प्रतिक धानमेर हा व्यवसायाने वास्तुविशारद असला तरीही कलाकार, पुस्तकप्रेमी, लेखक याबरोबर तो निसर्ग संवर्धनाचे कामही जिव्हाळ्याने करत असतो. प्रतिकच्या पुस्तकवाटा त्याला निसर्गाच्या अधिक जवळ नेणार्‍या आहेत. कलेच्या आणि शब्दांच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारा हा संवेदनशील कलाकार राजकीय विषयांवरही तितक्याच पोटतिडकीने व्यक्त होत समाजासाठी जे हितावह आहे ते मांडत असतो. यासाठी अनेकदा तो ब्रेख्तपासून अनेक लेखकांचे दाखले देत असतो.

आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वेती मुरबाड हे त्याचं गाव. इथेच प्राथमिक शिक्षण घेत असल्यापासून त्याला वाचनाची आवड होती. तो म्हणतो, ‘मी पदवीधर होईपर्यंत आमच्या घरात टीव्ही वगैरे प्रकार नसल्याने वाचन हेच मुख्यत: मनोरंजनाचं आणि नवी माहिती मिळविण्याचं साधन होतं. यामुळे आपसूकच वाचनाची आवड निर्माण झाली. शालेय वयातच माझ्या मित्रामुळे आंबेडकरांच्या साहित्याची ओळख झाली. त्याचा खूप जास्त प्रभाव जीवनावर पडत गेला आणि यातून आपण जातीपाती आणि धर्माच्या पलीकडे जात काम करायला हवं हा दुष्टीकोन अधिक दृढ होत गेला.’ यामुळे पुस्तकांनी मला घडविण्यात महत्वाची भूमिका बजावली, असं त्याने सांगितलं.

प्रतिक वास्तुविशारद आहे. पर्यावरणपूरक वास्तूंची निर्मिती करण्यावर त्याचा मुख्य भर असतो. तो जेव्हा या क्षेत्रातील शिक्षण घेत होता तेव्हा या विषयावरील बहुतांश साहित्य हे इंग्रजीत होतं. याबाबत सांगताना तो म्हणाला, ‘मी मराठी माध्यमात शिकलो होतो आणि एकदम इंग्रजी पुस्तकांमधून या विषयावरील काही संज्ञा समजून घेणं सुरुवातीला अवघड वाटत होतं.’ अशावेळी प्रतिकच्या हाती अतुल देऊळगांवकर यांनी लिहिलेलं लॉरी बेकर यांचं चरित्र लागलं. हे पुस्तक त्याने केवळ इतर पुस्तकांप्रमाणे वाचून पूर्ण केलं नाही, तर तो लॉरी बेकर यांच्या कार्याने प्रभावित झाला. त्यामुळे त्याला वास्तुकलेत काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली. अगदी दुर्गम म्हणता येईल अशा भागातून आलेल्या प्रतिकला या पुस्तकाने दिशा दिली. दोन वर्षांपूर्वी जेव्हा देऊळगांवकर यांचं ‘लॉरी बेकर – ट्रुथ इन आर्किटेक्चर’ हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित होणार होतं, तेव्हा देऊळगांवकर अशा व्यक्तीच्या शोधात होते जो बेकर यांच्याप्रमाणे कार्य करतो आहे. तेव्हा त्यांना प्रतिकच्या कामाची माहिती मिळाली आणि त्यांनी त्याला त्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं. या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त प्रतिकने बेकर यांच्यापासून प्रेरणा घेत करत असलेल्या आपल्या कामाविषयी माहिती दिली होती. तो पुढे म्हणतो, ‘देऊळगांवकर सरांनी लिहिलेल्या लॉरी बेकर यांच्या चरित्राच्या चौदाव्या आवृत्तीत माझ्या आणि माझ्या फर्मच्या कामाविषयी माहिती देण्यात आली. हे माझ्यासाठी फार आनंददायी आहे.’

सध्या प्रतिक ‘पडघवली’ ही गो. नी. दांडेकर यांची कादंबरी वाचतो आहे. या पुस्तकात नष्ट होत जाणार्‍या खेड्याचे शब्दचित्र आहे. ‘मी स्वत: गावात राहत असल्याने ही कादंबरी वाचत असताना त्यातील काही संदर्भ हे लगेच लक्षात येत जातात’, असं तो म्हणतो. तसंच, नुकतंच त्याने ‘जल थल मल’ या सोपान जोशी यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचून पूर्ण केला. या पुस्तकाविषयी सांगताना, त्यात विष्ठा व्यवस्थापनावरील अनेक दुर्लक्षित मात्र महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली असल्याची माहिती त्याने दिली. प्रतिक काढत असलेल्या चित्रांमधूनही निसर्ग, गावाचं नैसर्गिक रुपडं, जैवविविधता आणि त्यांचं संवर्धन असे विषय डोकावतात. पण, या अभिव्यक्तीसाठी चित्रांच्या भाषेचा आधार घेतानाच तो शब्दातूनही व्यक्त होत असतो. कविता वाचन हाही त्याचा आवडीचा प्रांत आहे. यात बोरकर, मर्ढेकर, केशवसुत, बालकवी ही त्याची काही आवडीची कवीमंडळी आहेत. अशा दिग्ग्ज कवींच्या वाचनाने काव्य लेखनासाठीही त्याला प्रेरणा मिळाली, असं तो सांगतो. त्याला वास्तुकला या विषयावर कविता लिहायलाही आवडतात. ‘शाळा’ ही मिलिंद बोकिलांची कादंबरी त्याची आवडती असून आतापर्यंत त्याने ती सोळा वेळा वाचली आहे, असं त्याने सांगितलं. जेव्हा मी फार तणावात असतो तेव्हा ही कादंबरी मी आवर्जून वाचतो, असंही त्याने पुढे सांगितलं. तसंच, पु. ल. देशपांडे, प्रबोधनकार ठाकरे, विनोबा भावे, महात्मा गांधी, गोविंद पानसरे, हरी नरके आणि इरावती कर्वे यांचं साहित्य वाचायलाही त्याला आवडतं आणि त्यातून प्रेरणाही मिळते, असं त्याने सांगितलं.

प्रतिकला बालसाहित्य वाचनाचीही आवड आहे. त्यातील चित्रं त्याला अधिक आवडतात, असं त्याने सांगितलं. भोपाळच्या ‘एकतारा फाऊंडेशन’कडून अशी अनेक बालसाहित्यावरील पुस्तकं प्रकाशित केली जातात. यामुळे मी भोपाळला गेलो की तिथून बर्‍याच पुस्तकांची खरेदी करत असतो. अशा एखाद्या पुस्तकांसाठी चित्रं आणि रेखाटनं करण्याची संधी मिळावी, अशीही आपली फार इच्छा असल्याचं त्याने सांगितलं. प्रवासात असतानाही तो पुस्तकांचं वाचन करत असतो. ‘हिमाचल प्रदेशात एक सुंदर पुस्तकांचा कॅफे आहे, तिथेही जाऊन मला पुस्तकं वाचायला आवडतं’, असं त्याने सांगितलं. आपल्या गावातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरु करण्याचा मानस आहे, असंही त्याने सांगितलं.

नुकतंच वास्तुकलेत विद्यार्थ्यांबरोबर सुरू असलेल्या प्रतिकच्या कामाचा वेध घेणारं आणि मुख्यत: संशोधनावर आधारित असलेलं पुस्तक प्रकाशित झालं आहे. ‘जमीन, जल, जंगल, जनावर, जन:’ असं त्याने योगदान दिलेल्या या पुस्तकाचं नाव आहे. प्रतिक शिक्षणाने आणि व्यवसायाने वास्तुविशारद असल्याने वास्तुकलेवरील पुस्तकांचंही तितकंच वाचन करत असतो. ‘द बेअरफूट आर्किटेक्ट’ हे पुस्तक अगदी तुम्ही वास्तुविशारद नसलात तरीही वाचायला हवं, असंही तो सुचवतो. ‘जॉफ्री बावा, चार्ल्स कोरिया अशा प्रसिद्ध वास्तुविशारदांवर लिहिलेली पुस्तकंही सुंदर आहेत. तसंच, माझ्या मार्गदर्शक दिदी कॉन्ट्रॅक्टर यांनी त्यांच्या पुस्तकातून मातीचं अध्यात्म सुंदरपणे समजावून सांगितलं आहे. ‘ऑरोव्हिल अर्थ इ्स्टिटट्यूट’ या संस्थेने मातीच्या बांधकामासंबंधी लिहिलेली पुस्तकंही आवर्जून वाचण्यासारखी आहेत’, असं प्रतिकने सांगितलं. वास्तुकला या विषयावरील पुस्तकं खूप महाग असतात, असंही तो सांगतो. ‘वास्तुकला संदर्भातली सचित्र पुस्तकं तर विशेषत: महाग असतात. मी वास्तुकला शिकत असताना अनेक पुस्तकं महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून घ्यायचो. मात्र, जेव्हा मी नोकरी करायला सुरुवात केली, तेव्हा हळूहळू या विषयातील पुस्तकांचा संग्रह करायला सुरुवात केली. वास्तुकला या विषयावर संदर्भग्रंथ मराठीत फारच कमी आहेत. तसंच, विश्लेषणात्मक आणि शास्त्रीय लेखनाची कमतरताही जाणवते’, असं त्याने स्वत:च्या अनुभवावरून सांगितलं. त्यामुळे वास्तुकला विषयावर, त्यातील प्रबंधांवर किंवा संशोधनांवर आधारित पुस्तकं लिहिली जाण्याची गरज आहे, हेही प्रतिकने अधोरेखित केलं.

viva@expressindia.com