|| गायत्री हसबनीस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या आधुनिक युगात स्त्री कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. विशेषत: करोनासारख्या कठीण काळातही प्रगतीची किनार आणि संधीची वाट तरुण, ध्येयवादी विचारांच्या मुलींनी सोडली नाही. करोनामुळे आलेले नैराश्य, नोकरी गमावण्याची भीती, इतर ताणतणाव आणि खुद्द करोना व्हायरसची चिंता अशी नाना तऱ्हेची नकारात्मकता आजूबाजूला असतानाही करिअरपासून विविध गोष्टींबद्दलची चौकट मोडत नवं काही करण्याचं धाडस अनेकींनी दाखवलं आहे. सांस्कृतिक, समाजकारण, क्रीडा, व्यवस्थापन आणि हवाई क्षेत्र अशा विभिन्न क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींची जिद्द आपल्यालाही प्रेरणा देऊन जाते. इंटरनेटच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचलेल्या या तरुणींचे कार्य जाणून घेतले असता करिअरपासून पर्यावरणापर्यंत विविध क्षेत्रांत त्यांनी तथाकथित अपेक्षांच्या चौकटी मोडून भरारी घेतलेली दिसते…

मैत्री पटेल

सुरतला राहणारी मैत्री पटेल अमेरिकेतून पायलटचे प्रशिक्षण घेऊन भारतात आली ती पायलट होऊनच. तिचं वय आहे फक्त १९ वर्षे. ती साधीसुधी पायलट नाही, तर कर्मशिअल पायलट म्हणून परवाना मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. आपलं शिक्षण संपवून तिने पायलट होण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी कठीण परिश्रम करून, आर्थिक परिस्थितीवरही मात करत तिने अमेरिका गाठली. आणि इतक्या कमी वयात प्रशिक्षण पूर्ण करून कमर्शियल पायलट म्हणून ती मायदेशी परतली. दोन वर्षे जगात बिकट परिस्थिती असतानाही आपलं प्रशिक्षण तिने कमी कालावधीत पूर्ण केलं. आता ती भारतीय पायलट लायसन्ससाठी लवकरच प्रशिक्षण घेणार आहे.

अदिती महेश्वरी

नुकताच ११ ऑक्टोबरला ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिवस’ साजरा झाला, त्यानिमित्ताने ब्रिटिश हाय कमिशनद्वारे ‘हाय कमिशनर ऑफ द डे’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेची विजेती म्हणून २० वर्षीय अदितीने एका दिवसासाठी ‘ब्रिटिश हाय कमिशनर टू इंडिया’ होण्याचा मान पटकावला. त्यामुळे ब्रिटिश हाय कमिशनर म्हणून काम पाहाणारी ती एकमेव भारतीय ठरली आहे. अदिती महेश्वरी ही मूळची चितोडगढ, राजस्थान येथील रहिवासी आहे. सध्या ती दिल्ली विद्यापीठाच्या ‘मिरांडा हाऊस कॉलेज’मधून शिक्षण घेते आहे. सध्या वृत्तपत्रातून अदितीचीच चर्चा आहे. अदितीला भारत-इंग्लंड एनर्जी फॉर ग्रोथसंदर्भातील काम जवळून पाहाता आले. करोना व्हायरसचा फटका जगाला बसला असला तरी स्वप्न बघणं न थांबवता संधीचे सोने करत पुढे जाणं हेच अदितीच्या या यशस्वी वाटचालीतून सिद्ध होते.

नॅन्डी सिस्टर्स यूट्यूब हे आज जगाचे हक्काचे माध्यम आहे. तुम्हाला योग्य सूर सापडला आणि तुम्हाला लोकांपर्यंत काय पोहोचवायचं आहे ते कळलं तर तुम्ही नक्कीच या माध्यमावर राज्य करू शकता. अंकिता आणि अंतरा नॅन्डी या दोन बहिणीही अशाच?. लॉकडाऊनच्या काळातच यूट्यूबवरून या दोघी जास्त प्रकाशझोतात आल्या. त्यांनी स्वत:ची अशी संगीतशैली निर्माण करत आत्तापर्यंत लोकप्रिय हिंदी, मराठी, दाक्षिणात्य गाणी गायली आहेत. तरुण पिढीच काय प्रौढ वर्गालाही त्यांनी भारावून सोडलं आहे. जगभरात आता त्यांचा चाहतावर्ग तयार झाला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आपले यूट्यूब चॅनेल्स सुरू के ले.  असे कित्येक यूट्यूबर्स सध्या लुप्त झाले, मात्र लॉकडाऊनच्या लाटेनंतरही जे टिकून राहिले त्यात नंबर १ जोडी ही नॅन्डी सिस्टर्सची आहे. आजही त्यांच्या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळतात. आतापर्यंत करोडोंच्या संख्येने त्यांना फॉलोअर्स लाभले आहेत. मध्यंतरी त्यांनी लोकप्रिय संगीतकार शंकर महादेवन यांनी गायलेले ‘ब्रिथलेस’ गाणेही आपल्या शैलीत संगीतबद्ध केले होते, जे तूफान व्हायरल झाले आणि त्यावर कौतुकाचा वर्षावही झाला.  हातात छोटे ‘यूकुलेले’ हे वाद्य घेऊन दोघी गाण्याला साजेल अशी वेशभूषा करून बाल्कनीत उभ्या राहून आनंदाने नृत्य करत गातात. त्यामुळे ‘#बाल्कनीकॉन्सर्ट’ एवढंच यूट्यूबवर सर्च केलंत तरी त्यांची नक्की भेट होईल.

नव्या नंदा

अमिताभ बच्चन यांची नात म्हणून नव्या प्रसिद्ध आहे, पण तिचे काम फार कमी लोकांना माहिती आहे. नव्या स्वत: एक आंत्रपे्रनर आहे आणि स्त्री आरोग्याविषयी तिने स्वत:चे स्टार्टअप सुरू केले आहे. तिच्या इन्स्टाग्राम पेजवर गेलात तर तुम्हाला तिचे काम पाहाता येईल. हे स्टार्टअप तिनेही लॉकडाऊनच्या आसपास सुरू केले होते. ज्यात ती यशस्वीही ठरली आहे. आतापर्यंत स्त्री आरोग्याविषयी तिने बरीच जनजागृती केली असून काही दिवसांपूर्वीच तिने ‘हक्काची पाळी’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातून तिने समाजातील मासिक पाळीबद्दलचे समज-गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घेतला असून या विषयावर के ली जाणारी जनजागृती सध्या महत्त्वाची ठरते आहे.

अवनी लेखारा

शारीरिक अपंगत्वावरही मात करून ‘पॅराऑलिम्पिक २०२०’मध्ये रायफल या खेळात सुवर्णपदक मिळवणारी ही १९ वर्षीय तरुणी आज सगळ्यांसाठी आदर्श ठरली आहे. अवनीने १० मीटर एअर वूमन्स रायफल खेळात २४९.६ हा स्कोअर केला आहे. २०१२ साली एका अपघातामुळे तिला अपंगत्व आलं, तेव्हापासून जिद्दीने तिने या खेळात आपली ओळख बनवली आणि आज सुवर्णपदक पटकावल्यानंतर जगभरात तिचा सन्मान के ला जातो आहे. भारतीय मुलींसाठी तर तिने एक वेगळा प्रेरणास्रोत निर्माण केला आहे. २०२० साली टोकियो ऑलिम्पिक होणार होते तेव्हा करोना व्हायरसची चिंता सगळीकडे होती आणि त्याच वेळी अवनी महत्त्वाकांक्षेने पॅराऑलिम्पिक २०२० साठी तयारी करत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिच्या खेळाचे कौतुक केले. सुवर्णपदकासोबतच ५० मीटर एअर रायफल खेळात तिने कांस्यपदकही पटकावले आहे. जागतिक पातळीवर एक सर्वोत्कृष्ट रायफल खेळाडू म्हणून तिचा गौरव  होतो आहे.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today modern age woman is not behind in any field akp
First published on: 15-10-2021 at 00:02 IST