ताणतणाव, अयोग्य जीवनशैली, प्रदूषण, बदलते ऋतू आणि औषधांच्या भडिमाराचे दुष्परिणाम आपल्या त्वचेवर होत असतात. त्यावर वेळीच नियंत्रण आणलं नाही तर त्वचेची होणारी हानी भरून काढणं अशक्य होऊन बसतं. जितक्या लवकर त्वचेची काळजी घेणं सुरू कराल तितकी तुमच्या त्वचेची चमक दीर्घकाळ टिकते. दुर्दैवाने आपल्यापैकी सर्वानाच स्वच्छ, नितळ त्वचा, गुलाबी गाल किंवा रेशमासारखे मऊसूत, दाट काळे केस अशा निसर्गदत्त देणग्या लाभत नाहीत. तरीही हे मिळवता येऊ शकतं. त्यासाठी थोडा कॉमन सेन्स वापरावा लागेल आणि चांगलं दिसण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत.
आपल्या आयुष्यात त्वचा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. एखादी व्यक्ती कशी दिसते, याचा थेट संबंध त्याच्या त्वचेशीच असतो. ही गोष्ट चांगली म्हणा किंवा वाईट, पण त्वचा केवळ आपल्या वयाचीच नव्हे तर सर्वसामान्य आरोग्याचीही निदर्शक असते.
जनुकं, वय, लिंग, सूर्यकिरणांमध्ये आपण किती काळ राहतो आणि आजूबाजूचं वातावरण यावर आपल्याला त्वचेचा पोत अवलंबून असतो. जीवनशैलीत बदल करून म्हणजे हितावह आणि नैसर्गिक अन्नाचं सेवन, नियमित व्यायाम, श्वसनाचे व्यायाम, योगसाधना, विश्रांती, निकोप मानसिक दृष्टिकोन आणि पुरेशी झोप साधून आपण त्वचेच्या काही तक्रारी सोडवू शकतो.
त्वचेची दैनंदिन काळजी घेणं श्वसनाइतकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ऋतुमानात होणाऱ्या बदलांशी सामना करण्यासाठी आपल्या त्वचेला सज्ज करा. यंदाच्या उन्हाळ्यात ‘सन स्मार्ट’ बनत पुढल्या गोष्टींचा अंगीकार करा-

१) त्वचा निरोगी ठेवण्यामध्ये आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. गाजर, लाल / पिवळी भोपळी मिरची, टोमॅटो आदी रंगीत भाज्यांची नेमकी निवड करून त्यांचा आहारात समावेश केल्यास कोलॅजन निर्मितीस चालना मिळते आणि पेशींच्या वाढीलाही गती मिळते. या आहार घटकांमध्ये बीटा-कॅरेटेनॉइड्स मुबलक प्रमाणात असतात, जे उतींची झालेली हानी भरून काढण्याच्या कामी उपयुक्त ठरतात.
२) दररोज आवर्जून फळांचा आस्वाद घ्या. लिंबू वर्गातली फळं आणि बेरीजमध्ये भरपूर अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट्स असतात. त्यांच्यातलं ‘क’ जीवनसत्त्व कोलॅजन आणि पेशींना सक्षम बनवतं.
३) सुका मेवा अवश्य खा. त्यात बदाम, अक्रोड, पिस्ते, काजू आदींचा समावेश असू द्या. सुक्या मेव्यात मुबलक इसेन्शिअल फॅट्स आणि प्रथिनं असतात, जे त्वचा मऊ बनवून ती घट्टही बनवतात.
४) हिरवाईवर प्रेम करा! पालक, ब्रोकोली, कोबी यांसारख्या हिरव्या भाज्यांवर मनापासून प्रेम करा. त्या आपली रोगप्रतिकारशक्ती सुदृढ बनवतात आणि त्वचेच्या पेशींचा ऱ्हास होण्यास प्रतिबंध करतात.
५) उन्हाळ्यात भरपूर द्रवपदार्थ प्यावेत. त्यामुळे शरीरातलं पाणी कमी होत नाही आणि यकृत तसंच मूत्रपिंडासारखे अवयव स्वच्छ राहण्यास मदत होते.
६) सौम्य साबणाने नियमितपणे चेहरा धुवा. त्वचा कोरडी पडू नये यासाठी गरम पाणी आणि चेहरा खसखसून धुणं टाळावं.
७) दिवसातून किमान दोन वेळा चांगलं मॉइश्चरायझर लावून त्वचा सुदृढ ठेवा.
८) सनस्क्रीनचा दररोज वापर करा (१५ ते ३० एसपीएफ). घरातून बाहेर पडण्याच्या अर्धा तास आधी त्वचेला सनस्क्रीन लावावं. खूप वेळ उन्हात राहिल्याने वेळेपूर्वीच सुरकुत्या येणं, कोरडेपणा आणि त्वचा सैल पडणं, या तक्रारी जाणवतात. धूम्रपान टाळा. तंबाखूमधल्या घातक विषारी घटकांमुळे त्वचा सैल पडते आणि पोषक घटक शोषून घेण्याच्या क्रियेत अडथळे येतात.
९) मद्यपान अत्यंत कमी करावं किंवा पूर्णत: टाळावं; कारण मद्यपानामुळे त्वचेतली आद्र्रता हरवते.
१०) तरु ण राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे व्यायाम. व्यायामामुळे रक्ताभिसरणाच्या क्रियेला चालना मिळते, जे त्वचेला निरोगी बनवतं. फुप्फुस, हाडं आणि हृदयाची कार्यक्षमता वाढवतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतं.
ताज्या भाज्या, हिरवे रस आणि पदार्थ शरीराची शुद्धी करतात आणि त्वचेला पोषण पुरवतात. हिरव्या पालेभाज्या, गाजर, टोमॅटो, काकडी, दुधी, पुदिना, आलं, लिंबू, सुकामेवा, कोरफड सर्वच प्रकारच्या त्वचेला पोषण पुरवतात. संतुलित आहार आणि चांगलं पचन नितळ, मुरु मंरहित आणि तजेलदार त्वचेसाठी महत्त्वाचं आहे.
त्वचेवरून केवळ आपलं वयच नाही, तर सर्वसामान्य आरोग्याचाही अंदाज बांधता येतो. आपल्या त्वचेच्या तक्रारींमधल्या केवळ एकतृतीयांश तक्रारी जनुकांमुळे होतात. उरलेल्या तक्रारी आपण काय खातो, ऋतुमानातल्या बदलांशी आपण कसे जुळवून घेतो किंवा आपल्या अयोग्य सवयींमुळे उद्भवतात. भरपूर व्यायाम आणि निरोगी आहार हा नैसर्गिकरीत्या तरुण राहण्याचा मार्ग आहे.