लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडता येणार नसल्याने तुमच्या- आमच्या भटकंतीला ब्रेक लागेल असं सगळ्यांनाच वाटलं होतं, मात्र ही भटकंती काही थांबलेली नाही. अनेकांनी घरबसल्या ऑनलाइन भटकंतीविषयक मालिका पाहणं सुरू केलं. इतिहास, खाद्यसंस्कृती, साहस, फोटोग्राफी असे विविध पैलू उलगडत सुरू असलेल्या या प्रवास मालिकांच्या माध्यमातून व्हच्र्युअल का होईना, भटकं ती मोड ऑन आहे.

दीपेश वेदक

कुठे फिरायला जायचं तर अनेकदा आपण प्रसिद्ध पर्यटन स्थळं, समुद्र किनारे, संग्रहालये, अभयारण्ये यांना भेट द्यायचा विचार करतो. नेटफ्लिक्सवर सुरू असलेली ‘डार्क टुरिस्ट’ ही मालिका मात्र या ठिकाणांना भेट न देता एका वेगळ्या प्रवासाला तुम्हाला घेऊन जाते. पत्रकार डेव्हिड फेरीअर रहस्यमय ठिकाणांना भेट देत तिथली अचंबित करणारी रहस्यं सर्वांसमोर उलगडण्याचा, प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न या प्रवास मालिकेमध्ये करतो. डेव्हिडच्या नजरेतून तुम्ही जगभरातील अद्भुत ठिकाणांना भेट देऊ शकता. लॉकडाऊन काळात अनेकांनी घरी बसून ही मालिका पाहण्याला पसंती दिली. आपल्यापैकी अनेकजण एखाद्या रविवारी फिरायला जायचं तर बाईक ट्रीपला पसंती देतात. २०१७ मध्ये सुरू झालेली ‘दी काईन्डनेस डायरीज’ ही मालिका बाईक राईडला जाणाऱ्या अनेकांनी पुन्हा बघितली. या मालिकेत लिऑन लोगॉथेटिस आपली व्हिन्टेज मोटारबाइक घेऊन प्रवासाला निघाला आहे. एखाद्या प्रवासाला निघताना हा प्रवास आपल्या खिशाला परवडेल का हा विचार नेहमीच आपल्या डोक्यात येतो. पण लिऑनच्या या प्रवासात त्याला भेटलेल्या अनोळखी व्यक्ती आणि त्यांच्या दयाळूपणामुळे त्याला जगभर फिरणं शक्य झालं आहे. ना त्याच्याकडे पैसे आहेत, ना झोपायला छत, ना खायला अन्न, पण जगभरचा प्रवास करायची इच्छा असलेल्या या भटक्या माणसाला जगभरातील चांगल्या माणसांची सोबत मिळते आणि हा प्रवास तुमच्या प्रवासाला एक वेगळा दृष्टिकोन देऊन जातो.

‘नॅशनल जिओग्राफिक’ चॅनेल आणि ‘नेटफ्लिक्स’वर सुरू असलेली ‘टेल्स बाय लाईट’ ही मालिका लॉकडाऊन काळात पाहिली गेली. भटकंती करताना फोटो काढायला तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आवडतं. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिके तील काही उत्कृष्ट फोटोग्राफर्सनी त्यांचे उत्तम फोटो आणि त्या फोटोमागची कथा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न या मालिकेत केला गेला आहे. एखादा उत्तम फोटो काढताना कॅमेऱ्याच्या मागे काय घडतं? हे समजून घेतानाच कोणत्या गोष्टींमुळे हे फोटो जगभरात सर्वोत्तम ठरले, हे या मालिकेत पाहता आलं. भोवतालचा निसर्ग आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचं तुम्ही ठरवत असाल तर ही मालिका तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन देऊन जाईल आणि लॉकडाऊननंतरच्या भटकंतीसाठी तुम्ही सज्ज व्हाल.

एखादी सुट्टी मिळाली की पिकनिक म्हणून इगतपुरी किंवा महाबळेश्वरला हॉटेल बुकिंग करणाऱ्यांची आपल्याकडे कमी नाही. अशा पर्यटकांसाठी ‘इन्स्टंट हॉटेल’ ही मालिका पसंतीची ठरली आहे. २०१७ पासून सुरू असलेल्या या मालिकेत ऑस्ट्रेलियातल्या काही घरमालकांनी आपल्या घरांना हॉटेलमध्ये रूपांतरित करायचं ठरवलं. एकमेकांच्या हॉटेलमध्ये रूपांतरित केलेल्या या घरांमध्ये राहून त्यांनी बेस्ट इन्स्टंट हॉटेल निवडण्याचं ठरवलं आहे. मालिकेचे आता दोन सीझन पूर्ण झाले असून हे सगळे प्रतिस्पर्धी आता ऑस्ट्रेलयामधील प्रसिद्ध उद्योजक झाले आहेत. आपल्या छोटेखानी घरात लॉकडाऊन संपेपर्यंत काय नवीन करता येईल, ते अजून छान कसं सजवता येईल हे अनेकांनी या मालिकेतून पाहिलं.

‘दी कॉलिंग’ ही मालिकाही लॉकडाऊनमध्ये खूप पाहिली गेली. आपल्या बकेटलिस्टमधल्या ठिकाणांना भेट देण्याची संधी तीन भटक्यांना मिळते आणि ही लिस्ट पूर्ण करतानाच ते एकमेकांबरोबर स्पर्धाही करतात. त्यांच्या या प्रवासात तिथली खाद्यसंस्कृती, परंपरा, पर्यटन स्थळे तुम्हाला पाहता येतात. आणि या तिघांपैकी कोण जिंकेल याची उत्सुकताही लागून राहते, कारण या स्पर्धेत विजेत्याला एक शिष्यवृत्ती मिळणार आहे, ज्यात एक वर्षभर विनाखर्च जगभरात कुठेही फिरता येणार आहे. या स्पर्धेतल्या वेगवेगळ्या घडामोडी, आव्हाने आणि आकर्षक ठिकाणं प्रेक्षकांना शेवटच्या भागापर्यंत स्क्रीनसमोरून हलू देत नाहीत.

अनेक जण आपल्या घरच्यांबरोबर सुट्टीत फिरायला जातात. हलक्याफु लक्या प्रवास मालिकेच्या शोधात असणाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये ‘ट्रॅव्हल विथ माय फादर’ ही मालिका पाहिली. नेटफ्लिक्सवरची सर्वात विनोदी प्रवास मालिका कोणती तर हीच. वेगवेगळ्या इंग्रजी मालिकेतून प्रेक्षकांना हसवणारा जॅक व्हाईटहॉल हा विनोदी नट आपल्या वडिलांना घेऊन भटकंतीला निघाला आहे. तर ‘स्टीफन फ्राय इन अमेरिका’ या मालिकेत ब्रिटिश लेखक आणि अभिनेता स्टीफन फ्राय आपल्या फेमस लंडन ‘ब्लॅक कॅब’मधून निघाला आहे अमेरिका फिरायला. या मालिकेत ब्रिटिश आणि अमेरिकन संस्कृती, त्यांच्या भिन्न जीवनशैलीतील फरक समजून घेताना अमेरिकेबद्दलचं स्टीफन फ्रायचं कुतूहल आणि अचूक वेळ साधत त्याने केलेले विनोद पाहणाऱ्याला या मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत स्क्रीनसमोर टिकवून ठेवतो.

‘स्ट्रीट फूड’ पेक्षा भटकंतीसाठी दुसरं उत्तम कारण नाही. म्हणूनच यूटय़ूब आणि सोशल मीडियावर उपलब्ध असलेले व्हिडीओ लोकांनी लॉकडाऊनमध्ये पुन्हा पाहिले. याच आशयाची ‘स्ट्रीट फूड’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीची ठरली. ही मालिका तुम्हाला जगभरच्या खाद्यसफरीवर घेऊन जाते. जगभरातले फूड जॉइंट्स, त्यांचे शेफ, त्यांच्या कथा तुम्हाला या मालिकेत पाहता येतील. नेहमीच्या त्याच त्या खाद्य मालिका किंवा हॉटेलच्या सफारी पाहण्यापेक्षा काही तरी नवीन शोधणाऱ्या प्रेक्षकवर्गाला स्थानिक खाद्यसंस्कृती टिकवणाऱ्या या जागा आणि तिथल्या शेफसोबत मारल्या गप्पा, त्यांनी सांगितलेल्या कथा तोंडाला पाणी आणल्याशिवाय राहत नाहीत. ‘डिस्कव्हरी’, ‘फूड फूड’, ‘टीएलसी’, ‘ट्रॅव्हल एक्सपी’ या वाहिन्यांवरील मालिकाही प्रेक्षकांनी या काळात पाहिल्या.

‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर ‘एक्स्पेडिशन अननोन’ या मालिकेत जगभरातील दंतकथा आणि त्या मागची रहस्यं उलगडण्यासाठी अमेरिकन टीव्ही होस्ट आणि शोधक प्रवासी जोश गेट्स एका अद्भुत प्रवासाला निघाला आहे. या मालिकेच्या प्रत्येक भागात एक दंतकथा, त्यासाठी जोशने केलेला प्रवास, त्याला भेटलेली माणसे, त्याचे संशोधन, त्या दंतकथेमागची रहस्य प्रेक्षकांपुढे उलगडली आहेत. सध्या मालिकेचा सहावा सीझन सुरू असून जोश गेट्सची ही भटकंती लॉकडाऊन काळात पाहायला अनेकांना आवडली. भटकं तीप्रिय तरुणाईसाठी लॉकडाऊनच्या काळात हे शो एक प्रकारे वरदान ठरले आहेत.

viva@expressindia.com