शूज आणि हँडबॅग याची जोडी जमवावी लागते, हे आता बहुतेक सगळ्यांना समजायला लागलं आहे. म्हणूनच फूटवेअरच्या दुकानात हल्ली पर्स आणि हँडबॅगही दिसायला लागल्या आहेत. कुठल्या प्रसंगी, कुठल्या ड्रेसवर आणि कुठल्या कामाला तुम्ही बाहेर जाताय यानुसार हँडबॅग कशी घ्यायची हे ठरतं. शूजइतकी बॅग्जची यादी मोठी नसली, तरी प्रत्येक ऑकेजननुसार वेगवेगळ्या बॅग्ज नक्कीच पाहायला मिळतात. त्यामुळे सकाळचं ऑफिस किंवा कॉलेज, दुपारचं शॉपिंग किंवा संध्याकाळी पार्टीला जाताना तुमच्याकडे अनेक बॅग्जचे पर्याय उपलब्ध आहेत.
टोट  बॅग तमाम स्त्रीवर्गाचा लाडका बॅगेचा प्रकार म्हणजे टोट बॅग. मध्यम आकाराच्या आणि खांद्यावर सहज घेता येणाऱ्या या बॅग्जचा प्रकार सर्वच वयोगटाच्या स्त्रियांमध्ये प्रसिद्ध आहे. गंमत म्हणजे ज्या बॅगला आपण रोज सर्वसामान्य भाषेत ‘पर्स’ म्हणतो, त्याचंच फॅशन कॉन्शस सोफेस्टिकेटेड भाषेतलं नाव ‘टोट’ आहे.
स्लिंज बॅग टोट बॅगनंतर सर्वाधिक लोकप्रिय प्रकार म्हणजे स्लिंज बॅगचा. छोटीशी आटोपशीर बॅग कॉलेज तरुणींमध्ये बरीच प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे या बॅगेला लांब पट्टा असतो. ती खांद्यावर तिरकी घेता येते. त्यामुळे रेल्वे, बसने प्रवास करताना आटोपशीर आणि सुटसुटीत असा हा बॅगेचा प्रकार आहे. याच्यामध्ये अर्धचंद्रकोर आकाराची ‘हाफ मून बॅग’, फर असलेली ‘मफ बॅग’ असे प्रकारही आलेत.
क्लच कुठल्याही सणासमारंभाला किंवा पार्टीला जाताना क्लचला पर्याय नसतो. पार्टीला जाताना आपल्याला ‘टच-अप’चं सामान, थोडे पैसे, मोबाइल आणि एखादं क्रेडिट कार्ड इतक्याच गोष्टी मावतील अशी छोटी बॅग हवी असेत. त्या वेळी मोठी टोट बॅग डोईजड होते. त्यामुळे क्लच वापरणं कधीही उत्तम. याच कारणाने बहुतेकदा क्लच मस्त झगमगीत किंवा ग्लिटर्ड टेक्श्चरमध्ये पाहायला मिळतात.
मेसेंजर बॅग खांद्यावर सॅक मारून जगभ्रमंती करणाऱ्या जमातीमध्ये लोकप्रिय असलेली एका खांद्यावर घेता येणारी बॅग म्हणजे मेसेंजर बॅग. या बॅग्ज वापरणारे लोक रफ-टफ असतात, त्यामुळे या बॅग्जचे डिझाइन स्टाइलही तसेच रफ-टफ असते.
सॅशेल बॅग आयताकृती, फॉर्मल वापराच्या या बॅग्ज बहुतेकदा लेदरमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे कॉर्पोरेट विश्वामध्ये या बॅग्ज बऱ्याच प्रसिद्ध आहेत. लॅपटॉप बॅग्ज वेगळ्या कॅरी करायच्या नसतील तर या बॅग्ज उत्तम पर्याय ठरू शकतील.
डफल बॅग आयताकृतीच पण छोटय़ा हँडलच्या बॅग्जना डफल बॅग्ज म्हणतात. या बॅग्ज लहान प्रवासाला जाताना वापरायला अत्यंत सोयीच्या असतात. त्यामुळे छोटीशी ट्रिप प्लॅन करत असाल, तर एका डफल बॅगमध्ये आवश्यक सामान आणि खांद्यावर छोटी स्लिंज घेतली की तुमचा प्रवासाला जाताना स्टायलिश लुक तयार.