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने काय नवे पाऊल टाकता येईल त्याबद्दलचा हा लेखनप्रपंच..

boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण

सस्टेनेबल फॅशन

सस्टेनेबल फॅशन म्हणजे ज्या कापडापासून पर्यावरणाला काहीही हानी पोहोचत नाही. फक्त कापडच नाही तर कपडे बनवण्याची प्रक्रिया, वापरण्याची पद्धतसुद्धा मानवी जीवन, वन्यजीवन तसेच पर्यावरण अशा नैसर्गिक घटकांना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवत नाही. याने कमीत कमी कचरा निर्मिती होते. अलीकडच्या वर्षांत ग्राहक जागरूकता आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटला चालना देणारी सरकारी धोरणे यांच्या संयोगाने भारतात सस्टेनेबल फॅशनची मागणी वाढते आहे. भारतातील सस्टेनेबल फॅशन मार्केट अजूनही प्राथमिक टप्प्यात आहे, परंतु गेल्या काही वर्षांत त्यात स्थिर वाढ दिसून आली आहे.

भारतातील अनेक मोठय़ा फॅशन ब्रॅण्ड्सनी सस्टेनेबल फॅशन आत्मसात केली आहे. तसेच अगदी लॅक्मे फॅशन वीकपासून ते कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापर्यंत सस्टेनेबल फॅशन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी डिझायनर्स आणि स्टायलिस्ट काम करत आहेत. फॅशन स्टायलिस्ट तन्मय जंगम सांगतो, ‘‘जेव्हा आपण एक कपडय़ाचा सेट अनेक वर्षे वापरत असतो तेव्हा ती सस्टेनेबल फॅशन असते. सस्टेनेबल फॅशन लोकांना समजणं फार गरजेचं आहे. जे प्युअर आहे, लॉन्ग-लािस्टग आहे, ओरिजिनल आहे त्याला सस्टेनेबल फॅशन म्हणतात. एखादी साडी जी पूर्वी आपली आजी/आई नेसायची त्याचा आता तुम्ही ड्रेस करताय, तुमची मुलगी त्याचा टॉप करेल यालाही सस्टेनेबल फॅशन म्हणतात. यातून आपण नकळतपणे भरपूर प्रमाणात पर्यावरणाचे प्रदूषण टाळतो आहोत.’’ 

रेन्टेड कपडय़ांची फॅशन

यातलाच एक महत्त्वाचा आणि नवीन मुद्दा म्हणजे सेकंड हॅन्ड फॅशन. पूर्वी सगळय़ाच घरांमध्ये मोठय़ा भावाचे, बहिणीचे कपडे धाकटय़ांनी वापरण्याची पद्धत असायची. तीच आता फॅशन क्षेत्रातही येताना दिसतेय. या मुद्दय़ावर तन्मय सांगतो, ‘‘स्वत:च्या लग्नात, कुठल्यातरी पार्टीत, अ‍ॅवॉर्ड शो अशा ठिकाणी घातलेले कपडे सेलिब्रिटीज पुन्हा कधीच वापरत नाहीत, ते एखाद्या ब्रॅण्डला किंवा शॉप्सला विकतात आणि तिथून आपल्यासारखे लोक ते कपडे विकत किंवा रेन्टवर घेऊ शकतात. आपल्यासारखे लोकही आता लग्न आणि सण समारंभांमध्ये कपडय़ांची हौस करू लागले आहेत. मुळातच आता कपडय़ांवर अमाप पैसा खर्च होतोय अशा वेळी सेकंड हॅन्ड किंवा रेन्टल कपडय़ांमुळे पैशाची बचतही होते, कारण नवीन काही बनत नाही, तेच कपडे वेगळे लोक वेगळय़ा पद्धतीने घालत असतात आणि यातून पर्यावरणाचे संवर्धनही होते. हा प्रकार सेलिब्रिटीजमध्ये प्रचलित होणे गरजेचेच आहे, कारण त्या क्षेत्रात सतत प्रकाशझोतात राहणे गरजेचे असल्याने कपडय़ांचा प्रचंड वापर होतो. तसेच त्यांच्या राहणीमानानुसार कापडाच्या निवडीतही पर्यावरण संवर्धन होणे गरजेचे आहे.’’

प्रत्येक पद्धतीचा कपडा आपल्याकडे असणं व्यावहारिकदृष्टय़ासुद्धा शक्य नाही आणि आजकाल आपल्याला प्रत्येक कारणासाठी वेगवेगळे कपडे लागत असतात, अशा वेळी ही रेन्टल फॅशन सुपरहिट ठरते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पेशवाई लग्नाची थीम. लग्नात मुलांनी घेतलेल्या पगडय़ा आणि फेटय़ांचा वापर त्या दिवसापुरताच असतो किंवा मुलींचा भरजरी लेहेंगासुद्धा पुन्हा पुन्हा वापरला जाईलच याची खात्री नसते. लग्नासाठी कपडे रेन्टवर घेणं हा ट्रेण्ड तर आता सर्रास फॉलो होतोय. अशा वेळी सस्टेनेबल फॅशन प्रकाशझोतात येणे गरजेचे आहे. एकच कापड किंवा एकच फॅब्रिक जास्तीत जास्त लोक, पिढय़ा वापरतात त्यावेळी त्याला खऱ्या अर्थाने सस्टेनेबल फॅशन म्हटले जाते.

कॉटन आणि इक्कतचा बोलबाला

सस्टेनेबल फॅशन वाढण्यामागचे अजून एक मोठे कारण म्हणजे तरुणांची कॉटन कपडय़ांची आवड. टॉप्स, क्रॉप टॉप्स, कुर्ता, ड्रेस अगदी पैठण्यासुद्धा कॉटनमध्ये पाहायला मिळत आहेत. मिक्स अँड मॅच करणे हा तरुणांचा फॅशन करण्याचा अंदाज आहेच, यातच आता कॉटन फॅब्रिकचा समावेश त्यांनी केला आहे. मोठमोठे ब्रॅण्ड्स आणि सेलिब्रिटी ब्रँड्सनेसुद्धा कॉटन फॅशन उचलूनच धरली आहे. ही फॅशन फक्त तरुण मुलींनाच नाही तर मुलांच्याही आवडीची आहे. पार्टीवेअर किंवा ट्रॅडिशनल कपडे घालायची वेळ कमी येते, त्यामुळे सुंदर असा कॉटनचा कुर्ता घेतला तर तो पुढची ४-५ वर्षेसुद्धा चालतो असे अनेक तरुण मुलांचे म्हणणे आहे.

इक्कतने सध्या इतर कापडांचे मार्केट खाऊन टाकले आहे. कॉटन, इक्कतसारखे सस्टेनेबल फॅशनचे कपडे वापरायला, घालायला आणि हाताळायलाही सोपे आणि कम्फर्टेबल असतात असे तरुणाईचे म्हणणे आहे. मल कॉटन, हँडब्लॉक प्रिंट हे सगळे प्रकार कपडय़ांमध्ये भरपूर गाजतायेत. या फॅब्रिकमध्ये विविध प्रकारचे कपडे- साडय़ा, वन पीस, टॉप्स, कुर्ता हे तरुणाईसकट सगळय़ाच वयोगटातल्या लोकांना आकर्षित करत आहेत. राम मोरा या ब्रॅण्डची ओनर रश्मी मोघे सांगते, ‘‘कॉटन, लिननसारखे फॅब्रिक हे चिरंतर आहेत ते कधी आऊटडेटेड झालेच नव्हते, फक्त आता ते नव्या स्वरूपात आपल्यासमोर येत आहेत. पाश्चात्त्य संस्कृतीचा आपल्यावर नेहमीच परिणाम राहिला आहे, त्यामुळे आता आपल्या ट्रॅडिशनल फॅब्रिकमध्ये ट्रेण्डी कपडे यायला लागले आहेत, त्यालाच आता सस्टेनेबल फॅशन म्हटलं जातंय.’’

सस्टेनेबल फॅशन फक्त कपडय़ाची नाही

नकळतपणे कपडय़ांमुळे आणि कापडाच्या अनेक वस्तूंमुळे आपण पर्यावरण प्रदूषण  करत असतो, परंतु हे आपल्याला लक्षात येत नाही. तरुणाईने सस्टेनेबल फॅशन फक्त कपडय़ांतच नाही तर इतर अ‍ॅक्सेसरीजमध्येही आत्मसात केली आहे. खण, कॉटन, इक्कत फॅब्रिकमध्ये पर्सेस, स्कार्फ, ज्वेलरी, चप्पल असे प्रकार वापरताना दिसत आहेत. रश्मी असंही सांगते की, ‘‘सस्टेनेबल फॅशन हे भारतात पूर्णपणे उलगडले नव्हते. फॅशन करताना लोकांचा सगळय़ात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे किंमत. कॉटनसारखे फॅब्रिक स्वस्त असतात हा मुद्दा सस्टेनेबल फॅशनला दुजोरा देतोच परंतु लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे हे आपण नाकारू शकत नाही. लोक खरंच पर्यावरण संरक्षणासाठी जागरूक झाो आहेत. त्यात सगळय़ात मोठा वाटा सोशल मीडियाचा आहे. जास्तीत जास्त तरुणाईला या ट्रेण्डचा भाग व्हायचे आहे आणि ही सकारात्मक बाब आहे. फॅशन अंगावर मिरवताना पर्यावरणाचे संवर्धन झालेच पाहिजे.’’

रियुज, रिडय़ूस, रिसायकल या पद्धतीने पर्यावरण संवर्धन होते हे आपल्याला अगदी शाळेपासून शिकवले जाते. पाण्याचा आणि विजेचा योग्य तेवढाच वापर करणे, झाडे लावणे, वायुप्रदूषणाला आळा घालणे या गोष्टींची जाणीव तरुणांना झाली आहे, परंतु कपडय़ांमुळे होणारे प्रदूषण याबद्दल अजूनही म्हणावी तेवढी जनजागृती झालेली नाही. याबद्दल नक्कीच विचारमंथन करणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धनाची व्याख्या कालानुरूप आता बदलणे गरजेचे आहे. सस्टेनेबल फॅशनच्या माध्यमातून कपडय़ांचा जास्तीत जास्त वापर होतो, जास्त काळ टिकणारे कपडे वापरले जातात ज्यातून जैवविविधतेचे संवर्धन होते. फक्त पर्यावरणपूरक कापड वापरून सस्टेनेबल फॅशन साधली जाऊ शकत नाही. जेव्हा एखादा कपडा जास्तीत जास्त काळ आपण वापरतो तेव्हा ती सस्टेनेबल फॅशन असते हे गणित समजून घेणे गरजेचे आहे.

फॅशन मार्केटच्या आढाव्यानुसार २०२१-२०२६ च्या दरम्यान सस्टेनेबल फॅशनची सारासार १०-१६% वाढ होणार आहे. भारतीय ग्राहकांची जागरूकता आणि टिकाऊ उत्पादनांसाठी पैसे देण्याची इच्छा वाढते आहे असे या सगळय़ा नामांकित डिझायनर्सशी बोलताना लक्षात आले. भारताचा समृद्ध वस्त्रोद्योग वारसा सस्टेनेबल फॅशन मार्केटसाठी अनुकूल आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक हातमाग कामगार आहेत जे पारंपरिक हस्तकला, विणकाम तंत्र आणि कापड यांचा वापर स्थानिक आणि जागतिक ग्राहकांना पुरविणारी सस्टेनेबल फॅशन उत्पादने तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच आपल्या संस्कृतीतले कपडे नेहमी पर्यावरणपूरकच असतात हेसुद्धा समजून घेतले पाहिजे. अनेक दिग्गज मंडळी भारताचे प्रतिनिधित्व करताना, अगदी कान असो किंवा राष्ट्रीय पुरस्कार; मोठमोठय़ा कार्यक्रमांना जाताना ते साध्या आणि सुटसुटीत कॉटन किंवा तत्सम पोशाखात असतात. फॅशनचा एलिगन्स कापडाच्या निवडीवर नाही तर तुमच्या वापरण्यावर आहे. तरुण ग्राहकांनी आज कपडय़ांच्या प्रमाणापेक्षा त्याच्या गुणवत्तेवर (quality) खरेदी केली पाहिजे, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे संवर्धन करू शकाल.

viva@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sustainable fashion concepts eco friendly concept in fashion zws

First published on: 09-06-2023 at 06:44 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×