अनिश पाटील

गेले काही दिवस श्रद्धा वालकर प्रकरण गाजते आहे. डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर एकत्र आलेल्या श्रद्धाने आफताब पूनावाला या तरुणाबरोबर लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. सध्या डेटिंग अ‍ॅपवरचा तरुणाईचा वावर वाढला आहे. मात्र या अ‍ॅप्स आणि समाजमाध्यमांच्या मदतीने फसवणुकीचे अनेक गुन्हे घडत असल्याने याबाबतीत तरुण वापरकर्त्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे ठरत आहे..

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

‘क्लब हाऊस’ या सोशल अ‍ॅपवरून जोगेश्वरी येथे राहणाऱ्या २३ वर्षांच्या तरुणीची अलोक सिंह नावाच्या तरुणाबरोबर ओळख झाली होती.. अलोकच्या प्रेमळ बोलण्यामुळे तो तिला खूप आवडू लागला.. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.. त्यातून ही तरुणी अलोकला भेटण्यासाठी वाराणसीला पोहोचली, पण त्यानंतर अलोकचे खरे रूप तिच्यासमोर आले. त्यातून तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.

या आभासी जगात झालेल्या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले आणि त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. अलोक हा उत्तर प्रदेशच्या वाराणसीचा रहिवासी असून तो तिला नेहमीच वाराणसीला येण्याचं निमंत्रण देत होता. त्यामुळे ती त्याला भेटण्यासाठी वाराणसीला गेली होती. तीन दिवस ती त्याच्याबरोबर त्याच्या घरी राहत होती. या वेळी त्याने तिच्याकडून २५ हजार रुपये घेतले. आणि बाथरूममध्ये आंघोळ करताना अलोकने तिचे चित्रीकरणही केले.  त्याच्याबरोबर असताना त्याच्या मोबाइलमध्ये तिने इतर काही तरुणींची आक्षेपार्ह छायाचित्रे आणि संदेश पाहिले होते. ती छायाचित्रे व संदेश पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडले होते. मुंबईत आल्यांनतर तिने दिलेल्या २५ हजार रुपयांची मागणी अलोककडे केली,  मात्र त्याने तिला पैसे देण्यास नकार देत तिचे अश्लील चित्रीकरण इन्स्टाग्रामवर एका महिलेच्या अकाउंटवरून प्रसारित केले. 

सध्या समाजमाध्यमांसह डेटिंग संकेतस्थळावर अनेक तरुणांचा हमखास वावर असतो.  या आभासी जगाची आता सर्वाना भुरळ पडली आहे. सध्या तरी त्याला कोणीही अपवाद नाही. या माध्यमांनी जगभरात राहणाऱ्या लोकांना जवळ आणले आहे, ही एक बाजू झाली. पण हे आभासी जग आपल्याला वाटते तेवढे खरेही नाही ही दुसरी बाजू आपल्याला चटकन लक्षात येत नाही. किंबहुना अनेकदा फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतरच त्याची जाणीव अनेकांना होते. तरुणाईचे प्रमाण यात मोठे आहे. आभासी जगाच्या माध्यमातून होणारी तोतयागिरी, माहितीचा गैरवापर, ब्लॅकमेलिंगचे प्रकार, सूड भावनेने बदनामी अशा विविध प्रकारे त्रासाला अनेकांना सामोरे जावे लागते आहे. एकटय़ा  मुंबईत समाजमाध्यमांवरून अथवा ईमेलद्वारे अश्लील संदेश पाठवल्याचे ३२१ गुन्हे दाखल झाले आहेत. बनावट प्रोफाइल, मॉर्फिगद्वारे अश्लील छायाचित्र तयार करून प्रसारित केल्याप्रकरणी १२६ गुन्हे दाखल झाले आहेत.  याशिवाय, सेक्सटॉर्शनचेही जवळपास ६८ गुन्हे मुंबईतच दाखल आहेत. अनेक जण लाजेपोटी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत, त्यामुळे फसवले गेलेल्यांचा हा आकडा दिसतो त्याहून मोठा असू शकतो. आणि म्हणूनच समाजमाध्यमांचे कितीही आकर्षण वाटले तरी हे माध्यम म्हणजे दुधारी तलवार आहे, हे कायम लक्षात ठेवून सतर्कतेनेच त्याचा वापर व्हायला हवा, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.  समाजमाध्यमांच्या वापरातून फसवणूक होण्याचे प्रकार नवीन नसले तरी त्यात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे, त्याचे कारण अर्थात त्याच्या वापरकर्त्यांच्या वाढत्या संख्येत आहे. आणि तरुणाई इन्स्टा, फेसबुकपासून डेटिंग अ‍ॅपपर्यंत अनेक प्रकारे समाजमाध्यमे आणि संकेतस्थळांचा मोठय़ा प्रमाणावर वापर करते.

नावात काय आहे? असे म्हटले जाते, पण समाजमाध्यमांवर कविता शर्मा, प्रियांका वर्मासारख्या प्रचलित नावांचा वापर करून बनावट प्रोफाइलद्वारे भामटय़ांचे खंडणी मागण्याचे प्रकार सुरू आहेत. गावदेवीमध्ये डेटिंग अ‍ॅप्लिकेशनवरून कविता शर्मा नावाच्या तरुणीसोबत झालेल्या मैत्रीनंतर तरुणाचे नग्न चित्रीकरण करून खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या तरुणाप्रमाणेच अनेकांना समाजमाध्यमांवर या नावाने मैत्रीचे प्रस्ताव येतात. अल्टामाउंट रोड परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला डेटिंग अ‍ॅपवर सोनाली गुप्ता या नावाने मैत्रीचा प्रस्ताव आला होता. तो मान्य केल्यावर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. दोघांनी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक एकमेकांना दिले. त्यानंतर सोनालीने टोपण नाव असलेल्या कविता शर्मा नावाने त्याला फेसबुकवरून मैत्रीचा प्रस्ताव पाठविला. तरुणाने तो स्वीकारला. त्यानंतर सोनालीच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. त्या वेळी या तरुणाचे आक्षेपार्ह स्थितीत चित्रीकरण करण्यात आले. थोडय़ा वेळाने सोनालीने या तरुणाला ती चित्रफीत पाठवून बदनामीची धमकी देत ३५ हजार रुपयांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार देताच सोनालीने ती चित्रफीत तरुणाची आई, बहीण आणि भावाच्या फेसबुक अकाउंटवर पाठवली. असे कित्येक प्रसंग, कित्येक घटना दररोज घडत आहेत. या घटनांचा माग घेत आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांनाही कठीण होत असल्यानेच तरुण पिढीने वैयक्तिक पातळीवर अतिशय सावधपणे इंटरनेट वा तत्सम समाजमाध्यमांचा वापर करावा, असे वारंवार आवाहन केले जाते. 

समाजमाध्यमे वा इंटरनेटच्या माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांचं स्वरूप थोडं लक्षात घेतलं पाहिजे. ही फसवणूक करणारे आरोपी ज्या राज्यात राहतात, तेथे फसवणूक न करता इतर राज्यांमधील नागरिकांना लक्ष्य करतात, त्यामुळे पोलिसांनाही लवकरात लवकर आरोपींपर्यंत पोहोचणे सहजशक्य होत नाही. मुळात अनेक प्रकरणांमध्ये तक्रारदार लाजेपोटी तक्रार करण्यासाठीच पुढे येत नाहीत. त्यामुळे त्याचाही फायदा आरोपींना होतो. गेल्या वर्षी सुमारे १०० नागरिकांचे पैसे गेले म्हणून ते पोलिसांकडे आले होते. त्या सर्वाना समजावल्यानंतर त्यातील केवळ एकाच व्यक्तीने अधिकृतरीत्या तक्रार दिली. त्यामुळे आरोपींवर कारवाई करणे कठीण होऊन जाते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. डेटिंग साइट, समाजमाध्यमांच्या या जगात सर्वानाच वाईट अनुभवच येतात, असे नाही. अनेक चांगल्या व्यक्ती या माध्यमांतून संपर्कात येतात. पण काही तरुणी समोरच्या व्यक्तीला न भेटता, फक्त फेसबुकवरील चॅटिंगवरून त्यांच्या फसवणुकीला बळी पडतात. अनेक तरुणी या ओळखीतून लिव्ह इन रिलेशनशिप ठेवण्याचा वा लग्नाचा निर्णय घेऊन मोकळय़ा होतात. पण या आभासी जगाला दुसरी काळी बाजू कायम लक्षात ठेवणेही गरजेचे आहे. त्यानंतरही फसवणूक झाल्यास न घाबरता तक्रार करण्यास पुढे आले पाहिजे. विशेष म्हणजे पोलिसांकडूनही अशा व्यक्तीची विशेष करून तरुणींची ओळख गुप्त ठेवली जाते. त्यामुळे भीतीपोटी तक्रार न करणे थांबवायला हवे.

विविध अ‍ॅप्स वा माध्यमांचा वापर करताना त्यांनी सुरक्षेसाठी म्हणून दिलेल्या पर्यायांची माहिती करून घेत त्याचा वापर वाढवला पाहिजे. उदाहरणच द्यायचं झालं तर व्हॉट्सअ‍ॅपवर ठेवलेले डीपी अनोळखी व्यक्तीला दिसू नयेत, यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा वापर करता येईल. समाजमाध्यमांवरही वैयक्तिक माहिती जाहीर करताना भान ठेवणे आवश्यक आहे. खास करून छायाचित्रे शेअर करताना विशेष काळजी घ्यायला हवी. समाजमाध्यमांवर त्रास देणारी व्यक्ती ही नेहमी अनोळखीच असेल, असे नाही. कित्येकदा ओळखीच्या व्यक्तीकडूनही त्रास देण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आपल्याबरोबर शिक्षण घेत असलेली वा काम करत असलेली व्यक्ती, प्रियकर, पूर्व नात्यात असलेली व्यक्ती, मित्र-मैत्रिणी यांच्याकडूही त्रास देण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. नाती बिघडली की, एकमेकांवर असलेला राग समाजमाध्यमांद्वारे व्यक्त केला जातो. त्यासाठी बनावट प्रोफाइलचा वापर केला जातो. कधी काळी विश्वासाने सांगितलेल्या पासवर्ड वा अन्य माहितीचा अशा वेळी गैरवापर करून प्रोफाइल हॅक केले जाते. त्यामुळे समाजमाध्यमांवरील प्रोफाइल पासवर्डसह अन्य माहिती ही गुप्त राहील याची काळजी घेतली पाहिजे.

याशिवाय, मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करतानाही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अशा अ‍ॅपच्या माध्यमातून आपली गोपनीय माहिती अजाणतेपणी शेअर केली जाते. त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो.  कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करताना प्रोटेक्ट फीचर ऑन करून ठेवावे. त्यामुळे जाहिरातीच्या माध्यमातून येणारे कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करणे टाळले जाते. मोबाइलवर परमिशन देताना अ‍ॅप तपासून घ्यावे, अशा काही गोष्टी लक्षात ठेवल्यास या आभासी जगात तुम्ही स्वत:ला सुरक्षित ठेवू शकता. वर म्हटलं तसं इंटरनेट वा समाजमाध्यमांच्या मदतीने अनेक चांगल्या गोष्टी घडतात. त्याचे फायदे अनेक आहेत, मात्र त्यावर पूर्णपणे अवलंबून राहून आपलं आयुष्य, आपली सुरक्षितता अन्य कोणाच्या हातात देण्याची चूक घडू नये यासाठी सावधगिरीने आणि हुशारीने या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा.