w brand for women w brand for online shopping w online shopping brand zws 70 | Loksatta

‘ब्रॅण्ड’ टेल :  डब्ल्यू

हा ब्रॅण्ड १९७२ साली सुरू करण्यात आलेल्या ‘टीसीएनएस क्लोिदग कंपनी लिमिटेड’ या रिटेल कंपनीचा भाग आहे.

‘ब्रॅण्ड’ टेल :  डब्ल्यू
(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

‘डब्ल्यू’ हे इंग्रजी अद्याक्षराचे चिन्ह ही एकमेव ओळख घेऊन वावरणारा हा ब्रॅण्ड सध्या फॅशन बाजारात प्रचंड लोकप्रिय आहे. एथनिक क्लोदिंग ब्रॅण्ड्स म्हणून सध्या ऑनलाइन आणि प्रत्यक्ष बाजारपेठेत जे ब्रॅण्ड मानाने मिरवतात, त्यामध्ये हा ‘डब्ल्यू’ आघाडीवर आहे. मॉलमध्ये फिरताना अचानक ही इंग्रजी ‘डब्ल्यू्’ची एकमेव पाटी दिसली की तिथे आपल्याला हव्या त्या साइजची, रंगाची-ढंगाची कुर्ती वा कुर्ता-पायजमा-दुपट्टा असे ट्रेण्डी सेट सहज उपलब्ध होणार हा विश्वास तुम्हाला असतो. त्याचं कारण खास भारतीय स्त्रियांसाठी पारंपरिक कपडय़ांचा ब्रॅण्ड ही ओळख ‘डब्ल्यू’ने गेल्या काही वर्षांत कमावली आहे.

पूर्णपणे देशी निर्मिती आणि देशी कपडय़ांमध्ये नवे फॅब्रिक्स-नवे डिझाइन्स उपलब्ध करून देणाऱ्या या ब्रॅण्डला चाळीस वर्षांची परंपरा आहे. समकालीन स्त्रियांची अभिरुची, त्यांच्या गरजा लक्षात घेत नवनवे कलेक्शन उपलब्ध करून देण्यात हातखंडा असलेला हा ब्रॅण्ड १९७२ साली सुरू करण्यात आलेल्या ‘टीसीएनएस क्लोिदग कंपनी लिमिटेड’ या रिटेल कंपनीचा भाग आहे. या कंपनीची मुहूर्तमेढ त्रिलोक चंद आणि नरेंद्र सिंग यांनी रोवली होती. सुरुवातीच्या काळात स्त्री-पुरुष आणि लहान मुलांचे कपडे बनवणारी आणि निर्यात करणारी कंपनी असे याचे स्वरूप होते. आता या कंपनीच्या पंखाखाली ‘डब्ल्यू’, ‘विशफुल’ आणि ‘ऑरेलिया’ असे तीन ब्रॅण्ड आहेत. अर्थात, कंपनीचा चेहरामोहरा बदलणारा पहिला ब्रॅण्ड होता तो ‘डब्ल्यू’. आणि हा ब्रॅण्ड गल्ली ते दिल्ली नव्हे तर थेट परदेशातही लोकप्रिय करण्याचं श्रेय जातं ते ओ. एस. पसरिचा आणि ए. एस. पसरिचा या दोन भावंडांना.. भारतीय फॅशन आंतरराष्ट्रीय फॅशन बाजारपेठेत पोहोचावी हे स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या या दोन भावंडांनी त्यादृष्टीने केलेले प्रयत्न आज या ब्रॅण्डच्या रूपात डौलात उभे राहिले आहेत, असे सांगितले जाते.

लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर पिवळय़ा रंगातील ‘डब्ल्यू’ हाच लोगो का? यामागचे धागेदोरे फारसे उलगडले नसले तरी ‘डब्ल्यू्’ फॉर वुमेन हे मात्र आजही ठासून सांगितले जाते. शहरी भारतीय स्त्रियांची गरज ओळखून त्यानुसार कलेक्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २००१-०२च्या दरम्यान दिल्लीत लजपत नगर येथे या ब्रॅण्डचे पहिले स्टोअर सुरू करण्यात आले. आज जवळपास १६हून अधिक वर्षांच्या वाटचालीत या ब्रॅण्डने केवळ देशातच नव्हे तर मॉरिशस, श्रीलंका, काठमांडूसह अन्य देशांतही ४००हून अधिक स्टोअर्स उभे केले आहेत. याशिवाय, अ‍ॅमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट अशा कोणत्याही मोठय़ा ई-कॉमर्स साइटवर उपलब्ध असलेल्या फॅशन ब्रॅण्ड्सच्या मांदियाळीत ‘डब्ल्यू’चे कलेक्शन्स मोठय़ा संख्येने उपलब्ध आहेत. मुळात भारतीय फॅशनची बाजारपेठ आणि त्यातही स्त्रियांसाठीची फॅशन बाजारपेठ वेगाने बदलत गेली. भारतीय कपडे उद्योगात केवळ स्त्रियांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या फॅशन बाजाराचा २५ टक्के भाग हा ब्रॅण्डेड कंपन्यांनी व्यापला असल्याचे आर्थिक पाहणी अहवाल सांगतात. आणि या ब्रॅण्ड बाजारात एथनिक कुर्ते कलेक्शन हे वैशिष्टय़ ठेवत ‘डब्ल्यू’ने आपले स्थान पक्के केले आहे.

फॅशन बाजारात कितीही आधुनिक वारे वाहिले असले तरी भारतीय स्त्रियांसाठी आजही कुर्ता-पायजमा हा मूळ पारंपरिक पेहरावच सोईचा आणि मोठय़ा प्रमाणावर वापरला जाणारा असा प्रकार आहे. ‘टीसीएनएस क्लोिदग कंपनी लिमिटेड’ची सुरुवात झाली तेव्हा मोठय़ा प्रमाणावर ड्रेस मटेरियल विकत घेऊन ते शिवण्याकडे स्त्रियांचा कल होता. हळूहळू नोकरदार स्त्रियांचे प्रमाण वाढत गेले आणि ड्रेस शिवून घेण्यापेक्षा तयार ड्रेस विकत घेणे ही त्यांची गरज बनली. कपडय़ांच्या मागणीत झालेला हा बदल वेळीच लक्षात घेऊन ‘डब्ल्यू’ने रेडिमेड कुर्ते मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध करून दिले. त्या वेळी अशाप्रकारे रेडिमेड कुर्ता-पायजमा किंवा नुसतेच कुर्ते उपलब्ध करून देणारा हा एकमेव ब्रॅण्ड होता असे म्हणता येणार नाही. त्या वेळी बाजाराची गरज लक्षात घेऊन अनेक देशी-परदेशी कंपन्यांनी तशा पद्धतीचे एथनिक कलेक्शन्स उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे ब्रॅण्ड्सच्या या गर्दीत आपलं वेगळेपण ठरवताना ‘डब्ल्यू’ने कुत्र्यांवर अधिक लक्ष केंद्रित केलं.

रेडिमेड कुर्ते उपलब्ध करून देताना विविध फॅब्रिक्स, डिझाइन्स आणि िपट्र्सचा वापर केला गेला. मात्र कोणत्या गोष्टी या पारंपरिक पेहरावाला नावीन्याची झळाळी देतील याचा विचार करतानाच रोज कामावर जाणाऱ्या स्त्रियांसाठी या पेहरावात सुटसुटीतपणा कसा येईल, यावर अधिक भर दिला गेला. आणखी एका गोष्टीवर या ब्रॅण्डने अधिक लक्ष दिले ते साइजवर. मुळात रेडिमेड कपडे घेण्याकडे सगळय़ाच स्त्रीवर्गाचा कल नव्हता. त्यामागे एकतर सवयीचा भाग होता आणि दुसरा आपल्या साइजनुसार परफेक्ट ड्रेस मिळेल का ही चिंता. अनेक ब्रॅण्डसनी अमेरिकन- युरोपियन साइझ चार्ट्सचा आधार घेऊन कलेक्शन्स डिझाइन केले होते. ज्यामध्ये अनेक भारतीय स्त्रियांना आपल्या मापाचे तयार कपडे मिळवणे अवघड होऊन बसले होते. त्यामुळे केवळ भारतीय स्त्रियांच्या गरजेनुसार कलेक्शन सादर करणारा ब्रॅण्ड म्हणून मिरवताना ‘डब्ल्यू’ने हा साइज चार्टचा प्रश्न सोडवण्यावर जास्त भर दिला. भारतीय स्त्रियांची शारीरिक ठेवण, उंची आणि प्रमाणबद्धता यांचा अभ्यास करत काही नव्या साइज ‘डब्ल्यू’ने उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे भारतीय एथनिक कलेक्शन सादर करणारा ब्रॅण्ड ही ओळख हळूहळू अधिक घट्ट होत गेली. ब्रॅण्डचे डिझाइनर्स परदेशातील फॅशन ट्रेण्ड्स, भविष्यातील बदल यावर लक्ष ठेवून आपले कलेक्शन्स डिझाइन करत असले तरी सुटसुटीत-आरामदायी कपडे आणि खिशाला परवडतील अशा भावात ते उपलब्ध करून देणे यावर ब्रॅण्डचा जोर कायम राहिला आहे.

‘डब्ल्यू’च्या प्रसारासाठी ऑनलाइन मार्केटिंग वा कोणत्या मोठय़ा कलाकाराला हाताशी घेत नाव मोठे करण्याचा प्रयत्न कंपनीने किमान ‘डब्ल्यू’च्या बाबतीत केलेला नाही. त्याऐवजी ब्रॅण्डशी वर्षांनुवर्षे  बांधल्या गेलेल्या ग्राहकांनी ‘डब्ल्यू’ हे नाव सर्वतोमुखी करत ब्रॅण्डची बाजारपेठ वाढवली आहे, असे या ब्रॅण्डच्या कर्त्यांकडून सांगितले जाते. केवळ कपडय़ांपुरते मर्यादित न राहता त्या त्या कलेक्शन्सनुसार आवश्यक अशा अ‍ॅक्सेसरीज, ज्वेलरी सगळे ब्रॅण्डकडून उपलब्ध केले जाते. अर्थात, ब्रॅण्डचा व्याप आणि कलेक्शन कितीही वाढले तरी ‘डब्ल्यू’ म्हणजे खास वेगवेगळय़ा प्रकारचे, डिझाइन्सचे कुर्ते ही समस्त स्त्री मनात ठसलेली प्रतिमा कायम राहणार आहे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
एकांकिका जगताना..

संबंधित बातम्या

क्लिक पॉईंट : ‘गौरी’ ते ‘इंद्रायणी’

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अहो ऐकता का.. चोरट्या बाईने ‘हे’ एक वाक्य म्हणत सोनाराला घातला लाखोंचा गंडा; Video बघा आणि सावध व्हा
FIFA World Cup 2022 : कोरिया बाद फेरीत, उरुग्वेचे आव्हान संपुष्टात
FIFA World Cup 2022: अर्जेटिनाच्या मार्गात ऑस्ट्रेलियाचा अडथळा
मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींच्या मंजुरीमुळे दिलासा
न्यायवृंद व्यवस्था पारदर्शकच; ती कोलमडून पडू नये; सर्वोच्च न्यायालयाचे मत