scorecardresearch

विष्णूज् मेन्यू कार्ड : भाज्यांचे स्नॅक्स

रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय.

विष्णूज् मेन्यू कार्ड : भाज्यांचे स्नॅक्स

रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय.

मागील भागाप्रमाणे या भागातसुद्धा आपण भाज्यांचा वापर करून तयार केलेले काही न्याहारीचे पदार्थ बघणार आहोत. यात काही पारंपरिक प्रकार तर असतीलच पण काही नवीन प्रकार आहेत.

कुरकुरीत भेंडी
भाजी म्हणून भेंडय़ांचा खूप उपयोग होतो. भेंडय़ांची भाजी पौष्टिक व अत्यंत आरोग्यदायक असते. काटेदार व खरबडीत भेंडय़ांपेक्षा कोवळ्या व मऊ भेंडय़ा अधिक चवदार असतात. जुन्या भेंडय़ा वातड होतात व त्याची भाजी चांगली होत नाही. जून भेंडय़ा भाजीसाठी निरुपयोगी असतात. भेंडय़ांपासून सांडगे, सूप, भाजी, कढी, रायते वगैरे लोकप्रिय पदार्थ आहेत. याशिवाय भेंडी सुकवून ज्यावेळी भाज्यांची कमतरता असते त्यावेळी उपयोगी येऊ शकते.
भेंडी हा असा भाजीचा प्रकार आहे की जो, ताजा तयार केल्याबरोबरच खाल्ला तरच छान लागतो.
साहित्य : बारीक लांब चिरलेली भेंडी २ वाटय़ा, आलं लसूण पेस्ट २ चमचे, अध्र्या लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, तिखट, हळद चवीनुसार, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, बेसन अर्धी वाटी, तेल तळायला
कृती : बारीक चिरलेल्या भेंडीमध्ये कॉर्नस्टार्च सोडून सर्व जिन्नस घालावे. दहा मिनिटे मुरल्यानंतर भेंडीचे बारीक लांब तुकडे कॉर्नस्टार्च व बेसनाच्या द्रावणात घोळवून डीप फ्राय करावे व त्यावर थोडा चाट मसाला घालावा. अशा प्रकारे तयार झालेली कुरकुरीत भेंडी स्नॅक्स म्हणून सुद्धा खाता येते.

दोडक्याचे मुटकुळे
हा प्रकार मी लहान असल्यापासून खात आलो आहे. एक अगदी चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ असे याचे वर्णन करावे लागेल. हा प्रकार दोडक्याला सुटलेल्या पाण्यात शिजत असल्यामुळे याला एक वेगळी चव आहे.
साहित्य : दोडके ३०० ग्रॅम, कणीक १ वाटी, बेसन अर्धी वाटी, तेल ४ चमचे, मोहरी १ चमचा, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, हिंग चिमूटभर, कोथिंबीर.
कृती : प्रथम अर्धी वाटी कणीक, अर्धी वाटी बेसन चांगले भाजून घ्या. २ चमचे तेल घेऊन त्यामध्ये मोहरी फोडणीला टाकून थोडी आल्याची पेस्ट घाला. त्यानंतर हळद, पाव चमचा आमचूर पावडर, चवीनुसार साखर, तिखट, हिंग व मीठ घालून ही दोन्ही पीठं त्यामध्ये परतून घ्या. थोडे पाणी शिंपडून त्याचे मुटकुळे बनवून घ्या. ३०० ग्रॅम दोडके व्यवस्थित चिरून त्याला हींग, मोहरी, हळद व तिखटाची फोडणी देऊन चवीनुसार मीठ घाला. त्यावर हे मुटकुळे ठेवून झाकण लावून बंद करा.. दोडक्याला जे पाणी सुटेल त्या पाण्याच्या व वाफेवर मुटकुळे शिजू द्या. कोथिंबीर घालून खायला द्या.
टीप : यात आपण कणीक आणि बेसन वापरले आहे. पण याशिवाय तुम्ही एखादी डाळ, ज्वारी, बाजरीचे पीठ किंवा थालीपिठाची, चकलीची भाजणी वापरू शकता.

पालकाचे दहीवडे
दही वडा हा असा प्रकार आहे की जो जास्तीत जास्त लोकांना आवडतो. ज्याला भूक नसेल असा माणूसही दहीवडा खातो. आपण जे नेहमी वडे खातो त्यातलाच हा प्रकार, पण यात पालक वापरल्यामुळे त्याला हिरवा रंग येतो व पांढरे शुभ्र दही आणि त्याबरोबर हिरव्या रंगाचा वडा दिसायला छान तर आहेच व चवीला सुद्धा वेगळा आहे.
साहित्य : उडदाच्या डाळीचा रवा १ वाटी, पालकाची पेस्ट अर्धीवाटी, मीठ चवीनुसार, सोडा १ चमचा, कोथिंबिरीची पेस्ट पाव वाटी, ते तळायला, घोटलेले घट्ट दही २ वाटय़ा, चाट मसाला १ चमचा.
कृती : प्रथम उडदाच्या डाळीचा रवा काढून त्यात पालकाची पेस्ट, मीठ, सोडा व कोथिंबिरीची पेस्ट घालून मिश्रण अर्धा ते एक तास भिजवून ठेवणे. त्यानंतर त्याचे वडे काढून घेणे. व ते वडे थंड पाण्यात घालून दोन ते तीन मिनिटांनी बाहेर काढून घेणे. नंतर घोटलेल्या घट्ट दह्य़ात चाट मसाला घालून खायला द्यावे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-08-2013 at 01:03 IST

संबंधित बातम्या