scorecardresearch

Premium

‘परंपरेचं’ पान!

गणेशोत्सवातील नैवेद्याच्या पारंपरिक पदार्थाच्या रीतीभातीही तितक्याच अनोख्या आहेत..

traditional food Prepared during ganesh chaturthi
गणेशोत्सवातील नैवेद्याच्या पारंपरिक पदार्थ

दसरा-दिवाळीपेक्षाही ज्या सणाची जोरदार तयारी केली जाते, तो सण म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सवातील नैवेद्याच्या पारंपरिक पदार्थाच्या रीतीभातीही तितक्याच अनोख्या आहेत..

‘नैवेद्य’ हा शब्द ‘नि’ आणि ‘विद्’ या दोन संस्कृत शब्दांपासून तयार झाला आहे. ‘जाणवून देणे’ असा त्याचा अर्थ आहे. नैवेद्य हा पंचेंद्रियांतून जाणून घेण्याचा प्रकार आहे. केळीच्या पानावर नैवेद्य वाढण्याची पूर्वापार पद्धत आहे. यामागचं लॉजिकही पटण्यासारखं आहे. केळीच्या पानाचा आकार मोठा व बराचसा मानवी जिभेसारखा दिसतो. एकाच केळीच्या पानावर बरेच पदार्थ वाढता येतात. पानाची अरुंद बाजू भगवंताच्या डावीकडे ठेवतात. केळीचे पान बळकट असतं,  ते पटकन फाटत नाही. त्यावर एक मेणचट आवरण असल्याने प्रवाही अन्नपदार्थ वाढले तरी ते ओलसर होत नाही. त्यामुळे नैवेद्याचं ताट म्हटलं की डोळय़ासमोर केळीचं हिरवंगार पान आपोआप येतं. पानावर मधोमध पांढरीशुभ्र भाताची मूद, त्यावर पिवळंधमक वरण, डावीकडे ओल्या खोबऱ्याची चटणी, एखादी कोशिंबीर, तळणाचा एखादा पदार्थ, सहसा शेवयांची किंवा गव्हल्यांची खीर, उजवीकडे पुन्हा पिवळी धमक बटाटयमची भाजी, वाटीत एखादं सार, एकावर एक रचलेल्या दोनचार पुऱ्या, त्या दिवसासाठी केलेला खास गोडाचा पदार्थ. हिरव्यागार केळीच्या पानात हे सगळे पदार्थ इतकी सुंदर रंगसंगती साधतात की बघतच राहावं. हा सगळा नैवेद्य देवाला दाखवल्यानंतर घरातल्या सगळय़ात लहानग्याला कौतुकाने ते ताट दिलं जातं आणि वर प्रसादाचं ताट आहे, त्यातलं काहीही टाकायचं नाही, अशी तंबीही दिली जाते.

Should Ganpati idol be immersed or not
गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करावे की करू नये? काय आहे चर्चा व लोकप्रवाद, जाणून घ्या सविस्तर…
Famous Ganpati Mandal in Pune
Ganesh Chaturthi 2023 : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे महत्त्व आणि इतिहास, जाणून घ्या; कसे घ्याल दर्शन?
How to Make Khirapat Recipe
Ganesh Chaturthi 2023: गणपतीच्या प्रसादात पहिला मान खोबऱ्याच्या खिरापतीचा! पाहा परफेक्ट पारंपरिक रेसिपी
gold price in Nagpur
सोने खरेदी करायला जाताय, मग ‘हे’ वाचाच, नागपुरात सोन्याच्या दरात…

हेही वाचा >>> गोविंदा आला रे..

कोणत्याही शुभकार्याची सुरुवात जशी गणरायाच्या पूजनाने होते, तसंच गणपतीच्या खाऊची ओळखही मोदकापासूनच होते. गणेशोत्सवातील आकर्षणाचा परमोच्च बिंदू म्हणजे ‘उकडीचे मोदक’. नैवेद्याच्या ताटातला हा हिरोच ! सगळय़ा पदार्थाच्या बरोबरीने ऐटीत बसलेला हा मोदक अस्सल मराठमोळय़ा खाद्य संस्कृतीचा राजदूत आहे. महाराष्ट्रात अर्ध्या घरांमध्ये उकडीचा तर अर्ध्या घरांमध्ये तळणीचा मोदक करण्याची पद्धत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांत घराघरांमध्ये असे उकडीचे मोदक बनतात तर मराठवाडा – विदर्भात मात्र सुक्या खोबऱ्याच्या सारणाचे तळलेले मोदक बनवले जातात. सुकं खोबरं आणि गुळाच्या जोडीला काजू, बदाम, केशर, जायफळ, वेलची, बेदाणे, चारोळी यांची मस्त चव या मोदकांमध्ये आपल्याला चाखायला मिळते. कोकणात सार्वजनिक वा घरगुती गणपतींचं आगमन हा एक जल्लोषच असतो. याविषयीची माहिती देताना रत्नागिरीची साक्षी परब ही तरुणी सांगते, ‘कोकणातील मूळ निवासी, व्यवसाय- उद्योग- नोकरीनिमित्ताने बाहेरगावी कुठेही गेले असले तरी आपल्या घरी गणपती उत्सवाला आवर्जून येतात. कोकणात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाला पाच भाज्या आणि मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. दारातल्या केळीच्या पानावर वरण, भात, भाज्या, उकडीचे मोदक आणि कोशिंबिरीचा नैवेद्य वाढला जातो. उकडीच्या मोदकांचा आणि सुग्रास भोजनाचा दरवळ वाडीतल्या सगळय़ाच घराघरांतून येत असतो. अख्खं कोकण खऱ्या अर्थाने हा सण साजरा करत असतं. महाराष्ट्रात इतरत्र दिवाळीत होणारी फटाक्यांची आतषबाजी कोकणात मात्र गणेश चतुर्थीलाच होते. त्या अर्थाने इथे चतुर्थीतच दिवाळी साजरी केली जाते’. गणेशोत्सवात करंज्या, मोदक, पंचखाद्य, लाडू असे फराळाचे पदार्थ घरी बनवले जातात. अगदी सगळय़ा घरात हमखास गोडाधोडाचे पदार्थ बनवण्याचे वर्षांतले हेच दिवस असतात. भजनाला येणाऱ्या मंडळींसाठी खास उसळीचा बेत आखला जातो. तर ऋषीपंचमीच्या दिवशी उंदरबीज असल्याने उंदराला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. विसर्जनाच्या दिवशी ‘म्हामदं’ घातलं जातं. ‘म्हामदं’ म्हणजे परिचितांना आपल्या घरी जेवायला बोलावणं. कोणी कोणाच्या घरी जेवायला जायचं हे आदल्याच दिवशी ठरवलेलं असतं. म्हामद्यालाही पाच भाज्या केल्या जातात. त्यात उसळ आणि वडे हमखास असतात. पडवळ, भेंडी, कोबी अशा भाज्या केल्या जातात. खीर किंवा तत्सम गोडाचा पदार्थ केला जातो. विसर्जनाच्या वेळी गणरायाला गूळ, खोबरं, फळं आणि काकडयमंचा नैवेद्य दाखवून त्याचा प्रसाद वाटला जातो, अशी माहिती तिने दिली. 

हेही वाचा >>> अवकाशाशी जडले नाते : भारताची गगनभरारी

ऋषी पंचमीच्या दिवशी करण्यात येणारी ऋषीची भाजी ही आपली नेहमीची मिक्स भाजी नाही. या भाजीची काही वेगळी वैशिष्टयम्े आहेत. या भाज्या पिकवण्यासाठी बैलाचे कष्ट  (आणि आजच्या युगात यंत्राचे) नकोत म्हणून फक्त आपोआप उगवलेल्या किंवा अंगणातल्या भाज्या वापरण्याची परंपरा आहे. या भाजीत फळभाज्या,पालेभाज्या आणि कंदमुळे अशा प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात. यात तेल-तूप, मिरची पूड आणि कुठल्याही प्रकारचे मसाले वापरले जात नाहीत. तिखटपणा येण्यासाठी फक्त हिरव्या मिरच्या वापरल्या जातात. कमी उष्मांक असलेली ही भाजी अत्यंत पौष्टिक आणि चवदार आहे. याचं कारण म्हणजे सेंद्रिय, हंगामी आणि ताज्या भाज्यांचा केलेला वापर व तेल आणि मसाल्यांचा अभाव. ऋषी पंचमीच्या दिवशी खाल्ला जाणारा भात आणि भाकरी यासाठी जे तांदूळ मिळतात तेसुद्धा बैलाचे कष्ट न घेता पिकवलेले असतात. त्या तांदळाला ‘पायनु’ असं म्हणतात. ऋषीमुनी अत्यंत साधे जीवन जगत असत. रानात मिळणारी फळं, भाज्या आणि कंद हेच त्यांच्या आहारात असे. ऋषी पंचमीच्या या जेवणातून एक प्रकारे ऋषींच्या सात्त्विक आहाराची आणि त्यांच्या जीवनशैलीची झलक अनुभवायला मिळते. ब्राह्मणांच्या काही पोटज्ञातींमध्ये ऋषीपंचमीच्या दिवशी गणपतीला नैवेद्यात खव्यारव्याचे मोदक दाखवले जातात.

गोव्यातील गणेशोत्सवातल्या नैवेद्याच्या परंपरेविषयी सांगताना ओंकार भावे हा तरुण सांगतो,‘आमच्याकडे गजाननाला नेवऱ्या (करंज्या) अधिक प्रिय असं मानलं जातं. आमच्याकडे मोदकांची पद्धत नाही. गोमंतकीय महिला ओल्या पुरणाच्या, किसलेल्या नारळापासून केलेल्या पंचखाद्याच्या, रव्याच्या पिठाच्या, तिखट पिठीच्या अशा विविध नेवऱ्या बनवतात. नेवऱ्या प्रमाणेच पुरण घातलेले चित्रविचित्र आकाराचे पदार्थही बनविले जातात. मुगाचे लाडू, चून घातलेली मुठली, पातोळय़ा, गोड पोहे, गुळाच्या पाकातील पीठ आवळे इत्यादी पदार्थही नैवेद्यात वापरले जातात. दुपारच्या जेवणात गोड पदर्थाची अक्षरश: रेलचेल असते. खीर, मणगणे, सोजी आणि गोडशें हे खास गोमंतकीय पदार्थ असतात. सोबत तळलेल्या पुऱ्या किंवा वडे-भाज्यांध्ये घोसाळयाची भाजी, भेंडीची भाजी, केळीची किंवा सुरणाची भाजी, कोबीची भाजी, शेवग्याच्या किंवा दुधयाच्या फुलांची भाजी, केळीच्या बोंडलांची भाजी, फणसाच्या कुवल्यांची किंवा नीरफणसाची भाजी, अशी तोंडाला पाणी आणणारी व्हरायटी असते. तायखिळा, कुड्डकी, आळु, तेरे आणि शेवगा (म्हिशग) अशा पालेभाज्यांची भाजी केल्याशिवाय गोवेकरांचे ताटच सजत नाही. ऋषीपंचमीच्या दिवशी पानात एकंदर एकवीस प्रकारच्या भाज्या वाढल्या जातात’. 

गौरींच्या नैवेद्यातील भाज्या- महाराष्ट्रात गौराईच्या पूजनाची आणि तिच्या होणाऱ्या लाडकौतुकाची पद्धत पावलापावलावर बदलत जाते. मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात तर ती घरागणिक बदलते. महाराष्ट्रात काही ठिकाणी गौरीच्या नैवेद्यात माठ व भेंडीची मिक्स भाजी बनवली जाते, काही ठिकाणी अंबाडीची भाजी, तर काही ठिकाणी १६ भाज्यांची मिक्स अथवा १६ वेगवेगळय़ा भाज्या बनवल्या जातात. त्याचबरोबर १६ चटण्या व १६ कोशिंबिरीदेखील बनवल्या जातात. नाशिकची  नूपुर सावजी ही तरुणी सांगते, ‘गौरींच्या नैवेद्याचा थाटमाट वेगळाच असतो. आधीपासून येणाऱ्या स्वयंपाकाच्या सुगंधाने वेड लागलेलं असतं. एखादा पदार्थ तोंडात टाकण्यासाठी हात शिवशिवत असतात, पण आईचं बारीक लक्ष असतं. नानाविध फोडण्यांचे, पदार्थ परतण्याचे, कुकरच्या शिट्टयमंचे आवाज कान टिपत असतात. त्यानंतर जे नैवेद्याचं ताट समोर येतं त्याला तोड नाही. चांदीच्या ताटात, योग्य जागेनुसार सजविलेले जिन्नस म्हणजे ‘प्लेटिंग’चा उत्कृष्ट नमुना होय. नाशिक, औरंगाबाद, मराठवाडा या भागांत गौरींना महालक्ष्मी म्हणण्याची पद्धत आहे. जेष्ठा व कनिष्ठा अशा दोन उभ्या महालक्ष्मीची पूजा या भागांत केली जाते. त्यांच्या नैवेद्याचा थाट हा दिवाळीच्या फराळासारखा असतो. त्यामुळे आमच्या इथे गौरींच्या नैवेद्यात शंकरपाळे, चकली, अनारसे, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, मुगाचे लाडू, कडबोळी, करंजी, दोन प्रकारचा चिवडा असा दिवाळीसारखा तिखट गोड फराळ बनवला जातो’. 

हेही वाचा >>> बलशाली भारत होवो..

पावसाळय़ाच्या दिवसांत मोठयम हिरव्या आणि पांढऱ्या सालीच्या दुधीभोपळय़ाच्या आकाराच्या काकडयम भरपूर प्रमाणात व स्वस्त मिळतात. या काकडीला ‘बालम काकडी’ असंही म्हणतात. याच काकडीपासून एक चविष्ट गोड पदार्थ देशस्थ ब्राह्मणांकडे गौरींना बनवला जातो ज्याला काकडीचे सांदण असं म्हणतात. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ब्राह्मणांमध्ये गौरीच्या नैवेद्यामध्ये निनाव हा पदार्थ हमखास असतोच. निनाव या शब्दाचा अर्थ ‘ज्याला नाव नाही’ असा तो निनाव. सीकेपींची खासीयत म्हणून हा पदार्थ सर्वश्रुत आहे. कणिक, बेसन पीठ व नारळाच्या दुधापासून बनवला जाणारा हा पदार्थ चवीला कमी गोड असतो.

आधी नैवेद्य म्हणून दाखवलेला पदार्थ नंतर प्रसाद होऊन आपल्या हातात येतो. या प्रसादाचं पहिलं द्रव रूप म्हणजे पंचामृत होय. दही, दूध, तूप, मध आणि साखर अशा पाच पदार्थाचं एकत्रित मिश्रण म्हणजे पंचामृत होय. हे पंचामृत चवीला चांगलं लागतंच, शिवाय पौष्टिकही असतं. महाराष्ट्रात काही भागात यात केळं कुस्करून घालतात. हा पंचामृताचा आणखी एक प्रकार आहे. डाव्या हाताच्या पंज्यावर उजव्या हाताचा पंचा उलटा ठेवून मधल्या खळग्यामध्ये पंचामृत घेऊन ते पिऊन नंतर न चुकता तो हात भक्तिभावाने डोक्यावरून फिरवताना मंडळी दिसतात. काहीजणांकडे हे पंचामृत रोजच्या रोज नैवेद्य दाखवलं जातं.

नैवेद्याची ही कथाच आगळी. हिरव्यागार केळीच्या पानावर हे सगळे पदार्थ इतकी सुंदर रंगसंगती साधतात की पाहातच राहावं. जेवायला सुरुवात करायच्या आधी हे नेत्रसुख व सर्व पदार्थाच्या सुवासाने नस्यसुख असा हा मामला असतो. हा सगळा नैवेद्य देवाला दाखवल्यानंतर हे सर्व पदार्थ हात व बोटांचा सुयोग्य वापर करून खाल्ले की स्पर्शसुखाचाही आनंद मिळतो आणि पंचेंद्रियं तृप्त होतात.

viva@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Traditional food prepared during ganesh chaturthi zws

First published on: 22-09-2023 at 06:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×