काही वर्षांपूर्वीपर्यंत खाणं म्हणजे आरोग्याच्या गरजा, डाएट, फिटनेस, वजन कमी करणं इतक्याच बाबींपुरतं मर्यादित होतं. मागच्या पिढ्यांमध्ये तर खाणं म्हणजे पोट भरायची सोय म्हणूनच बघितलं जात होतं. कामाला प्राधान्य देण्याच्या नादात कधी जमेल तेव्हा आणि जमलं तर खायचं, अगदी घरगुती जेवणाचे डबे घेऊन नोकरीला जाणारेसुद्धा वेळेवर जेवतीलच याची काही खात्री नसायची. त्यात त्यांच्या तब्येतीची होणारी हेळसांड त्यांच्या गावीही नव्हती. मात्र, जेन झी सगळ्याच बाबतीत बॅलन्सिंग करणारी म्हणून प्रसिद्ध आहे.

तशीच ती याही बाबतीत स्वत:ची पूर्ण काळजी घेण्याच्या प्रयत्नात असते. हेल्दी लिव्हिंगच्या नावाने मिलेनियल्सनी याची काही प्रमाणात सुरुवात केलीच होती. जेन झीने स्वत:ची पूर्णपणे काळजी घेण्याचं ठरवून आपल्या खाण्यावरही तितकंच लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते, सकाळचा नाश्ता किती पोषक आहे, दिवसभर पुरेसं पाणी प्यायलं जातं का, जेवण वेळेवर होतं का, याकडे आताची तरुणाई अधिक सजगतेने पाहू लागली आहे.

सोशल मीडियावरही घरचं अन्न, संतुलित आहार, हंगामी फळं, पारंपरिक पदार्थ आणि हेल्दी इटिंग हॅबिट्स यांची चर्चा वाढताना दिसते. काही वर्षांपूर्वी जे ‘डाएट’ म्हणून पाहिलं जात होतंं, ते आता ‘सेल्फ केअर’चा एक भाग मानलं जातं आहे. अन्न आणि मन यांचा संबंध आपल्या कल्पनेपेक्षा खूप जवळचा आहे आणि तो आताच्या नवीन पिढीने सीरियसली घेतला आहे. आपण जे खातो त्याचा परिणाम केवळ शरीरावरच नाही, तर आपल्या मन:स्थितीवरही होत असतो.

म्हणूनच आपण थकलो असलो, तणावात असलो किंवा भावनिकदृष्ट्या अस्वस्थ असलो की त्याचा परिणाम भुकेवर आणि खाण्याच्या सवयींवर दिसून येतो. काही लोकांना ताण आला की भूक लागत नाही, तर काहींना गोड, तिखट किंवा जंक फूड खाण्याची इच्छा होते. त्याचप्रमाणे आपण काय खातो याचाही परिणाम आपल्या मूडवर होतो. दिवसभर प्रोसेस्ड फूड, अति साखरयुक्त किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने काही काळासाठी उत्साह वाटतो, पण त्यानंतर थकवा, सुस्ती किंवा चिडचिड वाढू शकते.

याउलट फळं, भाज्या, कडधान्यं, ड्रायफ्रुट्स आणि घरगुती संतुलित आहार शरीराला नियमितपणे एनर्जी देतो, त्यामुळे मन अधिक स्थिर राहण्यास मदत होते. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने जेवणाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. खाण्याशी, पदार्थांशी, त्यांच्यामागच्या आठवणींशी असलेलं आपलं भावनिक नातं! म्हणूनच खूप जास्त स्ट्रेस असला तर अनेकांना घरगुती पदार्थांची आठवण येते. आईच्या हातची पोळी-भाजी, गरम वरणभात, खिचडी, उपमा किंवा आजीच्या हातचा एखादा आवडता पदार्थ हे फक्त खाणं नसतं. त्यांच्याशी आठवणी, माणसं आणि सुरक्षिततेची भावना जोडलेली असते. त्यामुळे असं अन्न खाल्ल्यावर मनालाही एक प्रकारचा दिलासा मिळतो.

आजची तरुण पिढी ‘कम्फर्ट फूड’ या संकल्पनेकडेही नव्या नजरेने पाहते आहे. पूर्वी पिझ्झा, बर्गर किंवा स्वीट्स एवढ्यांनाच कम्फर्ट फूड मानलं जात असे. मात्र आताच्या अनेक तरुण-तरुणींसाठी घरगुती आणि पारंपरिक पदार्थ हेच खरं कम्फर्ट फूड बनलं आहे. फक्त कम्फर्ट फूडच नव्हे तर कम्फर्ट इटिंगलाही आताची तरुणाई महत्त्व द्यायला शिकली आहे. सतत सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मवर डोळे चिकटवून बसण्याचे तोटे आताच्या पिढीला हळूहळू लक्षात यायला लागले आहेत.

त्यामुळे जेवताना काम बाजूला ठेवणं, छोट्या स्क्रीनवर बघत न बसणं, शांत वातावरणात हळूहळू जेवणं या सगळ्या गोष्टी तरुणाई पाळायला लागली आहे. ऑफिसमध्येसुद्धा छोटा तर छोटा पण वेगळा लंच ब्रेक घेणं, त्या वेळात काम न करणं, मीटिंग्सना नकार देणं अशा गोष्टी जाणूनबुजून पाळण्याचा प्रयत्न होताना दिसतो. खाण्याविषयीच्या या सजगतेचे दीर्घकालीन फायदेही महत्त्वाचे आहेत. नियमित आणि संतुलित खाण्याच्या सवयीमुळे एनर्जी टिकून राहते, कामावर लक्ष केंद्रित करणं सोपं जातं आणि दिवसातील ताणतणाव अधिक शांतपणे हाताळता येतात. सततचा थकवा, चिडचिड किंवा अस्वस्थता काही प्रमाणात कमी होऊ शकते.

मानसिक आरोग्याविषयीची चर्चा सगळीकडे वाढत असताना थेरपी, व्यायाम आणि मेडिटेशन यांच्यासोबत अन्नाचं महत्त्वही अधिक अधोरेखित होतं आहे. कदाचित म्हणूनच आजची तरुण पिढी एक साधा पण महत्त्वाचा मुद्दा आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आणते आहे. चांगलं अन्न हे केवळ शरीरासाठीच नाही, तर मनासाठीही आवश्यक आहे. म्हणूनच ‘गुड फूड, गुड मूड’ हा केवळ ट्रेंड नसून अधिक संतुलित, आनंदी आणि निरोगी जीवनाकडे नेणारा एक छोटासा पण प्रभावी बदल ठरतो आहे, जो आताच्या नवीन पिढीने अंगीकारायला सुरुवात केली आहे.
viva@expressindia.com