गायत्री हसबनीस

गेल्या वर्षी हिवाळ्यात कॉटनच्या कपडय़ांना सगळ्यांनी अधिक पसंती दिलेली होती त्यामागे कारणही मुंबईतील तापमान हे होते. यावर्षी चित्र वेगळे आहे. हिवाळ्याची चांगली सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता दुपारचे थोडे ऊन सोडल्यास पहाटे, सकाळी, संध्याकाळी आणि रात्री थंडीचे गार वारे अंगाला झोंबू लागले आहेत. त्यामुळे अशा मोसमात तुम्ही कॅज्युअल पण स्टायलिश कपडे परिधान करू शकता, अर्थात तेही आपापल्या निवडीनुसार. हिवाळ्याच्या निमित्ताने बाजारात एकूण झालेले बदल आणि त्यानुसार खास तरुणाईसाठी सजलेले विंटर कलेक्शन यावर टाकलेली एक नजर..

ट्रेण्डी अ‍ॅक्सेसरीज

कानातले, चेन आणि अंगठय़ा विशेषकरून हिवाळ्यात जास्त वापरले जातात, कारण कपडय़ांमध्ये सटल रंग ट्रेण्डी असल्याने या अ‍ॅक्सेसरीजला तरुणाईकडून जास्त पसंती मिळते. यंदा खरंतर खूप मिनिएचर म्हणजे लहान आकाराचे मेटलचे दागिने अधिक चलतीत आहेत. हे हलकेफुलके मेटलचे दागिने तुम्ही सटल रंगाच्या जम्पसूटवर, जॅकेटवर घालू शकता. छोटेखानी बॅग्जही सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. यामध्ये ‘पोटली’ हा प्रकार जास्त चालतो आहे. वेस्टर्न आऊटफिट्सवरही शब्दश: हातात अडकवून या पोटली बॅग्ज तुम्ही मिरवू शकता. राजस्थानसारख्या ठिकाणी गेल्या काही दिवसात इन्टाग्रामवरून पाहिलंत तर परदेशी तरुणी त्यांच्या पाश्चात्त्य पेहेरावात हातात पोटली धरून फोटोशूट करतायेत इतकी पोटलीची फॅशन गाजते आहे. खरंतर एथनिक वेअरसोबत किंवा लग्नसराईत वधूच्या हातामध्ये ही पोटली बॅग अधिक खुलून दिसते आणि वापरली जातेसुद्धा! पण आश्चर्य म्हणजे आधुनिक पेहराव म्हणून गाऊन किंवा जीन्स आणि जॅकेटसोबतही पोटली घेतली जाते. या पोटली बॅग्जसाठी रंगांचे काही बंधन नाही, पण एक आहे ते म्हणजे पिस्ता कलर या बॅग्जमध्ये अव्वल ठरला आहे. हिवाळ्याचे दिवस म्हटले की हातमोजे, मोजे, डोक्यावर वूलन टोपी या गोष्टी आवश्यक यादीत गणल्या जातात. त्यातूनही वूलन कॅप बाजारात दाखल झाल्या आहेत व त्यांची खरेदीही जोरात सुरू आहे. विशेषत: पर्यटनाला चालना मिळल्याने खरेदीस उधाण आले आहे. यामध्ये करडय़ा रंगाला अधिक मागणी असून पाचशे रुपयांपासून तुम्ही वूलन कॅपची खरेदी करू शकता.

लग्नसराईसाठी काही विशेष..

यंदा वेडिंग सीझनसाठी लेहेंगा, गाऊनची चलती आहे, कारण नोव्हेंबर आणि पुढचा अख्खा डिसेंबर महिना हा लग्नसराईचा आहे. त्यामुळे लगीनघाई सुरू असल्याने त्याची खरेदीही वधू आणि वरपक्षाकडून जोरदार होते आहे. ‘कल्की फॅशन’कडून यंदाच्या वर्षी सिल्क कपडे बाजारात आले आहेत. त्यात लेहेंग्यावर त्यांनी अधिक भर दिला आहे. कल्की फॅशनचे संचालक सौरभ गुप्ता सांगतात की ‘मेटॅलिक रंग हे सध्या नववधूचे आवडीचे रंग आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत होणाऱ्या लग्नसराईच्या निमित्ताने म्हणूनच आम्ही वेलवेटचे कलेक्शन आणले आहे, जे खास विंटर वेडिंग सिझनसाठी  आहे.’ यंदा रंगही खूप सौम्य आणि आकर्षक असे आहेत. जांभळा रंग आणि केशरी रंग सध्या ब्राईडल वेअरमध्ये नंबर एक आहे. तुम्हाला यात बऱ्यापैकी क्रीम कलरही दिसतील. ज्याबरोबर ऑफ व्हाइट, मळकट पिवळा, गोल्डन, शिमर असे रंग ट्रेण्डमध्ये आहेत. फॅशन डिझायनर सब्यासाची आणि अमित अगरवाल यांचे कलेक्शन लक्षवेधी आहे.

सिंपल पण स्टायलिश लूक

हूडी, जॅकेट्स, डेनिम, श्रग असे प्रकार हिवाळ्यात नेहमीच ट्रेण्डमध्ये असतात. त्यापैकी काही तरी एक जास्त डिमांडमध्ये असते. यंदा जॅकेट टॉप लिस्टवर आहे आणि तेही लॉन्ग ब्लेझर जॅकेट. मुलींमध्ये सध्या या जॅकेटची चलती आहे, तर मुलांमध्ये हूडी आणि जीन्स जॅकेट अधिक लोकप्रिय ठरले आहेत. मुलींना हल्ली हरतऱ्हेची फॅशन करायला वाव आहे. त्यामुळे जीन्स, त्यावर सेमी कुर्ता आणि वर ब्लेझर जॅकेट असा फंडाही बऱ्याच जणी आजमावत आहेत. दुसरं म्हणजे ब्लेझर स्टाइलचा वनपीस आणि बेल्टही मुलींकरिता ट्रेण्डमध्ये आहेत. त्याखेरीज लेहेंगा, कुर्ता आणि पायजमावर कुर्ताही यंदा मुली मोठय़ा प्रमाणात परिधान करत आहेत. या हिवाळ्यात जांभळा, करडा, पांढरा, काळा, गुलाबी, हिरवा आणि लाल असे रंग आऊटफिट्समध्ये ट्रेण्डी आहेत. मुलींप्रमाणे मुलांना कुर्ता आणि जीन्सही पसंत पडत आहेत किंबहुना कुर्ता आणि जॅकेट असा पेहेरावही आजमावला जातो आहे. वेस्टर्न आऊटफिट म्हणाल तर मुलं हुडी, स्वेटशर्ट आणि शर्ट्सना पसंती देत आहेत. मुलांसाठी प्रिंटेड झीपर्सही ट्रेण्डमध्ये आहेत. यावर ४५ टक्के सूट बऱ्याच ऑनलाइन संकेतस्थळांनी जाहीर केली आहे.

चपलांचा तामझाम

लेदरचे बूट सध्या मुलांमध्ये आणि मुलींमध्ये ट्रेण्डी आहेत. यावेळी पायाला नरमपणा यावा म्हणून स्पोर्ट्स शूज, स्निकर्स, कॅनव्हास इत्यादी पद्धतीचे शूजही उपलब्ध आहेत. चपलांचा तामझाम यंदा फार अधिक आहे, कारण हिल्स, स्लिपर्स, लेदर बूट, सेमी हिल्स, पेन्सिल हिल्स, सिंड्रेला शूज, कॅनव्हास, स्निकर्स असे अनेक प्रकार ट्रेण्डमध्ये आहेत. एवढेच काय तर जूती, मोजडी, कोल्हापुरी चप्पलसुद्धा या मोसमात तुम्ही विकत घेऊ  शकता. एक हटके स्टाईल तुम्ही करू शकता. ही स्टाइल जुनीच असली तरी यंदा सर्वात अधिक लोकप्रिय आहे ती म्हणजे मुली लेदरचे झीपर असलेले बूट घालू शकता आणि त्यावर ट्रेण्डमध्ये असलेले ब्लेझर जॅकेट्स किंवा डेनिम जॅकेट्स घालून शोल्डर बॅग्जसह मिरवू शकता.

viva@expressindia.com