हरवलेल्या वाटा नव्याने शोधताना..
नव्या पिढीची जुन्या संस्कृतीशी, परंपरेशी तुटलेली नाळ.. आधीच्या पिढीसाठी हा विषय नेहमी नाराजीचा! पण याच नव्या पिढीतले काही तरुण कलाकार आवर्जून जुन्या वाटा धुंडाळत आहेत आणि त्यातून आजचा रीलेव्हन्स शोधत आहेत. जुन्या संस्कृतीची नव्या तंत्रज्ञानाशी सांगड घालून काही तरी नवीन द्यायचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या देशातल्या वैविध्यपूर्ण कलात्मक परंपरेचा आदर करीत या ‘व्हिंटेज इंडिया’ची नव्याने ओळख करून देत आहेत. अशाच काही प्रयत्नांविषयी..

फॅशन विश्वात काम करणारा मुंबईचा रुणव भारती प्राचीन भारतीय मंदिरांवरील शिल्पकाम बघून थक्क झाला. या शिल्पकलेतील नक्षीची आधुनिक पेहरावाशी सांगड घालत आपली संस्कृती जपण्याचं प्रयत्न तो करीत आहेत. कालौघात हरवलेली ही दगडावरची डिझाइन्स कापडावर कशी उमटली याची कहाणी त्याच्याच शब्दांत..
भारतात पूर्वीपासून विविध संस्कृती एकत्र नांदत आहेत. आपल्या या वैविध्यपूर्ण परंपरेचा आपल्याला अभिमान आहेच. पण या वैविध्याने एक सुंदर कलेचा ऐतिहासिक ठेवादेखील दिलाय. याची झलक देशाच्या विविध भागांमध्ये विविध पद्धतीने दिसते. राजस्थानला जावे तर भलेमोठे पण बारीक कलाकुसर केलेले राजवाडे आपल्याला थक्क करतात. गुजरात तर विविध एम्ब्रॉडरी आणि डाइंग पद्धतींचे माहेरघरच. दक्षिणेतील मंदिरांइतका पौराणिक कथांचा संग्रह जगातील कुठल्याही वाचनालयात सापडणार नाही. तर बंगालमधील कारागिरीला जगात कुठेच तोड नाही. आपल्याला इतका समृद्ध इतिहास मिळाला असताना नावीन्याच्या शोधार्थ आपल्याला इतर कुठे पाहण्याची गरजच नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे गेली तीन र्वष या इतिहासाची फॅशनविश्वाशी नाळ जोडण्याचा प्रयत्न मी करतो आहे.
माझ्या मामाचा टेक्स्टाइलचा व्यवसाय आणि वडिलांना असलेली पेंटिंगची आवड यामुळे मीही या क्षेत्राकडे आकर्षित झालो. मुंबईमधून टेक्स्टाइल आणि फॅशनमध्ये रीतसर शिक्षण मिळविल्यानंतर नोकरी करीत असतानाच मी मुंबई विद्यापीठातून ‘अस्थेटिक’ विषयाचा कोर्स करीत होतो. तेव्हा माझी ओळख भारतातील या समृद्ध परंपरेशी झाली, मला फिरायची आणि छायाचित्रे टिपायची.
आवड होतीच. त्या वेळी एक कल्पना मनात घेऊन मी भटकंती करायला सुरुवात केली. भारताच्या विविध राज्यांमधील मंदिरे, राजवाडे यावरील कोरीव काम, नक्षी मी कॅमेऱ्यात बंदिस्त करू लागलो. या दरम्यान वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या मुंबईतील चर्नी रोड केंद्रातून ब्लॉक प्रिंटिंग आणि इतर प्रिंटिंग पद्धतींचे प्रशिक्षणही घेत होतो. त्या वेळी आपल्याकडील मंदिरांवरील कोरीव नक्षीकामाचे ब्लॉक करून त्याचा उपयोग ब्लॉक प्रिंटसाठी करण्याची कल्पना मला सुचली.
प्रिंटिंगसाठीचे हे ब्लॉक मुंबईमध्ये फार कमी तयार होतात. दरम्यानच्या मी जयपूरला गेलो असता, तिथे ब्लॉक तयार करणाऱ्या कारागिरांशी माझी ओळख झाली. हे कारागीर अत्यंत कमी दरात, प्रचंड मेहनत घेऊन हे ब्लॉक घडवत असतात. पण त्यांची कारागिरी वाखाणण्याजोगी असते. त्यांची नवी पिढी कामाच्या अभावाने या व्यवसायापासून दूर गेली आहे. त्यामुळे ही कला कुठे तरी काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहे. मुंबईला आल्यावर या कारागिरांना मी माझ्याकडील काही डिझाइन्सचे ब्लॉक्स करायला दिले. यासाठी मी काढलेल्या फोटोंतून मंदिरावरचे मोटिफ्स संगणकामध्ये परत डिझाइन करून घेतले. त्यानंतर घरातील काही कापडांवर मी हे ब्लॉक प्रिंट करून प्रयोग करून बघितले. सुरुवातीला स्वत:साठी, घरातील चादरी, उशांची कव्हर्स प्रिंट करत होतो. लोकांना हे आवडल्यावर त्यांनीही मला ऑर्डर्स देण्यास सुरुवात केली. मुंबईतील काही नामवंत बुटिक्सनासुद्धा मी हे प्रिंट देत गेलो. राजस्थानमधील अजमेर, जयपूर, उदयपूर येथील अनेक किल्ल्यांना, हवेल्यांना मी भेटी दिल्या आहेत.
दिल्लीतल्या जुन्या वास्तू, आग्य््रााचा ताजमहाल, फत्तेपूर सिक्री यांसारख्या वास्तू मी फिरलो आहे. कर्नाटकमधील बदामी, केरळमधील मंदिरे, संपूर्ण गुजरात फिरलो आहे. गणपतीपुळ्याच्या मंदिरातील कारागिरीही मी टिपली आहे. अमरावती आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत
मुक्तागिरी येथे जैन मंदिरे आहेत. त्यांच्यावरील कलाकुसर वाखाणण्याजोगी आहे. त्या काळी आजच्या प्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान नव्हते. मोजमापाची साधने नव्हती. तरीही त्या काळातील कारागिरांनी बारकाईने आणि अचूक मोजमाप करून हे कोरीव काम केलेय. त्यांची ही मेहनत लोकांसमोर नव्या स्वरूपात येणे गरजेचे आहे, असे मला सतत वाटते.
एरवी बाजारात मिळणाऱ्या अनारकली, शेरवानीवर एकाच पद्धतीची मशीन एम्ब्रॉयडरी असते. त्याऐवजी असे प्रिंट्स वापरले तर तुम्हाला नवीन लुकही मिळतो आणि चारचौघांत उठूनही दिसता येते. या डिझाइन्समध्ये त्यांचा एक एथनिक आणि युनिक चार्म आहे. तो तुमच्या कपडय़ांना अजूनच उठावदार करतो. आग््रयाच्या फत्तेपूर सिक्रीच्या किल्ल्याच्या दगडाचा रंग लाल आहे. जुने बांधकाम असल्याने त्याला काळपट चकाकी आली आहे. या किल्ल्यावरील मोटिफ उचलताना मी गडद लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाची बोर्डर प्रिंट केली आणि किल्ल्याचा लुक साडीत उतरवण्याचा प्रयत्न केला. या प्रिंट्सच्या भोवती कित्येकदा गुजरातमधील कच्छी वर्क, थ्रेड वर्कसारखी एम्ब्रॉयडरी करण्याचा प्रयोगही मी केला. त्यातून कपडय़ांचे रूप अजूनच उठून दिसते. अशा छोटय़ा-छोटय़ा
बारकाव्यांमुळे या डिझाइन्सना नवेपणा मिळतो आणि आजच्या फॅशनचा भाग बनून जातात. जयपूर, उदयपूरमधील राजवाडे, ताजमहालसारख्या वास्तूंमध्ये पाहायला मिळणारे बारीक नक्षीकाम आपल्याला चादरी, उश्यांच्या कव्हर्सना बॉर्डर्स म्हणून वापरता येते. तर मंदिरांच्या भिंतींवरील यक्ष, देवदेवतांच्या मूर्त्यांची डिझाइन्स ड्रेस किंवा मुलांचे शर्ट, शेरवानी यावर बॉर्डर, पाठीवरची आणि स्लिव्हवर बुट्टी म्हणून वापरता येतात. हल्ली भौमितिक प्रिंट्सचा ट्रेंड आहे. तो जगभर आहे. आपल्या पुरातन मंदिरांवर अशा प्रकारची असंख्य नक्षीकामे पाहायला मिळतात. त्यांचा उपयोग नक्कीच करता येतो. त्यामुळे नव्या राहणीमानाला जुळवून घेत आपला समृद्ध वारसाही जपता येईल.
(शब्दांकन – मृणाल भगत) viva.loksatta@gmail.com