श्रुती कदम

महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. सध्या मुंबईत गणेश उत्सवाची धामधूम पाहायला मिळते आहे. आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले असून हळूहळू सर्व सणांची जोरदार तयारी सुरू झाली आहे, परंतु गणपतीचे घरी आगमन झाल्यानंतरही कोणत्या दिवशी कोणती वेशभूषा करायची हा प्रश्न कायम आहे. काहीतरी हटके, पण पारंपरिक असा लुक जर तुम्हाला या गणेशोत्सवात करायचा असेल तर तो कसा? या वर्षी गणरायाच्या उत्सवात तुम्हाला पारंपरिक कपड्यांना मॉडर्न टच देऊन खण, पैठणीचा पोशाख करता येईल.

साडी हा भारतीय महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कोणताही सणवार असो, साडीची फॅशन कधीच जुनी होऊ शकत नाही. गणेशोत्सवाच्या या भक्तीमय वातावरणात तुम्ही नक्कीच साडीची निवड करू शकता. यामध्ये महाराष्ट्राची शान म्हणून ओळखली जाणारी पैठणी आणि या पैठणीपासून तयार करण्यात आलेले स्त्री आणि पुरुषांचे कपडे गणेशोत्सवासाठी उत्तम पर्याय आहेत. फॅशनच्या असंख्य क्षेत्रात पैठणीने शिरकाव केला असून तिची आंतरराष्ट्रीय झेपसुद्धा उंचावली आहे. आजकाल तरुण वर्गामध्ये पैठणी फॅशन म्हणून प्रसिद्ध होत आहे. जसे कुर्ती, जाकीट, धोती, घागरा ओढणी, ब्लाऊज, वनपीस अशा अनेक पोशाखांवर पैठणीचा ठसा उमटला आहे. त्यामुळे पैठणीपासून तयार करण्यात आलेले हे प्रकार पारंपरिक पण फॅशनेबल लुक देतात.

हेही वाचा >>> परंपरा गणरायाच्या दागिन्यांची

पारंपरिक साडीला वेस्टर्न लुक कसा देता येईल याचा विचार हल्ली अधिक केला जातो. यासाठी सुंदर आणि उठून दिसणारा प्रकार म्हणजे खण. खणाच्या साडीप्रमाणे खणाचे कुर्ते, वनपीस यालाही अधिक पसंती मिळते आहे. यातही नथ, मोर, पोपट, कलमकारी पॅटर्नचे पॅचवर्क केलेले ड्रेस अधिक खुलून दिसतात. वनपीसमध्ये लॉँग आणि शॉर्ट असे दोन्ही प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. काहीसे वेस्टर्न स्टाइलमध्ये हे वनपीस शिवले तर ते अधिक उठून दिसतात. तर, तरुणांनाही खणापासून तयार करण्यात आलेल्या शर्ट आणि कुर्ते यामुळे पारंपरिक लुकबरोबरच नावीन्यपूर्ण साज करण्याची संधी मिळते. शिवाय, पैठणी आणि खणांपासून तयार करण्यात आलेले हे कपडे गणेशोत्सवच नव्हे तर पुढे येणाऱ्या सणांसाठीही उत्तम पर्याय ठरतात.

यासह महाराष्ट्रात ‘इरकल’ म्हणून प्रचलित असलेल्या, मूळची कर्नाटकच्या साडीपासूनदेखील कुर्ते, वनपीस, घागरा – चोली शिवली जाते. इरकलच्या कापडापासून पुरुषांसाठी शर्ट आणि कुर्तेही शिवले जातात. या सगळ्यात फ्युजन ड्रेस प्रकारांना उत्सवादरम्यान विशेष मागणी असते. यात गर्द निळा, लाल, हिरवा, मोरपिशी, कॉफी, ग्रे कलर हे रंग जास्त उठून दिसतात. लहान मुलींच्या कपड्यांमध्ये इरकलचा लेहेंगा अतिशय प्रसिद्ध आहे. तसेच हा लेहेंगा शिवण्यासाठी तुम्ही जुनी इरकलची साडी वापरू शकता. जर साडी नसेल तर इरकलचे कापड किंवा खणाचे कापडदेखील यासाठी वापरू शकता.

याशिवाय, चिकनकारी वर्क असलेल्या कपड्यांना तर सदासर्वदा अधिक मागणी असते. चिकनकारी डिझाइनच्या अगदी साध्या पद्धतीने शिवलेल्या कुर्तीपासून ते आधुनिक पद्धतीचे वनपीस किंवा ड्रेसेसनाही तरुणाईकडून विशेष पसंती दिली जाते. मुघलांद्वारे सुरू केलेल्या लखनौच्या प्राचीन कढाई कला असलेल्या कापडाला चिकन म्हटलं जातं. सुरुवातीला ही कढाई मलमलच्या पांढऱ्या कपड्यावर तयार केली जायची. आता रेशम, शिफॉन, नेट यांसारख्या कपड्यांमध्ये हा चिकनकारी प्रकार आढळतो. यामध्ये हलके रंग उठून दिसतात. सणसमारंभासाठी तरुणांना या चिकनकारी कापडाचे कुर्ते शोभून दिसतात, तर तरुणी आजही या चिकनकारी साड्या आवडीने नेसतात. चिकनकारी कुर्ते, लेहेंगे प्रसिद्ध करण्यात बॉलीवूडचा मोठा हात आहे. सुरुवातीला महानायक अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता हिने लग्नात चिकनकारी लेहेंगा परिधान केला होता. अलीकडे सोनम कपूर, दीपिका पदुकोण, कियारा अडवाणी, अथिया शेट्टीसारख्या अनेक नामांकित बॉलीवूड अभिनेत्रींनी लग्नात चिकनकारी वर्क असलेल्या लेहेंग्याला पसंती दिली. त्यामुळे आधीच लोकप्रिय असलेला हा चिकनकारी प्रकार लग्नसोहळ्यांपासून, सण-कार्यक्रम याचबरोबरीने दैनंदिन कार्यालयीन पोशाखासाठीही सर्रास वापरला जातो.

पैठणी या पारंपरिक प्रकाराबरोबरच पेशवाई हा अस्सल महाराष्ट्रात तयार होणारा साडीचा लोकप्रिय प्रकार आहे. ही साडी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तयार केली जाते. या साडीचा कपडा खूप सॉफ्ट असतो. पेशव्यांच्या काळात अशा पद्धतीच्या साड्यांचा वापर केला जायचा. सध्याच्या काळातही या पेशवाईला विशेष मागणी आहे. या पेशवाई साडीपासून तयार करण्यात आलेले वनपीस हे सण-उत्सवात तरुणींवर अधिक सुंदर दिसतात. आणि खूप भरजरी नक्षीकामाला दिलेला फाटा, मऊ कापड यामुळे हे वनपीस कम्फर्टेबलही असतात. त्यामुळे या पेशवाई साड्यांपासून वेगवेगळे पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ साधणारे वन पीस घालण्यावर तरुणींचा अधिक भर असतो. सध्याच्या काळात काम करून मिरवण्याचीही हौस असलेल्या स्त्रिया आणि पारंपरिक कपडे नव्या पद्धतीने घालण्याची आवड असलेले तरुण सतत काही तरी नवीन शोधात असतात. विशेषत: गणेशोत्सव, गौराईची पूजा ते मग नवरात्री, दिवाळीपर्यंत वेगवेगळ्या सणांचा पारंपरिक साजही जपायचा. आणि चारचौघांपेक्षा काहीतरी नवीन, वेगळा पोशाख केल्याचे समाधान मिळवण्यासाठी पैठणी, चिकनकारी, पेशवाई यांसारखे पारंपरिक कपड्यांचे प्रकार उपयुक्त ठरले आहेत. या पारंपरिक कपड्यांचे आधुनिक पद्धतीने शिवलेले ड्रेस, साड्यांचे वेगवेगळे ड्रेपिंग, वनपीस असे कुठलेही प्रकार नावीन्याचा आनंद देऊन जातात. अगदी तरुणांनाही पैठणीचे जॅकेट, कुर्ते अगदी टोपीही मिरवावीशी वाटते. त्याला जोड म्हणून याच कपड्यांचे दागिने अगदी नथीपासून कानातल्यापर्यंतचा नखरा जोडला की अगदी हटके लुकचा आनंद सहज साधला जातो.