वैष्णवी वैद्य
महाराष्ट्राला मराठी साहित्याची अजरामर अशी परंपरा आहे. पिढय़ानपिढय़ा वेगवेगळय़ा स्वरूपात, मराठी साहित्य प्रगल्भ होत गेले. ग्रंथ, पोथ्या, संत वाङ्मय, नाटक, सिनेमा, पुस्तकं अशा अनेक कलाकृतींमधून मराठी साहित्याचे टप्पे आपण पाहिले आणि प्रत्येकाची नव्याने ओळख होत गेली. मराठी साहित्याप्रमाणेच समाजाला पुढे नेणारा, समृद्ध करणारा घटक म्हणजे तरुण पिढी. या पिढीचे चैतन्य, कल्पकता, विचारांची गती अशा अनेक तत्त्वांनी समाज बदलत गेला. या तरुण पिढीचे मराठी साहित्याबद्दलचे विचार, आवड आचरण आणि आत्मसात करण्याची पद्धत यात काही बदल झाला आहे का? असेल तर तो कशा पद्धतीचा.. अशा अनेक मुद्दय़ांवर वाचनवेडय़ा तरुणाईशी बोलून जाणून घेण्याचा प्रयत्न ‘व्हिवा’ने केला आहे.

वक्तृत्व किंवा संवादन हा एक महत्त्वाचा टप्पा आहेच, पण याची आवड जिथून निर्माण होते ते म्हणजे वाचन आणि व्यासंग. इंग्रजी पुस्तकांपासून का सुरू होईना, आजच्या पिढीची वाचन क्षमता वाढताना दिसते आहे. मराठी साहित्य समजायला, आकलन व्हायला थोडं कठीण पडतं असं अनेकांचं म्हणणं असतं; परंतु बऱ्यापैकी तरुण मंडळी आता वेगवेगळय़ा शैलीतील साहित्याचे वाचन करताना दिसतात. वाचनाच्या आवडीनिवडी बाबतीत ते घेत असलेल्या शिक्षणाचासुद्धा प्रभाव पडतो. विज्ञान आणि संशोधन क्षेत्राशी निगडित मुलं-मुली अच्युत गोडबोले, अब्दुल कलाम (मराठी अनुवाद), शिवाय जयंत नारळीकरांचे विज्ञानातील कल्पक कथांचे साहित्य अशी काही पुस्तकं आवर्जून वाचतात. ज्यांना भाषेची आणि मराठी वाचनाची गोडी लावून घ्यायची आहे त्यांचा कल सुधा मूर्तीच्या मराठी अनुवादित पुस्तकांकडे जास्त दिसतो. ती वाचायला, समजायला सोपी असतात असं मुलांचं म्हणणं आहे. अनेकदा साहित्याच्या बाबतीतही जे जे लोकप्रिय ते पहिल्यांदा वाचण्याची सवय असते, ज्याला तरुणाई अपवाद नाही हेही जाणवतं.

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Construction of Ram temple is due to Narendra Modi Raj Thackeray role
मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी, राज ठाकरे यांची भूमिका ; मनसे महायुतीच्या प्रचारात
uddhav thackeray and kangana
“भाजपाई कंगनाने तिचे अगाध ज्ञान पाजळून इतिहासाची…”, ठाकरे गटाचा टोला
Loksatta Lokrang Maharashtra Foundation is recognized in Maharashtra for awards in literary and social fields
पंचम देणे सामाजिक जाणिवेचे !

युवा लेखक आणि व्याख्याते पार्थ बावस्कर ‘व्हिवा’शी बोलताना सांगतात, तुम्ही जितकं चागलं वाचाल तितकं चांगलं तुम्हाला बोलावंसं वाटतं. आपल्यकडे विद्वान माणसाला ‘बहुश्रुत’ म्हणण्याची पद्धत आहे. याचा अर्थ जो चांगलं ऐकतो आणि वाचतो. माझ्या स्वत:कडे वेगवेगळय़ा शैलीतील एकूण दीड हजारच्या आसपास पुस्तकांचा संग्रह आहे. माझ्या व्याख्यानानंतर काही पालक मला येऊन सांगतात, ‘आमची मुलं वाचत नाहीत.’ त्यावर मी म्हणतो, तुम्ही स्वत: वाचताना दिसला नाहीत तर मुलं कशी वाचतील? याच संदर्भात बोलताना तरुण संवादक दिव्येश बापट सांगतो, ‘‘तरुणांना नक्कीच वाचनाची आवड आहे, पण चांगलं साहित्य त्यांच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचत नाही असं मला खूप वाटतं. आई-वडिलांकडून त्यांना त्यासाठी प्रोत्साहन मिळायला हवं. काय वाचावं आणि काय वाचू नये हे लहानपणापासूनच सांगितलं तर चांगलं साहित्य योग्य मार्गाने तरुणांपर्यंत पोहोचू शकेल. त्यातूनच चांगल्या वक्तृत्वाची निर्मिती होते. पुस्तकं वाचणं हा एक प्रकारचा अभ्यासच असतो. मला स्वत:ला आत्मचरित्रं वाचायला जास्त आवडतात. लोकांचे संघर्ष, अनुभव, जडणघडण आणि त्यातून तयार होणारे विचार हे वाचायला आवडतं. याव्यतिरिक्त रंजक कथा वाचायलाही आवडतात.’’

वाचनाचा बऱ्यापैकी व्यासंग असणारा मुंबईचा अक्षय आवारी सांगतो, ‘‘मी प्रिया तेंडुलकर, कविता महाजन यांसारख्या लेखिकांचं साहित्य सध्या वाचतो आहे. खरं तर वाचायला काय आवडतं हे व्यक्तिसापेक्ष आणि परिस्थितिसापेक्ष असू शकतं. आज कुठलं गाणं ऐकायचं हा जसा मूड असतो तसा काय वाचायचं याचाही मूड असू शकतो. यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वेगवेगळय़ा वयात वेगवेगळं साहित्य आवडू शकतं. मी कॉलेजमध्ये असताना टिळक, सावरकर, वगैरे खूप आवडीने वाचायचो. अभ्यास म्हणून किंवा त्या वयातली आवड म्हणूनही वाचायचो. रहस्यकथा मला वाचायची आवड नव्हती, पण जेव्हा मी ‘शोध’ आणि रत्नाकर मतकरींच्या गूढकथा वाचल्या तेव्हा मला आश्चर्य वाटलं की इंग्रजीत जसं डॅन ब्राऊनसारखं साहित्य आहे त्याहून अधिक तशाच प्रकारचं साहित्य मराठीतही आहे.’’

पु.ल. देशपांडे, व.पु. काळे, गो. नी. दांडेकर असे काही अजरामर साहित्यिक तरुणांच्या वाचन यादीत आजही सगळय़ात अग्रक्रमावर आहेत. ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून अनेक जण पुस्तकं, ग्रंथ, काव्य, नाटक या साहित्याचा लाभ घेत असतात; परंतु यातून खरंच साहित्याशी ते एकरूप होतात का? पार्थ बावस्कर याबद्दल सांगतात, ‘‘हा व्यक्तिपरत्वे अनुभव असू शकतो. पुस्तक वाचणं हा एक अनुभव आहे. हा अनुभव मिळवण्यासाठी कधी कोणाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते तर कधी कोणाला पहिल्याच प्रयत्नात ही अनुभूती मिळून जाते. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांचा बराचसा वेळ प्रवासात आणि इतर कामात जातो, त्या वेळी जर तुम्ही नव्या तंत्रज्ञानाची मदत घेऊन पुस्तकांचा आनंददायी अनुभव घेत असाल तर काय हरकत आहे! जिथून जे चांगलं आपल्याला मिळेल ते घेत राहावं.’’

अक्षयसुद्धा या मुद्दय़ावर दुजोरा देतो. ‘‘वाचनाची आवड कमी किंवा जास्त असं म्हणता येणार नाही, पण त्याचं माध्यमांतर जरूर झालं आहे. टाळेबंदीमुळे मुलांनी त्यांची त्यांची वेगवेगळी माध्यमं शोधून काढली आहेत. मला स्वत:ला पुस्तक हातात घेतल्यावर त्यावरून हात फिरवावासा वाटतो. पानांचा वास घ्यायला आवडतो. संग्रह करायला आवडतो, पण वेळेअभावी जर नवीन माध्यमं वापरून साहित्याची आवड जोपासली तर काहीच हरकत नाही. प्रत्येकाचा वाचनाचा व्यासंग हा त्याच्या त्याच्या पद्धतीने वाढतोच आहे,’’ असं अक्षय म्हणतो.

तरुणाई सध्या मोठय़ा प्रमाणावर वक्तृत्व आणि संवादनाकडेही वळते आहे. त्यांच्या या आवडीबद्दल बोलताना पार्थ सांगतात, ‘‘कुठल्याही विषयावर बोलण्याआधी तुम्हाला तो विषय आवडला पाहिजे. तुम्ही एखाद्या विषयावर लोकांचं मन जिंकण्याइतकं तेव्हाच बोलू शकता जेव्हा तुम्हाला तो विषय आवडलेला, पटलेला असतो. तुम्ही तो अभ्यासलेला असतो. याविषयी सावरकरांचं अतिशय सुंदर वाक्य आहे, त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही इतकी अलौकिक वक्तृत्व शैली कुठून आणता? तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही ज्या विषयावर बोलणार आहात त्याबद्दल तुम्हाला कमालीची तळमळ असेल तर मीच नाही कुणीही उत्तम वक्ता होऊ शकतो.’’ तरुणाईची ओढ असलेल्या वक्तृत्व कलेविषयी पुण्याचा अमेय खरे सांगतो, ‘‘वक्तृत्वाबद्दल बोलताना अभिव्यक्ती ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. प्रत्येक जण कुठल्या तरी पद्धतीने व्यक्त होत असतो. वक्तृत्व आणि संवादनाकडे तरुणाईचा कल आज वाढतोय, कारण त्याचा स्कोपही वाढतो आहे. सांस्कृतिक किंवा कुठल्याही पद्धतीच्या सार्वजनिक कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. आयोजक सतत चांगल्या वक्त्याच्या, निवेदकाच्या शोधात असतात. त्यामुळे तरुणांना त्यांचे वक्तृत्व सादर करण्याची किंवा लोकांशी वेगवेगळय़ा विषयांवर संवाद साधण्याची संधीही तितक्याच मोठय़ा प्रमाणावर आणि विविध माध्यमांतून उपलब्ध होते आहे.’’

तरुण वाचत नाहीत, हे सतत म्हणण्यापेक्षा त्यांच्या दृष्टीने साहित्याची, वाचनाची परिभाषा बदलत चालली आहे हे समजून घ्यायला हवं. मुक्तछंदी कवितांचा, चारोळय़ांचा हा काळ आहे. वैभव जोशी, गुरू ठाकूर, संदीप खरे, स्पृहा जोशी अशी अनेक नावं तरुणांचे आवडते कवी- गीतकार या यादीत तळ ठोकून आहेत. यमकाला यमक जोडण्यापेक्षा अगदी तरल अशी मुक्तछंदी कविता तरुणांना जास्त भावतात. वक्तृत्व, लेखन, संवाद, वाचन या सगळय़ाच गोष्टींची वाचनाशी नाळ जोडली आहे. तरुणाई काळानुरूप आपापल्या पद्धतीने हा व्यासंग जोपासते आहे. त्यांच्या या व्यासंगाला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने नवनवे स्वरूप प्राप्त झाले आहे हेही तितकंच खरं. त्यामुळे कदाचित सतत पुस्तकं घेऊन वावरण्यापेक्षा किंडलवर पुस्तकांचे कलेक्शन घेऊन वाचनात रमलेली वा ऑडिओ बुकवर पुस्तक ऐकण्यात रमलेली तरुणाई दिसते. कुठल्याही पद्धतीने असो वा कुठल्याही पद्धतीचे असो, तरुणाईचा साहित्याकडे आणि आपल्या भाषेतील साहित्याकडेही तेवढाच ओढा वाढलेला आहे हे चित्र सुखावणारे आहे.
viva@expressindia.com