बदलत्या जीवनशैलीत वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेण्याची ओढ तरुणाईत वाढताना दिसते आहे. केवळ प्रसिद्ध पर्यटनस्थळांपुरते मर्यादित न राहता, नैसर्गिक, शांत आणि अनोखे अनुभव देणाऱ्या ठिकाणांकडे त्यांचा कल वाढतो आहे. कोकणातील कासव महोत्सव असो, किल्ल्यांची भव्यता असो किंवा देवराई-टेकड्यांची शांतता… अशी प्रत्येक ठिकाणं एक वेगळा अनुभव देत असतात. निव्वळ प्रसिद्ध जागांवर भ्रमंती करण्यापेक्षा अशा पद्धतीचे नवे स्पॉट्स आणि नवे अनुभव शोधण्यावर सध्या तरुणाई भर देते आहे.

प्रसिद्ध ठिकाणांपलीकडे जाऊन अशा नव्या ठिकाणांना भेट देणे, हीच खरी वेगळी आणि समृद्ध अनुभव देणारी सफर असं मानणाऱ्या तरुणाईसाठी अशाच काही वेगळ्या अनवट जागांची माहिती देण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केला आहे. कोकणाबरोबरच महाराष्ट्रातील इतर ठिकाणंही नव्या अनुभवांसाठी चर्चेत आहेत. निसर्गरम्य किल्ले, शांत तलाव, डोंगरमाथे आणि ग्रामीण भागातील जीवनशैली यामुळे तरुणांना वेगळा अनुभव मिळतो. अशा ठिकाणी गर्दी कमी असते आणि निसर्ग अधिक जवळून अनुभवता येतो, हीच या स्पॉट्सची खासियत ठरते.

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास गावात गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी कासवांच्या अंडी उबवण्याच्या काळात कासव महोत्सव आयोजित केला जातो. स्थानिक स्वयंसेवक आणि पर्यावरणप्रेमी यांच्या मदतीने कासवांची पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडली जातात. या प्रक्रियेचे साक्षीदार होणे, हा पर्यटकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरतो आहे. वेळास जवळच असलेला बाणकोटचा किल्ला देखील आता आकर्षणाचे केंद्र ठरू लागला आहे. फारसा कोणाला परिचयाचा नसलेला बाणकोटचा किल्ला हा सुंदर निसर्ग आणि ऐतिहासिक वारसा दोन्हीची अनोखी अनुभूती आहे.

ही दोन्ही ठिकाणे शांत आणि निसर्गरम्य आहेत. या ठिकाणी जास्त वर्दळ नसल्याने निसर्गाचा पुरेपूर आनंद घेता येतो. सोबतच वेळासचा समुद्र, बाणकोटची खाडी ही ठिकाणेदेखील महत्त्वाची आहेत. वेळासला येऊन हा निसर्ग पाहायचा तर परिवहन मंडळाच्या एसटी बसने वेळासला जायला मुंबई सेंट्रल ते वेळास अशी बस आहे. याचबरोबर स्वतःची गाडी देखील घेऊन जाता येते. वेळासला होम स्टे आहेत, जिथे राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय असते.

वेळासमधील कासव महोत्सवाच्या धर्तीवर रत्नागिरीतील आंजर्ला आणि दाभोळ गावातही कासव महोत्सव आयोजित केला जातो. कासव संवर्धनासाठी केलेले प्रयत्न आणि स्थानिक लोकांचा सहभाग यामुळे हा महोत्सव पर्यटकांना आकर्षित करतो. येथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाशी जवळीक साधण्याची आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जाणून घेण्याची संधी मिळते. याचबरोबर कोकणच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या प्राचीन देवराया म्हणजे निसर्ग आणि मानवामध्ये शेकडो वर्षांपूर्वी झालेला एक अलिखित सांस्कृतिक आणि पर्यावरणीय करार आहे.

मानवी हस्तक्षेप कमीतकमी असल्यामुळे, येथील परिसंस्था नैसर्गिकरित्या उत्क्रांत होऊन एका अत्यंत स्थिर अवस्थेला पोहोचलेली आहे. पूर्वजांनी कोणत्याही आधुनिक पदव्या नसताना, केवळ निसर्गाप्रती असलेल्या अढळ श्रद्धेतून आणि दूरदृष्टीने हा वारसा जपला. देवराईमध्ये शिरल्यावर आपल्याला जी विलक्षण शांतता आणि प्रसन्नता जाणवते, त्यामागे एक भक्कम परिसंस्थात्मक आधार आहे. आभाळाला भिडणाऱ्या वृक्षांपासून ते जमिनीवरच्या पालापाचोळा सडवणाऱ्या बुरशीपर्यंत, प्रत्येक घटक या अधिवासात महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

जंगलाचे थर आणि सजीवांमधील सहजीवन यामुळे ही परिसंस्था स्वयंपूर्ण असते. ही केवळ झाडांची गर्दी नसून एक अनमोल इकोलॉजिकल ट्रेजर आहे. पूर्वजांचा या राई राखण्यामागे हाच उद्देश होता की, बाहेरील जगात कितीही बदल झाले तरी निसर्गाचे हे मूळ आणि शुद्ध स्वरूप पिढ्यानपिढ्या टिकून राहावे. शाश्वत पर्यटनाच्या आणि मनशांतीच्या शोधात असणाऱ्या खऱ्या निसर्गप्रेमी पर्यटकासाठी देवराई म्हणजे एक मोठी पर्वणीच आहे. कोकणातील जवळ जवळ बऱ्याच गावात ग्रामदैवतेची राखलेली देवराई आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कादिवली, कुडावले, ताडील, डौली, गवे, गावतळे, कुंभवे, नवशी इत्यादी गावांमध्ये या देवराई पाहायला मिळतात.

भ्रमंतीसाठी आणखी वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर रत्नागिरीमधील मंडणगड तालुक्यातील उन्हेरे हे गाव नैसर्गिक गरम पाण्याचे झरे (कुंड) यासाठी प्रसिद्ध आहे, जे मंडणगड तालुक्यापासून सुमारे २३ किमी अंतरावर आहे. या ठिकाणी नदीकाठी निसर्गरम्य वातावरणात गंधकयुक्त (सल्फर) गरम पाण्याचे कुंड आहे. येथील पाणी नैसर्गिकरित्या गरम असते आणि त्यात गंधकाचे प्रमाण जास्त असते. या ठिकाणी स्नानासाठी स्वतंत्र आणि व्यवस्थित बांधलेले कुंड आहे. एकंदर मंडणगड तालुक्यात वेळासचा समुद्र, बाणकोटचा किल्ला आणि गरम पाण्याचे कुंड ही ठिकाणे पाहता येतील.

निसर्गाशी आपलं नातं जोडून देणारे हे नवे स्पॉट्स म्हणजे केवळ नकाशावरची ठिकाणं नाहीत, तर अनुभवाची नवीन शिदोरी जोडणारे खजिने आहेत. या वाटांवर चालताना सापडतात शांत क्षण, निसर्गाची साथ आणि आठवणींची शिदोरी जी परतल्यावरही मनात रेंगाळत राहते. त्याच त्याच पर्यटन स्थळांना भेट देण्यापेक्षा अशी काही ठिकाणे एक वेगळा अनुभव देऊन जातील हे मात्र नक्की!